ती वाट बघत्येय-९
ती वाट बघत्येय-९
शिवानीची सुटका
शिवानीची कहाणी ऐकून लीलावती आणि महाराज सुन्न झाले होते. कितीतरी वेळ दोघेही एकमेकांशी न बोलता मौन बसून होते. शेवटी लिलावतीनेच मौन तोडले.
"महाराज, आता पुढे काय? माझ्या शुभमला आणखी किती त्रास काढावा लागणार? यावर काही उपायच नाही का महाराज? लवकर काही तरी करा, माझ्या शुभमला यातून सोडवा." लिलावतीचं काळीज पिळवटून निघत होतं.
तसे महाराज भानावर आले. पुढील कार्यसिद्धी करण्यासाठी मनाची तयारी करू लागले.
"लीलावती, लवकरच आपल्याला शुभमकडे जायला हवे. त्याला आणि शुभांगीला सोबत घेऊन ते ठिकाण शोधून काढायला हवे. तिने सांगितल्याप्रमाणे तिची विधिवत अंत्यक्रिया केल्याशिवाय तिचा आत्मा मुक्त होणार नाही, आणि ती मुक्त होईपर्यंत शुभमला त्रास सहन करावाच लागणार आहे. जा घरी जाऊन लवकर तयारी कर, मीही तयार होतो. उद्या पहिल्या गाडीने आपण निघू." असे म्हणून महाराज उठून तयारीला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने महाराज आणि लीलावती दोघेही शुभमकडे जायला निघाले होते. गाडी रस्त्याने कुठेच थांबू नये असे लिलावतीला वाटत होते. प्रत्येक थांब्यावर थांबत थांबत गाडी एकदाची ठिकाणावर पोहोचली. महाराज आणि लीलावती खाली उतरून शुभमच्या खोलीकडे निघाले. शुभम ऑफिसला जाण्याच्या तयारीतच होता. पार्किंगमधून गाडी बाहेर काढत होता. शुभांगी हातात टिफिन घेऊन शुभमला देण्यासाठी उभी होती. तेवढ्यात हे दोघे येताना पाहून तो गाडीच्या खाली उतरला. समोर जाऊन महाराजांच्या हातातील पिशवी घेऊ लागला, पण महाराजांनी, 'राहू दे घेतो मी' म्हणत ती दिली नाही. मग त्याने लिलावतीच्या जवळचे गाठोडे घेतले, त्यांना घरात नेले. शुभांगीने हातपाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये पाणी काढले. महाराज आणि नंतर लीलावती फ्रेश होऊन आले. शुभांगी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. शुभम-शुभांगी दोघांच्याही पाया पडले.
"मामी, फोन नाही काही नाही. असं कसं अचानक येणं केलं? आणि तेही महाराजांना घेऊन?" शुभमने प्रश्न केला.
"जावई बुवा, शुभांगीच्या स्वप्नाच्या प्रकरणापासून माझा जीव अगदीच घाबरला होता. माझ्या जीवात जीव उरला नव्हता. शुभांगी, एकदा सगळ्यांसाठी चहा ठेव ना." शुभांगीला चहा ठेवायला सांगून मुद्दाम तिला इथून दूर केले आणि परत सांगायला लागली, "महाराजांकडे जाऊन चौकशी केली तेव्हा एक भयंकर प्रकार ऐकायला मिळाला. तिला पिशाच्चाची बाधा होणार असे ऐकायला मिळाले. त्याचा बंदोबस्त करण्यासाठीच आम्ही इकडे आलो आहोत. आपल्याला आजच निघावे लागणार आहे. लवकर तयारी करा."
"मामी, आता या काळातही अशा गोष्टीवर विश्वास ठेवावा का? असं कुठं असतं का?" शुभमचा प्रश्न.
"पाव्हणं, अशा गोष्टींवर तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांचा विश्वास बसत नाही. पण हे सत्य आहे. जन्मवेळच्या ग्रहदशेचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत असतो, हे शास्त्र सांगतं. विधिलिखिताप्रमाणेच मनुष्य जीवनात घडामोडी घडत असतात." महाराजांनी खुलासा केला.
शुभांगी चहा घेऊन हजर झाली होती. चहा बनवत असताना तिचाही कान इकडेच होता. तिने सर्व ऐकले होते. तिने सर्वांना चहा दिला.
"जावई बुवा, आज नाही म्हणू नका. आपण आज जाऊन साऱ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावून टाकू." लिलावतीने शुभमला विनंती केली.
"आई म्हणत्येय तर जाऊ या ना. काय हरकत आहे? एक सुटीच लागेल फार तर. तिच्याही मनासारखं होईल. तिलाही भीतीचं कारण उरणार नाही." शुभांगीने लगेच गोष्ट उचलून धरली. तिच्या आतील शिवानीला लवकर मुक्त व्हायचं होतं. शुभम अंधश्रद्धा समजून नकार द्यायचा नाहीतर. म्हणून तिने पटकन मनातला विचार मांडला.
शुभम थोडा विचारात पडला. सुट्टीचे काय करावे? सुटीचे कारण काय सांगावे? हे सारं खरं असेल का? शुभांगीचा तसाच विचार दिसतोय. त्याने ऑफिसला फोन लावला. आज येत नाही म्हणून सांगितले. तोपर्यंत शुभांगी या दोघांसाठी स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली.
स्वयंपाक झाला. शुभांगीने त्या दोघांना जेवायला वाढले. त्यांचे जेवण होईपर्यंत तिने स्वतःची बॅग भरली. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. जेवण झाल्याबरोबर भांडे उचलून बेसिनजवळ नेऊन ठेवले. आणि बॅग उचलून गाडीत नेऊन ठेवली. सर्वजण गाडीत बसले. तिने दारे-खिडक्या व्यवस्थित बंद करून गेटला लॉक केले आणि गाडीत बसली. ते सर्वजण पुन्हा एकदा बालमटेकडीच्या प्रवासाला निघाले.
रस्त्याने जाताना शुभांगी आईसोबत गप्पा मारत होती. नेहमीपेक्षा शुभांगी आज जास्तच मोकळी बोलत होती. गप्पा गप्पांच्या ओघात ते बालमटेकडीजवळ पोहोचलेसुद्धा. त्या ठिकाणी गेल्यावर सर्वप्रथम ते मंदिरात गेले. तेथे दर्शन करून ते इकडे तिकडे शोध घेऊ लागले. शिवानी अंतिम क्रियेसाठी तयारून गेली होती. शुभांगीच्या शरीरात असल्यामुळे तिने शोध घेण्यात पुढाकार घ्यायचे ठरवले.
शुभांगीची शिवानीसोबत पहिल्यांदा झालेल्या भेटीचे स्थळ तिने दाखवले. इथून जवळच तो तलाव असल्याचे तिने सांगितले, ज्यामध्ये सूरज आणि शिवानी बुडाले होते. आता तिथे झाडीने घनदाट जंगल बनले होते. तलावाची पडझड झाली होती. बांध फुटून पाण्याच्या प्रवाहामुळे तेथे खोल दरी निर्माण झालेली होती. झाडा-झुडुपांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. शेवटी शुभांगीमधील शिवानीनेच पुढाकार घेऊन एक ठिकाण दाखवले. तिथे शोध घेतला असता तेथे बरीचशी हाडे सापडली. महाराजांनी ती गोळा केलेली हाडे एकत्र जोडून पहिली, तर तो मानवी शरीराचा सांगाडाच होता.
महाराजांनी तो व्यवस्थित जुळवला. तो शिवानीचाच आहे याची खात्री करण्यासाठी प्रेतात्म्याच्या आवाहनाचा विधी आरंभला. यज्ञकुंड तयार करून त्यात समिधा टाकत तो प्रज्वलित करून मंत्रोच्चारण सुरू केले.
"ओ$म ह्रिम ह्रिम चामुंडायै! ओ$म फट् स्वाहा!
ओ$म ह्रिम ह्रिम चामुंडायै! ओ$म फट् स्वाहा!"
मंत्राचे उच्चारण सुरू होताच इकडे शुभांगीच्या अंगात काहीतरी घडतंय असं तिला जाणवायला लागलं. ती डोळे मिटून शांत बसली होती. तसे महाराज सोडून सर्वच जण शांत बसले होते. मंत्र जोरात सुरू होते, समिधा टाकणेही सुरू होते. समिधा टाकताना मोठा भडका व्हायचा त्या वेळेस आपोआपच सर्वांचे डोळे बंद होत होते. असाच एक भडका झाला. सर्वांचे डोळे मिटले गेले. शुभांगीला शरीरातून सर्रर्रर्रकन काहीतरी निघून गेलं अशी जाणीव झाली. तिला हलकं हलकसं वाटू लागलं. तेवढ्यात..
"थांबा!" असा मंजुळ आवाज आला. यज्ञकुंडात एक सुंदर, सुकुमार स्त्री उभी होती. सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले.
"अरे, ही तर तीच आहे माझी मैत्रीण" शुभांगीच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले.
"हो. मी तीच आहे जी तुला मैत्रिणीसारखी जवळ करत होती. मला माफ कर शुभांगी. मी तुझा फार मोठा गुन्हा केलाय, तुझ्या शरीराचा वापर करून मी माझी कामेच्छा पूर्ण करून घेतली. माझा नाईलाज होता. त्याशिवाय मला या पिशाच्च योनीतून मुक्तीच नव्हती. तू पहिल्यांदा भेटलीस तेव्हाच मी शुभमला बघितले. तो दुसरा तिसरा कुणी नसून नक्की माझा सुरज आहे हे मी ओळखलं. पण त्याचे माझे मिलन होण्यात तुझी अडचण होती. त्या अडचणीलाच मी माझे साधन बनवले. मी तुझे शरीर वापरायचे ठरवले. त्या शरीरावर माझ्या सुरजचे म्हणजे शुभमचे खूप प्रेम आहे हे मी त्याच्या चेहऱ्यावरच्या चिंतेच्या रेषामुळे ताडले होते. सुरज, आपले मिलन झाले, जन्मोजन्मी होत राहील. तू कुठेही गेलास तरी मी तुझी साथ सोडणार नाही. पण हो! घाबरून जाऊ नकोस मी तुला बिलकुल त्रास देणार नाही. आता माझ्यावर एकच उपकार करा. माझ्या या सांगाड्यावर अंत्यक्रिया करा, मला माझ्या सुरजच्या म्हणजे शुभमच्या हस्ते अग्नी द्या. मला पिशाच्च योनीतून मुक्तता मिळेल. मी आणि सूरज पुन्हा एकमेकांचे जोडीदार होऊ. महाराज, मला माफ करा, तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागला. मला तुम्ही मुक्ती मिळवून दिली. मी तुमची जन्मोजन्मी आभारी राहीन. येते मी..." असे म्हणत तिने हात जोडून सर्वांना नमस्कार केला. आणि आपले शरीर सूक्ष्म करायला सुरुवात केली. पाहता पाहता लहान होत होत सर्वांच्या देखत ती यज्ञकुंडात विलीन झाली.
सर्वांनी मिळून तिथल्या झाडाझुडुपामधून वाळलेल्या काटक्या, लाकडे जमा केली. एकत्र करून त्याची चिता तयार केली, ती हाडे व्यवस्थित त्या चितेवर अंथरली. विधिवत पूजा करून शुभमच्या हस्ते अग्नी दिला. आपल्यातीलच एका व्यक्तीला निरोप देऊन आल्यासारखे जड अंतःकरणाने, सुतकी चेहऱ्याने ते तिथून परत फिरले. परत आल्यावर त्यांनी पूर्ण तेरा दिवसाचे सुतक पाळले आणि सर्व विधीही पार पाडले.