आरती महाडिक

Classics

3.1  

आरती महाडिक

Classics

ते दोन दिवस

ते दोन दिवस

3 mins
204


"ए आज कुठला रंग आहे? ऑफिसला येताना त्या रंगाचे कपडे घालून येऊ आपण सगळ्याजणी." फोनवर बोलताना मैथिली राघवची बॅग भरत होती."आई, आज डब्ब्यात काय दिलं आहेस? मला तर फ्रँकी हवी आहेत. चीझ पण हवे त्यात आणि टोमॅटो केचअप आणि... "अरे हो हो.. फोन बंद करत मैथिली म्हणाली. तुला आवडते तशीच दिली आहे आणि हो ते फळ सुद्धा संपवायचे आहे हं डब्ब्यातले... माझा बच्चा.. असे म्हणून लगबगीने त्याला शाळेच्या बसमध्ये बसवून परत घरी आली.


  ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट आल्यापासून मैथिलीवर कामाचा खूप ताण आला होता. त्यात त्यांचे क्लायंट फारच कडक होते. त्यामुळे वेळेवर काम झाले नाही तर वरच्या बॉसचा ओरडा खावा लागे.तिच्या डोक्यात ऑफिसची राहिलेली कामे फिरायला लागली.

  

हल्ली सासऱ्यांच्या काहीच लक्षात राहात नाही त्यामुळे बाहेर जाताना त्यांच्या गळ्यात ओळखपत्र आणि मोबाईल दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवतच नाही. सासऱ्यांनी सगळ्या वस्तू घेतल्या आहेत याची खात्री करून मगच तिने त्यांना घराबाहेर जाऊ दिले. सगळ्यांचा नाश्ता झाला होता.राहुल सकाळीच त्याचा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला गेला होता.सासूबाई दुसाऱ्या बेडरूम मध्ये टीव्ही वर त्यांच्या आवडत्या मालिकेचा रिपीट कार्यक्रम पाहत बसल्या होत्या.घरातील बाकीची कामे पटापटा आवरून मैथिली सुद्धा तिचे आवरायला तिच्या बेडरूम मध्ये गेली.


आजचा रंग पिवळा. यल्लो यल्लो डर्टी फेलो.. असे म्हणत मैथिली खुदकन हसली. कपाटातून राहुलने तिला घेतलेला अनारकली ड्रेस अलगद बाहेर काढला. त्यावर छान शोभून दिसतील असे कानातले घातले. हलकिशी लिपस्टिक लावली आणि तिचा आवडता परफ्यूम लावून ती ऑफिसला गेली.

ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात थोडी विश्रांती मिळाल्यावर तिच्या टीमने ग्रुप फोटो काढले. एकूणात दिवस थोडी मज्जा आणि कामात निघून गेला.


मैथिली - राहुल राहात होते तो एक उंच टॉवर होता. तसे चार टॉवर त्यांच्या सोसायटीत होते. आलिशान घरे आणि आलिशान गाड्या.. सुंदर बाग, लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया, मोठ्यांसाठी चालायला रस्ता इत्यादी अनेक सुविधा होत्या.नवरात्र सुरु होती म्हणून छोट्या देवीची स्थापना केली होती. आकर्षक विदयुत रोषाणाई केली होती.सकाळ संध्याकाळ आरती होतं होती. रोज नऊ दिवस देवीसमोर गरबा रंगत असे. प्रत्येक रात्री खाण्यासाठी काहीतरी नाश्ता असायचा त्यामुळे महिलावर्ग विशेष खुशीत होता. छान छान तयार होऊन लहान थोर गरब्यामध्ये सामील होतं.

एरवी कोणाला कोण माहित नसतं पण यामुळे नव्या ओळखी होत होत्या.


मैथिली छोट्या राघवला आणि सासूबाईंना खाली घेऊन आली. पिवळ्या कुर्त्यामध्ये राघव फारच गोड दिसत होता. मैथिली राघवला घेऊन गरबा खेळू लागली. माय लेक खेळण्यात दंग असताना राहुल आला आणि त्या दोघांना कौतुकाने पाहू लागला. मैथिलीने एक गिरकी घेतली आणि अचानक तिच्या ओटीपोटीत असह्य वेदना होऊ लागल्या. ती तेथून बाहेर आली. राहुल दिसताच ती त्याच्याकडे धावली आणि रडू लागली. आपल्याला सवय नसेल म्हणून दुखत असेल असे समजून ती थोडी शांत झाली पण नंतर दुखणे फारच वाढल्यावर राहुल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे ताबडतोब तिची सोनोग्राफी करण्यात आली. दहा मिनिटांनी रिपोर्ट आला की काहीतरी गंभीर समस्या आहेत.क्काय.. कसे शक्य आहेत? उणे पुरे पस्तीस वय आहेत हो तिचे.. छोटा मुलगा आहेत आम्हाला,, असे कसे होऊ शकते?


नको नको ते विचार दोघांच्या मनात येते होते. मन चिंती ते वैरी न चिंती! फार हौसेने आणि मेहेनतीने त्यांनी हे नवे घरी घेतले होते. त्यासाठी प्रत्येक महिन्यात मोठी रक्कम त्यांच्या पगारातून वजा होत होती.किती स्वप्ने त्या दोघांनी मिळून पहिली होती? अजून काय काय करायचे होते.. फिरायचे होते.. एका क्षणात जग 360 अंशात फिरले होते. आता पैशांची जुळवाजुळव कशी करायची?


छोट्या छोटया कुरबुरी, राग, तक्रारी कुठच्या कुठे पळून गेल्या. आता फक्त जगायचे होते. साधे, सोपे.. कसलीही अपेक्षा नव्हती.


दुसऱ्या दिवशी ते दोघे पुन्हा दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. एम आर आय करण्यासाठी.. त्याची चाचणी झाली. आणखी काही तास त्यांना वाट पाहावी लागणार होती. मैथिली विचार करत होती. कसे आहे हे जीवन.. कालपर्यंत मी एकदम ठीक होते. वेळच्या वेळी काम झालेच पाहिजे यासाठी तत्पर असणारी मी आता फक्त माझ्या वैद्यकीय चाचण्या आणि त्यांचे रिपोर्ट्स यातच अडकली आहेत. काय होईल, कसे होईल.. विचारांनी डोके सुन्न झालेय.इतक्या मेहेनतीने उभे केलेले आणि सजवलेले आमचे घर , माझे बाळ आणि मी... नशिबात काय वाढून ठेवलंय काय माहित? असा मनात विचार करत असताना तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते.


 राहुल रिपोर्ट्स घेऊन आला. सगळं नॉर्मल होते आणि तिचे दुखणे गोळ्या औषधानी बरे होणार होते.झटक्यात वातावरण बदलले. एकमेकांचे हात हातात घेऊन दोघेही आनंदाने रडले.. बंध आणखी घट्ट झाले.


दोन दिवस दोन वर्षांसारखे भासले होते. आता तिला तो योग्य जोडीदार वाटत होता. आपले घर, आपली माणसे आणि अवघे जगणेच किती सुंदर आहे याची जाणीव आणखी गडद झाली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics