End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

आरती महाडिक

Children Stories


2.4  

आरती महाडिक

Children Stories


दगड

दगड

3 mins 12.2K 3 mins 12.2K

टाईमपास चित्रपटात वैभव मांगले मुलाला विचारतात, "नाव काय रे तुझं?" मुलगा म्हणतो, "दगडू." पुन्हा वैभव मांगले म्हणतात, "दगड... " त्यावेळी खूप दिवसांनी दगडू हे नाव ऐकलं. 


लहानपणापासून मला दगडू-दगडी हे नाव अजिबातच आवडत नसे. वर्गात कधी शिक्षक कोणाला दगड म्हणाले की हसू यायचे परंतु, आपल्याला कोणी दगड म्हणू नये असे मनोमन वाटायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर काही छोट्याशा मंदिरात एखादा दगड असे. त्याचीच पूजा केली जायची. तर कधी मंदिराच्या बाहेरच्या आवारात इतस्ततः विखुरलेल्या काही दगडांना पण कुंकू-गुलाल लावून पुजलेले पाहतो आपण. आपल्या हिंदू संस्कृतीत आपण दगडातसुद्धा देव पाहतो हेच खरे!


दहावीच्या परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न हे "गुळगुळीत दगडासारखे" अशी या प्रश्नांना दगडाची दिलेली उपमा 

हसवून जायची. पावसात, उन्हात आणि थंडीतही हे दगड भिजतात, तापतात आणि थंड होतात पण बदलत नाहीत. ते तसेच तपस्व्यासारखे सोसत राहतात. वर्षानुवर्षे नव्हे युगानुयुगे दगड आहे त्या जागीच आहेत. आपली, आपल्या वैभवशाली संस्कृतीचा इतिहास दिमाखाने सांगण्यासाठीच!


एखादी पुरातन विहीर आणि तिच्या दगडी पायऱ्या, प्राचीन मंदिरे त्यावरील कलाकुसर अजूनही तशीच आहे. आम्ही लहान असताना इतिहासातील अनेक पौराणिक, धार्मिक आणि वीररसातील गोष्टी ऐकल्या होत्या. आम्ही शाळेत गेलो.. चौथीच्या पुस्तकात शिवछत्रपतींचा जीवनपट अनुभवला, त्याआधी भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळाची गोष्ट ऐकून होतो. या गोष्टीतून कळाले होते की ध्रुव बाळाला अढळ स्थान हवे होते म्हणून आकाशात त्याच्या नावाने ध्रुवतारा आहे आणि तो तेव्हापासून तिथेच आहे. भक्त प्रल्हादाच्या पित्याने म्हणजेच हिरण्यकश्यपूने स्वतःच्या मुलाचा केलेला अनन्वित छळ आणि माझा देव सगळीकडे आहे असे ठामपणे भक्त प्रल्हादाने सांगितल्यावर क्रोधाने पेटून उठलेल्या हिरण्यकश्यपूने दगडी खांबावर लाथ मारल्यावर प्रकट झालेला नरसिंह अवतार.. सगळेच अद्भुत.

 

देव सगळीकडेच आहेत हे पटवून देण्यासाठी ही गोष्ट आहे अशी मनाची धारणा होती पण आम्ही त्यावर विश्वास ठेवत होतो. आताच्या मुलांना काही सांगितले की ते आधी पुरावे मागतात. आम्ही असे उलट प्रश्न विचारलेच नाही कारण घरात आणि गावात धार्मिक वातावरण होते. त्यामुळे सखोल माहिती घेता आली नाही. कोणी सांगितले नव्हते की नरसिंह अवतार प्रकट झाला ती जागा आणि तो खांब आताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे! त्या जागेचे नाव आहे मूलस्थान त्याचा अपभ्रंश झाला आहे आताचा 'मुलतान.' पण ही माहिती माझ्यासारख्या सामान्य लोकांना नव्हतीच कसे काय? अशा कितीतरी गोष्टींपासून आपण अनभिज्ञ आहोत. आपल्या प्राचीन संस्कृतीची माहिती पाठ्यपुस्तकात फार कमी होती. त्रोटक इतिहास होता.

 

रामायण आणि महाभारतातील कित्येक गोष्टी आजही आपण पाहू शकतो. आपल्या महाराष्ट्रातील प्रभू राम आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पुनित असे गोदावरी नदी किनारीचे नाशिक! कितीतरी गोष्टी आहेत. आपल्या भारतातील प्राचीन मंदिरे, त्यावरील दगडात कोरलेल्या सुंदर सुंदर मूर्ती.. अपार सुंदर कोरीव काम पाहून दगडाबद्दलचे प्रेम व आदर वाढतच आहे. असे म्हणतात की औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील शिवमंदिर उद्ध्वस्त करण्याचे आदेश औरंगजेबाने दिले होते पण दगडी बांधकाम इतके मजबूत होते की सैन्य त्याला धक्का पोहोचवू शकले नाहीत. 


आजही पहाडासारखे उभे असणारे गड-किल्ले आपल्या इतिहासाची साक्ष देतात. शेकडो वर्षे झाली तरी तेथील बांधकाम अजूनही शाबूत आहे ते या दगडांमुळेच. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा. या दणकट दगडातून साकारलेला प्रचंड गड 'रायगड' घडवला त्या स्थापत्य कलाकार इंदुलकरांनी महाराजांकडे मागितले तर काय? एक दगडी पायरी त्यांच्या नावाची! "सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर." खरंच देवस्वरूप किती तो आदर व राजांबद्दल सेवाभाव. अखंड भारतात कुठेही जा. महाराष्ट्रातील गड-किल्ले, दक्षिणेकडील सुंदर नक्षीकाम केलेली मंदिरे, उत्तर भारतातील धार्मिक स्थळे, तसेच पवित्र नदीतील शाळीग्राम. नर्मदेतील गोटे, विविध लेण्या, शेकडो वर्षे बर्फाखाली गाडले गेल्यानंतरही व महाभयानक प्रचंड जलप्रलय होऊनही शाबूत असलेले केदारनाथ मंदिर, अति दुर्गम आणि उंचच उंच पर्वत शिखरांवरील देवस्थाने. काश्मीर ते कन्याकुमारी आणि पूर्व-पश्चिम दिशांमधील देशांमध्ये अनेक ठिकाणी रामायण-महाभारत यांच्या खुणा जपणारे दगड आहेत. ते मैलाचे दगड नसून अनेक युगांची गाथा सांगणारे मार्गदर्शकच होत आणि नेहेमीच आम्हास शिरसावंद्य राहतील. 


फेसबुक वर अनेक मंदिरांची माहिती देणारी पेजेस आहेत किंवा गूगल बाबा आहेतच. खूप सारी प्राचीन मंदिरांची माहिती आणि फोटो आहेत. किती महान आहे आपली संस्कृती! भविष्यात वरील सर्व ठिकाणांना भेट देण्यास खूप आवडेल. तोपर्यंत सगळेच घरात राहा. सुरक्षित राहा. 


Rate this content
Log in