ती वाट बघत्येय-८
ती वाट बघत्येय-८
शिवानीची इच्छापूर्ती
शुभम, शुभांगी, डॉक्टर रमेश, सरिता सारे बालमटेकडीच्या सहलीहून परत आले. दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या नेहमीच्या कामाला सुरुवातही झाली होती. शुभमही नियमितपणे ऑफिसला जायला लागला. रमेशचा दवाखानाही नेहमीप्रमाणेच सुरू झाला. फक्त शुभांगी तेवढी नेहमीप्रमाणे फ्रेश दिसत नव्हती. सहलीच्या प्रवासामुळे थकली असेल असे समजून शुभमने थोडे दुर्लक्ष केले. परंतु दुसऱ्या दिवशीही ती नॉर्मल दिसली नाही म्हणून दोन दिवस सरीताला बोलावून घेतले.
सरिता दोन-तीन दिवस तिथे राहिली. मात्र, शुभांगी काही तरी विचारात मग्न असल्याप्रमाणे मौन राहायची. सरीताने खोदून खोदून विचारले, एखादे मूल आता लवकर येऊ द्या म्हणून सांगितले, तेव्हा तिनेही, 'लवकरच एखादे मूल यावे, हीच एक आखरी इच्छा आहे' असे सांगितले. संध्याकाळी रमेश जेवायला आल्यावर सर्वांनी जेवण केले आणि गप्पांच्या ओघात सरीताने तो विषय काढलाच. शुभांगी मात्र लाजून बाजूला झाली. शुभम सांगू लागला...
"आम्हाला का नकोय का? पण हे स्वप्नांचं झेंगट निघाल्यापासून तिची पाहिजे तशी साथच मिळेनाशी झाली. कधी तिच्या मनातले नैराश्य निघेल आणि ती पहिल्यासारखी होईल ते होवो."
"काळजी करू नकोस मित्रा, सारे काही व्यवस्थित होईल. वहिनीला काहीही झालेले नाही. तू निराश होऊ नकोस. चार दिवसात जर काही फरक दिसला नाही तर पुढे बघू काय करायचे ते. मी आहे ना..." रमेशने हिंमत भरली.
सर्वांनी गप्पा केल्या. रमेश आणि सरिता घरी निघून गेले. शुभम, शुभांगी बेडरूममध्ये गेले. झोपताना शुभमने बाळाचा विषय काढलाच. तेव्हा, 'मी कुठे नाही म्हणत्येय. मलाही बाळ हवेच आहे.' असे म्हणून शुभांगी बोलता बोलता झोपलीसुद्धा. ती रात्र सुद्धा अशीच रिकामी गेली.
दुसऱ्या दिवशी शुभम नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. शुभांगीच्या रूपातील शिवानी आज वेगळ्याच मूडमध्ये होती. 'आज काही झाले तरी आपली इच्छा पूर्ण करून घ्यायचीच' तिने आज पक्का निश्चय केला होता.
शुभम ऑफिसला गेल्यावर शुभांगीने घरातील सर्व कामे झटपट आटोपली. घर, हॉल, किचन स्वच्छ केले. ती बेडरूममध्ये गेली. संपूर्ण बेडरूम तिने धुवून पुसून स्वच्छ केले. गुलाबपाण्याचा स्प्रे मारून रुम सुगंधित केली. कधी नाही ते शुभांगी आज बाजारातही गेली. मोगऱ्याची, गुलाबाची फुले घेऊन आली. गजरे आणून फ्रीजमध्ये ठेवले. सर्व काही मनासारखे झाल्यावर किचनकडे मोर्चा वळवला.
शुभमला पुरणपोळी खूप आवडते, 'तशी ती सुरजलाही खूप आवडत होती. आज सुरजला मनसोक्त पुरणपोळी खाऊ घालायची.' शुभांगीमधील शिवानी मनात म्हणत होती. तिचे हात आज अति वेगाने काम करत होते. पुरणपोळीचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? किती बारीक बारीक कामं करावी लागतात? हे गृहिणींनाच कळतं. शुभम ऑफिसहून येईपर्यंत पोळी सोडून बाकीचा सर्व स्वयंपाक पूर्ण झालेला होता. पोळी गरम गरम पाहिजे म्हणून मुद्दाम तेवढी बाकी ठेऊन ती हातपाय धुवून मेकअप करून दारात त्याची वाट बघत बसली होती.
शुभम घरी आल्याबरोबर दारात बसलेल्या शुभांगीला बघून अचंबित होऊन पाहू लागला. आज काय विशेष आहे बुवा? तो विचार करायला लागला. तिने हसतच त्याच्या हातातील बॅग घेतली, घरात नेऊन ठेवली. हात-पाय धुवायला गरम पाणी काढले. त्यात गुलाबपाणी घालून ते बाथरूममध्ये दिले. त्याचे हात-पाय धुवून झाल्यावर स्वतःच्या हाताने टॉवेल दिला. तो फ्रेश होईपर्यंत तिने लगेच स्वयंपाकघरात पोळ्या बनवायला सुरुवात केली. गावरान तुपात बनवलेल्या गरम पुरणपोळीच्या वासाने तो नुसता वेडा व्हायचा राहिला. पोळ्या बनवून झाल्याबरोबर तिने त्याला आवाज देऊन जेवायला बोलावले. खरंतर त्यालाही पुरणपोळीच्या खमंग वासाने भूक अनावर झाली होती. दोघांनी मनसोक्त जेवण केले. जेवताना त्याने याबद्दल विचारलेसुद्धा, पण तिने, 'सहजच वाटलं म्हणून केलं.' असं सांगितलं. मनात मात्र ती म्हणत होती, 'तुला आठवत नसेल पण मला पक्के आठवणीत आहे. सुरज, आज तुझा वाढदिवस आहे. आज सारे काही तुझ्या मनासारखे करणार आहे मी. तुझ्या नि माझ्याही सर्व अपूर्ण इच्छा आज पूर्ण करणार आहे.' उघड फक्त ती शुभमकडे डोळे भरून पाहून घेत होती. जेवण झाल्यावर तिने पटकन भांडीकुंडी स्वच्छ केली. आणि दोघेही बाहेर फिरून आले. आल्यावर तिने त्याला अंघोळीसाठी गरम पाणी काढले तेव्हा, 'हे काय नवीनच?' असा प्रश्न त्याच्या मनात आला पण तो तिला नकार मात्र देऊ शकला नाही. त्याची अंघोळ झाल्यावर तिनेही अंघोळ केली. मस्त मलमली हिरवी साडी नेसली. केसात गजरा माळला. अंगावर हलकासा सुगंधी स्प्रे मारला. आणि ते बेडरूममध्ये शिरले.
तिच्या या सर्व वागण्याकडे पाहून शुभम वेडा व्हायचाच बाकी राहिला होता. हिरव्या मलमली साडीत तिचे अंग अंग उठून दिसत होते. छातीवरचे गुलाबी गेंद त्याला खुणावत होते. त्याला उत्तेजित करण्यासाठी मुद्दाम तिने खांद्यावरचा पदर खाली सोडला होता. तो एकटक नजरेने तिच्या सुकुमार देहाचे, तिच्या अप्रतिम सौंदर्याचे रसपान करता होता. ती देखील त्याची भरदार छाती, अंग प्रत्यंग पाहून उत्तेजित होत होती. आणि तो क्षण आला, दोघेही अनावर ओढीने एकमेकांना बिलगले. कित्येक वर्षांपासून उपाशी असलेले, भुकेलेले प्राणी जणू अधाशीपणे एकमेकांना लुचत होते. कधी तो, कधी ती वरचढ होत होती. त्यांच्या प्रणयाराधनेपुढे रती आणि मदनाचा प्रणयसुद्धा फिका पडला असता कदाचित. प्रणयाच्या धुंदीत रात्र केव्हा सरली कळलेच नाही. त्यांच्या प्रणयाची लाली जेव्हा पूर्व क्षितिजावर उमटली तेव्हा त्यांच्या गळ्यातील मिठी सैल झाली. सूर्याची किरणे दार ठोठावत होती. आज पहिल्यांदाच शुभम आणि शुभांगी, नव्हे तर सुरज आणि शिवानी तृप्त झाले होते. दोघेही उठून नित्याच्या दिनचर्येला लागले. शुभम नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला. ती घरातील कामे आवरायला लागली. ती आज तृप्त तृप्त झाली होती. आज तिचा सुरज तिला भेटला होता. नुसता भेटलाच नाही तर भोगायलाही मिळाला होता. आता एकच बाकी राहिले होते, पिशाच्च योनीतून सुटका. 'ती वेळ आता लवकरच यावी', ती मनोमन प्रार्थना करत होती.

