आरती महाडिक

Classics

4.6  

आरती महाडिक

Classics

झिंगरी

झिंगरी

8 mins
1.0K


झिंगरी ही आबा जाधवाची लाडकी लेक. आबा जाधव छोट्या गावातील साधा सरळ शेतकरी. वाट्याला आलेल्या एखादं एकरात शेती पिकवायचा. नशिबानं त्याच्या रानात विहीर होती आणि विहिरीला बारा महिने पाणी असल्यामुळे चांगलं चाललं होतं. पोटाला दोन मुलगे आणि त्यांच्या पाठीवरली झिंगरी. गावात, रानात नुस्ता धुमाकूळ घालत असे. आई म्हणाली "आता पदूर आलाय तवा थोडं सावकाशीन घ्यावं बाई मानसानं ", तर म्हणते कशी पोरीस्नी च का गं ह्ये असलं? भाबड्या रखामानं मग तिच्या परीनं समजावलं." पोरी, बाईलाच मान हाय पोराला जल्म द्यायचा आनी ह्ये पुरुसाला झेपायचं न्हाई म्हणून त्यानं आपल्याला हे दान दिलंय बघ. झिंगरीच्या मनाच समाधान झालं नाही पण ती गप्प बसली. दिवस जात होते. झिंगरी आता बरीच शांत झाली होती. रखमाच्या म्हणण्यानुसार ती आता बाई मानसात आली होती. 


बघता बघता झिंगरी साठी स्थळ आलं. शेजारच्या गावातील पाटलाच्या माणसांनी भरलेल्या घरात झिंगरी जाऊन पडणार होती. आबा कामाला लागला. जिथं कुठं पैसे जमवून ठेवले होते ते आणून जुळणी करू लागला. झिंगरी ला काय कुणी विचारलं नव्हतं. फार उंच नाही सावळा, किडकिडीत असा महादेव (म्हाद्या) म्हाद्या किती शिकला होता देव जाणे पण घरची एकट्याच्या नावावर दोन अडीच एकर पाणस्थळ जागची शेती आणि मोठं घर पाहून आबा नं पोरीचं लग्न ठरवून टाकलं. 


रखमाला तर आता काय करू आणि काय नाही असं वाटू लागलं.फाल्गुन संपत आला होता. उन्हाचा पारा चढतच होता. भावकीतल्या बायकांना बोलावून रखमानं शेवयाचे पाट स्वच्छ धुवून सुकवून त्याला हळदी कुंकू लावून पुजून घेतले. जमलेल्या बायकांनी झिंगरी ला पण हळदी कुंकू लावलं. मोठ्या भाळावरचं ते कुंकू मोठ्या कौतुकाने आरशात जाऊन पाहिलं. नक्षत्रा सारखी दिसत होती ती. गोरीपान, चाफेकळी नाक आणि रखमाच्याच नेसलेल्या लुगड्यात झिंगरीचं रूप आणखीन खुललं होतं. 


झिंगरीची म्हातारी आई (आजी )झिंगरी लहान असतानाच म्हणाली होती "आमच्या झिंगरीला पयल्या झटक्यातच पाव्हणं पास करतय का न्हाई ते बघाच.माज्या आबाला पोरीसाठी हुंबरं झिजवायला नाही लागणार.. " आणि तसंच झालं. पाहता पाहता रखमाच्या शेवया, सांडगे, रंगीत कुरडया,पापड, भातवड्या, वर्षभराचा साठवणीचा मसाला सगळं सगळं करून झालं.चैत्र संपत आला. दिवसभर कोकिळेचे गाणं काही थांबेना. घरातील लगबग आणखीन वाढली. 


पंधरा दिवसांवर मुहूर्त धरला होता. वैशाख वणवा पेटला होता. अंगाची लाही होतं होती. अश्यातच एक दिवस तालुक्याच्या गावी जाऊन झिंगरीच्या लग्नाचा बस्ता काढला.हळदीसाठी पिवळी साडी आणि हिरवागार शालू लग्नासाठी झिंगरीने पसंत केला. लग्नानंतर घरात नेसायला आणखीन तीन चार साड्या, त्याच्यावरील पेटीकोट सगळी खरेदी झाली. जवळच्या नातेवाईकांना द्यायला चांगल्या साड्या, लांबच्याना जरा हलक्या साड्या, मानाच्या भारी साड्या, टॉवेल टोप्या, ब्लॉऊस पिसं, फेटे सगळं सगळं घेऊन मंडळी घरी परतली. 


स्वयंपाक घरातील मनी झिंगरीच्या पायाला अंग घासू लागली तशी ती उठली आणि मनीच्या बशीत दूध ओतून तिला प्यायला दिलं. मनी दूध पीत होती आणि झिंगरी मायेने तिला गोंजारत होती. आता मनीने डोळे मिटून घेतले. बराच वेळ त्या दोघींचं गुज चालू होतं. 

सांजचे पाच वाजायला आले. झिंगरी उठली सांडगे तव्यात मस्तपैकी भाजून तिने चुलीवरच्या टोपात तेल तापवले आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या दगडानं ठेचून गरम तेलात टाकल्या तसा सगळ्या खोलीत खमंग सुवास दरवळला. भिजवलेली तूरीची डाळ, कांदा आणि सांडगे तेलात परतले जात होते आणि झिंगरी मनाने केंव्हाच भावी संसाराच्या सुख स्वप्नात जाऊन पोहोचली होती. त्या तंद्रीतच तिने इंद्रायणी तांदूळ निवडून धुवून चुलीवर शिजायला ठेवला आणि पितळेची परात घेऊन भाकरी थापायला घेतल्या. 

तेवढ्यात तिची आत्येबहीण सुनीता तिथे हिरवीगार ताजी मेथीची जुडी घेऊन आली. तिला पाहताच झिंगरी ने लगबगीने भाकरी साठी घेतलेल्या पाण्यात हात धुवून सुनीताला भेटण्यासाठी उभी राहिली. सुनीता ने तिला मिठीच मारली आणि दोघीही रडू लागल्या. तितक्यात तिथे आलेल्या रखमा आणि सुनीताची आई तिथं आल्या. बघता बघता पोरी कश्या हो मोठ्या होत्यात हो वहिनी असे म्हणत आत्या बाईंनी पदराने डोळे पुसले. रखमाला पण भरून आले आणि दोन्ही नणंद भावजया एकमेकींना धरून समजाऊ लागल्या. 

थोड्या वेळाने सगळ्या घरात मेथीच्या भाजीच्या सुगंध पसरला, पापड, कुरडया तळून झाले. नणंद बाई आल्या म्हणून रखमाने तुपात खरपूस भाजलेल्या शेवयांची दुधात शिजवलेली गोड खीर ही केली. 


दुसऱ्या दिवशी रखमाची भावजय, बहीण आणि माहेरचा गोतावळा कामात मदत करायला आला. घर पाहुणे मंडळींनी भरून गेलं. मुहूर्तमेढ आबा जाधवांच्या चुलत भावाच्या नावानं आली. दोघे नवरा बायकोनी आनंदाने मुहूर्त मेढ रोवली. आबा आणि रखमानं उभयतांचा मान दिला. अंगणात करंज आणि आंब्याच्या फांद्यांचा गारेगार मांडव तोवर उभा राहिला. सगळ्या बायका घरातली कामं आवरून हळद दळायला जमा झाल्या. गावातील स्पीकर केंव्हाच जोडून त्याचा माणूस बसला होता. म्हाताऱ्या आईनं एका हातात माईक घेतला, दुसऱ्या हातानं जातं फिरवू लागली आणि मुखातून हळदीची गाणी संपूर्ण गावात घुमू लागली. फुला काकू या की.. तुमचा गळा लै ग्वाड.. या म्हना गानं.. दोघींनी सुरात सुर मिसळून गाऊ लागल्या. 


तेवढयात बाजूच्या गावातली कासारीन चाची डोक्यावरची काचेच्या बांगड्यांनी भरलेली टोपली घाम पुसत जमलेल्या बायकांच्या मदतीने उतरवू लागली.कोणीतरी पळत जाऊन पाण्याचा तांब्या आणला. सगळ्या छोट्या पोरी कासारनीच्या भवती गोळा झाल्या. सुनीता एक वही आणि पेन घेऊन बसली. सगळ्या लहान पोरींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या. साडी नेसलेली झिंगरी पुढे झाली. तिच्या आवडीच्या रंगाचा हिरवागार एका एका हातात दीड डझन असा चुडा भरला. लाजतच तिने कासारनीला आणि सगळ्या वडीलधाऱ्या स्त्रियांना वाकून नमस्कार केला. सगळ्यांनी बांगड्या भरल्या. कासारीन समाधानाने आणि हलक्या झालेल्या टोपलीने घरी गेली. 


हातातला चुडा सांभाळत झिंगरीने गावातील सगळ्या देवांचे दर्शन घेतले. पान, भिजवलेले चणे, नैवेद्य प्रत्येक देवळात ठेवून मनोभावे नमस्कार केला. लग्नं मुलीच्याच दारात होते. दुपारी नवऱ्या कडची मंडळी वऱ्हाडासह गावात दाखल झाले. घरातील पुरुष भेटीसाठी साखऱ्या घेऊन भेटीसाठी तिथे पोहोचलेच होते. भेटी झाल्यावर वाजत गाजत नवरदेव मंडपात आला. सासू बाई तोऱ्यातच होत्या. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागले. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. झिंगरी नवऱ्याबरोबर सासरी निघाल्यावर आबा ला काही रडू आवरता आले नाही. सगळ्यांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. रखमाच्या मनात मात्र नंदी बैल वाल्याचे बोल घुमत होते. झिंगरी ला पाहून त्याने सांगितले होते की या मुलीची दोन लग्नं होणार आणि हे आठवून रखमाच्या काळजात धस्स झाले. तिने झिंगरीला पोटाशी कवटाळून पोटभर रडून घेतले. 


पाहुणे निघून गेल्यावर खूप वेळ रिकाम्या मांडवात घरातील माणसं शांत बसून होती. जेवणं आटपली आणि सगळं घर निजले.झिंगरी बरोबर पाठराखीण म्हणून आलेली तिची मामी खूप हुशार होती. तिने झिंगरीची नव्या माणसात काळजी घेतली. म्हाद्या इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या कपाटाजवळच झिंगरी आणि मामी बसल्या होत्या. मामींनी काही पाहिजे का तुम्हांला? 

तर म्हादू हो म्हणाला. मामी झिंगरीला घेऊन मागच्या दाराला जाऊन बसल्या. दोन तीन दिवसात मामींना समजले की म्हादू कपाटातून सकाळ- संध्याकाळ काहीतरी घेत आहे. त्यांनी लक्ष ठेऊन पाहिले तर म्हादू कसल्या तरी गोळ्या खात होता. 


लग्नाच्या तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. त्यासाठी दोन्ही पोरांना घेऊन रखमा आणि आबा जोडीनं आले. मामी हळूच रखमाच्या कानात कुजबुजली. रखमानं आबाच्या कानावर ही गोष्ट घातली.आबा काही बोलला नाही. पूजा आटोपल्यावर मंडळी घरी परत निघाली. संपूर्ण रस्त्यात रखमाच्या डोक्यातून नंदी बैल वाल्याचे बोलणे फिरत होते. 


लग्नाच्या चार पाच दिवसांनी झिंगरी आनंदात घरी आली. रखमाने तिला सगळं विचारून घेतलं. तिच्या मनात पाल चुकचुकत होती पण पोरीच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहुन ती सुखावली. दोन चार दिवस राहून झिंगरी ची पाठवणी करण्यात आली. तिचा नवराच येणार होता तिला घ्यायला. बाईक वर म्हादूच्या मागे बसायला तिला फार लाज वाटत होती आणि आनंद ही होत होता. गाडी वळणावरून दिसेनाशी होई पर्यंत आबा आणि रखमा निरोपा साठीचा हात हलवतच राहिले होते. आता सडकला लागल्यावर गाडीचा वेग वाढला तसा आपोआप च झिंगरीने नवऱ्याच्या खांद्यावर आधारासाठी हात ठेवला. थोडं अंतर पुढे जात नाही तोवर त्याला खोकल्याची मोठी उबळ आली की गाडी रस्त्याच्या बाजूला लावून तो मोठ्यानं खोकू लागला. त्याचा जीव अगदी घशापर्यंत आला होता. झिंगरीला काय करावे कळेना तिने आपल्याकडची पाण्याची बाटली त्याला दिली. पाच दहा मिनिटांनी त्याला जरा बरे वाटू लागले. त्याने खिशातून एक कसलीशी गोळी काढली आणि खाल्ली. 


घरी पोहोचल्यावर सासूबाईंनी भाकर तुकडा ओवाळून नवरा नवरीची दृष्ट काढली. नव्या नवलाईचे दिवस चालू झाले पण म्हादू चा खोकला काही कमीच होत नव्हता. तो फार वैतागलेला आणि थकलेला वाटत होता.त्याचे अगदी खोल गेलेले डोळे आणि त्या खालची काळी वर्तुळं आता ठळक पणे दिसत होते.झिंगरीच्या मनात नविन संसाराची स्वप्नं फुलून येत होती परंतु तिचा नवरा फार अशक्त झाला होता. आजाराचा विळखा आणखीनच घट्ट झाला होता. एक दिवस झिंगरीने न राहवून तो घेत असलेल्या गोळ्यांची नावं लिहून घेतली आणि माहेरी गेल्यावर ओळखीच्या औषधांच्या दुकानात जाऊन दाखवली. जेंव्हा त्या विक्रेत्याने तिला त्या आजाराबद्दल सांगितले तेंव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने ताबडतोब घरी जाऊन ही गोष्ट आबा आणि रखमाला सांगितली. 


बराच वेळ रखमा आणि झिंगरी बरोबर चर्चा केल्यावर आबा झिंगरीच्या सासरी गेला आणि त्याने तुम्ही आम्हांला फसवलंय म्हणून दंगा करून आला.झिंगरीच्या सासू सासर्यांना आजारपणाबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे अचानकच दोन्ही घरातील वातावरण ढवळून निघाले. बिचारी झिंगरी आणि रखमा यांचे रडून रडून हाल झाले. आता पुढे काय हा प्रश्न होताच. रीतसर घटस्फोटाचा अर्ज करण्यात आला. रखमाला ह्या अचानकच घडलेल्या घटनेमुळे फार धक्का बसला. नवर्यावरती फसवणुकीची केस पण टाकली गेली. थोड्या महिन्यात महादेव चा मृत्यू झाला पण झिंगरीच्या आयुष्याशी विचित्र खेळ खेळून!

महादेव ने आजार लपवून एका मुलीचं आयुष्य असं उधळून लावायला नको होतं. कोण बरोबर कोण चूक.मात्र शिक्षा झिंगरीला भोगावी लागली. 


तरणी ताठी पोर घरात बसलेली पाहून आबा रखमाचा जीव तुटत होता. काही न घडता पोरीच्या आयुष्याला लग्नाचा डाग तेवढा लागला होता.काही दिवसांनी आबा चा तोल ढळू लागला तो उगाच झिंगरी वर चडफडायचा. आताशा तो रोजचं दारू पिऊन घरी येऊ लागला. रखमाला तर वाटत होते की नज़र लागली माझ्या सुखी संसाराला.. हे पांडुरंगा काय चूक झाली आमची की तू हे दुःख माझ्या पोरीच्या वाट्यात टाकलस? पण तेवढ्या पुरतंच.. रखमा बोलली खरी पण लगेच सावरली. नाही मीच हात पाय गाळून चालणार नाही. रखमा अशिक्षित होती पण विचारांनी समृद्ध होती. ती झिंगरी ला म्हणाली "बाळा, काही काळजी करू नगस..तो हाय नंव्हका वर बसलेला त्याला आपली काळजी हाय.. तो सगळं नीट करील बघ. फक्त तू हार मानू नगं.. ह्ये पन दीस जातीली.. बाळा. जसा रात्रीचा अंधार संपून पहाटे उजाडतंय तसंच.. थोडा धीर धर. 


महिन्या मागून महिने गेले. इकडे झिंगरीचं दुःख आणि दुसरीकडे आबाचं विचित्र वागणं.. रखमाला खूप जड जात होतं. मधल्या मध्ये तिची फरफट होत होती. आणि एक दिवस नदीकाठच्या गावातील एका अविवाहित मुलाचं स्थळ झिंगरीसाठी सांगून आलं. मुलगा पदवीधर होता, घरची शेती होती आणि जोडधंदा ही करत होता. रमेश त्याचं नाव. त्याला झिंगरीच्या आयुष्याची वाताहत समजली होती. एकदा तोंड पोळल्यामुळे आबा ताक ही फुंकून पिणारा असल्यामुळे त्याने रमेश ची नीट चौकशी केली. सगळं मनासारखं आहे हे पक्के झाल्यावर च साधेपणाने झिंगरी आणि रमेश चं लग्न लावून दिलं. 


आता रखमा खूष आहे. झिंगरी तिच्या संसारात रमली आहे. पण रखमाच्या मनात मात्र त्या अनामिक नंदी बैलवाल्याबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics