SAMPADA DESHPANDE

Horror

4  

SAMPADA DESHPANDE

Horror

उर्वशी - भाग ३

उर्वशी - भाग ३

10 mins
613


१९०० चा सुमार कालीघाट नावाचं एक छोटंसं गाव होतं. ते ठाकूर कुटुंबियांच्या मालकीचं होतं. गावात त्यांना राजासारखा मान होता. रावसाहेब ठाकूरांना तीन मुले होती, मोठे रुद्रप्रताप, मधले राजवर्धन आणि धाकटे राजवीर. रुद्रप्रताप आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कारभार सांभाळत होते. मधले राजवर्धन यांना देवधर्माची आवड होती त्यातच ते व्यस्त असत. त्यासाठी त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. राजवीर लहान असल्याने त्यांच्यावर काहीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे नेमबाजीचा सर्व करणे आणि जंगलात हिंडणे हीच त्यांची दिनचर्या होती. राजवर्धन यांना देवधर्माची आवड असल्यामुळे त्यांनी गावात एक सुंदर देवालय बांधून घेतले होते. त्याचा मुक्काम देवळातच असे. त्या देवळात सतत होम हवन चालू असे. दूर दूरवरून ब्राम्हण येऊन त्या देवालयात होम हवन आदी कार्यांमध्ये स्वतःची हजेरी लावत असत. राजवर्धन त्यांच्या या तपश्चर्येमुळे इतके तेजस्वी दिसत कि कधी कधी त्यांचे वडीलही त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत. पावसाळी दिवस होते. राजवीर नेहेमीप्रमाणेच देवालयात आले. संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती गुरव शिवशंकराच्या पिंडीवरील अभिषेक पात्रात दूध ओतत होते. राजवीर गाभाऱ्यात आलेले पाहताच गुरवांनी हसून अभिवादन केले. देवळात असताना कोणीही त्यांना नमस्कार करायचा नाही असा नियम त्यांनी घालून दिला होता. या ठिकाणीच काय संपूर्ण जगात देवाइतकं शक्तिशाली कोणीच नाही. तेंव्हा मान झुकवायची तर फक्त देवापुढे असे ते म्हणत. गुरव त्यांचे काम करून निघून गेले. राजवीर शंकरापुढे घ्यान लावून बसले. पण काही केल्या त्यांचं चित्त स्थिर होईना. मनावर कसलेसे मळभ आल्यासारखे वाटत होते. मग ते बाहेर येऊन सरोवराकाठी गेले. ती जागा अत्यंत रमणीय होती. तिथे गेल्यावर त्यांना नेहमीच प्रसन्न वाटत असे. ते सरोवराच्या शांत नितळ पाण्याकडे पाहत बसले . अचानक त्या पाण्याचा रंग बदलून काळा झाला. आता मात्र ते दचकले. हि गोष्ट काही सेकंदातच घडली. लगेच सरोवराचे पाणी पूर्वीसारखे झाले. पण राजवर्धन यांना इतकाच इशारा पुरेसा होता. आपल्या गावावर काहीतरी संकट येणार याची त्यांना खात्री पटली. काय होणार ? कधी होणार ? कसे होणार ? हे त्यांना समजत नव्हते. पण होणार हे नक्की हे त्यांना समजत होते. असेच काही दिवस गेले. सगळे सुरळीत चालू राहिले. मग राजवर्धनही थोडे शांत झाले. कदाचित आपल्याला भास झाला असेल असे समजून ते शांत झाले आणि आपल्या देवकार्याला लागले.  


एक दिवस गावाच्या वेशीजवळ राहणार काही लोक रावसाहेब ठाकुरांकडे तक्रार घेऊन आले, जंगलातून प्राणी येऊन त्यांची गाईगुरे यांना जंगलात ओढून नेतात. गावप्रमुख हात जोडून त्यांना म्हणाला," मालक कायतरी उपाय करा. नायतर आमच्यावर उपाशी मारायची वेळ येईल." मग रावसाहेब त्यांना म्हणाले,"ठीक आहे मी राजवीरला याविषयी सांगतो. तो बघेल नक्की काय झालंय ते उगाच मुक्या प्राण्यांना मारणं बरोबर नाही जे काही होतंय याची शहानिशा करूनच मग निर्णय घेऊ." मग रावसाहेबांनी राजवीरला तातडीने बोलावले. राजवीर तडक महालात आला. आल्या - आल्या ठाकूर त्याला म्हणाले,"राजवीर हे गावकरी तक्रार घेऊन आले आहेत कि जंगलातून काही हिंस्त्र प्राणी येऊन आपल्या गाईगुरांना ठार करत आहेत. तुम्हाला याविषयी काय माहिती आहे?" राजवीर म्हणाला," पिताश्री ! माझ्याही कानावर या गोष्टी आल्या होत्या. म्हणून मी स्वतः जंगलात जाऊन या गोष्टीची शहानिशा करायचा निर्णय घेतला आणि माझ्या सहकाऱ्यांना घेऊन गेलोही. जंगलात काही अंतरावर गेल्यावर मला मृत प्राण्यांचे देह दिसले आणि ते हि पूर्ण . फक्त त्यातील रक्त कोणीतरी शोषून घेतल्याप्रमाणे ते झाले होते. जर हे काम हिंस्त्र प्राण्याचे असते तर त्यांनी पूर्ण प्राणी खाऊन कठीण भाग जसे खूर, शिंगे, हाडे असे भाग बाकी ठेवले असते परंतु इथे असे काहीच नव्हते. म्हणून हे कोण करते आहे याचा शोध घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी व माझे सहकारी आजच निघणार आहोत. गावकऱ्यांनो तुम्ही घरी जा. लवकरच हा त्रास बंद होईल. असे मी आश्वासन देतो.

 

मग त्याच रात्री राजवीर आणि त्याचे सहकारी निघाले. निघताना ते शिवमंदिरात राजवर्धन यांना भेटायला गेले. कोणत्याही कामाला निघताना

शिवशंभूचा आणि राजवर्धन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायची राजवीर यांची पद्धत होती. परंतु त्याला राजवर्धन भेटले नाहीत. शंकराचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. ते खूप सावधगिरीने जात होते. गावाच्या वेशीबाहेर जंगल लागत होते. ते आत आत निघाले. आपला सामना कोणाशी आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती. परंतु जे काही आहे ते वाघ आणि सिंहापेक्षा भयंकर आहे हे त्यांना समजले होते. खूप शोध घेऊनही त्यांना काही सापडले नाही मग राजवीरने दोन दोनचे गट बनवले. मग ते निघाले राजवीरबरोबर त्याचा एक मित्र होता. दोघेही खूप आत गेले. रात्रीची वेळ असल्याने हिंस्त्र श्वापदांच्या आवाजाने त्यांचा थरकाप होत होता. तरीही ते पुढेपुढे जात होते. इतक्यात राजवीरच्या मित्राला समोरच्या झुडपात हालचाल जाणवली. त्याने राजवीरला सावध केले. ते पटकन दबा धरून बसले. मग ती हालचाल जोरात होऊ लागली. त्याचा सुमार घेऊन राजवीरने बाण सोडला. बाण सावजाला लागलाच असणार याची राजवीरला खात्री होती. इतक्यात एका स्त्रीच्या किंकाळीचा आवाज आला आणि ते दचकले. आवाजाच्या दिशेने ते धावत गेले. त्यांच्याबरोबरच त्या किंकाळीच्या रोखाने त्यांचे सहकारीही धावत आले. जंगलात जनावरे असणे यात काही वेगळे नव्हते पण एक स्त्री असणे हि आश्चर्याची गोष्ट होती. मग राजवीर पुढे गेला. मशालीच्या उजेडात त्याला एक आदिवासी स्त्री बेशुद्ध पडलेली दिसली. त्या उजेडात तिचे अप्रतिम सौंदर्य उठून दिसत होते. राजवीर तिचे लावण्य बघून हरखून गेला होता. शिकारी स्वतः शिकार झाला होता. बाण तिच्या पायाला लागला होता. मग ते सगळे तिला घेऊन राज्यात आले. ते तिला घेऊन वेशीजवळ येताच शिवमंदिरात घंटानाद होऊ लागला. बाहेर बसलेल्या राजवर्धनना गावाच्या वेशीवरून एक काळोखापेक्षाही काळे काहीतरी गावात येताना दिसत होते. ते गावाच्या आत यायच्याआधी थांबवायला हवे याची त्यांना जाणीव झाली. ते घाईने निघाले. पण इतक्यात त्यांना समोरून राजवीर आणि त्याचे सहकारी त्या जखमी स्त्रीला घेऊन येताना दिसले. त्यांनी देयालयाबाहेरच्या एका ओसरीवर तिला ठेवले. तिला आता शुद्ध आली होती. राजवीर मुग्धपणे तिच्याकडे पाहत होता. तीही त्याच्याकडे बघून गोड हसली. राजवर्धन मात्र तिच्याकडे बघून दचकले कारण त्यांच्या तपस्वी नजरेला तिचे खरे रूप दिसले होते. त्यांना तिच्या ओठातून डोकावणारे सुळे दिसले होते. ती गावात यायच्या आत आपण तिला रोखायला हवे होतं.


