SAMPADA DESHPANDE

Horror

3.4  

SAMPADA DESHPANDE

Horror

उर्वशी - भाग २

उर्वशी - भाग २

11 mins
736


तो एक भटका मुसाफिर होता. त्याला आठवत होतं तेंव्हापासून त्याची भटकंती चालूच होती. त्याच्या जन्माच्या वेळेस ते राहत असलेल्या झोपडीसमोर एक साधू आला होता. काळासावळा परुंतु अतिशय तेजस्वी. तो "भिक्षांदेही" म्हणून दारात उभा राहिला. ओली बाळंतीण असलेली त्याची आई घरातल्या वाटीभर कण्या घेऊन आली आणि त्याच्या झोळीत टाकल्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली," बाबा ! इतकंच हाय माझ्यापाशी." ते साधू हसून म्हणाले,"माते तुझ्यापाशी जे आहे ते आजन्म देवाची सेवा करणाऱ्या माझ्यापाशीपण नाही बघ." तिचा प्रश्नार्थक चेहरा बघून तो म्हणाला," तू नुकताच एका मुलाला जन्म दिला आहेस ना ! तो अतिशय दुर्मिळ मुहूर्तावर जन्माला आला आहे. त्याच्या अंगात जन्मतःच अभूतपूर्व शक्ती आहेत. ज्या आम्ही जन्मभर तपस्या केल्यावरही मिळू शकत नाहीत. तो पुढच्या आयुष्यात खूप महान कार्य करेल." हे सर्व ऐकणारे त्याचे वडील म्हणाले,' बाबा ! हे घरातलं पाचवं मूल आहे. खरंतर हिला दिस राहिले तवाच पडून टाकनार व्हतो. सगळे उपाय बी केले पण ह्यो मूल पडेचना. काय झाला समजतच नाय. आता तुमी सांगतासा कि ह्यो आगळा हाय. आवो म्या तर हि झोपल्यावर या पोराला नदीवर सोडून येणार व्हतो. आता तुमी म्हंताय कि ह्यो मोठा हुन लय मोटा काम वगैरे करणारे. बगा बाबा आमाला तर ह्यो पोरगा नको हाय. तुम्ही घेवून जावा याला आनि बनवा कि मोटा मानूस वगैरे. आमाला ह्यो पोर नको." साधूबाबांना त्या माणसाचा बिलकुल राग आला नाही ते परिस्थितीपुढे मजबूर होते. मग ते म्हणाले," ठीक आहे तुमच्या मुलाला मी नेतो. पण तो परत तुमच्याकडे येणार नाही. माझ्या हातात दिल्यावर तुमचा याच्याशी असलेला संबंध संपेल. मान्य आहे का ते सांगा." त्या बाळाच्या वडिलांनी त्वरित हे मान्य केले आनि नुकतेच जन्मलेले ते मूल साधूबाबांच्या हातात आणून दिले. त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद होता. आईच्या डोळ्यात मजबुरी होती. मग साधूबाबा त्याला घेवून निघाले. त्या बाळाला हातात घेताच त्यांच्या तोंडातून अवचित बाहेर पडले " शंभू " हेच नाव ठेवायचं बाळाचं त्यांनी ठरवलं .तो गोरापान घाऱ्या डोळ्याचा बालक त्यांच्याकडे न घाबरता बघत होता. " शंभू तुझी देखभाल करायचा योग आला खरंच मी किती भाग्यवान आहे. आता तुझी सेवा तूच करून घे माझ्याकडून." असं म्हणून ते निघाले.


हे कार्य आपल्या हातून व्हायचं म्हणून आपली पावले या गावाकडे वळली. हे त्यांनी मनोमन ओळखले.मजल दर मजल करत ते आपल्या छोट्याशा कुटीजवळ आले. रस्त्यात अन्न-पाण्याची कमतरता पडली नाही. लोक आपणहूनच त्यांना फळे आणि बाळाला दूध आणून देत होते. हळू हळू शंभू मोठा होत होता. त्याच्यातल्या शक्तीचा प्रत्यय बाबांना येत होता. तो कधी एका जागी राह्यचाच नाही . सतत भटकत राहायचा आणि बाबा मात्र एका सामान्य मुलाप्रमाणे त्याची काळजी करत राहायचे शंभूला वाईट शक्तिची जाणीव लगेच व्हायची आणि त्या शक्ती त्याला स्पर्श करू शकायच्या नाहीत. शंभू आता ४ वर्षांचा झाला होता तो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप बुद्धिमान आणि समजूतदार होता. एक दिवस अचानक बाबांच्या छातीत कळ आली. आता आपण फार जगणार नाही याची त्यांना जाणीव झाली. मग त्यांनी शंभूला बोलावले आणि ते म्हणाले," बघ बेटा! तुझा जन्म एका मोठ्या कार्यासाठी झाला आहे. तुला फार मोठ्या शक्तींशी सामना करायचा आहे. स्वतःला कणखर बनव कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नकोस. त्या शंभू महादेवाने तुला काहीतरी उद्देशाने जन्माला घातले आहे.ते कार्य तो तुझ्या हातून करून घेईलच. फक्त ती वेळ आली कि हार मानू नकोस. माझे आशीर्वाद नेहेमीच तुझ्या पाठीशी राहतील. असं बोलून बाबानी प्राण सोडला. बाबा होते म्हणून शंभू त्या जागेशी बांधला गेला होता. आता तो बांध तुटला. बाबांचे अंत्यसंस्कार झाल्यावर तो निघाला. पाय नेतील तिथे जाऊ लागला. कधी त्याचा मुक्काम शंकराच्या देवळात असायचा तर कधी गावाबाहेरच्या स्मशानात. कधी कोणा धनिकांच्या घरी तर कधी गरीबाच्या झोपडीत. तर कधी झाडाखाली. त्याला सगळ्याच जागा सारख्या होत्या. मुळातच तो दिसायला देखणा, लोखंडच्या कांबीसारखं शरीर अनेक बायका स्वतःहून पुढाकार घ्यायच्या. त्याला मोहात पडण्याचा प्रयत्न करायच्या. पण या विषाला त्याने आपल्यापासून दूर ठेवलं होतं. अनेक लोक त्याला साधू समजून आशीर्वाद घ्यायला यायचे. काही ना काही मागायचे. तो चमत्कार करून दाखवेल या आशेवर त्याच्या मागे लागायचे. अशा लोकांना तो योग्य मार्ग दाखवून मदत करायचा.आयतं काहीच मिळत नसतं सगळ्यासाठी कष्ट घयावे लागतात हे पटवून द्यायचा. उगाच अंधश्रद्धांना खतपाणी घालू नका असे लोकांना सांगायचा. लोक त्याला ‘शंभुनाथ’ म्हणायचे. तो कधी एका ठिकाणी थांबायचाच नाही. मात्र ज्यांना त्याची गरज आहे तिथे न सांगता जायचा. असाच एकदा तो रात्रीचा झाडाखाली झोपला होता. पाठ लांब करताच त्याला गाढ झोप लागली होती. झोपेत त्याला एक गाव दिसले.


छोटंसं टुमदार गाव होतं ते . वेशीजवळच सुंदर शंकराचं मंदिर होतं. त्याच्याजवळच सुंदर स्वच्छ तलाव होता. वेळ सकाळची होती सगळे लोक आपापल्या दिनचर्येत व्यस्त होते. एक व्यक्ती शंकराच्या देवळाकडे लगबगीने निघाली होती. ती व्यक्ती उंच, धिप्पाड होती. वय अंदाजे सत्तरीच्या आसपासचे होते. ती व्यक्ती चेहऱ्याने करारी दिसत होती.(ते अण्णासाहेब देशमुख होते.) ते शिव शंकरच्या मंदिरात गेले. त्यांनी गाभारा साफ केला. मग शंकराच्या पिंडीवर स्वतःच्या हाताने आधी पाण्याचा मग दुधाचा अभिषेक केला. पिंडीची पांढऱ्या फुलांनी पूजा केली. ते त्यांच्या हातून इतक्या सहजतेने होतं होते कि तो कित्येक वर्षांपासूनचा दिनक्रम असावा. मग ते पिंडीपुढे ध्यानस्थ बसले. परंतु त्यांचे चित्त कशाने तरी विचलित होतं होते. मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला व ते बाहेर येऊन बसले. शंभू स्वप्नात त्यांचे निरीक्षण करत होता. हा माणूस खरा शिवभक्त असावा. शंभू मनात म्हणत होता. इतक्यात त्यांचे लक्ष समोरच्या तलावाकडे गेले. आणि ते दचकले तसा शंभू सुद्धा समोर पाहू लागला. जे अण्णासाहेबांना दिसले तेच त्यालाही दिसले. त्या सरोवराचे पाणी एकदम काळेकुट्ट झाले होते आसपास एक दुर्गंधी जाणवत होती. एक अत्यंत वाईट शक्ती आसपास असल्याचा तो संकेत होता. मग क्षणात सगळे ठीक झाले. इतक्यात शिरपा येऊन अण्णासाहेबांशी बोलू लागला. त्यांच्या बोलण्यावरून शंभूला समजले कि गावात सुधारणा करायला नवीन संस्था येणार आहे. का कोणास ठाऊक त्याला वाटत होते कि त्यांनी गावात येऊ नये. पण तो काहीच करू शकत नव्हता. मग तो त्याला त्या संस्थेच्या लोकांचा स्वागत समारंभ दिसत होता. जेव्हा ते लोक गाडीतून उतरले तेव्हा शंभूच्या मस्तकातून एक सणक गेली. काहीतरी खूप खूप वाईट त्या स्थळी आहे याची त्याला जाणीव झाली. ते लोक उतरले. सुवासिनींना ओवाळणीसाठी नकार देताना ते त्या पवित्र दीपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत याची त्याला जाणीव झाली. मग त्याने उर्वशीकडे पहिले, तिचे संपूर्ण भाषण त्याने ऐकले. भाषणाच्या शेवटी ती हसली तेंव्हा जे कोणालाच दिसले नाही ते शंभूला दिसले ते म्हणजे तिच्या लाल ओठांमधून डोकावणारे दोन सुळे. कधी नव्हे तो शंभू घाबरला. मग त्याने तिच्या सर्व साथीदारांकडे पहिले ते सर्वही तिच्यासारखेच असल्याची त्याला जाणीव झाली. त्या सुंदर गावावर एक मोठे संकट येऊ घातले होते. काय करावे काहीच शंभूला समजत नव्हते.


मग त्याला दुसरे दृश्य दिसले. एक टेम्पो त्या दहाजणांचे सामान एका जुन्या हवेलीत उतरत होता. त्या सामानात दहा मोठाल्या पेट्या होत्या. शंभूला त्या पेट्यांच्या आत असलेली ओली रेतीही दिसत होती. "देवा ! काय हे ! कोण लोक आलेत या गावात." तो मनात विचार करत होता. दुसऱ्या दिवशीपासून त्या गावाच्या विकासाची कामे सुरु होणार होती. ते दहाजण हवेलीवर यायला निघाले होते. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला सरपंच आबा देशमुख त्यांना हवेलीच्या गेटपर्यंत सोडायला गेले. निरोप घेताना उर्वशीने त्यांच्याशी हात मिळवला आणि ती सूचक हसली. आबा तिच्या त्या इशाऱ्यांनी पुरते पागल झाले होते. मग सगळे आत गेल्यावर इकडे तिकडे बघत आबा हळूच तिच्या मागे गेले. मग शंभूला दिसले कि तिच्या खोलीत आबा तिला जवळ घ्यायला गेला आणि तिचे भयानक सुळे त्याच्या मानेत रुतले. थोड्या वेळानी सगळे एक एक करून आबाचे रक्त प्यायले. शंभूला ते भयानक दृश्य बघवत नव्हते. तो डोळेही मिटू शकत नव्हता कारण तो स्वतः स्वप्नात होता. दुसऱ्या दिवशी श्रमदानाला सुरवात झाली सूर्यास्तानंतर सगळे जण या दहा सदस्यांबरोबर जमून काम करत होता आणि सगळ्यात पुढे सरपंच आबा देशमुख होता. रात्री उशिरापर्यंत सगळे काम करत होते. इकडे आबा घरी आला. त्याची पत्नी त्याची जेवायला वाट बघत होती. तिला आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. ती ओट्याजवळ जेवण गरम करत होती. इतक्यात आबाने जाऊन तिला मागून धरले. ती हसून म्हणाली," अवो ! हे काय सुचतंय भलतंच तुमास्नी?" ती पाठमोरी असल्याने आबाच्या डोळ्यात उतरलेले रक्त आणि ओठातून बाहेर आलेले त्याचे सुळे तिला दिसलेच नाहीत. ती बोलत असतानाच आबाने तिच्या मानेत आपले सुळे रुतवले आणि तो रक्त पिऊ लागला. मग त्याच्यामागून उर्वशी आणि तिचे साथीदारही आले. त्यांनी आबाच्या मुलांचेही रक्त पिऊन त्यांना मारून टाकले.

दर आमावस्येला असे होऊ लागले. हळू हळू गावात बदल होतोय हे अण्णासाहेबांच्या लक्षात आले. दिवसा गावातली गजबज कमी होऊ लागली होती आणि रात्रीचे गावात लोक फिरू लागले होते. शंकराच्या मंदिराकडे कोणी फिरकेनासे झाले होते. 


एक दिवस अण्णांनी या प्रकारचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. हल्ली दिवसा गावात गावात फारशी वर्दळ नसेच. अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब देवळात निघाले होते. पहिले ते दोघे दिसले कि लोक त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नसत पण आबा देशमुख सरपंच झाल्यापासून त्याने अण्णासाहेबांविरुद्ध लोकांना भडकवण्यास सुरवात केली होती. साधे भोळे लोक त्यांना खरंच असे वाटू लागले कि अण्णासाहेबांना गावचा विकास व्हायला नकोय त्यामुळेच ते गावात सुधारणा करत नव्हते. वास्तविक पाहता अण्णासाहेबांचा गावातल्या लोकांवर अतिशय जीव होता. ते सर्वांवर मुलांप्रमाणे प्रेम करत असत. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही परदेशात स्थायिक झाले होते. मुलगा सून, मुलगी जावई नातवंड सगळे त्यांना तिकडे बोलवत होते. पण अण्णा आणि माई स्वतःच्या गावाला सोडून यायला तयार नव्हते. आता गाव सोडायची वेळ आली होती का? पण गावातल्या लोकांना शिवशंकराच्या देवळाला सोडून ते कुठे जाणार होते? गावात काहीतरी भयाण घडत आहे हे त्यांना जाणवत होते. त्यांना रात्र रात्र झोप लागत नसे. अशाच एका रात्री त्यांना जाग आली. त्यांनी वड्याच्या गॅलरीतून बाहेर डोकावून पहिले. तर रस्यावर दिवस असल्याप्रमाणे लोक फिरत होते. इतक्यात त्यांना सरपंच आबा देशमुख समोरून जाताना दिसला. तो झोपेत असल्याप्रमाणे चालत होता . आण्णा बाहेर पडून त्याच्या मागे निघाले. त्यांच्याकडे शिवाचा अंश असलेल्या त्यांचे गुरु ध्यानानंदानी मंतरून दिलेलं सोन्याच्या गोफात घातलेलं पदक होतं. ते गळ्यात असल्यावर त्यांना कसलीच भीती नव्हती. हे सर्व पाहणाऱ्या शंभूला अण्णांना सावध करावंसं वाटत होतं. पण तो हतबल होता. अण्णा आबाच्या मागे जात होते. आबा जवळच असलेल्या शिरपाच्या झोपडीकडे गेला आणि त्याने दार वाजवले. अण्णा खिडकीतून पाहू लागले. दिवसभर काम करून दमलेला शिरपा झोपला होता. तो दचकून उठला. सरपंच दारात पाहून त्याने आदराने त्यांना आत बोलावले. पुढचं दृश्य पाहून अण्णा हादरले. आबा शिरपाचं रक्त पीत होता. "बिचारा शिरपा आता आपल्याला दिसणार नाही." या कल्पनेनी आण्णा हताश झाले. ते गुपचूप घरी आले. गावात काय चाललं आहे याची त्यांना कल्पना आली. याचं मूळ ती दहा माणसं आहेत हेही त्यांना समजलं. 


ते वाड्याकडे परत आले. त्यांनी पाहिलं कि माईसाहेब उठवून त्यांना शोधत होत्या. मग त्यांनी माईसाहेबांना सगळी कथा सांगितली. त्या भीतीने थरथर कापू लागल्या. इतक्यात त्यांचा दरवाजा वाजला. अण्णा आणि माई दोघे खाली गेले. मुख्य दरवाजात शिरपा उभा होता. जणू काही झाले नाही असा." अण्णासाहेब येक काम व्हता. भायेर येताव का ?" तो बाहेर का बोलावतोय याची कल्पना अण्णांना आली. ते म्हणाले ," शिरपा ! अरे ये कि आत. तू काय परका आहेस का ?" शिरपा घाईनी आत येऊ लागला. दारात पाय ठेवण्याआधीच बाहेर फेकला गेला. मागे आबा देशमुख उभा होता. अण्णासाहेब म्हणाले," तुमच्यासारख्या वाईट शक्तींना या वाड्यात जागा नाही. हा वाडा बांधताना मी या वाड्याभोवती शिवाच्या नामजपाचे पवित्र रिंगण घातले आहे. चालते व्हा. मी तुमच्यातला कधीच होणार नाही त्याआधी मी स्वतःला जाळून घेईन." हे सर्व ऐकणाऱ्या शंभूला आण्णासाहेबांच्या धैर्याचे कौतुक वाटले. मग आबा म्हणाला," तुम्हीही इथेच आहात आणि आम्हीही बघू किती दिवस वाचता ते. चल रे शिरपा." ते निघून गेले. अण्णांनी "शिव शिव.' म्हणत दार बंद केले. आत आल्यावर ते माईंना म्हणाले," उद्या सकाळीच आपण गाव सोडायचा. हा गाव आपण राहायच्या योग्यतेचा राहिला नाही. "पण हे गावापुरतंच मर्यादित राहणार नाही. ते सगळीकडे पसरेल. मग काय करायचं?" माईंनी घाबरून विचारले. "उद्या जाताना आपण शंकराला साकडं घालूया. कि हि कीड गावापुरतीच राहूदे. बाकी आपल्या हातात काहीच नाही.चला आवरायला घ्या. " अण्णा आकाशाकडे हात करत म्हणाले. मग त्यांनी गरजेपुरते कपडे पारंपरिक देवाच्या मूर्ती, दागदागिने असे सर्व सोबत घेतले आणि सूर्योदयाची वाट पाहू लागले. सूर्य उगवला. गावात शांतता पसरली. मग ते निघाले. शिवाच्या देवळात गेले. शिवेवर अभिषेक केला. माईंच्या डोळ्यात पाण्याच्या धारा होत्या. त्या म्हणाल्या," देवा ! अजूनपर्यंत आम्हाला, या गावाला मुलाप्रमाणे संभाळलेस. पण हे संकट गावावर आले आहे. इच्छा नसतानाही हे गाव सोडून जावे लागत आहे. विनंती इतकीच कि हे संकट या गावातच थोपव. आम्ही जाऊ तिकडे तू आमच्या बरोबर असशीलच. देवा हि पण तुझी मुले आहेत यांचं रक्षण कर." माईंनी असे बोलल्यावर गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश पसरला. त्याचे एक वलय तयार झाले. माई आणि अण्णा त्या ववलयात शिरताच ते हलू लागले. मंदिरातून बाहेर पडल्यावर

अण्णासाहेबांनी शंकराच्या मंदिरासमोर असणाऱ्या तलावाकडे पहिले. त्याचे सुंदर नितळ पाणी आता लालभडक दिसत होते. ते डोळ्यातले पाणी थोपवून निघाले. ते गावाच्या वेशीबाहेर पडेपर्यंत ते वलय त्यांच्या भोवती होते. ते वेशीबाहेर पडताच ते वलय मोठे होऊन गावाभोवती पसरले. आता गावात कोणी जाऊ शकणार नव्हते किंवा गावातले कोणी बाहेर येऊ शकणार नव्हते. अण्णांनी मागे वळून गावाला नमस्कार केला आणि मग ते त्यांच्यासाठी बोलावलेल्या गाडीत बसले. ते आता परदेशातल्या त्यांच्या मुलांकडे जाणार होते. आज त्या गोष्टीला वीस वर्षे होऊन गेली.                 .


...आणि शंभू स्वप्नातून जागा झाला. तो घामानी निथळत होता. कधी नव्हे ती त्याला भीती वाटत होती. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती हे जे काही आहे ते आपल्याला मुद्दाम दाखवण्यात आले आहे. आपण त्या गावात जाऊन त्या शक्तीचा बिमोड करायचा आहे. आपला जन्म याच कामासाठी झाला आहे. पण हे गाव कुठे आहे ? त्याचं नाव काय ? मग त्याच्या मनात एक नाव उमटले "ध्यानानंद" अण्णासाहेबांचे गुरु. शंभूने त्यांचे समरण केले. ध्यानानंदांचा प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा त्याच्या समोर उमटला. तो म्हणाला," हे स्वामी मला हे सगळे दृश्य का दिसले हे मी जाणतो. परंतु या बाबतीत मी पूर्ण अज्ञानी आहे. ती जागा कोणती आहे? ती शक्ती कोण आहे ? विरुद्ध बाजूला एक अत्यंत प्रभावी आणि ताकदवान अशी शक्ती आहे. मी तिला पुरा पडेन का? शंका वाटते. सुरवात कुठून करू ? ते मार्गदर्शन करा. आपण माझ्याबरोबर राहाल ना ? कृपया सांगा." मग प्रसन्न हसत ध्यानानंद म्हणले,"पुत्र! ते एक माधवपूर नावाचे गाव आहे. छोटेसे आणि सुंदर त्याच्यावर शिवशंकराचा अभयहस्त होता. पण गावातला एक जण एका वाईट शक्तीला या गावात घेऊन आला आणि या सुंदर गावाची पूर्ण वाताहत झाली. जशी आबा देशमुखची निवड त्या शक्तीने गावात प्रवेश करण्यासाठी केली, तशी देवाने तुझी निवड केली आहे गावाला या शक्तीपासून सोडवण्यासाठी केली आहे. तुला त्या शक्तीशी लढा द्यायचा आहे. त्यासाठी तुला तिचे मूळ शोधून काढावे लागेल. कारण मुळावरच घाव घातला कि ते कमजोर होतील. मग त्यांचा नायनाट करणे सोपे जाईल आणि तिचे मूळ आहे." "उर्वशी" शंभू पटकन म्हणाला.


आता आपण या सगळ्यापासून मागे फिरू शकत नाही हे त्याला समजले. आपल्याला जावेच लागणार याची त्याला खात्री पटली. तो आता नीट विचार करू लागला. या शक्तीशी लढा द्यायचा तर आपल्याला संपूर्ण माहिती हवी. एकूण दृष्यावरून हि उर्वशी सगळ्यांची प्रमुख दिसते आहे. ती कोण आहे ? कुठून आली ? तिचं मूळ स्थान काय ? याची माहिती असल्याशिवाय आपल्याला तिला हरवण्याचा उपाय सापडणार नाही. मग त्याने आपल्या गुरुचे नाव घेऊन ध्यान लावले. इकडे माधवपूरला हवेलीच्या तळघरात दहा पेट्यांमध्ये दहाजण ओल्या मातीत झोपले होते. त्यांच्यातल्या सर्वात वेगळ्या पेटीत शांतपणे उर्वशी झोपली होती. तिला माहित होतं ती अमर आहे. तिला हरवू शकेल अशी शक्ती या जगात नाही. तिचा हा भ्रम दूर करण्यासाठी लवकरच गावात शंभू येणार होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror