तुला कथेत मांडतांना
तुला कथेत मांडतांना
तुला कथेत मांडतांना माझीच जरा गफलत होते, लिहायचं असतं सौंदर्याबद्दल तुझ्या अन् तुझ्या अस्तित्वाच्या प्रश्नानेच सुरुवातीलाच शेवट होते.. मी स्रीबद्दल काय लिहायचं असा मुद्दा हजेरी पटावर उभा राहतो मग सुटलंय का कुणी माझाच मी वर्गातून बाहेर पाहतो, दिसते तू दुर उभी अगदीच व्याकुळ जरा थकलेली व्यवहारी जगाशी दोन करताना घर संसार सुखाचा करताना. कुठून सुरु करु तुझ्याबद्दल लिहायला राणी झाशीपासून की, आई सावित्रीपासून.. की माझ्याच घरातून.. तू उत्तम गृहिणी असावं माझ्यासारखेच जवळ जवळ प्रत्येकाचेच असे विचार असतील कदाचित. मग तू जरा चिडशील , तुझं चिडणंही साहजिकच.. तू हवेत उडतेय विमानाच्या दोन पखांच्या खटोल्यात.. तू प्रशासकिय खुर्ची सांभाळतेय.. तू मुलांबाळांचं करुन नवर्याचा डब्बा अन् घराची भिंतीचा आधार होतेय. तू दमलीस की नाही हा प्रश्न ही मी कथेत तुला विचारणार नाही कारण पुरुषी अहंकार म्हण की, कथेची गरज नसेल कारण मी तुझ्याबद्दल चांगलंच लिहिलं तर प्रत्येकाला रुचेलच असेही नाही. हे बघ ! कसं आहे मी फक्त रकानेच्या रकाने लिहू शकतो तुझ्या कर्तृत्वाचे पण आम्हा पुरुषांना तुला प्रगत स्री म्हणून स्विकारायला आणखी वेळ लागेल. तू निवांत रहा, बिनधास्त जग तुझ्या पद्धतीने, नको करु विचार आमच्या सडक्या कुजलेल्या विचारांचा... कारण आमच्या पुरुषी विचारांचे कुजून कुजून फक्त खत होऊ शकतं आणि तुझं प्रत्येक प्रगतीकडचं पाऊल हे उद्याच अन्न मुलद्रव्यासारखं अनमोल माध्यम माणसं जगविण्याचं असू शकतं. तुझ्या गर्भातल्या बाळाची काळजी घ्यायला आमच्यातले काहीच सरसावतील बाकी राहीले त्यांचे तुरुंगात त्यांच कंपोस्ट होईल.. तू थांबू नकोस म्हणजे झालं मी कथा लिहितच राहीन तुझ्या अस्तित्वाच्या नव्या युगातून...