आपल्याला उशीर झाला याचा त्यांना पश्चाताप झाला. ते म्हणाले," यांना इकडे उघड्यावर ठेवण्यापेक्षा मंदिराच्या आत नेऊ म्हणजे त्यांची सुश्रुषा करता येईल." राजवीर तत्परतेने तिला हात द्यायला उभा राहिला. देवळात जाण्याच्या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावर घबराहट पसरली. ती राजवीरचा हात धरून म्हणाली," नको नको मंदिरात नका नेऊ आपण इतकी तसदी घेऊ नये. मी आता ठीक आहे, मी माझ्या घरी जाते." राजवीरला तिचा हात सोडवेना तो म्हणाला," नाही नाही मी तुला या जखमी अवस्थेत जाऊ देणार नाही. तू माझ्या महालात चल." राजवर्धन काही बोलायच्या आत ते निघालेही. मग काही दिवसांनी राजवीरनी आपण तिच्याशी म्हणजे उर्वशी बरोबर लग्न करत असल्याचे जाहीर केले. उर्वशी हे नावही त्यानेच तिला दिले होते. ठाकूर या लग्नाच्या विरुद्ध होते. मग एक दिवस जंगलात जाऊन उर्वशी आणि राजवीर लग्न करून आले. तिने येताना तिचे काही लोक बरोबर आणले होते. उर्वशीने त्यांच्या पहिल्याच रात्री म्हणजे आमावस्येला तिच्या जवळ आतुरतेने आलेल्या राजवीरला त्यांच्यातले बनवले. मग राजवीरने त्याच्या कुटुंबियांना. हळू हळू लोकांचे देवळात येणे बंद झाले. राजवर्धन चिंतीत झाले. त्यांच्याबरोबर होमासाठी येणारे ब्राम्हणही येईनासे झाले. राजवर्धनना दिवसोंदिवस गावातील बदलत जाणारी परिस्थती दिसत होती. दिवसा रस्त्यावर लोक दिसत नव्हते. रात्री मात्र दिवसासारखी वर्दळ होती. त्यांच्या घरच्या लोकांचीही

खूप दिवसात काही खबरबात मिळाली नाही. त्यांचे आईवडील दोन महिन्यात देवळाकडे फिरकलेही नव्हते. मग एक दिवस मंदिरात पूजा केल्यावर ते त्यांच्या वाड्यात जायला निघाले. राजवर्धन सहसा देवळाचे आवर सोडून जात नसत. निघताना त्यांनी देवळातली पवित्र विभूती बरोबर घेतली होती. ते त्यांच्या हवेलीवर आले. बाहेर कोणीही सेवक, पहारेकरी दिसले नाहीत. मग ते आत गेले पूर्ण हवेली ओस पडली होती. मग ते एक एक खोली फिरून पाहू लागले.


प्रथम ते आईवडिलांच्या खोलीत गेले. आईवडील त्यांना शांत झोपलेले दिसले. नेहेमी सूर्योदयापूर्वी उठणारे त्यांचे आईवडील असे का झोपलेत त्यांना प्रश्न पडला. संपूर्ण हवेलीच्या खिडक्या काळ्या रंगाने रंगवल्या होत्या जेणेकरून ऊन आत येणार नाही. संपूर्ण हवेलीत एक विचित्र गारवा पसरला होता. मग त्यांनी आईवडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोळे उघडले आणि मग परत थकल्यासारखे मिटून घेतले. मग राजवर्धननी त्या खोलीतल्या खिडक्या उघडायला सुरवात केली. जसे ऊन त्यांच्या आईवडिलांच्या अंगावर पडले तसे त्यांची त्या भागातली त्वचा जळू लागली व ते वेदनेने विव्हळू लागले. तशी राजवर्धन यांनी घाईने खिडक्या परत लावल्या. मग ते त्यांच्या मोठ्या भावाच्या आणि राजवीरच्या खोलीत गेले. तिकडेही तशीच परिस्थिती होती. देवघरातले देव अस्ताव्यस्त झाले होते. कितीतरी महिन्यात त्यांची पूजा झाली नव्हती. संपूर्ण हवेलीत त्यांना उर्वशी कुठेच दिसली नाही. हे सर्व तिचे आणि तिच्या साथीदारांचेच काम आहे हे त्यांनी ओळखले. मग ते त्यांना शोधत शोधत तळघरात गेले. तर तिकडे त्यांना मशालीच्या उजेडात भयानक दृश्य दिसले. उर्वशी आणि तिचे नऊ साथीदार तळघरात लाकडी पेट्यांमध्ये झोपले होते. खाली ओलसर रेती होती. तिच्यामध्ये किडी वळवळत होत्या. तरीही ते शांत झोपले होते. झोपेत उर्वशीचे रक्ताळलेले सुळे उठून दिसत होते. राजवर्धनच्या अंगाचा थरकाप झाला. मग ते घाईने वर आले. हवेलीच्या आवारातल्या विहिरीचे पाणी आणून त्यांनी देवांची पूजा केली. मग देव एका कापडात बांधून घेतले. कारण आता यापुढें त्या ठिकाणी देवांची पूजा कधीच होणार नव्हती. निघण्यापूर्वी त्यांनी हवेलीभोवती सुख्या पडलेल्या खंदकात देवळातली विभूती टाकली. संपूर्ण हवेलीभोती विभूतींचे रिंगण घातले. आता ते बाहेर येऊ शकणार नव्हते. त्यांच्या विनाशाचा मार्ग शोधेपर्यंत त्यांना हवेलीत थोपवणे गरजेचे होते.


मग राजवर्धन देवळात आले. त्यांनी आर्तपणे शिवशंकरापुढे विनवणी केली. "या गावावरचे संकट तूच मला दाखवलेस आता ते टाळण्याचा उपायसुद्धा तूच सुचव "असे त्यांनी कळवळून सांगितले. मग त्यांनी ध्यान लावले. थोड्या वेळाने ते भानावर आले. रात्र झाली होती. गावात गजबज चालू झाली होती. राजवर्धन यांना उर्वशीचे मूळ ठिकाण शोधायचे होते. तिथेच त्यांना पुढचा मार्ग मिळणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. गावाच्या वेशीबाहेर पडले. वेशीबाहेर येताच त्यांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विभूतींची रेखा ओढली. गावातून बाहेर पडायचा तोच एक मार्ग नव्हता पण ते गाव संपल्याचं आणि गावाची सुरवात झाल्याची प्रतीक होतं. साधारणपणे राजवीरने सांगितल्याप्रमाणे जिथे उर्वशी जखमी अवस्थेत सापडली त्या बाजूला त्यांनी चालायला सुरवात केली. हळू हळू जंगल दाट होत गेले. दिवसाही काळोख दिसू लागला.  इतक्यात अचानक काही आदिवासी लोकांनी त्यांची वाट आडवली. ते लोक खूप घाबरलेले वाटत होते. मग राजवर्धन यांनी त्यांच्या प्रमुखाला ते कशासाठी आले आहेत हे सांगितले. मग ते लोक त्यांना गावात घेऊन आले. आणि मग राजवर्धन यांना कळली उर्वशीची कथा.


उर्वशीचे पूर्वीचे नाव तानी होते. ती त्यांच्याच जमातीतली स्त्री होती. रूपाने अतिशय देखणी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. या आदिवासी जमातीत आपल्यायोग्य एकही तरुण नाही याची तिला कल्पना होती. अशीच एक दिवस जंगलात भटकताना तिला एक परदेशी पुरुष जखमी अवस्थेत पडलेला दिसला. ती त्याला त्यांच्या गावात घेऊन आली. रात्री तो शुद्धीवर आला. तानी त्याच्याजवळ त्याची सेवा करायला अखंड बसून होती. तिला त्याच्या रूपाची भुरळ पडली होती. तो शुद्धीवर आल्यावर तिला म्हणाला," तू खूप सुंदर आहेस. पण काही कालावधीने हे सौंदर्य लोप पावेल. तू वृद्ध होशील आणि मरशील. जर तुला चिरतरुण व्हायचे असेल तर तुला माझ्याबरोबर यावे लागेल. तानी त्याच्यावर भाळली होती. तो जे म्हणेल ते करायची तिची तयारी होती. मग तो तिला घेऊन निघाला. गावातला एक तरुण त्या दोघांच्या पाठीमागे गेला. त्याचं तानीवर खूप प्रेम होतं. तो सतत तिच्या मागे मागे असायचा पण ती त्याला नेहेमीच उडवून लावायची. तो तानी त्या परक्या माणसाबरोबर जाते तिला काही अपाय होऊ नये म्हणून तो गुपचूप जात होता. गावाची हद्द संपल्यावर तो एका डोंगराच्या दिशेने गेला तानी भरवल्यासारखी त्याच्या मागे जात होती. तो त्या डोंगरातल्या एका कपारीत गेला. तो तरुणही सावधगिरीने त्यांच्या मागे गेला. आणि त्याला एक भयानक दृश्य दिसले. तो परदेशी तरुण आता त्याच्या मूळ रूपात आला होता. त्याच्या तोंडातून भयानक सुळे डोकावत होते. त्याने खुणेनी तानीला जवळ बोलावले. ती भरवल्यासारखी त्याच्याजवळ गेली. मग त्यांनी त्याचे सुळे तिच्या मानेत रुतवले आणि तिचं रक्त पिऊ लागला. हे पाहणाऱ्या त्या तरुणाचा थरकाप झाला. त्याने पहिले कि तो माणूस तानीला एक पेटी दाखवत होता. लवकरच सूर्योदय होणार होता. तो माणूस एका पेटीत जाऊन झोपला आणि तानी दुसऱ्या पेटीत. सूर्योदय झाल्यावर हळूच तो तरुण त्या कपारीत गेला. तिकडे दहा पेट्या होत्या. त्यात दहाजण झोपले होते. त्याचे सुळे बाहेर डोकावत होते आणि त्यांना रक्त लागलं होतं. तो तरुण धावत गावात आला आणि त्याने गावातल्या लोकांना सावध केले. सगळे या बातमीने हादरले होते.


त्यांनी गावाबाहेर कपारीकडून येणाऱ्या रस्त्यावर लाकडांचा ढीग केला होता. रात्र होताच त्यांनी तो पेटवला. इतक्यात तानी पलीकडून येऊन तिच्या आईला आवाज देऊ लागली. लोकांनी नाही म्हणत असतानाही आईने तिला आत यायचा रस्ता दाखवला. शेवटी आईचं काळीज होतं ते. तानी आली एकटीच नाही तर तिच्या साथीदारांनाही घेऊन आली ती अमावस्येची रात्र होती. त्या रात्री गावात हाहाकार माजला. त्यांनी लोकांचे रक्त प्यायचा एकाच धडाका चालवला. काही लोक देवळात लपल्यामुळे वाचले. सकाळ झाल्यावर त्या तरुणाने सगळ्यांना तानीची हकीगत सांगितली. असेच चालू राहिले तर आपली जमात नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. मग त्यांनी संसर्ग झालेल्या सर्व लोकांना एकत्र जमवले आणि गावाच्या मध्यावर एक मोठी चिता पेटवून त्यांना जाळले. जळताना ते आक्रोश करत होते. परंतु शेवटी ते नष्ट झाले. त्यातच तानीला भुरळ पडणारा तो राक्षस गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावातल्या लोकांनी त्याला खांबाला बांधून जाळले. तानी मात्र तिच्या साथीदारांबरोबर त्या कपारीत गेली. त्यांना जाळणे केवळ अशक्य होते. मग त्या गावच्या मांत्रिकाने एक मंतरलेला पवित्र धागा त्या कपारीच्या प्रवेशदवरापाशी बांधला जेणेकरून ते आतच राहतील. त्यांचा प्रमुख जळाल्याने त्यांची शक्ती कमी झाली होती. तरी ते निरुपद्रवी नव्हते. थोडे कमजोर झाले होते त्यामुळे त्यांना बांधणे शक्य होते. ते ज्याचे रक्त पितात तोही त्यांच्यासारखाच होतो यांच्यावर उपाय एकच कि त्यांना जाळले पाहिजे. जर पुरले तरी ते नष्ट होणार नाहीत. आम्ही त्यांची मूळ जागेत म्हणजे त्या कपारीत गेलो आणि त्यांची विश्रमाची जागा म्हणजे त्यांच्या पेट्या तोडल्या. त्यामुळे ते बेघर झाले.त्यांना लपणे आवश्यक झाले दिवसाचे ऊन ते सहन करू शकत नाहीत “ मग राजवर्धन म्हणाले तुमच्या हकीगतीवरून असे वाटते कि त्या कपारीत त्याची मूळ जागा असेल आणि तो धागा कोणत्यातरी कारणाने तुटला असेल. त्यामुळे ते बाहेर आले. आणि आमच्या गावात त्यांना राजवीर घेऊन आला. एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणची व्यक्ती जर त्यांना घेऊन गेली तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. ठीक आहे मी आपला आभारी आहे." असे म्हणून राजवर्धन परत निघाले. राजवर्धन यांना त्या आदिवासींनी सुचवलेला मार्ग मान्य नव्हता ते सर्व लोक मृत नव्हते अर्धमृत होते आणि आपलीच माणसांना असे जाळणे त्यांना जीवावर आले होते. मग ते गावात परत आले.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror