"ती"
"ती"
स्लँम मधली शेवटची काही पानं कोरी होती. सतत मित्र मैत्रीणींच्या विश्वात स्वछंद जगणारा व दोस्तांचा लाडका समीरण, त्या कोर्या पानांची पुन्हा पुन्हा उघडझाप करीत होता. काही पाने शब्दांनी भरलेली तर काही नुसतीच नाव गाव वस्तू प्राणी या मजकुराने व्यापलेली.
काँलेजच्या दिवसात प्रत्येक ग्रुपमधे बिनधास्त मश्गुल होणारा हा समीरण. नाव समीकरणासारखे असले तरी समजायला उमजायला समीरण अगदी उघड्या पुस्तका सारखा. त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात काही लपलेलं नव्हत आणि काही लपविण्यासारख असायला त्याच्या तत्वांची हिंमत सुध्दा नव्हती.
वर्तुळासारखं आयुष्य जगायला लागलो तर तीच ती माणसं पुन्हा पुन्हा भेटतात काहींचा कंटाळा येतो तर कोणासाठी ते वर्तुळ सर्वस्व असतं. होस्टेलचे लाईफ जवळ जवळ सर्वांनीच अनुभवलेले. उन्हाळ्याच्या दिवसात रुम मध्ये कूलरचा अट्टाहास न करता गादी गुंडाळून थेट टेरेस वर जाऊन चंद्र चांदण्यांच्या सहवासात निजतांना त्याला कधी एकटेपणा जाणवत नव्हता.
प्रत्येक विषयात जरी अव्वल येत नसला तरी सामाजिक विषयांचा त्याचा अभ्यास दांडगा. म्हणजे वाद विवाद असो वा भाषण कौशल या घश्या ला कोरड पाडणार्या कलांमध्ये तो हुकूमी एक्का. गेल्या ३ वर्षात आंतरविद्यापिठातील वादविवाद स्पर्धेत हँट्रीक मिळविणारा मात्र ૪ थ्या वर्षी जरा मुद्द्यांना रोखठोकपणे मांडण्यात कुठेतरी कमी पडतांना दिसू लागला. मंचावर बसून असतांना तो जरा अस्वस्थ जरा अडगळलेला होता. समोरच्या रांगेतला एक चेहरा कदाचित त्याला मुळ मुद्दयांपासून भरकटू बघत होता.
स्पर्धा संपली.. निकालाची वेळ.. २रा क्रमांक जातोय समीरण काळे ला.. या वेळी उपस्थित पाहूण्यां व्यतिरिक्त फक्त एकाच हाताच्या टाळ्यांचा आवाज ऐकू येत होता. तोच चेहरा.. ५'२ उंची.. दिसायला बाहुली सारखी.. चुलबूली.. बोलक्या डोळ्यांची ती.. बक्षिस स्विकारून पायर्या उतरतांना तिनेच पहिला हात पुढे केला.
"अभिनंदन समीरण!"
"थँक्स. पण मी दुसरा क्रमांकाचा मानकरी आहे, तुम्ही प्रथम आलेल्याचे अभिनंदन आधी करायला हवं."
"अच्छा! असे कां बर, आणि त्याने काय फरक पडतोय? बक्षिस महत्वाच नं!
"हो, ते तर आहेच परंतू मला इतक्या मुला मुलींमधून तुम्हीच कसं अभिनंदन करताय."
"कसं आहे बघ समीरण, गेल्या तीन वर्षापासून तू प्रथम येत होतास, त्यांना तुझ्यातल्या कलेच कौतूक होतं."
"आणि आता?"
"आता त्यांना तू दुसरा आलास, या पेक्षा पहिला कां नाही आलास? याचे दुःख आहे."
"तुम्हाला असं नाही वाटत कां, माझ्या या दुसर्या क्रमांकाच्या बक्षिसात तुमचा मोलाचा वाटा आहे."
"नक्कीच नाही, कां तुला हे म्हणायच की, मी तुला डिस्टर्ब केल त्या दिवशी?
"अँक्झाटली, तुम्ही बरोबर पकडलतं स्वत:लाच."
तिला हसू आले. दोघांची काही मिनिटात मैत्री झाली. मग मेसेजेस, काँल्सचा सपाटा सुरु झाला .शेवटच्या वर्षाची परिक्षा डोक्यावर तांडव करण्याकरिता उत्सूक. तरी तिला वेळ द्यायला
म्हणून वेळातला वेळ काढून समीरण तिला भेटायला लागला. खर तर तिच्या नावा व्यतिरिक्त ती कुठल्या काँलेजला आहे किंवा इतर काहीही माहीती समीरण कडे नव्हती, किंबहुना तिला भेटल्या नंतर या गरजेच्या चर्चा अवांतर झालेल्या असतील.
परिक्षा संपत आली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी स्लँमबुक लिहिण्याचा मौसम सुरू झाला.. अभ्यासातून दहा पंधरा मिनिटं ब्रेक घेऊन काहीस खर काहीस खोटं लिहिण्यात सर्व मित्र आणि मैत्रीणी व्यस्त झाले. समीरणने सुद्धा स्लँम लिहायला दिला. स्लँम परत आलेला होता. यामधे एकच ती सुटली होती. म्हणून त्याने तिला तिची माहीती इत्यादी वगैरे भरायला सांगितले.
समीरण काँलेज होस्टेल सोडून गावी परत जायची तयारी करु लागला. त्याचा स्लँम पुस्तकांच्या ढिगार्यातून बाहेर आला. थोडा वेळ विचार करुनही आठवेना तिने हा स्लँम केव्हा परत केला. माझच लक्ष नसेल परिक्षेच्या गडबडीत असं म्हणून कपड्यांचा पसारा तसाच टाकून तो टेरेस वर गेला. तिच्या बद्दलची माहीती वाचण्यापेक्षा माझ्या बद्दल काय लिहिलय हीच उत्सुकता लागलेली होती. स्लँमची पूर्ण पाने काळजीने बघीतली. परंतू तिने काहीही लिहिलेले नव्हते. परंतू दोन पानं फाडून टाकलेली होती. समीरण पुर्ता गोंधळला. एखाद्या व्यक्तीला आपण प्रेमाने, आदराने व्यक्त व्हायला दिलेला स्लँम विनामजकूर परत येतो याचा अर्थ काय? त्यांने तिला लगेच काँल लावला. तिचा मोबाईल बंद येत होता. कासावीस झालेला समीरणचा जीव आकांत करीत होता. चिडचिड होतं होती. फाडलेल्या दोन पानांच्या उरलेल्या काठांकडे बघत त्याने स्टेशन गाठले होते.
इतक्या वर्षानी तोच स्लँम पुन्हा हातात होता. मात्र एक गोष्ट खुणावत होती. भरलेल्या स्लँम च्या प्रत्येक पानांवर एक दोन शब्द पानावरील मजकुराशी विसंगत होते. त्याने त्या शब्दांचा सांगड घालून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेवटी एक गोष्ट त्याला दिसून आली. त्या प्रत्येक शब्दांना जोडून एक मेसेज होता.
मी तुझ्या बद्दल काय लिहायच? खरे तर मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मी ती पाने फाडून टाकली. मी तुझ्यासाठी अनोळखी होते, तरी तुझं माझ्यात गुंतत जाणं मला बघवत नव्हत. अस्तित्वात तू आहेस, मी नाही. कारण पहिल्या भेटीत मी तुझे प्रथम बक्षिस गमवायला कारणीभूत ठरले. नंतर तुझे अभिनंदन करतांना सुद्धा मी माझी चूक मान्य केली नव्हती. आपण जितक्यांदा भेटलो त्या प्रत्येक भेटीत तू लोकांकरीता हसण्याचे कारण होऊ लागला होतास आणि जेव्हा तू मला माझ्याबद्दल लिहायला सांगीतलस तेव्हा मी जरा स्तब्ध झाले. तू मला खरच मैत्रीण म्हणून खूप प्रेम दिलेस. आणि मी मात्र तुझ्या करिता शेवट पर्यंत रहस्य ठेवून जातेय कारण मी सांगीतलेले तुला कळणार नाही आणि ते तू स्विकारशील असा मला विश्वासही वाटत नाही.
हे सर्व वाचताच समीरणचे डोके चक्रावले. त्याचापुढे सर्व प्रसंग काचेप्रमाणे साफ झाले. स्पर्धेत त्याला खुणाविणारी ती, शुभेच्छा देणारी ती. भेटी दरम्यान आजुबाजूला बसलेल्या लोकांचे हसण्याचा अर्थ त्याला आज कळला होता.
ती फक्त ती होती. अस्तित्वात नसलेली. ती आजही त्याला हवी हवीशी वाटणारी. अदृश्य मनात वसलेली.