Swapna Sadhankar

Classics

3  

Swapna Sadhankar

Classics

ती नवदुर्गा

ती नवदुर्गा

3 mins
246


नववीत मी आणि ती दोघीही नवीन. तिची ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे ती ९२ बॅच मधून ९३ बॅच मधे आलेली आणि मी दुसऱ्या शहरातून शिफ्ट झाल्यामुळे. माझ्या घराजवळ राहणारी तीच, मग आम्ही शाळेत सोबत येऊ जाऊ लागलो एका रिक्षाने. ट्युशन ही सोबत लावल्या होत्या. सतत सोबतच! माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग कधी झाली ती कळलंच नाही. होतीच तशी ती! मनमिळावू, हसरी, सहनशील, साहसी आणि सहज सामावून घेणारी सुंदरी. नववीत व दहावीत माझा बॅकलॉग भरून काढायला ती माझ्या पाठीशी उभी होती. नुसतीच मैत्रीण म्हणून नाही तर अगदी गार्डियन प्रमाणे. मी तो फेज यशस्वीरित्या पार करू शकली ते तिच्यामुळे. त्यावेळी ती स्वतःच आपल्या परिस्थितीशी दोन हात करत होती, पण त्याची जरा देखील तमा तिच्या चेहऱ्यावर उमटत नसे. कुठून तेवढी ताकद येत असे तेव्हा समजत नव्हतं. आता सगळं नव्याने आठवतंय त्या नवदुर्गेचं,.. जी फक्त एकदाच हारली.. आपल्या शेवटच्या श्वासाशी झुंज देताना..

नववीत असताना मुंबई ला जाऊन हार्टचे ऑपरेशन करावे लागले. शाळेतले ते वर्ष गेले म्हणून परत नवव्या वर्गात बसली. घरची जवळजवळ सगळी कामं करून अभ्यास करताना तिचा उत्साह द्विगुणित व्हायचा. वळणदार अक्षर होते तिचे. दहावीत ऐन बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर परत हार्टचा त्रास व्हायला लागला म्हणून दवाखान्यात दाखल केले. परीक्षेसाठी कशीबशी उठली. परीक्षा दिली. उत्तम मार्काने पास झाली. विज्ञानाची आवड पण घरची परिस्थिती बेताची. तरीही जिद्दीने ज्युनिअर कॉलेज ला विज्ञान घेतले. घरी वडील टीबी ने ग्रस्त. आईची नौकरी करून ओढाताण, कारण घरी आजारी नवरा, म्हातारे सासरे, नौकरीच्या शोधात असलेला दिर, चार शाळेत शिकणारे मुलं. अशात वडिलांच्या पाठोपाठ वर्षाच्या आत आईचे हार्ट फेल्युअर ने निधन. आता आधार आजोबांचा. तर तेही सहा महिन्यातच सोडून निघून गेले. असे मृत्यूचे सावट घरात असूनही बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. डॉक्टर व्हायचे स्वप्न. पण काकाने सर्वांचा सांभाळ करण्यासाठी नकार दिला. तोडकं मोडकं डोक्यावरचं छप्पर देखील गेलं. मावशीने मुलांना आपल्या सोबत आपल्या गावी नेले. मग घरूनच बी. ए. इन इंग्लिश लिटरेचर केले. लग्न जुळणे कठीण. पण अखेर चांगला नवरा मुलगा चालून आला. लग्न झालं पण आता मुल होणं जिकरीचं. तरीही एका गोंडस मुलाला प्राणाशी खेळून जन्म दिलाच. आजार काही पिच्छा सोडत नव्हता. तरी ओठांवर कधीही कसली तक्रार नाही. दोनदा व्हॉल्व बदलवले होते. तरीही अगदी सर्वसामान्य होऊन जगण्याचा आनंद घेत राहायची. ह्याचे कधी रडगाणे गात बसली नाही. सासरच्यांचे सगळं अगदी मनापासून करायची. मुलाचे खूप छान संगोपन केले. नवऱ्याला नौकरी सोडल्यावर व्यवसाय करण्यात साथ दिली. एम. ए. इंग्लिश लिटरेचर केले. मास्टर इन फिलॉसॉफी केले. कौन्सेलर & हीलर म्हणून काम केले. मुलांच्या शिकवण्या घेतल्या. योगा चा अभ्यास केला, (जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालण्याकरिता बक्षीस पटकावलं). नृत्याची आवड जोपासली. बहीण भावंडांना जपले. खूप मोठा मित्र परिवार मिळवला... फोनवर तासनतास बोलताना कधीच आपल्या वेदना शब्दांना पकडू देत नसे. बोलून झाल्यावर वाटायचं इतकं कसं कुणी स्ट्राँग असू शकतं. खरं तर तिच्या आयुष्याची ट्रॅजडी शब्दात मांडलेली मुळीच आवडणार नाही तिला. ट्रॅजडी हा शब्दही तिने खपवून घेतला नसता. तरी आज माझ्याकडून ते घडलं ह्यासाठी तिची माफी मागते.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics