Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Drama


3  

Sangieta Devkar

Drama


सुमी एक देवदासी

सुमी एक देवदासी

7 mins 1.2K 7 mins 1.2K

आपल्या महाराष्ट्रात पश्चिम भागात जसे कोल्हापूर, बेळगाव, सौन्दती तसेच कर्नाटक, या ठिकाणी आजही देवदासी म्हणजेच जोगतिण, ही प्रथा एक प्रकारची अंधश्रद्धा अस्तित्वात आहे. या प्रथेविरुद्ध कायदा संमत झाला असूनही लपून छपून आजही देवाशी मुलीचं लग्न लावणे, तिला जोगवा मागायला दारोदार पाठवणे, देवदासी म्हणून तिने आयुष्यभर एकटी राहणे आणि गावातील प्रतिष्ठित लोक आणि मंदिरातील पूजारी यांची शय्यासोबत करणे हेच त्या देवदासीचे जीवन आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमाभागातील देवदासींची संख्या फार मोठी आहे. देवदासी ही देवाची स्त्री मानली जाते. त्यामुळे तिला अनिच्छेने का होईना पण देवाधर्माच्या नावावर काही अनिष्ट प्रथा आणि उत्सव साजरे करावे लागतात. ही एक काल्पनिक कथा आहे, कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही, काही परंपरा-रूढी आहेत, याचेच उदाहरण स्वरूप ही कथा आहे...


सुमी, शांता आणि रामा अंगणात खेळत होते, दुपारचे कडक ऊन होतेच पण एका झाडाखाली हे तिघे खेळत होते, तशीही यांची घरं गावाबाहेर होती. देवदासींची वस्ती म्हणूनच ही पालावरची घरं ओळखली जायची. सुमी खेळण्यात मग्न होती.


गावचे पाटील तिथे आले म्हणाले, काय सुमे शाळा सुटली वाटतं. आवाज आला म्हणून सुमीने पाटलाकडे पाहिले, म्हणाली, होय सुटली.


तसे पाटील म्हणाले, हे घे खाऊ आणि मी बाहेर येईपर्यंत इथेच खेळत बस, असे म्हणत त्यांनी सुमीला बिस्कीटीचे पाकीट दिले. सुमीने ते अनिच्छेने घेतले. पाटील घरी यायचे हे तिला अजिबात आवडत नव्हते. तिने बरेचदा रात्रीसुद्धा गाढ झोपेत पाटलांना आपल्या घरात पाहिले होते तेसुद्धा तिच्या आई सोबत एकत्र झोपलेले. पण या गोष्टीचा अर्थ काय हे तिच्या बालमनाला अजून समजले नव्हते. सुमी नऊ वर्षाची होती. तिची आई वसुधाबाई जोगतीन म्हणजेच देवदासी होती,घरोघरी जाऊन जोगवा मागत फिरायची. मंदिरात काही काम असेल ते करायची, देवाची सेवा करायची, हेच देवदासीचे काम असे आणि या देवदासीच्या शरीराचा उपभोग घ्यायला गावातील पुजारी, पाटील अजून धनाढ्य मंडळी होतीच. सुमीही कोणाची मुलगी हे वसुधाबाईंना पण माहीत नव्हते. पण आपली मुलगी ती पण देवाची सेवा करणार. ती वयात आल्यावर तिचे पण देवाशी लग्न होणार, हे गृहीतच होते.


गावातील एक शिक्षिका मालतीबाई यांनी या वस्तीवर येऊन देवदासींना खूप समजावून सांगितले की ही एक अंधश्रद्धा आहे याला बळी पडू नका. पण त्याचे कोणी ऐकले नाही आणि गावातील बडी मंडळी त्यांना या कारणावरून त्रास देऊ लागले. शेवटी बाईनी हार मानून निदान वस्तीवरील मुलांना शिकवण्याची परवानगी घेतली, जेणेकरून देवदासींची मुले काही चांगल्या गोष्टी शिकतील. म्हणून मालतीबाई रोज सकाळी मुलांना शिकवायला येत असत, पण देवदासींना काही फरक पडणार नाही, हा ठाम विश्वास गावकऱ्यांना होता. सुमीला हे पाटील घरात असेपर्यंत आत जाता येणार नव्हते कारण दार आतून बंद केले होते. सुमी पाटील घरा बाहेर जाण्याची वाट पाहात बाहेरच थांबली. थोड्या वेळाने ते निघून गेले. तशी सुमी घरात आली.


आईला म्हणाली, आई हे पाटील कशाला आपल्या घरी येतात, मला आवडत नाहीत ते.


