तो आणि ती - "गुलाब..!"
तो आणि ती - "गुलाब..!"
ना रंगाची ओढ
ना तुझ्या रुपाची भक्ती
तुझा सुवास पुरे आहे
तुझं अस्तित्व जागवायला.
हजारोंच्या संख्येने अनेकांपर्यंत पोहचतो
माझ्यासाठी तो एक रंग पुरेसा आहे.
कधी शांती
कधी प्रेम
कधी मैत्री
कधी कळी
कधी पाकळ्या
कधी सुकलेल्या आठवनी
प्रत्येक रंगात प्रत्येक रुपात
माझ्यासाठी तु फक्त माझा गुलाब आहेस.
~Happy Rose Day
गुलाबाचं महत्व प्रेमात अविरत आहे. आजच्या Rose Day निमित्त आजची कथा त्याच गुलाबासाठी...
अपेक्षांचं ओझं बागळत माझ आयुष्य पुढे सरकत होतं. आज ६ महिने होत आले होते त्याला न पाहुन. पण त्यानेच तर दुर जायला सांगितलं होतं आणि मी ऐकलं होतं. त्याच्या घराकडचा रस्ता मला केव्हाच अनोळखी झाला होता तरीही आज त्या भागात आले होते. ह्रदयाची गती खुपच तीव्र होती. नुकताच पाऊस बरसला होता. वातावरण खुप छान होत पण तरीही खिन्नता होती. त्याच घर आजही तसच होतं शांत अगदी त्याच्यासारखं. त्याच्या घरासमोरची बाग मात्र खुपच खुलली होती. कधी नव्हे ते एक माळी काका झाडातला कचरा साफ करण्यात मग्न होते. त्याच्या घराला कुलुप होतं.
'हुश्श! म्हणजे तो घरी नाहीये.'
मी गेट उघडुन आत गेले, तसे ते माळी काका मला न विचारता आत आले म्हणून ओरडले.
'साहेबांना कोणी आलेल आवडत नाही. कोण तुम्ही कशा काय आत आलात. साहेबांनी मला नाय सांगितलं कोणी येनार म्हणून' ते मला जरा ओरडून विचारत होते. माझी नजर मात्र त्या गुलाबी गुलाबावर स्थिरावली होती. खुप सुंदर फुल उमललं होतं.
'मी ते फुल सोबत नेऊ शकते प्लिज.' मी आर्जव करत विचारलं. तसे माळीकाका अजुनच चिडले.
'ते गुलाब, माझी नौकरी घालवायची का तुला. साहेबांच लय प्रेम हाये त्या झाडावर. खबरदार जर फुलाला हात लावला तर. साहेब आल्यावर विचार. आता जा इथुन.' माझे डोळे पाण्याने भरले. ते माळी काकाच्या बोलण्याने नाही तर मी काय गमावलयं ते आठवुन. त्या गुलाबाकडे पाहत मी जड पावलाने मागे निघाले.
'असंच असतं ना आपण ज्याला जिवाभावाने रुजवलं प्रेम दिल, अचानक कोणीतरी आपला हक्क कायमचा हिरावतो. दुरुन फक्त हताश होऊन पाहन हातात राहत.' माझंही असचं काही झालं होतं. मी रडतच तिथुन बाहेर पडले. पण मला पाहनारे दोन डोळे दुरुनच मला न्याहळत होते. संध्याकाळ मी असाच त्याचा विचार करण्यात घालवली.गेल्या ६ महीन्यात त्याला आठवुन मला पहिल्यांदा त्रास झाला होता.
'बास पुरे झाले आता. मला माझं उत्तर हवं आहे मी विचारनार आहे त्याला, सगळं. सांगनारही आहे मला जे वाटतं ते.' मी त्याच्या घराकडे निघाले या वेळी ठरवून. गाडी लावून आत निघाले. त्याची बाहेरच होती. घराला कुलुपही नव्हतं. तो आज घरी होता. मागच्या वेळी कठोरपणे मला जायला सांगुन तो आज कसा वागेल या बाबतीत मला अंदाज करता येत नव्हता. वातावरण थंड असुनही मला घाम येत होता. गळा सुकला होता, खूप तहान लागली होती.
आजही माळीकाका बागेत काम करत होते. मला पाहिल्यावर पळत गेट कडे आले.
(हे पुन्हा रागावतील आज. पण नाही मी यावेळी मागे जाणार नाही. आज त्याला भेटनारच)
मी काही बोलनार इतक्या माळीकाकांनी हसुन गेट उघडलं. त्याने सांगितलं असनार. म्हणजे मी येऊन गेलेली त्याला माहीत आहे? मी हळुवारपणे आत निघाले. माळीकाकांनी पुन्हा आवाज दिला. ते गुलाब तोडुन देत होते.मी त्यांना तसे करण्यापासून थांबवलं. ते गुलाब झाडापासून दुर नाही करु दिलं. आधी त्या गुलाबासाठी फक्त आपुलकी होती आज प्रेम होतं आणि प्रेम कधी हिराऊन घेण्यात नसतं तर ते समोरच्याला त्याच्या ढंगात बहरु देनं असतं. कदाचित ही त्याच्या प्रेमाची भाषा. हो त्याच्या प्रेमाची ज्याची कबुली द्यायला मी आज इथपर्यंत आले होते. या विचाराने माझं हसु अजुनच रुंदावलं. दरवाजा उघडा होता त्याच्या मनासारखा पण मला परवानगी होती? हो असनारच त्याच्यासाठी मी कोणी तरी होते, मैत्रिण किंवा अजुन कोणी. त्याच्या लेखी आमचं नातं काहीही असो माझ्यासाठी मात्र ते प्रेम होतं. जिथे अपेक्षा नव्हत्या, स्वातंत्र्य होतं, विश्वास होता आणि तो होता. मी घरात गेले. घर तसचं होतं फक्त खुपसार्या पेंटिंगस् ने भरलेलं होतं. माझ्या आणि त्याच्यातले प्रत्येक क्षण. कोणत्याच पेंटिंगमध्ये चेहरे स्पष्ट नव्हते पण भावना कळत होत्या निदान मला तरी. आम्ही दोघं होतो त्यामध्ये, विचारामध्ये, प्रश्नांमध्ये. त्या झोपाळ्यावरचा तो क्षण जेव्हा मी डोळे बंद करुन बसले होते. तो अगदी त्याने त्या चित्रात जिवंत केला होता. क्षणभर वाटले तो अजुनही मला पाहतोय त्या चित्रातुनच. मात्र नाही तो मलाच पाहत होता. जिन्यातुन संथगतीने खाली येत. चेहरा कमालीचा शांत, संयमी, चेहर्यावर तेच पुर्वीच स्मितहास्य.
'उशीर केलास यायला...' तो तितक्याच शांततेने बोलला. मी सोफ्यावर बसुन मान खाली घातली. तो येऊन नेहमीप्रमाणे शेजारी बसला. मी नकळत मान त्याच्या खांद्यावर टाकली.
'एकदाही प्रश्न केला नाहीस. का दुर जायला सांगतोय म्हणून विचारलं नाही. आता मी विचारु? का आहे मी तुझ्यासाठी एवढा खास. की माझं कितीही कठोर वाक्य कोणताच विरोध न करता तु ऐकतेस.' माझ्या डोळ्यातुन पाणी वाहत होतं.
'. . .कारण मी तुझ्यावर. . . .' मी माझं वाक्य पुर्ण करनार इतक्यात त्याने ते थांबवलं.
'नको देऊस काही नाव या नात्याला. तुझ्या मनातलं ओठी आणायची गरज नाहीये तुला. बस यापुढे इतकं अंतर देऊ नकोस' तो मनापासुन बोलत होता. मी फक्त त्याच्याकडे पाहत होते. त्याक्षणी ठरवुन टाकलं पुन्हा या नात्याबद्दल त्याला विचारायचं नाही. बस तो सोबत आहे हे च माझ्यासाठी गरजेचं आहे. प्रेम म्हणजे कोणती आसक्ती नाही तर त्याला त्याच्या ढंगात जगु देणं, स्वातंत्र्य देणं आणि विश्वास ठेवनं असतं. मी त्याच्यावर दडपण टाकत होते, हे नातं त्याने स्विकारावं म्हणून, मी स्वतः झुरत होते त्याने मान्य करावं म्हणून. तो मात्र माझ्यावर असणार्या प्रेमामुळे मलाच या नात्यातुन मुक्त करत होता. पण नातं तेच ज्यात बांधुन ठेवलं नसलं तरी सुटून जावंस वाटत नाही. आज तो आणि मी पुन्हा सोबत होतो मात्र यावेळी त्या नात्याला नाव नव्हतं, होता फक्त विश्वास, ओढ आणि आनंद. बाहेर पाऊस बरसत होता पण मन हलकं वाटत होता. आज त्याने कोणती व्यक्ती नाही ऐकवली. कारण आम्ही कुठेतरी त्या गोष्टीतले पात्र बनलो होतो. हसत, गप्पा मारत, त्याच्या हातचा चहा घेत मी त्याचं घर सोडलं.
जाताना बाहेरच्या त्याच गुलाबावर पावसाचं पाणी मोत्यासारखं स्थिरावलं होतं. कारण त्या गुलाबाने ते क्षण ती जागा त्या दवबिंदूना दिली होती, अगदी तशीच जशी मला त्याने त्याच्या आयुष्यात दिली होती. कारण खरं नातं तेच ज्यात बांधुन ठेवलं नसलं तरी सुटून जावंस वाटत नाही.

