जरा जरा तू
जरा जरा तू

2 mins

13.7K
तुझ्यात आणि तुझ्या केसात गुंतलेला गजरा मला जळवतो.. त्या निशीगंधाच्या फुलांचे आपआपसात असतील कां? काही भांडणं.. असोत मला मात्र आज त्यांनी तुझ्यापासून दूर ठेवलं यातच त्यांचा विजय कदाचित.. सौंदर्याची बात होते तेव्हा तुझं अन् फुलांच समिकरण अगदीच जुळलेलं. सकाळच्या ताज्या हवेत गारठणार्या बोचर्या धुक्यांशीही मी जरा नाराजच..पुसटशी कां होईन खिडकीच्या काचातून माझ्यातली तू मला स्वच्छ दिसतेस, मग तू बनवून दिलेला गरमा गरम चहा गोडवा साधून जातो. हातात पेपरमधली थोडीशी शिळी अन् थोडी अनओळखी अचंबित करणारी बातमी..तुला मात्र तेव्हा माझ्याशी काही चर्चा करावी असं वाटतं पण, माझं वाचनात गुंतलेली डोळे बघून हलकीच हसून स्विकारुन घेतेस.
तुझी एक आणखी तक्रार हल्ली तु लिहीत नाहीस पुर्वी सारखा कवितेत रमत नाहीस..
"सुचते ती कविता नसते सहज व्यक्त होते ती कविता" हे तुझेच मत पुन्हा स्मरण करते..
"पेनाशी कट्टी वगैरे कि, लिहायला बोटं एकवटत नाहीत"
"खर सांगायची तर खुप अाणि नाही तर शुल्लक कारणं आहेत. पुर्वी लिहायला कुठलचं बंधन नव्हते. आता मात्र डोक्यात भिनभिनायला लागतं ते आँफिस अवर्स मध्येच मग, काय बाँस चा पारा चढवून लिहायचं,
अगं , साधा कोरा कागद जरी लिहायला घेतला की, सहकारी माना वरती करुन बघतात आणि हो विशेषत: महिला सहकारी,
त्यांना कदाचित माझ्यातल्या लेखकी किड्याची ओळख असावी. आणि एक सांग आता या वयात प्रेम कविता वगैरे लिहीलं कां ?
"कां बरं ? कां नाही, प्रेमावरती लिहीते व्हायला काँलेजचीच हवा लागायला हवी कां ? अरे ! लिहायला घेतलं की, तू भन्नाट अगदी प्रेमात पाडून जातोस आणि याचे उदाहरण तर तुझ्या पुढे आहेच.
"अच्छा ! म्हणजे माझ्या कवितेच्या प्रेमातून माझ्यावर प्रेम झालं होतं तर"
"अहं, तुझ्या कवितेवरच्या प्रेमावरुन झालं होतं आणि हो आजही बरं"
"बरं चल मग,काय ऐकवू सांग ताजं.."
एक अलगद स्पर्श कविता,यमक बंधनांची फिकीर नसलेली , उनाड स्वतहात हरवून भिरभीरीत ठेवणारी एक तुझ्यातली मी अन् माझ्यातला तू सांगणारी..
जरा जरा तू
खळी हसरी गालातली
जरा जरा तू
कळी फुलती प्रेमातली
जरा जरा तू
जपुन रुमाल गंधातली
जरा जरा तू
मुक्त रचना मुक्तछंदातली
जरा जरा तू
मन हुरुप इशार्यातली
जरा जरा तू
स्पर्श गुलाबी शहार्यातली
जरा जरा तू
स्वप्न रात्र भासातली
जरा जरा तू
प्राणवायू श्वास श्वासातली.