तू येणार म्हणून ...
तू येणार म्हणून ...


प्रिये, आठवते अजुनी तू दाखवलेलं सुरेख बंधनातील नंदनवन अन् आठवणी त्या बेसुमार...
तुझ्या आठवणींशिवाय दिस गेला असं कधी झालंच नाही. तुजवाचुनी दिन सुने जातानां ...
एकाकी जगताना, काय वेदना होतात हे तुला कसे कळणार? प्रत्येक क्षण मज युगांसारखा भासतो.
येते प्रत्येक हसरी सकाळ तुझ्या आठवणींचे मोरपीस लेवून लहानगं मुलं अंगणी
रांगत यावं तसं ...
हं तर विचार तुझ्या प्रतीक्षेत ठोके चुकविणा-या माझ्या श्वासांना...
गोठलेल्या आसवांना... पंख छाटून टाकलेल्या पक्षाप्रमाणे तडफडणा-या माझ्या अधीर मनाला...
या उंच उंच पर्वतरांगा. तो खळाळता निर्झर. पशू पक्षी, वृक्ष वेली ... फुले फळे
चिमणी पाखरं ....आपल्या पवित्र प्रेमाचे जिवंत साक्षीदार आहेत. ते आजही माझ्याशी गुजगोष्टी करतात.
ते तुझ्यासारखे बेईमान झाले नाहीत. ते मज आधार देतात मित्र होवून सहाय्यास धावून येतात
तेच मला सांगतात तू येणार म्हणून.
कसं सांगू तुला तुझ्या प्रतीक्षेत तू येण्याच्या वाटेकडे टक लावून बघतांना
तुझ्या त्या स्नेहसिक्त सानिध्यात घालवलेला तो प्रत्येक क्षण आठवतांना. भावनांचा बांध फुट्तो अन्
डबडबलेल्या नेत्रांनी बघतांना तू येण्याची वाटही मग धूसर होते.
वाटलं होतं तू येशील मृगनक्षत्राचा पहिला पाऊस बनून जीवन माझं तृप्त करण्यासाठी.
माझ्या अंधःकारमय जीवनी शरदाचं चांदणं बनून जीवन माझं प्रकाशमय करून टाकशील.
वाटलं होतं तू अंगणी माझ्या बहरशील प्राजक्ताची फुलं होऊनी. वाट नको पाहूस येणार नाही कुणी..
मी मला समजवलही होतं... प्रेमाच होत नसतो कधी शेवट प्रेम असतं भिजरा चंद्न ... स्वतः झिजून
सुगंध अनिवारं पसरवणं ... प्रेम म्हणजे आपुलकिची जिव्हाळ्याची मुक्तहस्ते केलेली पखरणं...
प्रेम म्हणजे मनोमिलन ... प्रेम म्हणजे ...केवळ वासनांध शरिरांचा मिलाफ नव्हे तर ....
प्रेम म्हणजे त्याग, समर्पण... प्रेम म्हणजे... परस्परांतील अतूट बंधन ...दोन मनांच एकरूप होणं ..
तू कुठेही राहा पण सुखी असावी हीच सदिच्छा ...असं मनापासून वाटतं कारण मी तुजवर निःस्वार्थ
प्रेम केलंय .... हेही तितकंच खरंय ...
त्यात दोष् तुझा नव्हताच मुळी मीच हरीणासम आभासी मृगजळास वास्तव जल समजून त्यापाठी
धाव धाव धावत सुटलो होतो... तुझं प्रेम मिलन क्षीतीजाप्रमाणे तर होतं ...हे कटुसत्य मला पट्तं पण
मन माझं आजही मानायलाच तयार नाही त्याला मी तरी काय करु गं ? ... तेच मला पुन्हा पुन्हा...
सांगतं ... तू येणार म्हणून ... तू येणार म्हणून ...