STORYMIRROR

आरती महाडिक

Others

1.0  

आरती महाडिक

Others

सुगंधी भेट

सुगंधी भेट

4 mins
1.2K


फुले, सुमन, पुष्प किती नावे यांची!नाजूक, कोमल, सुगंधी.. ईश्वराने माणसाला दिलेली सुगंधी भेटच जणू. मला ही भेट वारंवार अनुभवता आली.त्या फुलांच्या पण आठवणींत अनेक प्रसंग जशेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.  


 जसं की मे मध्ये सगळी सुगंधी फुलं... जाई, जुई, टपोरा मोगरा, सायली, सोनचाफा...ट्रेन चा प्रवास करताना पण स्टेशन वर एकतरी माणूस किंवा बाई गजरे बनवत बसलेली असायची. हिरव्या पानात ते पांढरेशुभ्र सुवासिक मोहक गजरे अलगद बांधून घ्यायचे. त्याचवेळी सोनचाफ्याची पिवळी नाजूक कळी पण अद्भुत परिमलाने चित्त विसरायला भाग पाडायची. स्वर्गीय अनुभूती


 आम्ही एक पाण्याने भरलेले मडके बाहेर ठेवायचो. उन्हाळ्यात त्या पाण्यात मोगऱ्याची फुले टाकली की पाणी पण सुगंधी व्हायचे. 


मे महिन्यात "मे फ्लॉवर " फुलतं. पण आमच्या अंगणातील मे फ्लॉवर हे जून मध्येच आतापर्यंत फुलून आले आहे. खूप मोठे सुंदर फूल असते ते. 


आमच्या अंगणात पण चार पाच अबोलीची आणि मोगऱ्याची तीन चार झाडे होती. उन्हाळ्यात मी अबोली, मोगरा आणि झिपरीची शोभिवंत पाने घेऊन गजरे बनवायचे. नुसते अबोली किंवा मोगऱ्याचे पण करायचे. 


 एका वाडग्यामध्ये आधी ती फुले अलगद झाडापासून विलग करून ठेवायची. अबोलीच्या फुलांचे असे कणीस असते. त्यात वरती फुललेली फुले आणि खालच्या बाजूला मिटलेल्या कळ्या असतात. काही जण ती कणसे कळ्यांसकट तोडत. किती वाईट.. त्या कळ्या उमलतंच नाहीत पुन्हा! पायरीवर किंवा झोक्यात बसून मग धाग्याने ती फुले गुंफून गजरे करायचे. अबोलीच्या फुलांचे नाजूक दांडे आणि फुले चारही बाजुंनी गजऱ्यातून दिसायला हवेत. 


आमच्या दारात पप्पांनी हौसेने एक पारिजातकाचे झाड अश्या जागी लावले होते की त्याच्या फुलांचा आपोआप पहाटे तुळशीवर अभिषेक होईल आणि तसेच व्हायचे. रोज सकाळी उठून बाहेर आल्यावर अंगणात प्राजक्ताच्या सुंदर नाजूक लाल देठ असलेल्या फुलांचा सडा पडलेला असे. एकदा काय झाले होते की माझे लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरच्या मंडळीसहीत प्रथमच माझ्या माहेरी येणार होते  तर... त्या दिवशी आमचे स्वागत करण्यासाठी पप्पांनी प्राजक्ताच्या फुलांनी " सुस्वागतम " असे एका कट्ट्यावर लिहिले होते.


पप्पांनी कुठून तरी एक झाड आणून लावले आहे बाहेरच्या गेट पाशी. प्रामुख्याने केरळ ला ती झाडं जास्त असतात. तर या झाडाला पावसाळ्यात जून महिन्यात एकाएकी पांढऱ्याशुभ्र फुलांचे मोठमोठे गुच्छ येतात.संध्याकाळी ते फुलत जातात आणि रात्रभर स्वर्गीय सुगंध दरवळत राहतो.सकाळी एकही पाकळी झाडावर रहात नाही आणि झाडाभवती जमिनीवर त्या पाकळ्यांची शुभ्र चादर पसरते.  


जुलै ऑगस्ट मध्ये मदनबाण, अनंत, सोनटक्का यांसारखी फुलं.. बऱ्याच वेळा खूप वर्षांपूर्वी या दिवसांत "दातार मॅडम " पप्पां कडे मोगरा, गुलाब आणि मदनबाणाची ही सुगंधी भेट देत. मग आई आणि दीदी ती फुलं खूप आवडीने केसांत माळत. अनंताच्या अगणित फुलांनी डवरलेले झाड रात्रीचं पाहिलं की चांदण्यांचं जणू त्या झाडावर येऊन बसल्या आहेत असा भास होतो. झाडाच्या बाजूने जरी गेलो तरी प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीसंगे

अनंताचा मोहक गंध दरवळतो. 

सप्टेंबर मध्ये गणपती बाप्पाला लागणारी जास्वदांची फुले!

जास्वंदाचे प्रकार तरी किती सांगू? लाल, डबल, गुलाबी, सफेद, कातर लेली, मिरची जास्वंद!


नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शेवंती,कोरांटी ही फुले..कोरांटीच्या झाडाला काटे असतात. 

कोरांटीचे दोन रंग पिवळी आणि जांभळा.आई अबोली आणि कोरांटीच्या फुलांचा पण एकत्र गजरा करून लावायची.

आई आमची फुलवेडी होती. रोज एकतरी फूल ती वेणीत लावायचीच. तिची आई म्हणायची की "ही मेलेली पण उठेल फुलांसाठी...." इतके वेड ते फुलांचे


  शेवंतीचे चार प्रकार होते अंगणात!बटण शेवंती, पिवळी शेवंती, सफेद आणि छटा असलेली तपकिरी रंगाची पण! मार्गशीर्षातील गुरुवारी आई पिवळ्या शेवंतीचा हार बनवून देवीला घालायची इतकी फुले यायची. 


गुलाबाच्या झाडांना पण खूप फुले यायची. गावठी सफेद गुलाबाचा वेल होता. त्याला एका वेळेस दहा -पंधरा फुले यायची. लाल गुलाबाला पण खूप फुलं यायची. 


तर आताच्या जानेवारी महिन्यात येणारी ऍस्टर ची फुले. 

ऍस्टर ची फुलं किती सुंदर दिसतात.सफेद,जांभळी,फिक्कट गुलाबी, गुलाबी, गडद गुलाबी एक ना अनेक. या ऍस्टर च्या फुलांवरून मला आठवते ते आईचे संक्रांतीचे हळदीकुंकू!

त्या दिवशी दुपारी चार वाजताच आम्ही बाजारात जाऊन दोन तीन डझन ऍस्टर ची फुले आणायचो. लांब देठांची आकर्षक रंगांची फुले फुलदाणीत किंवा तांब्यात पाणी घालून ठेवायचो. खरंच खूप सुंदर दिसायचा तो फुलांचा गुच्छ


हळदी कुंकू साठी आलेल्या स्त्री ला विचारून तिच्या साडीला कुठले मॅच होत असले तर किंवा त्यांच्या आवडीचे फुल द्यायला फार आवडायचे मला!आमच्या शहापूरला संक्रांतीच्या दिवसांत संध्याकाळी गावातल्या रस्त्यांवरून अनेक स्त्रिया छान तयारी करून घोळक्याने हळदीकुंकू साठी जातानाचे दृश्य मनात घर करून राहिले आहे. 


त्याच निमित्ताने एकमेकींच्या घरी येणे-जाणे व्हायचे. एखाद्या घरी हळदी कुंकू साठी गेल्यावर शेजारच्या घरातील ओळखीच्या घरातही मग जाऊन गप्पा व्हायच्या. घरी हळदी कुंकू साठी आलेल्या स्त्रीच्या हातावर अत्तर लावायचे, तीळ गूळ द्यायचे आणि फूल द्यायचे काम आवडीने करायचो. आपल्याच घरी नाही तर ज्यांच्या घरी मुलगी नसेल त्या घरी पण जायचे


आमच्या शहापूर मधल्या काही जागा तिथल्या फूल झाडांमुळे लक्षात आहेत.जसे की ब्राह्मण आळीतील शंकराच्या देवळाजवळील आणि आजगावकर सर आधी जिथे राहायचे तेथील प्राजक्ताचे झाड आणि त्याचा सडा!

   डोंबिवली बँकेच्या बाहेरच्या रस्त्यावर असणारे बकुळीचे झाड आणि त्या खाली असलेली सुकलेली बकुळीची फुले!

आमच्या घराच्या गच्चीवर पसरलेल्या सायली आणि जाई-जुईच्या फुलांचे वेल


सध्या रातराणी फुलांनी बहरून आलीये. रात्री नुसता घमघमाट असतो. थोड्या दिवसांनी आंब्याच्या झाडाला मोहोर येईल. त्या फुलांचा पण मंद गोड सुगंध जीव वेडा करतो. 


आणि रोजच फुलणारे सदाफुली, तगर, डबल तगर, जास्वंद या सारखी फुले.. 

या फुलांनी त्यांच्या रंगांनी, सुगंधांनी खूप आनंद आणि आठवणी मनात फुलवून ठेवल्या आहेत.. कायमच!


Rate this content
Log in