मातृत्व!
मातृत्व!
संध्याकाळची वेळ! कविता छोट्या तयार कपडे बनवण्याच्या कारखान्यातून घरी निघाली होती. दिवसभर कपड्यांचे वेगवेगळे तुकडे जोडायचे, मशीनवर शिवायचे, कधी फक्त दिवसभर जादाचे धागे कापायचे तर कधी पूर्ण दिवस मापाने कपड्यांचे कटिंग करायचे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत जो काही मोकळा वेळ मिळायचा तेवढाच... आता चाळीशी कडे वय झुकत होतं. रस्त्याने चालता चालता बाजूला उभ्या असलेल्या गाडीच्या काचेवर ओझरता स्वतःचा चेहरा पाहिला.खरच की लग्नाला पुढच्या महिन्यात पंधरा वर्षे पूर्ण होणार होती तिच्या! उसासा टाकून ती बसस्टॉपकडे निघाली.
योग्य वयात आई-वडिलांनी लग्न लावून दिले होते तिचे. कविता अभ्यासात यथा तथाच होती. सुट्टीत गंमत म्हणून शिवण क्लास ला मैत्रिणीबरोबर गेली होती.पण थोड्याच कालावधीत खूप आवडीने सुंदर सुंदर कपडे शिवू लागली. नवीन प्रकारचे ब्लाउझं, पंजाबी ड्रेसही शिवू लागली. स्वयंपाक तर छान बनवत होतीचं. यथावकाश लग्न झाले. सुरुवातीची काही वर्षे अशीच ढकलली. खरंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये काहीएक भांडण नव्हते परंतु तो तुटक वागायचा.
काळ पुढे सरकत होता. तिही तिच्या नोकरीत रमली होती. पण काय झाले कुणास ठाऊक कविताला फारच अशक्तपणा जाणवत होता. जेवण जात नव्हते. डॉक्टरांच्या फेर्या वाढल्या. पोटात एका भयंकर आजाराने पाय पसरले होते. मातृत्वासाठी असणारा एक अवयव पूर्णपणे निकामी झाला होता. दहा वर्षे झाली या घटनेला पण तो दिवस अजूनही लख्ख आठवतो तिला. त्या दिवशी ती डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला गेली होती. डॉक्टरांनी तिला पाणी दिले. तिला धीर देऊन सांगितले की तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही. तिच्या नवऱ्याला मुलांची फार आवड होती. मुलामुळे का होईना नवऱ्याचे वागणे बदलेल अशी तिला आशा होती. पण आता डॉक्टरांचे बोलणे ऐकून ती सुन्न झाली. कशीबशी घरी आली. रिपोर्ट घेऊन ती एक दोन दिवसात माहेरी गेली आणि आहे त्या आजाराशी दोन हात करून पुन्हा सासरी परतली होती.
या घटनेला पण आता बरीच वर्षे उलटून गेली होती. तिचे नवऱ्याशी नाते पण आता छान फुलले होते. पण एकच कमतरता होती ती म्हणजे बाळाची.आता दोघांनाही वाटत होते की आपण फारच उशीर केलाय हा निर्णय घेण्यासाठी. दोघांचेही बाळ दत्तक घेऊ या यावर एकमत होते म्हणून त्यांनी मूल दत्तक घेणारे देणाऱ्या संस्थांशी संपर्कही साधला होता काही महिन्यांपूर्वी.. परंतु ती पद्धत फारच संथ होती.कित्येक पालक दोन-तीन वर्षांपासून प्रतीक्षा यादीत होते. कधी कधी पदरी दान पडायला देवाच्या दारात उशीर होतो पण जर देवाच्या मनात असेल तर काही घटना अशा काही घडतात की परिस्थिती पूर्णपणे बदलून जाते.
त्याचं झालं असं..
मुंबईपासुन खुप लांब म्हणजे विदर्भातील एका छोट्याशा खेड्यात कुसुम नावाची मुलगी होती. घरात अठराविश्वे दारिद्र्य. गरिबीने पिचलेल्या त्या संसारात तिचे आई-वडील कसेबसे कुसुम व तिच्या भावाला लहानाचे मोठे करत होते. कुसुम स्वभावाने फार शांत. तिच्या मोठ्या भावाचा तिच्यावर खूप जीव होता.सतरा-अठरा वर्षांचा झाल्यावर पैसे कमवण्यासाठी त्याने काही मित्रांबरोबर मुंबई गाठली. काही वर्षातच त्याने तिथे प्रामाणिक कामामुळे चांगलाच जम बसवला. तिकडे गावी कुसुमचे शेजारच्या गावातील एका गरीब मुलाबरोबर लग्न लावून दिले गेले. वर्षभरातच कुसुमने एका मुलीला जन्म दिला.
लग्नानंतर थोड्याच दिवसात पासून मला तिच्या नवऱ्य
ाचे विचित्र विक्षिप्त वागणं समजले होते याबद्दल घरातही आई-वडिलांना बोलले होती. परंतु नवीन नवीन माणसे ओळखता येत नाहीत जसे दिवस जातील तसे जावईबापू नीट वागतील असे कुसुमला समजावून तिला सासरी पाठवले होते. तिकडे मुंबईमध्ये दादाला या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा त्याने कुसुमला माहेरी आणून तिची काळजी घ्यायला आपल्या आईला सांगितले. तोपर्यंत कुसुमचे दिवस भरत आले होते आणि ती माहेरपणाला आली होती.
छोटे बाळ आता तीन महिन्यांचे झाले होते त्याला पाहण्यासाठी मुंबईहून मामा खूप सारी खेळणी घेऊन गावी आला. दोन दिवस झाले मग एका रात्री जेवण झाल्यावर कुसुमने दादाकडे विषय काढला, " दादा काय पण कर पण मला नवऱ्याकडे परत जायचे नाही". दादाला धक्काच बसला." काय म्हणतेस तू कुसुम? "." हो दादा तो माणूस मला मारहाण करतो, विचित्र वागतो. मला तुझ्याबरोबर मुंबईला घेऊन चल. मी पण काम करुन पैसे कमवीन. तुला त्रास नाही होणार माझा". असे म्हणून इतके महिने मनात दाबून ठेवलेले दुःख तिच्या डोळ्यातून रात्रभर झरझर वाहत राहीले. दादाने त्या रात्री खूप विचार केला आणि थोड्या दिवसात कुसुम ला घेऊन तो मुंबईला परतला.
कुसुम विशीच्या आतच होती. इतकी गुणी अल्लड पोरगी आई झाल्यावर अचानक खुप मोठया माणसासारखी वागत होती. दादाने तिला खूप धीर दिला. शेजारी ब्युटी पार्लर होते. अधून-मधून कुसुम बाळाला घेऊन तिथे जाऊ लागली. तिने दादाला विचारले की मी हे शिकू का? दादाने त्वरित होकार दिला. आता कुसुम काही महिन्यातच बऱ्याच गोष्टी शिकली. ती कामात फारच हुशार असल्याने तेथे सहाय्यक म्हणून काम पाहू लागली. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेतले. आता तर पार्लरमध्ये कुसुमकडूनच काम करून घेण्याचा अनेक ग्राहक महिला हट्ट करू लागल्या. पण या सर्व गोष्टींमुळे आणि घरातील कामांमुळे तिचे मुलीकडे थोडे दुर्लक्षचं होऊ लागले.
दादाला कुसुमच्या भविष्याची चिंता होती. कुसुमचा नवऱ्याबरोबर घटस्फोटही घेऊन झाला होता. तिला यश खुणावत होतं. ती वयाने तरुण होती आणि आत्मविश्वास होता. परंतु इतकं मोठं आयुष्य ती एकटी कशी काय चालणार? सोबत ही हवीच आणि त्या साठी हक्काचं माणूस पण हवे. आता पुन्हा लग्न करायचे तर मुलीला कोण बघणार? कुसुम चे आयुष्य मार्गी लावताना छोट्या मुलीची फरफट नको. म्हणून त्या दोघांना काळजी वाटत होती. आता कुसुमची मुलगी तीन वर्षांची झाली होती. त्यांच्या घराजवळच एक व्यक्ती मूल दत्तक देण्याच्या संस्थेत काम करीत होती. त्या व्यक्तीने कुसुमची अडचण बघून मुलगी दत्तक देण्याचा सल्ला दिला. योगायोगाने त्याच संस्थेत कविताने मुलासाठी नाव नोंदवले होते. कविताच्या पतीला मुलगी हवी होती. ज्यावेळी पहिल्यांदा कविताने मुलीचा फोटो पाहिला तेंव्हा तिला ती खूप आवडली. काही महिन्यातच सरकारी सगळे सोपस्कार पार पाडून कविता च्या घरी छोटी परी आली आणि तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख नांदू लागले.
काही घरात जी गोष्ट सुखाचे कारण असते परंतु काही गोष्टींमुळे ते त्या सुखाला पारखे होतात तर त्याच वेळी एखाद्या घरात तीच गोष्ट दुर्दैवाने अडचणीची ठरू शकते.अशाच अनाथ, गरीब किंवा सोडून दिलेल्या मुलांना आपलं करण्यासाठी समाजात अशा तऱ्हेने जर दत्तक विधान सोपे झाले तर खुप जणांच्या घरी आनंद येईल. म्हणतात ना मुलगी म्हणजे एक वेलचं.. कुठल्याही मांडवावर टाका त्यावर वाढते, विस्तारते आणि फुलतेही!!