आरती महाडिक

Others

4.9  

आरती महाडिक

Others

बदल

बदल

3 mins
906


बदल! बदल हा तर निसर्ग नियमच आहे. दिवस संपल्यावर रात्र होते आणि अंधार भेदून पुन्हा प्रकाश हा येतोच. 


आम्ही लहानपणी फारच भाबडे होतो. आई -पप्पा, मोठी माणसं जे सांगतील ते अगदी डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवायचो. रात्री झाडांना हात लावायचा नाही हं ती झोपलेली असतात. जर का रात्रीच्या वेळी फुलं, कळ्या तोडल्या तर आपल्याला देव दगड बनवतो.

पपई च्या बियांवर पाय ठेवायचा नाही.. नाहीतर आपण आंधळे होतो. कोण पसरावायच्या ह्या गोष्टी कोण जाणे पण आमचा लगेच त्यावर विश्वास बसायचा. 


 आमच्या माडीवर की नई म्हातारी बसलीये अंधारात.. हट्ट केला ना तर तिच्याकडे देईन अश्या धमक्या शेजारून पण मिळत. हा प्रयोग मग मीही आई झाल्यावर, माझ्या मुलीने जेंव्हा मला फार त्रास दिला तेंव्हा तिला घाबरवण्यासाठी केला.मी म्हणाले आता गप्प झोप नाहीतर मी दाराबाहेर म्हातारीआहे तिला बोलवेन तर ती म्हणाली की मला ती म्हातारी पाहायची आहे आणि मला काही कळायच्या आत धावत जाऊन दार उघडून पहिले पण कसली भीती आणि कसला विश्वास? 


आमच्या शाळेच्या बाजूला 'मामाचे दुकान' होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे गोष्टीची पुस्तके मिळायची. वाचून परत करायची.. त्याची ठराविक रक्कम भरायची . सगळ्या जादूच्या गोष्टी असायच्या. जादूच्या बिया, जादूची सतरंजी, जादूची सोनपरी, जादूचा दिवा आणि राक्षस, बोलणारा पोपट आणि काय काय? 


मला तर फारच गंम्मत वाटायची वाचून की अश्या कश्या रात्री लावलेल्या बियांमधून सकाळी आकाशापर्यंत वेल वाढते. आणि मग त्या गोष्टीतला छोटा मुलगा त्या वेली वर चढून थेट आकाशामध्ये जातो . तिथे मग एक गरीब स्वभावाची राक्षसीण असते . तिला एक खूप त्रास देणारा राक्षस नवरा असतो . मोठमोठ्या भांड्यात ठेवलेले जेवण राक्षस खातो आणि सुस्ती येऊन झोपतो आणि मघाशी लपलेला मुलगा आहे तो येऊन त्या राक्षसाचा ज्याच्यामध्ये जीव आहे अशा पोपट वा चिमणीचा खात्मा करून तिथली धन दौलत घेऊन माघारी फिरतो .. आणि मग आनंदाने जगू लागतो. शाळा नाही अभ्यास नाही. 


असेच एकदा दारावर काही बायका फुलझाडांच्या बिया विकायला आल्या होत्या. बहुतेक घरी कोणी नव्हतं. त्या बायकांनी सांगितलं की या बिया गुलाबाच्या आहेत. म्हणून मग मीही आनंदाने विकत घेतल्या . थोड्या वेळाने त्या बिया मी व्यवस्थित मातीमध्ये पुरल्या. पाणी घातले. आणि माझ्या डोळ्यांसमोर काश्मिरी गुलाबांचे ताटवे दिसायला लागले. मला त्या जादूच्या बियांची गोष्ट तेंव्हा आठवली. रोज अगदी रोजच येताजाता मी त्या बियांमधून कधी एकदा उगवून येतंय याची प्रतीक्षा करत राहिले. आणि मग कालांतराने माझी फसवणूक झाली आहे हे मला कळले


त्या गोष्टींमधले राज कुमारीचे नगर किती रमणीय असे. 

हिरव्या गार लतावेली, वनराजी, निळे डोंगर त्यातून झुळू झुळू वाहणारे पाणी. त्या पाण्यामध्ये विहार करणारे देखणे हंस.. आत्ता त्या क्षणाला तिकडे जावे असे वाटायचे. 

 तासन-तास त्या गोष्टींमध्ये रमायचे. 

 

दिवसभर कुठे कुठे झाडांच्या कैर्‍या पाड, पडलेल्या चिंचा गोळा कर, पाण्याच्या टाकीवर जायचं, नदीवर जायचं, सायकल भाड्याने आणून 1/2 तास चालवायची, कावळ्याचं कसलतरी बी असायचं ते शोधत फिरायचं सगळ्या ठिकाणी. आणखी एक महत्वाचे.. आमच्याकडे तेव्हा फ्रिज नव्हता म्हणून बर्फ फॅक्टरी मध्ये जायचं बर्फ घेऊन यायचं आणि मग पप्पा रसना बनवायचे (कालाखट्टा) त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग पार्टी करून प्यायचं इतकी मज्जा यायची म्हणून सांगू!


उन्हाळ्यात शिवाजी महाराज यांच्या जयंतीला रात्री शिवाजी महाराज, जिजामाता आणि मावळे( वेगवेगळ्या वयोगटातील )छान वेशभूषा करून ट्रक मध्ये फिरायचे. हॅलोजन light मध्ये भारी दिसायचे सगळे !


छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रचंड आनंद होता. आमच्याकडे एक कुल्फीवाले काका यायचे. बर्फाच्या तुकड्यांमध्ये कुल्फीचे मोल्ड्स ठेवायचे. बर्फाचे पाणी जास्त झाले की एका नळीतून ते पाणी बाहेर काढायचे.ते बघायला पण कोण आनंद मिळे ! तशी मावा कुल्फी Naturals मध्ये पण मिळत नाही. तीच गत खारी आणि टोस्ट ची !


आम्ही जसे मोठ्या माणसांचे ऐकायचो तसे हल्लीची मुले ऐकत नाहीत आणि जर का आताच्या मुलांना काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर त्यांच्या दिमतीला गूगल, यु ट्यूब आहेच. म्हणून पालकांपर्यंत काही गोष्टी पोचतच नाहीत. माझ्या एका वर्ग मित्राला एक खंत वाटत आहे की आताच्या मुलांना आई वडिलांची कदाचित काही गरज वाटणार नाही. काही अंशी खरे असेलही पण मला असे नाही वाटत. जरी आजूबाजूला खूप ज्ञान आणि प्रचंड माहितीचा खजिना असला तरी पण भावनिक गरज ही असतेच ना !

घरात उबदार मायेचे छत्र हवेचं असते.


आताचे खेळ बदलले, मनोरंजनाची साधने बदलली पण पालकांचे आणि मुलांचे नाते तर कायम तसेच राहणार. हा, आता पुढची पिढी आताच्या पिढीला कशी वागणूक देतील याचा विचार आताच करून ठेवून काळाची पावले ओळखून राहायला मात्र नक्कीच हवे.

कालाय तस्मै नमः !



Rate this content
Log in