तिची शक्ती - एक संघर्ष
तिची शक्ती - एक संघर्ष


आपण जन्मापासूनच वेगळे आहोत याची तिला जाणीव होती. मी अशी का आहे? नेहमीच तिला प्रश्न पडायचा. ती नेहमी आईला विचारायची. "तू इतरांसारखी नाहीस कारण तू लाखात एक आहेस." आई हसत म्हणायची. हे वेगळेपण तिला नकोसे वाटे. इतर सामान्य मुलींचा तिला हेवा वाटायचा. त्यांच्याकडे रस्त्याने जाताना कोणी बघायचं नाही, की त्यांना कोणी पाया पडायचं नाही, त्यांच्याकडे कोणी विचित्र नजरेनी बघायचंही नाही. त्याआपल्याच जगात मश्गुल असायच्या.जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून नीलमला आपल्यातल्या वेगळेपणाची जाणीव झाली.
नीलम ही एका छोट्या शहरात राहणारी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. तिचे वडील एका खाजगी कंपनीत क्लार्क होते. आईसुद्धा शिवण करून संसाराला हातभार लावायची. नीलमची आजी नेहमी सांगायची कि लग्नाला पाच वर्षं झाली तरी नीलमच्या आईला मूल होत नव्हतं. मग तीच पहाडावरच्या देवीला नवस बोलली. देवी नवसाला पावली आणि नीलम झाली. तिनेच नीलमला ही दिव्य शक्ती बहाल केली होती. नीलम जेव्हा एखाद्या माणसाला बघायची तेव्हा त्याच्यावर येणाऱ्या संकटाची जाणीव तिला व्हायची. त्याचं मरण तिला दिसायचं. सुरवातीला हे असं का होतंय हे तिला समजायचं नाही. एक दिवस तिच्या शेजारचे साबळे काका बाहेर जायला निघाले. त्यांना खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं. नीलम गॅलरीत बसून त्यांना बाय करत होती त्यावेळी ती ७ वर्षाची असेल, अचानक तिला काकांच्या गाडीला एक मोठा ट्रक उडवताना दिसला. ती एकदम किंचाळली, "काका जाऊ नका! तुमच्या गाडीला अपघात होणारे. मला दिसलं आता." साबळे काकू हे सगळं ऐकत होत्या. त्या चिडून म्हणाल्या,"इतकं पण समजत नाही का तुला की माणूस चांगल्या कामासाठी बाहेर निघालं की टोकायचं नसतं. अवलक्षणी मेली." काका गाडीने गेले आणि संध्याकाळीच त्यांच्या गाडीला एका ट्रकनी उडवल्याची बातमी आली. काका त्यात दगावले होते. साबळे काकूंनी नीलमला राग आणि दुःखाच्या भरात खूप शिव्या-शाप दिले होते. बिचाऱ्या छोट्याशा नीलमला हे समजतच नव्हते की आपली काय चूक झाली. मग असे वारंवार होऊ लागले. एखादा माणूस समोर आला आणि त्याच्या जीवाला धोका असला की नीलमला तो दिसत असे. असं ठरवून नाही पण तो मनुष्य समोर आला की अचानक समोरचे दृश्य नाहीसे होऊन तिला त्या माणसावर येणारे संकट दिसत असे. हळूहळू लोकांना तिच्यात अशी काही शक्ती आहे याची जाणीव होऊ लागली. मग लोक त्यांच्या घरी गर्दी करू लागले.
या गोष्टीचा फायदा तिचे वडील पैसे कमावण्यासाठी करून घेऊ लागले. त्यांनी नोकरी सोडून दिली. पैसे मिळवण्याचं इतकं मोठं साधन त्यांना मिळालं होतं. ते आता दुसऱ्या मोठया घरात राहत होते. नीलमला तिच्या मैत्रिणींची खूप आठवण यायची. त्या जरी शाळेत तिला भेटत असल्या तरी आता त्या तिच्यापासून लांबच राहायच्या. ती सर्वांहून वेगळी पडली होती.
नीलम शाळेत हुशार विद्यार्थिनी होती. तिला १०वीत ७७% मिळाले. तिला नर्स होऊन लोकांची सेवा करायची इच्छा होती. तिच्या वडिलांनी १०वि नंतर तिचे शिक्षण बंद करून तिला घरात बसवले. नर्स होऊन काय करणार? कमावते तर तू आता पण आहेस ना ? असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना भीती होती जर नीलम बाहेरच्या जगात गेली तर तिच्या दयाळू स्वभावानुसार ती लोकांची फुकट मदत करेल. सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्याला हातची सोडायची नव्हती.
नीलम १८ वर्षाची झाल्यावर देवगावच्या सरपंचाच्या मुलाचं अनिलचं स्थळ तिच्यासाठी आलं. ते अतिशय श्रीमंत होते. त्यांना मुलाच्या लग्नाची घाई झाली होती. नीलमच्या वडिलांना ते एकरकमी ५० लाख रुपये देणार होते. नीलमच्या वडिलांनी काही विचार न करता लग्न ठरवलं. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नीलमला समजलं की तिचा नवरा कॅन्सरनी आजारी आहे आणि काही दिवसाचा सोबती आहे. फक्त संपत्तीला वारस मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर महिनाभरातच अनिल गेला. या एक महिन्यात नीलमनी त्याची खूप मनापासून सेवा केली. मग मात्र नीलमच्या घरच्यांनी तिचा खूप छळ केला. तिला वाईट पायगुणाची म्हणून मारझोड करू लागले. अशातच एकदा त्यांना तिच्या शक्तीबद्दल समजले. त्यातच गावात मलेरियाच्या साथीमुळे ३-४ मुले दगावली. मग नीलमच्या सासू-सासऱ्यांनी नीलम जादूटोणा करतेय व त्यामुळेच गावातल्या मुलांचा तिने बळी घेतला असे पसरवले. त्यांना नीलम नकोशी झाली होती कारण, नीलमच्या आज्जे सासऱ्यांनी सर्व इस्टेट अनिलच्या नावावर केली होती. त्याच्यानंतर ती नीलमला मिळू नये म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होते. जर नीलमला मूल झालं असतं तर ते सज्ञान होईपर्यंत त्यांनी ती सहज काढून घेतली असती. त्यांचे सर्व प्रयत्न वाया गेले. इकडे गावातले लोक नीलमवर चिडले. तिला चेटकीण ठरवून जाळायला निघाले. इकडे नीलम आरशासमोर गेली आणि स्वतःचा चेहरा आरशात दिसताच तिला स्वतःवरच्या संकटाची कल्पना आली. त्याच क्षणी ती घरातून पाळली. नीलम जीव खाऊन पळत होती. तिची ताकद संपत आली होती. इतक्यात ती मुख्य रस्त्यावर आली आणि एका भरधाव वेगानी येणाऱ्या गाडीने तिला उडवले. माई साजगाववरुन मुंबईकडे जायला निघाल्या होत्या. रात्रीची वेळ होती. इतक्यात त्यांना एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले. त्यांना बेशुद्ध पडलेली नीलम दिसली.
नीलमनी डोळे उघडले तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. जवळ एक प्रेमळ चेहऱ्याची साठीच्या आसपासची स्त्री बसली होती. "आलीस का शुद्धीवर? मी माई. अगं मला तू रस्त्यावर बेशुद्ध पडलेली दिसलीस." त्या नीलमच्या केसात हात फिरवत म्हणाल्या. नीलमला रडू आलं. तिनी माईंना आपली कर्मकहाणी सांगितली. माई हसत म्हणाल्या,"अगं तुला अभिमान वाटला पाहिजे कि तुझ्यात इतकी दिव्य शक्ती आहे. त्याचा उपयोग तू लोकांच्या मदतीसाठी केला पाहिजेस. बघ मी तुला एक सल्ला देते. तू माझ्याबरोबर रहा. तुझी शक्ती योग्यप्रकारे वापरलीस तर त्यायोगे तू तुझ्या इच्छेप्रमाणे लोकांची सेवाही करू शकशील. त्याचबरोबर तू नर्सिंगचा कोर्सही कर, तुझं काम चालू झालं थोडेफार पैसे मिळवून तू तुझ्या पायावर उभी राहशील." "खरंच मला जमेल हे?" नीलमच्या डोळ्यात हे ऐकून आनंद उभा राहिला. नीलमला बघून माईंना स्वतःची आठवण आली. त्यांचीही कहाणी अशीच होती. घरची गरिबी असल्यामुळे दुप्पट वयाच्या माणसाशी वडिलांनी त्यांचं लग्न करून दिलं. त्यांचे पती अतिशय चांगले होते त्यांनी माईंना शिकवलं. नोकरी करायची परवानगी दिली. एक दिवस अपघातात ते गेले. माईंच्या सासरच्यांनी त्यांना हाकलून दिले. त्या एका समाजसेवी संस्थेत काम करत होत्या. त्यांनी सर्व आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलं होतं. गेल्या चाळीस वर्षात त्यांना अनेक अडचणींना, संकटाना तोंड द्यावं लागलं होतं. त्यांनी नवऱ्यानी टाकलेल्या, अकाली विधवा झालेल्या अनेक स्त्रियांना आधार दिला होता. तेव्हा समाजकंटकांनी त्या वेश्याव्यवसाय चालवतात असा आरोप करून त्यांची संस्था बंद पाडली होती. मग एक छोटीशी जागा भाड्यानी घेऊन त्यांनी या स्त्रियांना शिवण, नर्सिंग, केटरिंग असे व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले होते. त्यांची लग्नही लावून दिली होती. स्त्रीजीवन हाच मुळी संघर्ष असतो असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी अगदी माझ्यासारखीच संकटे यायला हवीत असे नाहीत. ज्या घरात जन्मल्यापासून मुलगी राहते, ज्या वंशाचे रक्त तिच्या नसानसांतून वाहते, ते सर्व सोडून एका नवीन घराला त्यातील माणसांना आपलेसे मानून त्यांच्यासोबत जन्म काढायचा हाही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष आहे. प्रत्येक स्त्री ही खास आहे. कोणी स्वतःला कमी समजू नये हे त्या नेहमी सांगायच्या. नीलमसारख्या अनेक मुलींना त्यांनी आधार दिला होता.
नीलमचे नर्सिंगचे शिक्षण चालू झाले. ती आता आपल्या शक्तीचा योग्य वापर करायला शिकली होती. ती ‘अनामिका’ या नावानी पेपरमध्ये भविष्य लिहू लागली होती.
भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, हल्ले याविषयी ती बातमी देत असे व त्या खऱ्याही ठरत. त्यामुळे अनामिकेच्या प्रत्येक बातमीची लोक आतुरतेने वाट बघत. नीलम माईंबरोबर मिळून संस्थेच्या कामातही हातभार लावत असे. आता ती नीलम नाही तर सर्वांची लाडकी आक्का झाली होती. अशातच एक दिवस माईंचा मृत्यू झाला. नीलम त्या धक्क्याने पार कोसळली. माई तिचा आधार होत्या. ती सावरली कारण माईंनी दिलेला धागा हातात घेऊन तिला पुढे जायचं होतं. सोने ज्याप्रमाणे भट्टीतून तावून सुलाखून निघून तेजस्वी होते तशीच नीलम अनेक संकटाना तोंड देऊन अक्का झाली होती. तिला तिच्या कार्याबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक दिवस आपणही मारणार याची जाणीव तिला झाली. त्यांनी संस्थेची जबाबदारी अगोदरच एका योग्य व्यक्तीकडे सोपवली होती. शेवटचा श्वास घ्यायच्या आधी त्यांना माईंचे बोल आठवले
संघर्ष असे तुझे जीवन, जन्म असो वा मरण
न हरता चालत रहा, दुसऱ्यांसाठी जगत रहा,
हे भगवंता एक मागणे तुला
जन्मोजन्मी द्यावे स्त्रीपण
जरी असले संघर्ष जीवन ||
आक्का गेल्या. आक्कांनी जातानाही नेत्रदान केले होते. त्यांच्या डोळ्यांच्या रूपाने त्यांची शक्ती जिवंत राहिली होती. लोकांचे चांगले व्हावे हीच सदिच्छा त्यामागे होती.