वन्य जीव आणि मानव संघर्ष
वन्य जीव आणि मानव संघर्ष


आपल्या हिंदू संस्कृतीत वसुंधरा आणि तिच्यावर नांदत असलेले अगणित जीव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रिकाम्या जागेवर घर बांधण्यासाठी शस्त्र चालवताना मातीतली व मातीच्या खालच्या थरात आनंदाने निवास करणाऱ्या जीवजंतूंना त्या जागेतून हलवावे लागते म्हणून आपण त्यांची माफी मागून त्या जागेची पूजा करूनच काम सुरू करतो.
भूतलावरील प्रत्येक लहान-मोठ्या जिवाला जगण्याचा हक्क आहे परंतु माणसाने अति हव्यासापोटी निर्जन प्रदेशातील युगानुयुगे जंगलात राहणाऱ्या जीवांना तिथून बाजूला करून मोठ-मोठे गृह संस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू केले. खाडीच्या कमी पाणी असलेल्या भूभागावर भराव टाकून तिथेही टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन्य जीवांना पाण्यासाठी व अन्नासाठी मानवी वस्तीत येणे भाग पाडले गेले.
आपण वर्तमानपत्रात अशा आशयाच्या अनेक बातम्या वाचतो. बिबटे, अजगर, हरीण, सरपटणारे दुर्मिळ प्राणी घरात सुद्धा येतात. बऱ्याच वेळा भीतीने त्यांना मारले जाते किंवा वनाधिकाऱ्यांना कळवले की त्या मुक्या जिवांची सुटका करतात व त्यांना सुखरूपपणे पुन्हा जंगलात सोडून देतात. वरील घटना कमी की काय म्हणून अनेक वन्य जीवांची तस्करी सुद्धा केली जाते.
या युगात माणसाचे पापाचरण इतके वाढले आहे की त्याला कमी मेहनतीत झटपट श्रीमंत व्हायचे आहे. आपण म्हणतो की या राज्यात साक्षरतेचे प्रमाण अमुक-अमुक आहे परंतु जे शिकलेले आहेत ते सज्ञान आहेतच असे आपण म्हणू शकत नाही. कारण मोहाला बळी पडून चुकीची स्पर्धा, मत्सर या वाईट गोष्टी माणसात ठासून भरल्या आहेत. त्याचा आधी समूळ नाश व्हायला हवा. कारण अशामुळे अंधश्रद्धेकडे लोकांचा कल झुकून नाहक मांडूळ, खवल्या मांजर इत्यादी प्राण्यांना जीव द्यावा लागत आहे.
माणसाची आपल्या बुद्धीवर आणि मनगटावर विश्वास हवा. या भौतिक सुखाला भुलून पापाचार बोकाळला आहे. 'सेकंड होम' च्या नावाखाली डोंगरांचे सपाटीकरण करून जागा तयार केल्या जात आहेत. एका माणसाची किंवा कुटूंबाची चार-चार घरे आहेत. शहरातून चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. काऊचा घास बाळाला भरवताना काऊ येतच नाही. लहानपणी पाहिलेल्या अंगणातून झाडावर सरसर चढणाऱ्या खारुताई गायब आहेत. पण जंगलातली वाट चुकलेली वानरे मात्र मध्येच खिडकीत, बाल्कनीत येऊन दर्शन देतात. वाघ सिंहाच्या भारतीय प्रजाती नामशेष होत आहेत.
कसे असते ना की प्राण्यांची अन्नसाखळी असते... अनेक असतात. जसे की शेतातील उंदरांची संख्या आटोक्यात राहण्यासाठी सापांची मदत होते. गावातील घरातील धान्य सुरक्षित राहण्यासाठी तिथल्या मांजरी उंदरांचा फडशा पाडतात म्हणून त्यात सुद्द्धा नकळतपणे या साखळीचा समतोल साधण्यात हातभार लावतात. मुंग्या, मधमाशा यांचा तर या सर्व निसर्गचक्रात फार मोलाचा वाटा आहे. अनेकाविध माशा, कीटक, फुलपाखरे यांच्यामुळे परागीभवन होऊन जंगल वाढत राहते.
बऱ्याच वेळा थोड्या स्वार्थापायी एखादा माणूस जंगलाला आग लावतो. वणवे पेटतात. त्यामुळे एकाच वेळी असंख्य वन्यजीव त्यात होरपळून नष्ट होतात. कधी कधी अचानक लागलेल्या नैसर्गिक वणव्याला शांत न करता त्याचा गैरफायदा घेतला जातो आणि आग आणखीनच भडकवली जाते. सुक्याबरोबर ओलेसुद्धा जळून खाक होऊन जाते.
आपला आदिवासी समाज शतकानुशतके जंगलात राहतो पण ते जंगलाची जपणूक करतात. आपल्या आईसारखी त्याची काळजी घेतात. ऋतूप्रमाणे बहरणाऱ्या वृक्षांची फळे फुले, पाने, साली याचा उपयोग करतात. जास्तीच्या वस्तू शहरात येऊन विकतात आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण त्यात ओरबाडून घेण्याची वृत्ती नसते. आपण त्यांच्याकडून फार शिकण्यासारखे आहे. ' जगा आणि जगू द्या' हा मंत्र प्रत्येक जीवाला लागू आहे.
असे म्हणतात की घोडा ज्या झऱ्याचे पाणी पितो अशा आडवळणाच्या अनोळखी ठिकाणचे पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता. कारण घोडा कधीच घाणेरडे पाणी पीत नाही. जिथे मांजरी झोपतात अशा जागी तुम्ही तुमचा बिछाना टाकू शकता कारण मांजर जी जागा सुरक्षित आहे तिथेच झोपते. जिथे चिचुंद्री बीळ करून राहते त्या जागेत खुशाल झाडे लावा. झाडे नक्की मोठी होतील, बहरतील. साप ज्या ठिकाणी जमिन
ीवर अंगाचे वेटोळे करून पडून असतात अशी जागा घर बांधण्यासाठी योग्य असते कारण साप अशाच जागी राहतो जिथे उब असते. प्राण्यांपासून फार घेण्यासारखे ज्ञान आहे. म्हणून त्यांचा फक्त वापर करून त्यांना नष्ट करण्याचा विचार करू नये.
आपल्या महाराष्ट्र राज्याची वनसंपदा विपुल आहे. एकूण 36 जिल्हे असलेल्या महाराष्ट्र जिल्ह्यात वनविभागाचे आठ विभाग आहेत. आपल्या ठाणे जिल्हा हा कोकण विभागाचा एक मोठा आणि फार महत्त्वाचा भाग आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुके हे आदिवासीबहुल प्रदेश आहेत. इथली वने प्रचंड जैवविविधतेने नटलेली आहेत. शहापूर मुरबाड, तलासरी आणि जव्हार हे तालुके तर हिरव्यागर्द कोंदणाने सजलेली आहेत.
पण म्हणतात ना चंदनाच्या झाडावर त्याच्या स्वर्गीय सुगंध आला व शीतल त्याला पुरून सर्प विळखे घालून बसतात त्याचप्रमाणे आता इथल्या जंगलातील साग, पळस, खैर याची झाडे सुद्धा त्यांच्या अंगभूत गुणांमुळे अवैधरित्या तोडली जातात. असे होऊ नये म्हणूनच वनाधिकारी व त्यांचे सगळे कर्मचारी डोळ्यात तेल घालून त्याची देखभाल करत असल्याचे आपण पाहतो. ते फक्त त्यांची नोकरी करत नाही तर अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.
" वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" असे सांगत संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा निसर्गाचे महत्त्व पटवून सांगितले आहे. वटसावित्रीची पूजा करताना स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात कारण वडाच्या झाडाच्या सभोवताली प्राणवायूचे प्रमाण खूप असते. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वनातून तोडून आणतो आणि त्याची पूजा करतो एकमेकांना आपण आपट्याची पाने देतो. ही झाडे जंगलात असतात. आपल्या अंगणातील किंवा गावातील झाडांची पाने बकरी, गाय कधी कधी खातात.आपण त्या झुडुपांची छाटणी करतो. परंतु दूरवर रानात असलेल्या या झाडांची पाने तोडण्यासाठी मुद्दाम लोक जावीत. हा त्यामागचा उद्देश आहे. कारण आपट्याची पाने आणि फांद्या तोडल्याने त्याला आणखीन फुटवे फुटातात आणि झाड जोमाने पुन्हा वाढते. असा झाडांचा, प्राण्यांचा आणि माणसांचा परस्पर संबंध आहे. जंगल त्याच्या पूर्ण क्षमतेने भरभरून रानमेवा, पाने, फुले आणि प्राणवायू देतोच आहे. त्या बदल्यात आपण काय करतोय वर्षासहल, सहली, ट्रेकिंगच्या निमित्ताने जंगलात गेल्यावर खाऊन रिकामी केलेली खाऊची पाकिटे, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलची ताटे तर चक्क कधीकधी काचेच्या दारूच्या बाटल्या जंगलात फेकून देतो. लाज वाटायला हवी असे वागताना.
प्लास्टिक, थर्माकोल यांचे जमिनीत विघटन होत नाही. वर्षानुवर्षे ते तसेच राहतात एकदा लहानपणी मी खेळत असताना दुपारच्या वेळेत शांत वातावरणात अचानक एक कोंबडी आली ती जिवाच्या आकांताने ओरडत होती. खूप घाबरली होती. मला काही कळेना. ती जीवाच्या आकांताने पळत होती. तिच्या मागोमाग एक मोठा फुगा पळत होता जणु काही! त्या बिचार्या कोंबडीच्या पायात एक प्लास्टिकची पिशवी अडकली होती आणि ती पळताना त्यात हवा भरून ती फुग्याप्रमाणे हवेने भरलेली होती. साधारण 1986 ची ही गोष्ट आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा आपल्या वापरामध्ये नुकताच प्रवेश झाला होता. खरेच त्या कोंबडीचे प्लास्टिकच्या पिशवीला घाबरणे रास्त होते कारण आता तेच प्लास्टिक संपूर्ण पृथ्वीच्या मानगुटीवर बसले आहे. वापरा आणि फेकून द्या या विलासी वृत्तीमुळे हे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे.
हवे.. हवे.. आणखी हवे या माणसाच्या प्रवृत्तीमुळे आधीच आपल्या वनांचा, नैसर्गिक गोष्टींचा र्हास झाला आहे.
नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत, तलाव, विहिरी जसे स्वच्छ ठेवायला हवेत त्यात रासायनिक द्रव्य मिसळायला नकोत. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील जंगले, राने, वने ही 'माणूस' या प्राण्या पासून सुरक्षित ठेवली पाहिजेत. अन्यथा त्याचे फार दूरगामी गंभीर परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागतील हे निश्चित. म्हणून आज पासून आपण शपथ घेऊया की इथून पुढे पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी आम्ही प्रत्येक जण कटिबद्ध राहू. कमीत कमी प्लास्टिक वापरू आणि जंगलातील अतिक्रमणे थांबवू. "वसुधैव कुटुम्बकम " ही पृथ्वी आपणा सर्वांची आहे आणि आपण सर्व मिळून तिचे जतन करू.