Jyoti gosavi

Drama

2.7  

Jyoti gosavi

Drama

त्या दोघी

त्या दोघी

7 mins
646


त्या दोघी खरेतर एकाच वयाच्या फरक होता तो फक्त आर्थिक आणि सामाजिक स्तराचा.


एक होती सीमा माझ्या शेजारी राहणारी मुलगी, वडील बँकेत, आई शिक्षिका, एक मुलगा एक मुलगी असे चौकोनी कुटुंब. सख्खे शेजारी असल्याने आमचे एकमेकांकडे जाणे-येणे होते, काही चांगलं चुंगले केलं की वाटीत घालून देणे घेणे होते.


दुसरी होती आमच्या कामवालीची मुलगी, ‘सरु...!’ जवळपासच्या एरियातील झोपडपट्टीत राहणारी, कर्नाटकातली, रंगाने काळीकुट्ट, दोन्ही नाकात चमकी घालणारी, कानडीत हेल काढून बोलणारी, कधीमधी आईला मदत म्हणून तिच्यासोबत येऊन घर कामाला हातभार लावणारी तर कधीकधी आई आजारी म्हणून एकटीच येऊन फटाफट कामे करणारी. काम एकदम झटपट, कामाचा उरक दांडगा, राहायला स्वच्छ आणि चटपटीत! आई एकदम अडाणी म्हणजे अक्षरशत्रू, तर ही त्यामानाने चार बुके शिकलेली म्हणजे बरोबर चौथी पास.


एक दिवस सकाळी सकाळी सरुची आई माझ्या घरी आली आणि दार उघडल्याबरोबर हंबरडा फोडून रडायलाच लागली. माझ्या हॉलमध्ये गडाबडा लोळून सरुच्या नावाने ओरडायला लागली. तिच्या त्या हेल काढून रडण्याने आणि मध्येच तोंडातून हवा गेल्यासारखा "फुस्स" आवाज पुन्हा "माझी सरु" यामुळे काय घडले ते मला कळेना.


तिच्या त्या आरडाओरड्याने माझ्या शेजारणी पण जमा झाल्या, कारण आमची कामवाली कॉमन होती. माझ्या तर छातीत एकदम "धस्स" झाले. अगं बाई काल तर चांगली होती, आज काय झालं तिला? एकाएकी? कुठे अपघात वगैरे झाला का? कोणी काही केले का? इत्यादी शंका माझ्या मनात डोकावल्या.


“सरुची आई आधी रडणे थांबव आणि काय झाले ते मला सविस्तर सांग. तिला बरं नाही का? तिला दवाखान्यात न्यायचं आहे का? त्यासाठी पैसे पाहिजेत का?” तिला शांत करत मी पाण्याचा तांब्या भरून तिच्या हातात दिला. "आधी तोंड धू बरं! पाणी पी आणि न रडता शांतपणे सांग.”


तिने कशीबशी चूळ भरली, तोंड धुतलं, स्वतःच्या पदरात शेंबूड शिंकरला आणि कानडीमध्ये हेल काढून सरूवर शिव्यांचा भडीमार सुरू केला. “काय सांगू ताई! पळून गेली की वो रांड... त्या भाड्याचा हात धरून पळून गेली. तिला लई "जवानी" आली होती. माझ्या तोंडाला काळे फासून गेली.”


अशा परिस्थितीत माझ्या मनात एक विनोदी विचार आला. आधीच या मायलेकी डांबरासारख्या काळ्या, यांच्या तोंडाला जर काळं फासलं तर त्या कशा दिसतील? असो.


”अगं बाई! मला समजेल अशा भाषेत सांग...” मी बोलले


"ताई मला रॉकेल द्या पेटवूनच घेते...”


“ए बाई! नको-नको माझ्या घरात असले काही करू नकोस...” मी पटकन बोलले. कारण मी शेवटी स्वार्थी समाजातील होते ना! जर खरोखरच हिने आपल्या घरात पेटवून घेतले तर मी कोठे पोलिसांची लफडी निस्तरत बसू? साक्ष देत बसू, असा विचार माझ्या मनात आला.

शेवटी त्या बाईला कसं बसं शांत केलं, तेव्हा तिच्या तोंडून जी हकिगत कळली ती अशी-


’सरु’ तिथल्या एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेलेली होती. घरात काही न सांगता सवरता पळाली. अर्थात त्यांच्या प्रेमाची कुणकुण आधीपासूनच तिच्या आईला होती त्यामुळे मायलेकींचे दररोज खटके उडत होते.


त्याच दरम्यान आमच्या शेजारच्या घरात देखील एक दिवस मोठ्या मोठ्या आवाजात सीमा आणि तिचे आई-वडील यांच्या भांडणाचे आवाज ऐकायला आले. खरेतर शेजारच्या घरात सारी सुशिक्षित मंडळी, घर म्हटले की थोडेफार भांड्याला भांडे लागायचे. पण आज जरा एका भांड्याला घरातील सगळीच भांडी एकमेकांवर आदळली असावी. असे चालले होते. त्यात मध्येच सीमाच्या रडण्याचा आवाज, तर कधी भांडण्याचा आवाज, त्यानंतर फडाफड मारल्याचा आवाज, मी सारं ऐकत होते. पण त्यांच्या घरगुती भांडणात मी कशी काय पडणार?

दोन दिवसांनी सरुची आई कधी कामावर येणार? हे विचारायला शेजारची सीमा माझ्याकडे आली. कारण त्या दिवसापासून म्हातारी गायब होती


“ये गं सीमा! बस....” मी तिला बोलले.


“नको काकू आधीच उशीर झालाय कॉलेजला जायचेच.”


”अगं पाच मिनिट बस, कशी आहेस?”


“ठीक आहे काकू!” सीमा उदासपणे हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मी तिच्या पाठीवर हात ठेवताच ती रडायला लागली.


“काकू! आईबाबांना माझं प्रकरण कळलंय, मला त्यांनी कॉलेजला जायला बंदी घातलेली आहे.” हळू आवाजात तिने सांगितलं.


एक-दोन वेळा बिल्डींगच्या गेटवर एका तरुणाच्या बाईकवरून तिला मी उतरताना बघितलेलं होतं. नेमकं मी खिडकीतून खाली बघायला आणि सीमा वर बघायला एकच गाठ पडली. एकदा सिनेमॅक्सला पण मी त्यांना पकडलं होतं. तिचे प्रकरण मला माहित आहे हे तिलादेखील माहीत होतं. पण आजकाल स्वातंत्र्याचे दिवस, त्यातून मुला-मुलींची मैत्री ही काही नवीन गोष्ट राहिली नाही. तर ही कॉमन गोष्ट झाली आहे. त्यातून आपण एखाद्याच्या आई-बापाला चांगुलपणाच्या भावनेने सांगावं आणि त्यांनी तुम्हाला काय करायचं? असं म्हणावं तर काय करायचं? शेवटी हा ज्याचा त्याचा पर्सनल मामला आहे म्हणून मी गप्पच राहिले होते.


सीमाच्या घरून आता स्थळे बघायला सुरुवात झाली. तिचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. पण घरच्यांनी तिला घरात बसूनच अभ्यास करायला सांगितला आणि फक्त शेवटी परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली.


त्याच दरम्यान गायब झालेली आमची कामवाली सरुची आईही बरेच उद्योग करुन आली होती. तिने सरुला शोधून काढले आणि तिचे लग्नदेखील लावून आली. म्हातारी खुशीमध्येच लग्नाचे लाडू घेऊन आली होती.


“ताई! सरीचं लगीन करून आले आणि आता मी बिनघोर झाले बघा.”


“अगं, पण तुला ती कोठे सापडली? तुझ्याबरोबर परत कशी आली?” वगैरे प्रश्न मी तिला विचारले.


ही सरिता उर्फ सरु बापाच्या पाठीमागे आईने मोठ्या कष्टाने वाढवली. ती एका कंपनीत रोजंदारीवर जात होती. तिथे तिचा पहिला प्रियकर तिला भेटला. खालच्या जातीचा म्हणून सरुच्या आईचा विरोध होता. अखेर दोघे पळून गेले. पण या बाईने मोठ्या हिकमतीने तिला शोधून काढले. सारा गोतावळा एकत्र जमवून तिला धाकदपटशा दाखवून गावी नेले, गावच्या जातपंचायतीच्या मदतीने दोन दिवसात तिला स्थळ शोधून, तिथल्या तिथे राहते घर विकून त्या पैशाने सरुचे लग्नदेखील करून आली. त्याचं तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते.


इकडे सीमाच्या घरात देखील तोच फार्स झाला. कशीबशी परीक्षा उरकली आणि सीमाचं शुभमंगल करण्यात आलं. त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी चांगला मुलगा शोधून लग्न लावून दिले. मधल्या काळात आम्हीदेखील राहत्या जागेपेक्षा मोठी जागा घेतली व ही जागा विकून शहराच्या दुसऱ्या टोकाला गेलो. अधीमधी जुन्या शेजार्‍यांकडे आमचे जाणे-येणे होते. चार-पाच वर्षाचा काळ गेला. उन्हाळ्याचे दिवस होते शहरात सगळीकडे रोजगार हमी योजनेचीची कामे चालू होती. आणि एक दिवस मी रस्त्याने चालले असताना चक्क "सरु" मला टु व्हिलर चालवत येताना दिसली. क्षणभर मला वाटले आपल्याला भास झाला असेल. सरु कशी इथं असेल. ती तर गावी आहे तिचे लग्न झालेले आहे पण तिने माझ्यासमोर येऊन गाडी थांबवून, “काही ओळखलं का?” म्हणून विचारलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.


“अगं सरु तू इथे कशी? तू गावाकडून कधी आलीस? तुझा नवरा कुठे असतो?” मी तिच्यावर प्रश्नांचा भडामार केला आणि मला तिच्याकडून हकिगत कळली ती अशी-


लहानपणापासून मुंबईत वाढलेली "सरु" कर्नाटकातल्या खेडेगावात रमणं शक्यच नव्हतं.  

शिवाय तिचं आधीचं लफडं आईने नवऱ्याला सांगितलेलं, तरीपण त्याने शेताचा एक तुकडा आपल्या नावाने करून मागितला आणि मुलीशी लग्नाला तयार झाला. पण सरूची आईदेखील हुशार होती तिने तो शेतीचा तुकडा लेकीच्या नावाने बक्षीस पत्र केला. वरून चांगला 10000 हुंडा आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी या बोलीवर तो लग्नाला तयार झाला. एक तर तो एका पायाने लंगडा होता. परंतु, त्यावेळी सरुच्या आईने विचार-पाचार करता लग्न करून दिले. जसे त्याला कळाले की शेतीचा तुकडा आपल्या नावाने नसून बायकोच्या नावाने आहे तसाच तो बिथरला आणि तिला तिच्या पहिल्या प्रकरणावरून त्रास देऊ लागला. शेतीचा तुकडा आपल्या नावाने करून मागू लागला.

एका रात्री तर त्याने कहरच केला. दारूच्या नशेत तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र सरुने पोलिसात धाव घेतली पण त्यांच्या मदतीने काडीमोड घेतला. जिथे लग्नच कायदेशीर नव्हते त्याची कुठे नोंद नव्हती. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच आला नाही. काडीमोड झटपट झाला. ते पण घेतलेला हुंडा आणि अंगठी त्याला परत करावी लागली. त्यानंतर सरु पुन्हा मुंबईला आली आणि आपल्या प्रियकराशी तिने पुन्हा लग्न केले. एक तीन वर्षाचा मुलगा तिला आहे. आता बिगाऱ्यांवर ती सुपरवायझर म्हणून काम करते. गाडी शिकली टु व्हीलर चालवते.

रात्रपाळीच्या शाळेमध्ये पण जात होती. तिच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वासाचे तेज झळकत धडकत होते. आता वयोमानानुसार तिच्या आईला काम होत नव्हते व ती स्वतःच्या आईला प्रेमाने सांभाळत होती.


त्यानंतर एखादा आठवडा गेला आणि एका लग्नामध्ये मला सीमा भेटली. तिच्या हातात देखील दीड एक वर्षाचा मुलगा होता.


”काय गं सीमा कशी आहेस?” त्या दिवसानंतर ती मला आजच भेटत होती. तशी तिच्या लग्नात मी भेटले होते पण ती लांबूनच भेटले होते. एक पाहुणे म्हणून.


“ठीक आहे काकू! त्या दिवशीच्या ज्या उदासपणे ती हसली होती तीच उदासी आजसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मला दिसली. आज एवढ्या वर्षांनी ती मला भेटली. तिचे गुपित मला माहीत होते. तिच्या हसण्यातील वेदना फक्त मीच समजून घेऊ शकत होते. मी तिला काही मागचे विचारले नव्हते. परंतु, तिच्या मनात सारे खदखदत होते, तिला माझ्यासमोर आपले मन मोकळे करायचे होते.


“काकू! आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाबरोबर संसार केलाच पाहिजे! त्यांनादेखील माझं ‘पहिलं प्रेम’ प्रकरण माहिती आहे त्यावरून मला त्रासदेखील देतात पण करणार काय? आई-बापांच्या इभ्रतीसाठी सारं सहन केलं पाहिजे. पण खरं सांगू काकू माणूस पहिले प्रेम नाही विसरू शकत...” तिच्या डोळ्यात पाणी आला. तेवढ्यात तिचा नवरा तिथे आला. आणि ती पटकन त्याच्यामागे घाबरल्याप्रमाणे गेली.


माझ्या समोरच्या या दोन घटना साधारण एकाच पद्धतीच्या पण दोघींनी दोन मार्ग अवलंबले. सीमा बरोबर? की सरु बरोबर? अडाणी न शिकलेली सरु मनाविरुद्ध लग्न करून दिले तर त्याविरुद्ध बंड करते. परंतु, तीच शिकलेली सीमा मात्र आई-वडिलांच्या नावासाठी त्यांची समाजात छी-थू होऊ नये म्हणून त्यांच्या नावाला कोठे काळिमा लागू नये म्हणून त्यांनी केलेले लग्न निभावून नेते. मला वाटते दोघीही आपल्या जागी बरोबर आहेत. त्यांच्या सामाजिक आर्थिक स्तरात, ज्या संस्कारात त्या वाढल्या, त्या संस्कारात खूप फरक होता आणि त्यांनी समाजात जे बघितले, अनुभवले, तसेच त्या वागल्या.


मध्यमवर्गाची स्थिती अशीच असते की खुल्या दिलाने रडणे पण नाही आणि हसणे पण नाही. आला दिवस ढकलत राहणे. पण झोपडपट्टी सारख्या ठिकाणी दारू, भांडणे, मारामाऱ्या, एल्गार आणि दुसरा घरोबा त्यात काहीच नवीन नव्हते. तिला योग्य वाटले ते तिने केले. योग्य वाटले ते हिने केले. पण सरु ज्या आत्मविश्वासाने वावरताना दिसली त्या आत्मविश्वासाने मला सीमा मात्र दिसली नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama