तो आणि ती - "सोबती..!"
तो आणि ती - "सोबती..!"


आज कधी नव्हे ते तो बाहेर भेटला होता मला. एका शांत जागी, उगीच च शुन्यात नजर लावून बसला होता. मनात नक्की काही तरी खदखदत होतं पण नेहमीप्रमाणे तो शांत होता. कदाचित शब्दांची जुळवाजुळव करत असावा. मी ही काही बोलले नाही. डोळे लाल आणि खोल गेले होते. कित्येक रात्री झोपलेला नसावा असे. चेहरा सुकलेला होता. मी ही कामामुळे, अभ्यासामुळे त्याला एवढ्यात भेटले नव्हते. पण हा एवढा एकटा पडेल वाटलं नव्हतं. तो आता ही दूर कुठे तरी नजर लावून होता. मी त्याच्याकडे पाहत होते, पण त्याला याचे भान नव्हते.
'अर्जुन...!'
मी तो काहीच बोलत नाही म्हणून त्याला आवाज दिला. त्याने दीर्घ श्वास घेऊन माझ्याकडे पाहिलं.
'तब्येत ठिक आहे ना तुझी?' मी काळजीने विचारत त्याच्या माथ्यावर हात ठेवला, थंड होता.
पण तो शांत होता एक वेगळचं हसू त्याच्या ओठी होतं. मी प्रश्न केले नाहीत. आवाज होता तो फक्त तिथल्या शांततेचा. तो पुन्हा कोठेतरी हरवला. यावेळी आमचे पात्र बदलले होते. दरवेळी तो समजवायचं, आज मला समजून घ्यायचं होतं. तो बोलत नव्हता. मला ही कळेनासं झालं होतं.पण तितकचं संयम ठेऊन, तो कधी बोलेल याची वाट मी पाहत होते. दूर कुठेतरी गाण्यांचा अावाज येत होता, बोल कळत नव्हते पण संगीत तिथली शांतता भंग करत होत.
'पिऊ...' अखेर त्याने बोलायला सुरुवात केली.
'कित्येक वेळापासून शांत बसलीये. अशी तर तु नक्कीच नाहीये?' तो लाघवी हसत मला बोलला. मी फक्त डोळे बारीक करुन त्याला पाहीलं. त्याने मान हलवत खाली केली.
'काय झालयं. का असा शांत आहे? काय छळतयं?' मी नेहमीप्रमाणे माझे प्रश्न सलग सुरु केले.
'आता आमची गाडी फ्लॅटफॉर्मवर आली!' तो हसू दृढ करत बोलला. मी उठून त्याच्याकडे पाठ करुन उभी राहीले. तो पुन्हा शुन्यात हरवला. मी रागावले आणि तो अजुनही धुंदीत म्हणजे नक्की काहीतरी झालं होतं. मी पुन्हा येऊन शेजारी बसले.
'अभय' तो बर्याच वेळानंतर बोलला.
दोन वर्षांचा असताना वडिल गेले. दुसर्या लग्नात अडचण नको म्हणून आईने आजीकडे ठेवले. सुरुवातीला काळजी म्हणून फोन यायचे पण नंतर नंतर आईही नवीन आयुष्यात रमली. त्या माऊलीचे दुःख तिलाच ठाऊक. इकडे आजी गेल्यावर बाकीच्या नातेवाइकांनी सांभाळण्यास नकार दिला. अभय ६ वर्षाचा होता तेव्हा, आईने त्याला होस्टेल ला पाठवले. आपली म्हणनारी तेवढीच एक राहिली होती त्याला. अभय १० वर्षाचा होईपर्यंत ती ही देवाघरी गेली. अभय आता पोरका झाला होता.
शिकून मोठा व्हायचं एवढचं काय त्याचं स्वप्न राहिलं होतं. पुढे कॉलेजला आल्यावर रॅगिंगच्या नावाखाली त्रास सहन केला. मित्र म्हणून कोणी नव्हतं, स्वतःला सिद्ध करायला संधी मिळत नव्हती. होत असलेला त्रास सांगायला कोणी नव्हतं. अनाथ हा असहनीय शिक्का त्याला लागला होता. या सगळ्या त्राग्यातून बंड करुन उभा ठाकला तो नवा अभय. ज्याला आता फक्त शासन करायचं होतं. जे हवं ते मिळवायचं होतं. पण तो मूल्य विसरला नव्हता. एका मुलीच्या अब्रुची सुरक्षा करताना एका बडे बापाच्या मुलाचा त्याच्या हातून खून झाला, आणि त्याचं आयुष्य उतरणीला लागलं. त्याला शिक्षाही झाली. मागे एकदा त्याला भेटलो तेव्हा खूप समाधान होतं त्याच्या चेहर्यावर त्या मुलीला वाचवलं याचं. ती शिक्षा त्याला तिच्या सुरक्षेपुढे काहीच वाटत नव्हती.
काही वर्षांनी जेव्हा तो शिक्षा भोगुन बाहेर आला तेव्हा त्याला एक हादरवणारी बातमी मिळाली. ती मुलगी जिला त्याने वाचवल होतं, तिला त्या बड्या आसामीच्या लोकांनी इतका त्रास दिला कि तिने आत्महत्या केली. अभयपर्यंत ही बातमी फार उशिरा पोहचली. तो कोलमडून पडला. अभय मला कायम म्हणायचा, 'सर तिच्यात मला माझी लहानी बहीण दिसते. बाहेर निघालो की पाहिल्यांदा तिलाच भेटणार.'
तिच्याबाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे अभय मनापासून हादरला. मला एकदा भेटला तेव्हा मी ही त्याला पाहून दुःखी झालो होतो. सूड घेणं त्याच्या स्वभावात नव्हतं. मात्र तो खूपच शांत झाला होता. ते पूर्वीचं समाधान त्याच्या चेहर्यावर नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यानेही हा जीवनप्रवास संपवला. काही क्षण असेच शांततेत गेले. कधी नव्हे ते आज त्याचे डोळे वाहात होते.
'तुला माहितीये पिऊ, अभय म्हणायचा, सख्ख्या आईने दूर केले. रक्ताच्या नात्यांनी झिडकारले. सतत अलिप्त ठेवण्यात आलं, तरीही मी आनंदात जगणार. फक्त कोणाची तरी साथ हवीये.' बोलताना त्याच्या डोळ्यात समाधानाचे भाव होते.
मी त्याचे डोळे पुसले. त्याला पाणी देऊ केलं. अर्जुन आज कधी नव्हे ते इतका हतबल झाला होता. तो कुठेतरी अभयमध्ये स्वतःची छबी पाहत होता. पण अभयकडे नसणारी एक गोष्ट अर्जुनकडे होती. काही वेळ असाच गेला. त्याचं मन मोकळ झालं होतं. पण अजुनही मला जाणवत होतं की प्रश्न होते. मी त्याला सावरायला वेळ दिला.
'पिऊ...' त्याने पुन्हा एक दीर्घ श्वास घेत मला विचारलं.
'अभय हरला........ अर्जुन पण हरेल का???'
मी स्मित करुन उत्तर दिलं. 'अभयच्या आयुष्यात त्याला ती साथ नव्हती आणि अर्जुन... त्याला दिलेली साथ कधीच सुटणार नाही.'
आता त्याच्या चेहर्यावर समाधान मला दिसलं. अभयमुळे तो नक्कीच हादरला होता, पण त्याची सोबती होती त्याच्याजवळ. हवेतला आवाज आता काहीसा वेगळाच जाणवत होता.
कुछ पल ये जिंदगी के, यहीं थमसे जाये।
हाथों में हाथ हमारा, ये समा रुक सा जाये।
शिकायते खत्म हो गयी है मेरे दोस्त,
अब बस उजाला हेै, चल साथ चले जाये।