तुझा माझा समान हक्क
तुझा माझा समान हक्क


अनघा ऑफिसमधून यायला आणि तिच्या सासूच्या हातून काचेची बरणी फुटायला एकच गाठ पडली.
अनघा तणतणच आत आली, अहो आई किती वेळा सांगितले तुम्हाला काचेच्या वस्तुंना हात लावत जाऊ नका, शेवटी फोडलेच का? तुम्हाला शांत बसता पण येत नाही का... माझ्या पगारातून आणते मी सगळ्या वस्तू माझ्या कमाईवर घर चालतं हे विसरलात काय? अशी अनघा बोलतच सुटली होती.
इतक्यात परागही आ,ला काय झाले इतके जोरजोराने कशाला ओरडतेस अनघा, त्याने विचारले.
ओरडू नाही तर काय पूजा करू काय आता तुझ्या आई-वडिलांची... नुसतं आपलं हे तोड ते फोड स्वस्थ बसवत नाही यांना एका जागी, अनघा बोलली.
तिची सासू म्हणाली, अरे पराग हात अचानक कापत होता रे म्हणून ती बरणी चुकून धक्का लागून पडली मुद्दाम नाही फोडली.
बरं आई, पराग म्हणाला, अनघा जाऊ दे सोड आता बरणीच तर होती साधी...
हो तू जाऊ दे म्हणनारच तुझ्या पैशातून आणली नव्हती ना ती.
अनघा बास आता, घरी आल्या आल्या तुझी चिडचिड सुरू असते.
तशी अनघा अजून भडकली, मी चिडचिड करते मग सांग आपल्या आई-बाबांना राहायचं तर नीट मी सांगेन तसे राहा नाहीतर चालायला लागा.
पराग काही न बोलता शांत बसला. हे नेहमीचं होतं. अनघा लग्न करून या घरात आली. नव्याचे नऊ दिवस संपले तसे तिने आपले एक एक रंग दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला परागला वाटले एकुलती एक मुलगी म्हणून लाडात वाढलेली, अनघा हट्टी बनली होती. लग्नाचं एक वर्ष व्यवस्थित गेले. त्यानंतर अनघा पराग त्याचे आई-वडील यांना कोणालाच किंमत देईनाशी झाली. ती आयटी कंपनीत जॉबला होती तर पराग एका खाजगी कंपनीत काम करत होता. साहजिकच तिचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता. त्यातून तिच्या मैत्रिणी तिला आता समाजात स्त्री-पुरुष कसे समान आहेत, दोघांना समान अधिकार हक्क मिळत आहेत, याचे रसभरीत वर्णन चर्चा सतत करीत असत.
आपला पगार किती मोठ्या प्रमाणात आहे. कारण आपण त्यासाठी लायक आहोत, असे बरेच काही बोलणे त्यांच्यात होत असे. म्हणूनच अनघा तिच्या गरीब सासू-सासऱ्याचा छळ करायची. पराग काही जास्त बोलला तर ती कशी बरोबर आणि त्याचे आई-वडील कसे चुकीचे हेच चित्र त्याला दाखवायची. परागही तिला घाबरून होता. कारण उठसूट अनघा पोलिसांना तक्रार करेन. मला हुंड्यासाठी हे लोक त्रास देतात, अशी धमकी देत असे. तसेच परागला आपल्या छोट्या नोकरीमधून स्वतःचे घर घेणे जमले नव्हते, याचाच फायदा घेऊन तिच्या वडीलांनी परागला एक फ्लॅट घेऊन दिला होता. जेणेकरून तो कायम त्यांच्या ऋणात राहील. अनघाची आईसुद्धा चार चांगल्या गोष्टी मुलीला सांगण्याऐवजी अजूनच तिला भडकवत असत. त्यामुळे इथे घरात अनघाचं राज्य होतं. तिने परागला पार लाचार करून ठेवले होते.
कारण तीही कमावती होती. त्याच्या बरोबरीने घर सांभाळत होती आणि जास्त काही झाले तर आहेच स्त्रीच्या बाजूने कायदा याची धमकी म्हणूनच पराग निमुटपणे तिचा त्रास सहन करत होता. अनघाच्या खूप मित्र-मैत्रिणी होत्या. सतत पिकनिक पार्टी सुरुच असायची. पण परागला वेळ देणं त्याच्या अपेक्षा पूर्ण करून तिला पुरुषाची गुलामगिरी वाटायची. तिच्या मनात येईल तरच ती त्याच्याजवळ जायची.
एक दिवस पराग ऑफिसला जायची तयारी करत आवरत होता आणि त्याची एक फाईल शोधत होता तर कपाटात त्याला काही रिपोर्ट दिसले. त्याने ते पाहिले तर ते अनघाच्या गर्भपाताचे होते. त्याला ते बघुनच शॉक बसला तसा त्याने अनघाला आवाज दिला ती किचनमध्ये स्वयंपाकाला येणाऱ्या बाईला संध्याकाळी काय बनवायचं हे सांगत होती. ती आली बेडरूममध्ये म्हणाली, काय काम आहे.
पराग ने तिला ते रिपोर्ट दाखवले म्हणाला, हे काय आहे...
ती बोलली, काय म्हणजे त्यावर लिहिले वाचता येत नाही तुला?
मी तेच विचारतो आहे अनघा हे तू परस्पर ठरऊन आणि गर्भपात करून मोकळी पण झालीस मला सांगावेसे पण वाटले नाही.
पराग इतका का रिऍक्ट होतोस मूल जन्माला मी घालणार तेव्हा ते कधी जन्माला यावं आणि मूल मला हवी की नको हा सर्वस्वी माझा निर्णय असेल.
अग पण ते मूल माझं पण होतं ना तीन वर्षे झाली आपल्या लग्नाला अजून किती थांबणार आहेस तू.
हे बघ पराग उगाच टिपिकल नवऱ्यासारखं वागू नकोस. मला वाटेल तेव्हा मी मुलाचा विचार करेन ते तू मला सांगायचे नाही.
अनघा मी तुझा नवरा आहे गं माझ्या पण काही अपेक्षा आहेत ना तुझ्याकडून तुला समजत कसे नाही.
पराग अरे कुठल्या काळात राहतोस तू? असे टिपिकल वागणं सोड जरा मॉडर्न विचार करत जा... नको त्या गोष्टी उगाच वाढवू नकोस मला ऑफिसला उशीर होतोय. बाहेर परागचे आई वडील गप्प राहून त्यांचा वाद ऐकत होते.
हे नेहमीच होत असे अनघा कोणत्याही कारणावरून भांडण उकरून काढत असे आणि जास्त ताणले तर कायद्याची धमकी. तिला परागसारखा शांत सहनशील नवरा मिळाला होता म्हणून ती त्याच्यावर रुबाब करत होती. तिला आपल्या सुंदर दिसण्याचा, पगाराचा माज होता. त्यात माहेरही श्रीमंत! पराग सरळमार्गी मुलगा होता म्हणून तिला त्याला सोडायचेही नव्हते.
बरेचदा पराग म्हणालाही, तुला नको आहे माझा संबंध तर घटस्फोट दे आणि मुक्त कर मला, मला हे तुझं वागणं सहन होत नाही. तुझ्यापायी आई-बाबांनाही त्रास... पण ती कुठे सोडते त्याला! परागची अवस्था बिकट झाली होती गप्प राहून बुक्यांचा मार तो सहन करत होता कारण कायदा हक्क आता स्त्रीच्या बाजूने समान होता. या समानतेमुळेच अनेक अशा अनघा आपल्या नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा छळ करतात त्यांना वेठीस धरतात. काही जणी तर अक्षरशः नवऱ्याला मारतात देखील हे मी स्वतः पाहिले आहे. याला काही महिला अपवादही आहेत. छान नेटाने समजुतीने संसार करणाऱ्या महिला आहेत तसेच अनघा सारख्या अहंकार वृत्तीने वागणाऱ्या महिलाही याच समाजात आहेत.
पैसा स्वातंत्र्य समानता अधिकार या जोरावर अनेक पुरुषाचा छळ आजही होत आहे. पण आपण फक्त स्त्री अत्याचाराबाबतच बोलतो लिहितो. पण अशा पुरुषाचे काय त्याने मन मोकळे करण्यासाठी रडायचेसुद्धा नाही. कारण तू मुलगा आहेस काय मुलीसारखा रडतोस किंवा तू आणि बायकोचा मार खाल्ल्यास अशी त्याची खिल्ली उडवली जाते. कायदा दोघांना समान आहे पण पुरुष अत्याचाराविरुद्ध कोणी आवाज उठवत नाही, त्याचे म्हणणं कोणी ऐकून घेत नाही कारण आपण फक्त स्त्री कशा अत्याचार सहन करतात. तिलाच पुरुष त्रास देतो याच कथा लहानपणापासून ऐकत मोठे होतो पण दहापैकी एका घरामध्ये परागसारखा पुरुष कौटुंबीक हिंसेला बळी पडतो हे वास्तव आहे. त्याचा आवाज दबला आहे आतल्या आत तो गुदमरतो आहे कधीतरी आपण स्त्रीला जरा बाजूला ठेवून त्याचा ही हुंदका ऐकूयात... बघा विचार करून. स्त्री-पुरुष समानता आहेच पण अशी समानता काय उपयोगाची जिचा दुरुपयोगही असा केला जातो....
कलम 498 अ पोटगीचा अधिकार,1995चा घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा हे सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत. त्याचा काही महिलांकडून गैरवापर होत आहे आणि पुरुषांवर गुन्हे दाखल होत आहेत. नाण्याची फक्त एक बाजू बघून उपयोग नाही स्त्रीचे जसे ऐकून घेतले जाते तसेच पुरुषांनाही समजून घ्या त्याच्या वेदनाही ऐका. स्त्रियांवर होणारे अत्याचाराला वाचा ज्या त्या वेळेस फोडली जातेच परंतु पुरुषांबद्दल हे तितकेसे होत नाही म्हणुनच हा प्रपंच.!!
#समानतामाझाहक्क