वसुधा बाई म्हणाल्या, तुला नाही समजणार तू लहान आहेस आपला जन्म असाच आहे. तू मोठी झाली की तुला समजेल. आता गप्प जेव आणि परत हे विचारू नकोस. सुमीला आईचे बोलणे काही समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी वस्तीवर मालतीबाई शिकवायला आल्या, तेव्हा सुमीने बाईंना विचारले जे तिची आई बोलली होती.


तेव्हा बाई म्हणाल्या, सुमी तू तुझ्या आईचे ऐकू नको तुला जे आवडत नाही त्याचा प्रतिकार कर, पण या घाणेरड्या प्रथेला बळी पडू नकोस. मी जे बोलते ते तुला आज नाही पण तू उद्या मोठी झालीस की समजेल. बाईंना सुमीची तसेच इतर मुलांची पण काळजी वाटायची पण परिस्थितीपुढे त्या हतबल होत्या आणि त्यांना कोणाचा पाठिंबाही नव्हता. त्यामुळे गप्प बसून जे होईल ते पाहात राहणे इतकंच त्यांच्या हाती होते. सुमी आणि रामा लहान पणापासून एकत्र खेळत मोठे झाले, दोघे जिवलग मित्र होते. एकमेकांना ते आवडु लागले होते. दोघेही वयाने चौदा वर्षाचे झाले होते, एकमेकांना एकमेकांची ओढ वाटत होती, पण याला प्रेम म्हणतात की, अजून काही हे त्यांना उमजत नव्हते, नकळत्या वयात होते ते.


सुमी वयात आली होती आता वसुधाबाईना तिचे लग्न देवाशी लावून देण्याची घाई झाली होती. मंदिरातील पुजाऱ्याशी त्यांचे बोलणे झाले होते लवकरच त्या सुमीचे लग्न लावून देणार होत्या. ती वयात आली तशी वसुधाबाईनी तिची शाळा बंद केली. सुमी फक्त लिहायला वाचायला शिकली होती. पण बाई जे बोलल्या होत्या ते ती विसरली नव्हती. एक दिवस चांगला मुहूर्त बघून सुमीचे लग्न देवाशी लावून दिले. तिच्या गळ्यात कवड्यांची माळ घातली, कपाळाला भंडारा लावला, एक परडी दिली त्यात देवीचा फोटो ठेवून तिला दारोदार जोगवा मागायला पाठवले. या मुळे गावातील लोकांनाही समजायचे की सुमी आता देवदासी झाली, ती फक्त पाटलांची पूजऱ्याची मालमत्ता झाली.


सुमी रोज जोगवा मागायला जायची, आईपुढे तिचे काही चालत नव्हते. पाटील नेहमीसारखे घरी येत राहायचे, सुमीला विचित्र स्पर्श करायचे हपापलेल्या नजरेने पहात राहायचे, सुमीला हे सगळे असहय व्हायचे पण ती काही करू शकत नव्हती. रामा आणि सुमी एकमेकांच्या प्रेमात होते. सुमी सतरा वर्षाची झाली होती, रामा अठरा वर्षाचा होता त्याला पण देवाचा सेवक म्हणून देवळात कामाला ठेवले होते, त्यालाही लग्नाची मुभा नव्हती, देवाचा सेवक म्हणून आजन्म त्याने अविवाहित राहायचे ही प्रथा होती. सुमी आणि रामाला लग्न करायचे होते, पण इथून बाहेर कसे पडायचे हा मोठा प्रश्न होता.


वसुधाबाई जोगवा मागायला बाहेर गेल्या होत्या सुमी एकटीच घरी होती, तिने रामाला भेटायला बोलावले होते. सुमी म्हणाली, रामा ही लोक आपण जिवंत असेपर्यंत तरी आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत. आपण इथून पळून जाऊ तरच काहीतरी होईल. मला हे असे देवदासीचे जीवन नाही जगायचे, तो पाटील असा पण माझ्या वर नजर ठेवून आहे मला त्याचीच जास्त भीती वाटते.


रामा म्हणाला, सुमे पण आपण पळून जाणार तरी कुठे आणि खाणार तरी काय. कोण आपल्याला मदत करेल?


सुमी म्हणाली, कुठे पण जाऊ पण या नरकापासून लांब जाऊ.


रामाने तिला आपल्या मिठीत घेतले. सुमीला आता मालतीबाईंचे बोलणे आठवत होते तिने निर्णय घेतला की या नरकातुन बाहेर पडायचे, याचा प्रतिकार करायचा. ते दोघे शांत एकमेकांच्या मिठीत बद्ध होते.


तितक्यात वसुधाबाई आल्या आणि या दोघांना अशा अवस्थेत बघून ओरडल्या, सुमे काय चाललंय तुझं, काही लाज लज्जा आहे का... आईच्या आवाजाने सुमी रामापासून दूर झाली, रामा बाहेर पळुन गेला.


