सुधा, कुठे आहेस तू?
सुधा, कुठे आहेस तू?


“छम्म... छम्म...”
पैंजणाचा छमछम असा आवाज कानावर पडताच, “सुधा, कुठे आहेस तू?” अस विचारलं. खोलीच्या काळोखात काही उत्तर न मिळता ते पाऊल बाहेर जाण्यासाठी पुढे वाढले परंतु परत एकदा आलेल्या छमछमच्या आवाजाने ते थांबले! शर्टातल्या खिशातून सिगरेट काढून तिला पेटवता पेटवता आपले लक्ष पैंजणाच्या ध्वनीवर केंद्रित केले परंतु काहीही आवाज एेकू न येता सिगरेटला एकीकडे फेकून, “सुधा, कुठे आहेस तू?” असं परत एकदा विचारले. परंतु, काही ही उत्तर भेटले नाही उरली होती ती फक्त निरव शांतता...
अखेर त्या शांत वातावरणात दरवाजाची डोअरबेल गुंजून उठली...
ते एकून पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडताच जसे मोराचे पाऊल थिरकून उठतात तसेच ते पाउल आनंदविभोर होऊन दरवाज्याकडे वळाले...
त्याचबरोबर छमछमच्या अावाजाने सर्व वातावरण ही गुंजून उठले...
खूपच उत्साहाने दरवाजा तर उघडला परंतु तिथे आपली मैत्रीण निर्मला उभी आहे ते पाहून सर्व उत्साह ओसरला गेला...
हताशाने विरक्त होऊन, “सुधा, कुठे आहेस तू?” असा उद्गार निघाला.
हे पाहून निर्मला विचलित होऊन म्हणाली, “अरे! तू तुझी ही काय अवस्था करून घेतली आहेस? तू वास्तविकतेचा स्वीकार का करत नाहीस? तू हे का समजत नाही की तुझा नवरा विराग आता या जगात राहिला नाही. भानावर ये सुधा... भानावर ये... तुझ्या नवर्या विराजचे कपडे घालून... त्याची नक्कल करून तू कुठपर्यंत स्वतःची अशी फसवणूक करत राहशील?”
सुधाच्या पायातील तुटलेल्या पैंजणाकडे पाहत निर्मला खिन्न स्वरात पुढे म्हणाली, “पावलोपावली मस्करी करणारी... दुसऱ्यांना हसवणारी... कुठे आहे आमची ती सुधा... आम्हाला ती परत पाहिजे... परत पाहिजे...” असं म्हणत निर्मला ढसाढसा रडायला लागली.
सर्वस्व गमावून हताश झालेली सुधा निस्तेज नजरेने निर्मलाला रडताना पाहू लागली. अखेर सुधाचे ओठ फडफडले आणि त्यातून स्वर निघाला, “सुधा, कुठे आहेस तू?”