End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Nagesh S Shewalkar

Fantasy


3  

Nagesh S Shewalkar

Fantasy


स्वीच बँक!

स्वीच बँक!

16 mins 842 16 mins 842

                      

        "होय! मी करून दाखवले. येस! आय डिड इट! हां, मैने कर दिखाया! कित्ती वर्षांपासून आमचे सरकार, आमची सी.बी.आय., आमचे पोलीस ज्यासाठी झटत होते. अनेक राजकीय पक्षांनी ज्या मुद्द्यांवर गोंधळ घातला, निवडणुका लढल्या-जिंकल्या-हरल्या ती गोष्ट मी...मी... रेल्वेत बिस्किटे, गोळ्या, शेंगदाणे आणि बंदी असतानाही तंबाखूच्या पुड्या विकणाऱ्या एका सामान्य-अतिसामान्य तरुणाने करून दाखवली ती केवळ माझ्या इच्छा शक्तीवर, आत्मविश्वासाच्या बळावर, सुक्ष्म दृष्टीच्या सहाय्याने करून दाखवली. होय! आज मी या आंतरराष्ट्रीय स्वीच बँकेचा प्रमुख आहे. सारे निर्णय मी घेणार आहे. त्याला आक्षेप घेता येणार नाही. या बँकेचे साठ टक्क्यांपेक्षा अधिक शेअर्स मी विकत घेतले असून मी म्हणेन ती पूर्वदिशा असणार आहे. ज्या बँकेत काही महिन्यांपूर्वी 'शून्य जमा' या योजनेत खाते उघडण्यासाठी आलो होतो. त्यावेळी आज हे जे सुरक्षारक्षक माझ्याभोवती तैनात आहेत त्यांनी मला अपमानित करून, लाथा मारुन बाहेर काढले होते. त्याच बँकेचा मी प्रमुख झालो असून मी एक मोठ्ठा निर्णय घेतलाय. या बँकेत अनेक देशातील बड्याबड्या मालदार लोकांची खाती आहेत. या सुजलाम सुफलाम देशातील मोठमोठे राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी, स्मगलर, भाई-दादा, नटनट्या, खेळाडू, व्यावसायिक, उद्योगपती अशा अनेकांची खाती आहेत. होय! या खात्यांवर जमा असलेला सारा पैसा....कदाचित काळा नसेल पण पांढराही नाही. म्हणून मी अशी सारी खाती गोठवली आहेत. या खात्यांवर जमा असलेल्या पै न पै चा हिशोब संबंधिताला अठ्ठेचाळीस तासांमध्ये द्यावा लागणार असून जमा रक्कम काळे धन नाही हे प्रामाणिकपणे सिद्ध करावे लागेल. तसे न केल्यास त्यांची सारी रक्कम जप्त करण्यात येईल. ही रक्कम ज्यांची-ज्यांची आपल्या स्वदेशी बँकेत तन-मन-धन या योजनेची खाती आहेत आणि ज्या खात्यांवर खाते उघडल्यापासून 'शून्य' किंवा नगण्य रक्कम जमा आहे अशा खात्यांवर वर्ग करण्यात येईल. नाही! मला कुठल्याही देशाच्या सरकारशी, त्या देशातील मुख्य आर्थिक वित्तीय संस्थेशी संपर्क साधण्याची गरज नाही. या निर्णयाला कोणत्याही...अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही विरोध करता येणार नाही. दाद मागता येणार नाही. पत्रकार मित्रांनो, तुमच्यासह देशातील नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या सर्वांचे मी निराकरण करणार आहे. स्वीच बँकेसारख्या एका मोठ्या, आंतरराष्ट्रीय बँकेत खाते उघडण्यासाठी पाच लाख रुपये अनामत भरावे लागतात. एवढी रक्कम मी आणली कुठून, हजारो अब्ज रुपयांचे शेअर्स विकत घेण्यासाठी मी पैसा उभा केला कुठून? मित्रांनो,

'भरुनी तुझ्याच पाण्याच्या ओंजळी, तर्पण करतो मी तुज निर्मळ जळी!' याप्रमाणे याच बँकेतील काही खात्यांवर मी डल्ला मारला हे वाक्य तुम्हाला गैरलागू वाटेल परंतु याच बँकेच्या एका योजनेप्रमाणे, नियमानुसार तंतोतंत वागून मी इथवर मजल मारली आहे...." असे सांगून स्वीच बँकेचे प्रमुख सत्येंद्रनाथ घोटाळे यांनी सारा वृत्तांत जाहीर केला.........

        माणसांनी खचाखच भरलेल्या त्या डब्यात सत्येंद्रनाथ घोटाळे नावाचा तरुण शिरला. खांद्यावर, हातावर आणि खांद्यावर लटकवलेल्या पिशवीमध्ये संत्री गोळ्या, शेंगदाणा चिक्की, हवाबाण हरडेच्या गोळ्या आणि हो सरकारने बंदी घातलेल्या अनेक प्रकारच्या तंबाखूच्या पुड्या यांच्या माळा लटकवलेल्या होत्या.

'संत्री गोळी घ्या, शेंगदाणा चिक्की-चांगली पक्की, हवाबाण हरडेची गोळी-करी पित्ताची होळी, सितार वाजवून मुड बनवा' अशी जाहिरात करत होता. ज्याला हवे ते देत होता, पैसे गोळा करत होता. ती रेल्वे जणू त्याची हक्काची होती. त्याच रेल्वेने तो सहा-सात तासांचा जाऊन येऊन प्रवास करीत होता. तंबाखूच्या पुड्या घेणारी त्याची गिऱ्हाईकं ठरलेली होती. नोकरी-व्यवसायानिमित्त जाणे-येणे करणारांचा तो डब्बा तसा ठरलेला होता. त्यामुळे सत्येंद्रनाथची गिऱ्हाईकं तशी ठरलेली होती. ती रेल्वे सकाळी आठ वाजता सुटत असे. सत्येंद्र सकाळी सकाळी जवळच्या वसाहतीमध्ये घरोघरी वर्तमान टाकून खोलीवर येऊन रेल्वे प्रवासाची तयारी करत असे. त्याने मुद्दामच रेल्वे स्थानकाच्याजवळ खोली घेतली होती. त्यामुळे फक्त पाच मिनिटात तो स्थानकावर पोहोचत असे. रेल्वे येईपर्यंत तो फलाटावर विक्री करत असे. त्यादिवशी सकाळी वर्तमानपत्र वाटत असताना त्याने नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रावर नजर फिरवली. एका बातमीने त्याचे लक्ष वेधले. सरकारने ज्या लोकांची आणि विशेषतः तळागाळातील लोकांची बँकेत खाती नव्हती त्या लोकांसाठी 'तन-मन-धन' या योजनेत 'शून्य जमा' अर्थात एक रुपयाही न भरता खाते काढायची योजना जाहीर केली होती. तोच विचार डोक्यात घेऊन त्याने रेल्वेत प्रवेश केला. तो ज्या स्थानकावर नेहमी उतरत असे त्या स्थानकाच्या आधीच्या स्थानकावर त्या डब्यातील जा-ये करणारे अनेक प्रवासी उतरले. त्यानंतर त्याची विक्री होत नसे. पुढील स्थानकावर उतरणारे लोकही तयारी करत होते. त्यातले बरेच लोक सत्येंद्रच्या ओळखीचे झाले होते. एक व्यक्ती बँकेत अधिकारी होती. त्यांच्याजवळ बसून सत्येंद्रनाथने विचारले,

"साहेब, ही तनमनधन योजना कशी आहे हो?"

"योजना अतिशय चांगली आहे. महत्त्वाचे म्हणजे काहीही रक्कम न भरता खाते काढता येणार आहे. भविष्यात एखादी कोणती योजना आली तर या खात्याचा उपयोग होऊ शकतो."

"काढू का मग मी हे खाते? या खात्यावर मला या व्यवसायसाठी कर्ज मिळेल का? दुसरा एखादा व्यवसाय करायचे ठरवले तर त्यासाठी कर्ज मिळायला काही अडचण तर येणार नाही?"

"खाते काढायला, कर्ज मिळायला काहीही अडचण येणार नाही...." साहेब सांगत असताना दोघांचाही अंतिम थांबा आला. दोघे खाली उतरले. नेहमीप्रमाणे ठरलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करून सत्येंद्रने चहा घेतला. शिल्लक मालाची तपासणी, जुळवाजुळव करून तो पुन्हा रेल्वे स्थानकावर आला. काही क्षण एका खुर्चीत बसून जमलेल्यानोटांची,चिल्लर नाण्यांची जुळवाजुळव केली. सारी सुटी नाणी त्याने स्थानकात असलेल्या एका दुकानदारास दिले....कमिशनवर! पुन्हा एका खुर्चीत येऊन बसला. त्याच्या डोक्यात त्यावेळी बँकेत खाते काढण्याचा विचार जोर धरत होता. काही वेळाने त्याची परतीच्या प्रवासाची रेल्वे आली. पुन्हा त्याची विक्रीची घाई सुरू झाली. ती रेल्वे जाणे-येणे करणारांसाठी सोयीची होती. त्यामुळे त्या गाडीला नेहमीच गर्दी असे. शिवाय दिवसभर काम करून कंटाळलेली नोकरशाही सत्येंद्रसारख्या विक्रेत्याकडून जे हवे ते घेऊन दिवसभराचा ताण घालवत असत. त्यामुळे विक्रेत्यांची चंगळ होत असे.

        रेल्वेतून उतरून बाहेर आलेल्या सत्येंद्रचे लक्ष समोर असलेल्या स्वीच बँकेच्या प्रशस्त इमारतीकडे गेले. त्याबरोबर त्याच्या डोक्यात एक विचार लख्खकन चमकला , 'अरे, ही बँक तर आपल्या खुपच सोयीची आहे. घर, रेल्वेस्थानक आणि हाकेच्या अंतरावर असलेला बाजार सारे अगदी जवळ होते. विशेष म्हणजे या बँकेची वेळ आपल्याला अनुकूल अशी म्हणजे रात्री दहापर्यंत आहे. चला. चौकशी तर करावी....' असे स्वतःशीच बडबडत सत्येंद्रने बँकेच्या आवारात प्रवेश केला. तसा एक सुरक्षारक्षक जणू त्याच्या अंगावर धावून येत म्हणाला,

"ये इकडे कुठे? चल.चल. हो बाहेर. ही बँक आहे, मॉल नाही. तुझी डाळ नाही शिजणार येथे..."

"दादा, मला माहिती आहे ते. या बँकेत खाते उघडायचे आहे......"

"काय? या बँकेत खाते? स्वप्नातही विचार करू नकोस...." म्हणताना त्याने सत्येंद्रचे निरीक्षण केले. हलका असला तरीही स्वच्छ पोशाख, पायातील चप्पल, वाढलेली दाढी हे सारे पाहून शिपाई म्हणाला,"शहाणा आहे की मुर्ख आहेस? इथे खाते उघडणे एवढे सोपे वाटले का तुला? कमीतकमी पाच लाख रुपये जमा ठेवावे लागतात. आहे का हिंमत? उघडू का दरवाजा?"

"पाच लाख? परंतु सरकारची नवी योजना 'तनमनधन' मध्ये खाते 'शून्य' रकमेवर उघडता येते ना?"

"इथे ना तन, ना मन, इथे चाले फक्त धन! आहे का तुजपाशी? कशाला परेशान होतो? जा. काम कर. एखादी रेल्वे बघ आणि गोळ्या विक."

"असे कसे? सरकारच्या योजनेत एवढी मोठी बँक सहभागी होत नाही म्हणजे काय? मला साहेबांना भेटायचे आहे..."

"सांगितलेले ऐकू येत नाही का? चालता हो येथून. कुठून कुठून येतात कोण जाणे?"

"हे बघा, तुम्ही मला अडवू शकत नाहीत. मी ग्राहक आहे. मला आत जाऊ द्या." सत्येंद्र हट्टाने म्हणाला.

"जमणार नाही. ही बँक लखोपती, करोडपतींची आहे. पुढे ऐकायचे तर अब्जाधीशांची आहे. तुझ्या- सारख्या भिकाऱ्यांची नाही."

"नसेल. पण हेच मला साहेबांकडून ऐकायचे आहे."

"जा रे, जा. मोठा आला साहेबांना भेटणारा. त्यांच्या सावलीपर्यंतही तू पोहचू शकणार नाही...." रक्षक बोलत असताना सत्येंद्र पुढे निघाल्याचे पाहून त्याने सत्येंद्रचा हात धरला. त्याला मागे ओढले आणि फाटकाकडे ढकलले. काय गोंधळ चाललाय हे पाहण्यासाठी त्याचा साथीदार-रक्षक धावून आला. दोघांनी मिळून सत्येंद्रला दोन्ही हातांनी धरले. त्याला ओढतच बाहेर ढकलून दिले. सोबत एकाने त्याच्या पाठीवर वारही केला. तसा सत्येंद्रचा तोल गेला. तो सावरत असताना त्याच्या खांद्याला लटकवलेली पिशवी खाली पडली. पिशवीतला सारा माल रस्त्यावर इतस्ततः पसरलेला पाहून दोन्ही सुरक्षारक्षक मोठमोठ्याने हसू लागले. पडलेली गोळ्यांची पाकिटे जमा करून सत्येंद्र निराशपणे निघाला....

       दुसऱ्या दिवशी रेल्वेत त्याने त्या बँकेच्या साहेबांच्या कानावर घडलेली सारी हकीकत घातली. ते साहेब म्हणाले,'नाही रे बाबा, नाही. त्या बँकेत कशाला गेला होतास? ती बँक म्हणजे आपल्यासारख्या सामान्यासाठी 'अंगुर खट्टे है' अशी आहे. तू असे कर,रेल्वे स्थानक ते बसस्थानक या रस्त्यावर एक बँक आहे. तिथे ही खाती उघडण्याची कामे सुरु आहेत." सत्येंद्रने त्या साहेबांचे आभार मानले. सायंकाळी परत येताच तो त्या बँकेत गेला. योगायोगाने त्या बँकेची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत होती. तो आत गेला. संबंधित कारकुनाने त्याचे स्वागत केले. त्याचे म्हणणे ऐकून घेतले. नंतर त्याला एक फॉर्म दिला. फॉर्मसोबत कोणकोणती कागदपत्रे लागतात ते समजावून सांगितले. सत्येंद्र फॉर्म घेऊन घरी आला. घर म्हणजे काय तर किरायाने घेतलेली एक खोली. त्याचे आईवडील आणि लहान भाऊ गावी राहात होते. त्याने पटकन स्वयंपाक केला. जेवण केले. फॉर्म भरायला सुरुवात केली. 'भ्रमणध्वनीवर संदेश व्यवस्था हवी काय?' या प्रश्नासमोर त्याने '√' अशी खूण केली. संदेशासाठी मराठी भाषा निवडली. फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या सूचना अत्यंत बारीक अक्षरातल्या होत्या म्हणून त्याने त्या सुचनांची मोठ्या आकाराची झेरॉक्स काढून आणली होती. तो पदवीधर असल्यामुळे त्याला फॉर्म भरताना अडचण येत नव्हती. त्या बँकेची स्वतःची एक साइट होती. त्याने ती साइट लगेच स्वतःच्या भ्रमणध्वनीवर बोलावून घेतली.

        दुसऱ्या दिवशी सायंकाळी तो बँकेत गेला. फॉर्म कारकुनाच्या हातात देण्यापूर्वी त्यात केलेल्या नोंदी आणि जोडलेली काही कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून पाहिली. नंतर ते सारे त्या कारकुनाने तपासून पाहिले. सत्येंद्रकडे कौतुकाने पाहत तो म्हणाला,

"व्वा! साऱ्या नोंदी अचूक भरल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता योग्य रीतीने केली आहे. असे ग्राहक फार कमी असतात हो. अगदी शिकलेली आणि सुटबुटातील माणसेही स्वतःचे नाव लिहिताना दहा वेळा विचारतात तरीही चुका करतातच. व्वा! बसा. लगेच तुम्हाला पासबुक देतो. चार दिवसात एटीएम पोस्टाने घरी येईल....."असे म्हणत कारकुनाने सारी कामे पटापट आवरली. पंधरा मिनिटात

पासबुक त्याच्या हातात दिले. ते घेऊन सत्येंद्र मोठ्या आनंदात घरी परतला. त्यादिवशी झालेली कमाई मोजून त्याने खोलीतील कपाट उघडले. एका कप्प्यात व्यवस्थित ठेवलेल्या नोटांचे बंडल त्याने काढले. ते सारे त्याने पुन्हा मोजले. सत्तर हजार रुपये जमले होते. त्याने घड्याळ पाहिले. बँक बंद होण्यासाठी अजून एक तास बाकी होता. तो पुन्हा बँकेत गेला. त्याने सारी रक्कम बँकेत भरली.

पासबुकमध्ये नोंद घेऊन एक फार मोठे ओझे उतरल्याप्रमाणे तो खोलीवर परतला. कित्येक वर्षांपासून तो रक्कम घरीच ठेवत होता. मात्र घराबाहेर असला की, त्याला घरात ठेवलेल्या रकमेची चिंता वाटत असे. बँकेत खाते आज उघडू-उद्या उघडू असे करता करता खाते उघडणे झालेच नाही. परंतु आलेली नवीन योजना त्याला अत्यंत आवडली आणि आळस शिरण्यापूर्वी त्याने बँकेत धाव घेतली. विशेष म्हणजे ती बँक त्याच्यासाठी सर्वच बाबतीत सोयीस्कर होती. त्यानंतर त्याने एक नियमच करून घेतला की, सायंकाळी रेल्वतून उतरला की, आधी बँकेत जाऊन त्यादिवशी जमलेली रक्कम खात्यात भरून येत असे. पाहता पाहता त्याच्या खात्यामध्ये बरीच रक्कम जमा झाली. बँकेतून पैसे न काढता खरेदी करता यावी म्हणून त्याने भ्रमणध्वनीवरून व्यवहार करण्याची व्यवस्था करून घेतली. वर्तमानपत्राच्या ग्राहकांकडून मिळणारी मासिक रक्कम आणि पेपरच्या मालकाला द्यावी लागणारी रक्कम यासाठी तो 'डिजिटल' यंत्रणेचा वापर करू लागला.

       त्यादिवशी सणाची सुट्टी असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारीही सुट्टीवर होते. सत्येंद्रचे बहुतेक गिऱ्हाईकं कर्मचारी होती. त्यामुळे सत्येंद्रने रेल्वे प्रवास टाळला. वर्तमानपत्र टाकून तो घरी परतला. येताना बाहेरून नाष्टा-चहा करून आला. खोलीवर येताच त्याने भ्रभणध्वनी सुरू केला. बँकेच्या साइटवर एक संदेश आला होता. बँकेने पुढील तीन तासांसाठी एक योजना जाहीर केली होती. ती योजना अशी होती,'जे ग्राहक त्या योजनेत सहभागी होतील त्यांना बँकेच्या एकूणएक ग्राहकांची यादी भ्रभणध्वनीवर मिळणार होती. त्यापैकी कोणतेही तीन खातेदार निवडण्याचे स्वातंत्र्य असणार होते. या तीन खातेदारांना तुम्ही तुमच्या खात्यावरुन जेवढी रक्कम पाठवाल ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा तर होईल परंतु त्याचवेळी बँक तुमच्या खात्यात तुम्ही पाठवलेल्या रकमेच्या तीन पट रक्कम जमा करेल. यावेळी तुमच्या मित्रांच्या खात्यातून एक रुपयाही कपात होणार नाही. उलट तुमच्या खात्यात जमा होणारी रक्कम बँक स्वतः भरेल.' तो संदेश वाचून सत्येंद्र काही क्षण विचारात पडला. डोक्यात असंख्य विचार धुमाकूळ घालत होते. शेवटी मनाचा हिय्या करून, धाडस करून, नशीब आजमावून पाहावे म्हणून त्याने ती योजना स्वीकारली. ताबडतोब त्याला असंख्य खातेदारांची माहिती मिळाली. त्याने हिंमत करून एक खाते मित्र म्हणून निवडले. एक रुपया पाठवावा की, दहा पाठवू...शंभर...छे! ही रक्कम कमी वाटतेय म्हणून त्याने त्या मित्र खाती एक हजार रुपये पाठवले. व्यवहार यशस्वी झाल्याचा संदेश त्याला प्राप्त होतो न होतो तोच त्याच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले असल्याचा संदेशही मिळाला. सत्येंद्रने खाते तपासले. दोन्ही व्यवहाराची नोंद तिथे दिसत होती. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या सत्येंद्र घोटाळे याने एक डाव खेळला. त्याने दुसरा एक खातेदार निवडला. त्या दुसऱ्या मित्र खात्यावर त्याने चक्क तीन लाख रुपये पाठवले. दुसऱ्या क्षणी व्यवहार यशस्वी झाल्याचा संदेश आला. तशी त्याची धाकधूक वाढली. 'मी तर रक्कम पाठवली पण बँकेने आता शब्द पाळला नाही....' तो तसा विचार करत असताना बँकेकडून पुन्हा एक संदेश आला. त्या संदेशाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याने पुन्हा खाते तपासले आणि तो आनंदाने ओरडला. त्याच्या खाती नऊ लाख रुपये जमा झाले होते. त्याने दाखवलेली हिंमत प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली होती. त्याच्या डोक्यात अजून एक विचार आला की, योजना संपायला अजून अर्धा तास बाकी आहे. त्याची शिल्लक अकरा लाख रुपये होती. शेवटचा दणका द्यावा का? असा विचार मनात येताच दुसरे मन म्हणाले, 'नको. नको. शेवटचा अर्धा तास आहे. काही अडचण आली. आपली रक्कम जमा झाली आणि नेहमीप्रमाणे बँकेचा सर्वर डाउन झाला आणि अवधी संपला तर? तेलही गेले, तूपही गेले...अशी अवस्था होईल. त्यापेक्षा आलेल्या तेल-तुपाचा मस्त आस्वाद घेऊया....' शेवटी दुसऱ्या मनाचा कौल लक्षात घेता सत्येंद्रने मोह टाळला. पण तो स्वस्थ बसला नाही. पाठोपाठ एक विचार त्याच्या मनात आला आणि तो कामाला लागला. दुकानात जाऊन त्याने एक आलिशान कार खरेदी केली. चारचाकी चालविण्याचा परवाना त्याने काही महिन्यांपूर्वीच काढून ठेवला होता. सायंकाळी तो कार घेऊन घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र टाकण्यासाठी तो कारनेच गेला. शिवाय मालकाला फोन करून तीन-चार दिवसांची सुट्टी घेतली. कारमधून पेपर टाकणारा पोरगा पाहून त्याच्या मालकासह अनेक ग्राहक आश्चर्यात पडले. अनेकांच्या चेहऱ्यावर शंकांचे दाट जाळे दिसत होते........

      "साहजिकच आहे ना घोटाळेसाहेब, पेपर टाकणारी, गोळ्या विकणारी एक व्यक्ती अचानक नव्या कोऱ्या कारमध्ये फिरते ही गोष्ट पचायला तशी अवघड आहे." एक पत्रकार म्हणाला. पाठोपाठ दुसऱ्या एका पत्रकाराने विचारले,

"सत्येंद्रनाथ घोटाळे.... घोटाळे... नावात घोटाळा याप्रमाणे एखादा घोटाळा करून तो अशा रीतीने, कपोलकल्पित तऱ्हेने बँकेच्या नावावर खपवत नाही आहात ना? एखाद्या श्रीमंताने स्वतःचा काळा पैसा तर तुमच्या 'शून्य बाकी' खात्यात भरला नाही ना? कारण असे लोक स्वतःच्या मागे इन्कमटॅक्सचा ससेमिरा लागू नये म्हणून असा खटाटोप करतात."

"मला वाटलेच होते. प्रामुख्याने 'घोटाळा' यावरच तुम्ही फोकस करणार. परंतु आडनाव घोटाळे असले तरी नाव सत्येंद्रनाथ आहे. त्यातले सत्य नाही तुमच्या लक्षात आले? ठीक आहे.माझ्या एकूण सर्व व्यवहारातील सत्य तुमच्या पुढे यावे म्हणून ही सारी कागदपत्रे! बँकेच्या पासबुकातील नोंदी तपासून पहा. माझ्या खात्यात जी मोठी रक्कम जमा झाली होती ती कुणी जमा केली ते सारे....." असे म्हणत सत्येंद्र घोटाळे यांनी सुरक्षारक्षकांच्या मार्फत सर्व पत्रकारांना झेरॉक्स प्रती दिल्या आणि पुढे म्हणाले,"आता लक्ष स्वीच बँक........."

       दुसऱ्या दिवशी सकाळी सत्येंद्रनाथ घोटाळे स्वतःच्या नव्या, चमचमीत आलिशान कारमधून स्वीच बँकेत पोहोचला. त्याची कार आत शिरली आणि त्याच दिवशीचा तो सुरक्षारक्षक धावत कारजवळ आला आणि सत्येंद्रला कडक सॅल्युट मारत वाहनतळाचा रस्ता दाखवला. त्याप्रमाणे सत्येंद्रने कार वाहनतळावर नेऊन लावली. हातात एक ब्रिफकेस घेऊन तो परतला. बँकेत प्रवेश करण्यापूर्वी त्याच सुरक्षारक्षकाने त्याचे अदबीने, आदराने, कमरेत वाकून त्याचे स्वागत केले. त्याच विनम्रपणे बँकेचे दार उघडले. सत्येंद्र मोठ्या आत्मविश्वासाने आत शिरला. अतिशय भव्य, शांत, देखण्या आणि थंडगार इमारतीत तो प्रथमच प्रवेश करीत होता. आत शिरल्याबरोबर एका अत्यंत तोकड्या कपड्यातील, प्रसाधन सामुग्रीचा अतिरिक्त मारा केल्यामुळे मुळचे सौंदर्य हरवलेल्या एका ललनेने मानेला आकर्षक झटके देत, डोळे गरगर फिरवत, मोठ्या विनयाने सत्येंद्रचे स्वागत केले. तिने तितक्याच मधाळ स्वरात विचारले,

"वेलकम सर! मी आपली काय सेवा करु शकते?"

"मला खाते उघडायचे आहे." सत्येंद्र तिच्या नजरेत नजर मिसळत म्हणाला.

"वॉ..व! या इकडे....." असे म्हणत चेहऱ्यावर आलेल्या मऊ, मुलायम, चमकणाऱ्या केसांना दिलखेच झटका देत निघालेल्या तरुणीच्या मागे सत्येंद्र निघाला. दहा-वीस पावले चालून जाताच एका आकर्षक खुर्चीकडे इशारा करून ती तरुणी गडद रंगवलेल्या ओठांचा चंबू करून म्हणाली,

"प्लीज सर, इथे बसा. एका क्षणात आमचा कर्मचारी तुमच्या सेवेत हजर होईल."

ती तरुणी गेली न गेली की तसल्याच अवतारातील दुसरी रमणी त्याच्याजवळ आली. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून त्याचे मनमोहक हास्याने स्वागत करून म्हणाली,"आमच्या बँकेचे नियम..."

असे म्हणत तिने काही क्षणात एखाद्या मंजूळ, मोहक आवाजातील टेप ऐकवावा तशी सारी माहिती तोंडपाठ सांगितली. आवश्यक ती कागदपत्रे सत्येंद्रने लगेचच तिच्याजवळ दिली. तशी ती आनंदाने चित्कारली,"व्वा! सर, ग्रेट! तुम्ही तर पूर्ण तयारीनिशी आला आहात." असे म्हणत तिने सारी कागदपत्रे चाळली. सोबत आणलेला खाते उघडण्याचा फॉर्म काढून तिने तो भरला. त्यातला एक कागद काढून तिने तो सत्येंद्रकडे परत दिला. तो इन्कमटॅक्सच्या हिशोबाचा फॉर्म होता. आधी फॉर्मवर आणि नंतर तरुणीकडे आश्चर्याने बघत सत्येंद्रने विचारले,

"इन्कमटॅक्सची माहिती लागत नाही?"

"नाही. काही गरज नाही."

"आश्चर्य आहे. मी आत्ता जी रक्कम भरतोय ती मी..."

"नो सर! आपण आत्ता किंवा यानंतर जेव्हा जेव्हा रक्कम भराल तेव्हा ती रक्कम काळी का पांढरी याच्याशी आमच्या बँकेला काही कर्तव्य नाही. त्याबाबत बँक तुम्हाला कधीच काहीही विचारणार

नाही. सर, मी लगेचच आले. मी येईपर्यंत तुमच्या भ्रमणध्वनीवर तुमचा खातेक्रमांक येईल. बरे, तुम्ही नगदी भरणार आहात की धनादेश?"

"नो. नो. मी नेटबँकेने वळती करतो...."

"ओ ग्रेट! आलेच...." असे म्हणत ती तरुणी आत गेली. काही क्षणातच सत्येंद्रच्या भ्रमणध्वनीवर संदेश आला. तो पेटारा त्याने उघडला. बँकेचा खाते क्रमांक प्राप्त झाला होता. तो पाहून त्याला अत्यंत आनंद झाला. आनंदाने उड्या माराव्यात, ओरडावे, शिट्ट्या फुंकाव्यात अशी त्याची अवस्था झाली. परंतु सारा मोह टाळून तो अत्यंत संयमाने, रुबाबात बसून राहिला. पाठोपाठ दुसरा संदेश आला. नेटबँकेची सारी गोपनीय माहिती मिळाली होती शिवाय व्यवहार करायला परवानगी देण्यात आली होती. ते वाचून सत्येंद्रने ब्रिफकेसमधून लॅपटॉप काढला. आणि स्वीच बँकेच्या खात्यावर सहा लाख रुपये वर्ग केले. काही क्षणातच आलेली ती तरुणी आनंदाने म्हणाली,

"व्वा सर! आपण रक्कम वर्गही केली. उत्तम! आपण आमच्या या आंतरराष्ट्रीय स्वीच बँकेचे सभासद झाला आहात. अभिनंदन! स्वागत!! आभार!!! दोन दिवसात तुमच्या पत्त्यावर पासबुक, चेकबुक, एटीएम सारे काही उपलब्ध होईल. धन्यवाद! सर, आपण काय घेणार? चहा, कॉफी...."

"नो. थँक्स! धन्यवाद! येतो मी..." असे म्हणत सत्येंद्रने त्या तरुणीचा निरोप घेतला........

        "घोटाळेसाहेब, ते खरे आहे. स्वीच बँकेला जरी तुमच्या रकमेचा स्त्रोत आवश्यक वाटला नसेल पण आम्हाला, देशवासियांना हे समजलेच पाहिजेत की, पुड्या विकणारा, पेपर टाकणारा एक माणूस आज एवढ्या मोठ्या बँकेचा प्रमुख होतो यामागचे रहस्य काय?"

"रहस्य वगैरे काही नाही. एकच आहे, मी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचून करतो.सध्या सोशल मीडियाचे युग आहे. मोठमोठे संदेश आपण न वाचता सोडून देतो. बँकेचे फॉर्म, कर्जाचे फॉर्म यावर सर्वात शेवटी तारांकित केलेली लहान अक्षरातील बरीच माहिती असते. ती माहिती आपण वाचतच नाही. ज्यावेळी मी स्वीच बँकेत खाते काढायला गेलो त्यापूर्वी मी त्यांचा खाते उघडण्याचा फॉर्म इंटरनेटवरुन काढून घेतला होता. त्याचा बारकाईने अभ्यास करताना मी एक गोष्ट हेरली होती की, म्हणजे त्यात एक कलम असे होते की, आपण बँकेचे ग्राहक झाल्यानंतर आपली इच्छा असेल तर बँकेतल्या कोणत्याही खातेदाराशी आपले खाते लिंक करण्यात येईल. याचा फायदा असा होईल की, त्या लिंक खात्यात जमा होणाऱ्या रकमेच्या एक टक्का रक्कम आपल्या खात्यात जमा होईल. हे करताना संबंधित खातेदाराच्या परवानगीची गरज नाही. महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा फक्त नवीन खाते काढणारांसाठीच आहे. शिवाय तुमचे खाते या नियमानुसार कुणाशीही लिंक करता येणार नाही. एक विशिष्ट कालावधी झाल्यानंतर तुमचे खाते कुणालाही लिंक करता येईल......

" आम्हाला दाखवाल का तो नियम......"

"इथेच आपण मागे पडतोय. अहो, मी जी पंजिका तुम्हाला दिली आहे ना, त्यात या नियमाची माहिती आहे. पण तुम्ही कुणी तो वाचलाच नाही. असो. खाते लिंक करण्यासाठी एक दिवसाचा अवधी होता. मी घरी आलो. बँकेला विनंती करून या योजनेसाठी पात्र असलेल्या खातेदारांची यादी मागवली. एक-दीड तासात मला ती यादी प्राप्त झाली. त्यातली काही नावे मी निवडली. रात्री शांत झोपलो. सकाळी उठून सारी कामे आटोपली आणि रात्री निवडलेल्या यादीचे बारकाईने निरीक्षण केले आणि एक खाते निवडले....नाव पक्के केले...."

"कोण होती ती व्यक्ती?"

"सॉरी! ते मी नाही सांगू शकणार? कारण ते नाव गुपित ठेवायची एक प्रमुख अट आहे. असो. काही क्षणात आमची खाती लिंक झाली असल्याचा संदेश आला. महत्त्वाचे म्हणजे सायंकाळपर्यंत लाखो रुपये माझ्या खात्यात जमा झाले असल्याचा संदेश आला. त्यानंतर केवळ चार दिवसातच मी करोडपती झालो. याच शहरात बंगला घेतला. गावाकडून कुटुंबाला बोलावून घेतले......"

"ते झाले. पण आपण स्वीच बँकेचे प्रमुख झालात कसे?" पत्रकाराने विचारले.

"सांगतो. सारे सांगतो. स्वीच बँकेचे हजारो ग्राहक आहेत.तितकेच शेअर्स होल्डर आहेत. एके दिवशी बँकेचा संदेश आला की, बँकेचे एक भागधारक त्यांचे पंचवीस भाग विकू इच्छित आहेत. मी माझे खाते तपासले. आवश्यक रक्कम शिल्लक होती. मी मागचा पुढचा विचार न करता ते पंचवीस शेअर्स विकत घेतले. पाच मिनिटात माझ्या नावावर ते भाग वर्ग झाल्याच संदेश आला. त्यानंतर माझ्या सुदैवाने दररोज कुणी ना कुणी शेअर्स विकायला काढत होते. मी खरेदी करत गेलो. माझे खाते लिंक असलेल्या खात्यातून माझ्या खात्यावर दररोज लाखो रुपये वर्ग होत होते. मला पैसा मिळत गेला मी भाग खरेदी करत गेलो. आठ दिवसांपूर्वी स्वीच बँकेच्या परदेशात असलेल्या मुख्य कार्यालयातून संदेश आणि मला फोन आला की, माझ्या नावावर स्वीच बँकेचे एक्कावन टक्के भाग असून मी बँकेचा प्रमुख झालो आहे. बँकेचे सारे निर्णय माझ्या संमतीने होतील. अंतिम निर्णय माझा असेल. मला बँकेच्या मुख्य कार्यालयात जावे लागणार आहे. रीतसर सुत्रं स्वीकारावी लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. तोपर्यंत तिथले कार्यालय आपल्या शहरात तात्पुरते स्थलांतरित झाले आहे. तिथले सारे कर्मचारी कालच आपल्या शहरात दाखल झाले आहेत. त्यांची बैठक घेऊन पुढली दिशा, नियोजन ठरवायचे आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या-ज्या खातेधारकांनी स्वीच बँकेत जमा केलेल्या रकमेचे नियमानुसार स्पष्टीकरण द्यावे. नसता अशा खातेधारकांवर कार्यवाही करण्यात....."

"काय कार्यवाही करण्यात येईल?"

"थोडा धीर धरा. संयमाने घ्या. काही तासात निर्णय होईल. तो तुमच्या मार्फत जगाला समजेल." असे सांगत सत्येंद्रने सर्वांचा निरोप घेतला.

       दुसऱ्या दिवशीची सकाळ देशातच नाही तर जगात एक क्रांती.... अर्थक्रांती घेऊन आली. स्वीच बँकेच्या नव्वद टक्के खातेदारांनी बँकेने दिलेल्या वेळेत स्वतःच्या खात्यावर जमा रकमेचा योग्य हिशोब, स्पष्टीकरण न दिल्याने आणि ज्यांनी दिलेले पुरावे पुरेसे नसल्याने ती सारी खाती बंद करण्यात आली. ही सारी माहिती त्या खातेदारांना आणि त्या- त्या सरकारला कळवण्यात आली आहे. या सर्व खात्यांवर 'काळा पैसा, बेहिशोबी रक्कम' असा शिक्का मारण्यात आला आहे. सोबत असे खातेदार जिथे असतील तिथेच अटक करण्याचे आदेश त्या-त्या सरकारने दिले आहेत.

गोठवण्यात आलेला सारा पैसा आपल्या देशातील 'तनमनधन' या योजनेत काढलेल्या गरिबांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. सत्येंद्रनाथ घोटाळे यांच्या एका निर्णयामुळे देशातील गरीब एका झटक्यात लखोपती होत आहेत..................

       " अरे, सत्येंद्र.....ए सत्त्या, उठतोस ना? किती वेळ असा गाढवासारखा लोळणार आहेस. अरे, आज तुझी बँकेत मुलाखत आहे ना? जाणार आहेस ना? उठ. लवकर उठ........" सत्येंद्रनाथ घोटाळे या नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकाला त्याची आई सकाळी-सकाळी झोपेतून उठवत असताना सत्येंद्र पुटपुटला,

'च्यायला! झोपेत तरी या देशातील गरिबांच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाल्याचे स्वप्न कुणी पाहू देत नाही......'

                                 


Rate this content
Log in

More marathi story from Nagesh S Shewalkar

Similar marathi story from Fantasy