वसुधाबाईनी सुमीच्या कानशिलात वाजवली म्हणाल्या, अगं देवाशी तुझं लग्न झालंय, याचं तरी भान ठेव... तू जोगतिन आहेस. तुला आयुष्यभर देवीची सेवा करायची आहे.


तशी सुमी म्हणाली, मला नाही व्हायचं तुझ्यासारख नाही, बनायचं देवदासी. मला लग्न करायचं रामा सोबत आमचं प्रेम आहे एकमेकांवर. इतके ऐकून वसुधाबाईंनी सुमीला मरमर मारले आणि बाहेर पडायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. सुमी मुकाट्याने रडत होती आणि आपल्या नशीबाला कोसत होती.


रात्री पाटील घरी आला, वसुधाबाईंनी त्याला जेवण दिले, सुमीला ही जेवणाचे ताट दिले पण तिची भूक मेली होती. ती तशीच न खाता झोपून गेली. भर रात्री कोणाच्या तरी स्पर्शाने तिला जाग आली, डोळे फाडून ती दिव्याच्या उजेडात पाहू लागली तर तिला पाटील दिसला. तो तिच्या शरीराची लगट करत होता, तिने आईला हाका मारल्या पण तिची आई नव्हती घरात, तिने खूप प्रतिकार केला पण पाटलापुढे तिचा निभाव नाही लागला.


सकाळी तिला जाग आली तेव्हा आई घरात होती, तिने आईला झाला प्रकार सांगितला, तशा वसुधाबाई म्हणाल्या, आपल्या जन्मात हेच लिहिले आहे जे मी केले तेच तुला ही करावे लागणार आहे. सुमीला काय करावे हेच समजेना, इथून सुटका कशी करायची याचा ती विचार करू लागली.


दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधाबाई अंघोळीला गेल्याचे बघून सुमी घरातून बाहेर पडली आणि रामाच्या घराजवळ जाऊन त्याला आवाज दिला. रामा बाहेर आला, काय गं सुमे इतक्या सकाळी सकाळी. काय झाले...


अरे आता बोलण्यात वेळ घालवू नकोस, चल आपण हे गाव सोडून पळून जाऊ आणि लग्न करू.


तसा रामा म्हणाला, अगं पण जायचे कुठे...


कुठे ही जाऊ पण आता लवकर निघ.


रामा म्हणाला, थांब आलोच आणि घरात जाऊन त्याने थोडे समान घेतले आईला याबद्दल कोणाला सांगू नकोस असे बजावून बाहेर आला. सुमी आणि रामा भरभर वेशीपर्यंत आले. अजून दिवस उगवायला वेळ होता. ते लवकरात लवकर हे गाव सोडणार होते. पण अचानक त्यांच्यासमोर पाटील आणि गावचा पुजारी समोर आले.


त्या दोघांना थांबवत म्हणाले, काय कुठून पळून चालला होता? धरा रे या दोघांना, असे पाटील म्हणाले... तसे त्याची माणसे काठ्या हातात घेऊन समोर आले आणि सुमीला आणि रामाला पकडले. सुमीला कळून चुकले की तिच्या आईनेच पाटलाला ही खबर दिली असेल. रामाला लोकांनी खूप मारले, सुमीला पाटील घरी घेऊन आले. सुमीच्या आईने तिलाही खूप मारले.


सुमी मार खात होती आणि म्हणत होती मार मला कायमचे, मी जिवंत राहून अशी देवदासी म्हणून जगणार नाही.


तिची आई म्हणाली, मग काय लग्न करून देवीचा शाप घेणार हायेस, इथं तुला देवदासी म्हणून किंमत तरी आहे पोटाला अन्न आहे. बाहेर जाऊन कोण तुला काय देणार, उलट सगळ्यांनी देवदासी म्हणून तुझा वापरच केला असता.


सुमी म्हणाली, इथं राहून पण तेच होणार आहे, मला रामाशी लग्न करायचं आहे, आई मला जाऊ दे सोड.


पण तिचे ऐकायला तिथे तिची आई नव्हती तर ती सुद्धा एक जोगतीनच होती, रूढी परंपरा याच्या नावाखाली दबलेली!! सुमीचे आयुष्य देवाच्या नावाखाली पुजारी-पाटील यांची भूक भागवण्यातच जाणार होते, इथून तिची सुटका नव्हती. रामा परत गावात दिसला नाही त्याचे काय झाले हे कोणालाच समजले नाही. सुमी दारोदार जोगतिन बनून जोगवा मागत फिरते.

   

समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama