फरफट
फरफट


कार्तिक महिन्याची प्रसन्न सकाळ होती. शेतातला भुईमूग जाळ्यांसकट उपटून अंगणात निवांत पसरून उन्हे खात पसरला होता." औंदा भुईमूग माप आलाय नव्ह", आनंदाने एकनाथ बायकोकडे बघून म्हणाला. "तर वं!" , डोक्यावरचा पदर उगाच नीट करीत अंजीने दुजोरा दिला. एकमेकांशी नजरानजर झाली तसे ते दोघेही समाधानाने हसले. चारही बाजुंनी हिरवेगार रान हवेने डुलत होते.
दिवाळीची सुट्टी असल्याने तीनही मुले दारासमोर मातीचा किल्ला बनवण्यात दंग झाली होती.त्यांची मोठी मुलगी सोनी सोळा वर्षांची झाली होती. तिखट झणझणीत चकली चा तुकडा तोंडात घालत एकनाथने बायकोकडे आपल्या आक्काची आणि तिच्या मुलाची म्हणजे दत्तूची चौकशी केली. "दत्तू डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे", सुमीने सांगितले. सुशीला ही एकनाथची मोठी बहीण. तिला सगळे अक्काचं म्हणत. तिचे लवकर लग्न झाले होते आणि लगेच मुलगाही झाला होता. दत्तू तीन-चार वर्षांचा झाला आणि त्याचा बाप अचानकच वारला तेव्हापासून एकनाथने दत्तू कडे लक्ष पुरवून त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला होता. आक्काकडे जेव्हा जेव्हा एकनाथ जाई तेव्हा रिकाम्या हाताने कधी जायचा नाही.
आक्का आणि दत्तूच्या मनात मामाविषयी फार प्रेम व आदर होता. पुढे एकनाथ चे लग्न झाले. त्याला मुलेबाळे झाली. त्याला पहिली मुलगी झाली. तिचे नाव सुनीता होते. पण तिला सगळे सोनी म्हणत.बऱ्याच वर्षांपूर्वी सोनी आणि दत्तू एकदा खेळत असताना अचानक त्याच्या मनात विचार चमकून गेला मोठा झाल्यावर दत्तुलाच मी माझा जावई केला तर? काय हरकत आहे? त्याच्या सगळा शाळेचा खर्च मीच उचलणार आहे. त्याला चांगले शिक्षण देतोय. सुदैवाने दत्तू अभ्यासात हुशार आहे. माझ्या पोरीचे आयुष्य आनंदात जाईल. या विचाराने त्याला खूपच हायसे वाटले.
दिवसामागून दिवस कापसासारखे उडून जात होते.. वर्षे सरली आणि आज एकनाथच्या मनात त्याने केलेल्या कर्तव्यकर्माची उपकाराच्या एका प्रचंड पर्वतामध्ये रूपांतर झाले होते. त्याला फक्त आणि फक्त त्याने दत्तू साठी केलेली मदत आणि स्वतःबद्दलचा दुराभिमान इतकच दिसत होते. दत्तू माझा शब्द कधीच खाली पडून देणार नाही अशी एकनाथ ला खात्री होती.
इकडे जिल्ह्याच्या ठिकाणी दत्तू मोठ्या महाविद्यालयात डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला होता. तंत्रनिकेतन मधून बाहेर पडल्यावर काय करायचे हे त्याने पक्के ठरवले होते. सर्व शिक्षण मामा मुळे होऊ शकले याची त्याला जाणीव होती. त्यामुळे आता ही 'पदविका' संपादन केल्यावर लगेचच नोकरी धरायची आणि आईची व घराची जबाबदारी घ्यायची अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. इतक्यात लग्न करून संसार थाटायची त्याची मुळीच इच्छा नव्हती. असे दिवस निघून गेले जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याची शेवटची परीक्षा झाली आणि तो आपल्या गावी आईकडे परतला.
तोवर एकनाथ सुद्धा त्याची शेतातली सगळे पेरणीची कामे आटपून निवांत झाला होता. घरात ठेवलेला भलामोठा भोपळा घेऊन एकनाथ आक्काकडे दत्ताची भेट घ्यायला गेला. आक्काने मोठ्या मायेने एकनाथची सगळी उठबस केली. मामा भाच्यांच्या गप्पा ऐकत ऐकत आक्काने भोपळ्याच्या घाऱ्या करण्याचा घाट घातला.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मात्र एकनाथने मूळ मुद्द्याला हात घातला. त्याने सरळ सरळ सोनीशी तुझे लग्न करण्याचा मा
झा विचार आहे असे सांगितले. क्षणाचाही विलंब न करता दत्तूने त्याला नकार दिला. घरभर गोड घार्यांचा चा सुवास दरवळत असताना नात्यात मात्र एका नकाराने कडवटपणा मिसळला. एकनाथ एकाएकी रागाने उभा राहिला आणि आक्काकडे जळजळीत कटाक्ष टाकत...दत्तू तुला हे लग्न करावेच लागेल असे ओरडून बोलला. यंदा दिवाळीत लग्नाचा बार उडवून टाकू असे सांगत तो तावातावाने माघारी फिरला.
त्यानंतर अनेकदा दत्तू ने मामाकडे येऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ त्याच्या मतावर अडून बसला होता.सोनीला काहीच कळत नव्हते. बापाच्या शब्दाबाहेर वागण्याची तिची टाप नव्हती. घरात अक्का सुद्धा दत्ताचे ऐकायला तयार नव्हती. भावाच्या उपकाराच्या ओझ्याखाली बिचारी दबून गेली होती. दत्तू ने सोनी कडे त्या नजरेने कधी पाहिलेच नव्हते. सोनी वाईट होती, तिचा स्वभाव चांगला नव्हता असे काहीच नव्हते. परंतु दत्तूला सोनी शी लग्न करायचे नव्हते.
अश्विन संपला. दिवाळी झाली. तुळशीचे लग्न दारात दारात वाजू लागले आणि त्यानंतर एके दिवशी संध्याकाळी एकनाथ च्या अंगणात सोनी आणि दत्तूच्या डोक्यावर अक्षता पडल्या.
आक्काच्या घरात सोनीचा गृहप्रवेश झाला. पण तो अजिबात आनंददायी नव्हता. दत्तू फार हट्टी होता. त्याने एकनाथची गोष्ट कबूल केली आणि लग्नही केले परंतु तो आता त्याच्या मनासारखेच वागणार होता. लग्न तर झालेच होते. सोनी घरात एखाद्या कर्तव्यदक्ष सुनेने वागावे तसे कामाला सुरुवातही केली. घरादारावर, भांड्यांवर तिचा जबाबदारीने हात फिरत होता पण दत्तू तिच्याकडे बघण्याचेही कष्ट घेत नव्हता. ती काही बोलायला गेली तर तो पुस्तकात डोके खूपशी किंवा सरळ बाहेर निघून जाई. रडवेल्या सोनीची अवस्था आक्का बघत होती." होईल समध नीट ", असे सोनीला सांगायची. दुर्दैवाने सहा महिने.. एक वर्ष झाले तरी दत्तू ने आपले वागणे बदलले नाही. दत्तू ने मामाचा शब्द खाली पडू दिला नाही पण त्याने आपलाचं शब्द खरा केला. तो सुद्धा कठोरपणे वागत होता. आता त्याला नोकरी लागल्यामुळे तो कायमचाच पुण्याला स्थाईक झाला. सोनीला आक्काबरोबर गावातच ठेवून तो एकटाच राहत होता. अखेर कंटाळून सोनी माहेरी निघून आली.तिकडे स्थिरस्थावर झाल्यावर दत्तूने पुण्यात दुसरे लग्न केले आणि नवा संसार थाटला.
आता इतक्या वर्षांनंतर दत्तूचा संसार छान बहरला आहे.तो सुखी आणि आनंदी आहे. एकनाथ ला जाऊन दहा वर्षे झाली. आक्का आता कधी गावी तर कधी पुण्याला राहते. एकनाथ च्या दुसऱ्या मुलाचे आणि मुलीचे ही लग्न होऊन ते सुखी संसार करत आहेत. मात्र.. मात्र सोनी आईबरोबर माहेरच्या घरात राहते. त्यांच्या शेतातील कामे करतेच पण कधी कधी रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतात मजुरीवर सुद्धा कामे करते. नुसता हाडांचा सापळा झालाय तिचा. प्रेमाच्या स्पर्शापासून वंचित राहिलेली ती आला दिवस फक्त ढकलते. रोज संध्याकाळी न चुकता हरिपाठ म्हणते. दुसऱ्याच्या सुखात आनंद बघते. कधी घरात जरा काम कमी झाले तर आई सुद्धा तिला रागाने बोलते. काय जिणे आले बिचारीच्या नशिबी.. बापाने न विचारता लग्न लावून दिले आणि नवऱ्याने काहीच न बोलता तिचा त्याग केला. आयुष्यभराची ससेहोलपट झाली सोनीची. दोष कोणाला द्यावा. बापाला, नवऱ्याला की नियतीला? आहे का कोणाकडे उत्तर? उत्तर मिळूनही काय उपयोग? खरे ना!