Niranjan Salaskar

Thriller


4.3  

Niranjan Salaskar

Thriller


सर्वच भुतांचे पाय उलटे नसतात.

सर्वच भुतांचे पाय उलटे नसतात.

9 mins 16.4K 9 mins 16.4K

सन १९७५
टेलिफोनची रिंग खणखणत होती धावतच गणुदा टेलिफोन जवळ आला. त्याने ओले हात खमिसाला पुसले व फोन कानाला लावला.
"Hello, "कोण बोलतयं?" 
"Hello, मी सदाशिव बोलतोय." पलीक[डून आवाज आला.
गणुदाने लागलीच ओळखले की हा सदाशिवरावांचा फोन आहे, "थांबा मी साहेबांना बोलवून आणतो." त्याने तिथूनच साहेबांना निरोप धाडला, "साहेब सदाशिव रावांचा फोन आलाय तुम्हाला".
साहेब आतमध्ये ४-५ गांवक-यांसोबत बैठकीत व्यस्त होते. त्यांनी गणुदाचा निरोप ऐकताच गांवक-यांना निरोप दिला व ते बाहेर फोनजवळ आले व कानाला फोन लावला. "काय रे साल्या आता आठवण आली काय तुला." 
पलीकडून सदाशिव हसत म्हणाला, "नाही रे जग्ग्या(जगदीश परचुरे) या सरकारी कामात वेळ नाही मिळाला रे, नाहीतर तुला कोण विसरतयं?" 
"बरं, बोल काय काम काढलयं माझ्याकडे?" जगदीशने हसत विचारले.
"काही नाही रे जरा सुट्टी काढली होती तर म्हटलं गावात फेरफटका मारुन यावं, जरा गावची जमीन अशीच पडून आहे विचार चाललाय जरा मार्गी लावावी." सदाशिव एका दमात बोलला.
"ठीक आहे मग ये, संध्याकाळ करु नकोस दिवसाच ये." जगदीश म्हणाला.
"हो उद्या सकाळीच निघतोय इथून संध्याकाळच्या आतच यायचा प्रयत्न करेन." सदाशिव खात्री देत म्हणाला.
"ठीक आहे ये मग आल्यावर बोलूच आपण." असं म्हणत जगदीशने फोन ठेवला.
जगदीश व सदाशिव लहानपणापासूनचे मित्र होते दोघांनी शालेय शिक्षण गावातच पूर्ण केलं पण सदाशिव पुढच्या शिक्षणासाठी शहरात आला व पुढे सरकारी नोकरीत रुजू झाला. जगदीश मात्र गावीच राहीला, पुढचं शिक्षण पुर्ण करता आलं नाही पण नंतर गावच्या निवडणुकीत जिंकला व सरपंच म्हणून सेवा करु लागला.
सदाशिवने बॅगेत मोजकेच कपडे भरले, प्रवासात वाचण्यासाठी भय कथेची काही पुस्तके घेतली, तशी त्याला वाचनाची खूप आवड होती आणि प्रवासात मुकाटपणे एकमेकांचे चेहरे बघत बसण्यापेक्षा दोन- तीन पुस्तकांचा फडशा पाडणे त्याला नेहमी फायदेशीर वाटायचे. गावी जाण्याच्या तयारीत दिवस कसा गेला कळलंच नाही, मुग्धा(सदाशिवची पत्नी) त्याच्यासोबत येण्यास हट्ट करत होती, पण त्यानेच तिला  येण्यास मनाई केली. कारण यावेळी त्याचं गावी जाण्याचं कारण जरा वेगळ होतं. नोकरी लागल्यापासून फार क्वचितच सदाशिव गावी गेला असेल आणि तसही त्याच्या गावच्या घरी कोणीच राहत नव्हतं. त्यामुळे जास्त गावी जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. 
सकाळी ठरल्याप्रमाणे ८ वाजता त्याने गाडी पकडली आणी अंदाजे जवळपास संध्याकाळी ५ पर्यंत तो गावी पोचणार होता. गाडी सुरू झाली. त्याने बॅगेतून पुस्तकं काढलं आणी झपाटय़ाने एकामागून एक आधाश्यासारखा तो पुस्तकं वाचू लागला. संध्याकाळी जवळपास ४ च्या सुमारास गाडी 'वळणा' फाट्याजवळ पोहोचली होती गाडीचा वेग कमालीचा मंद झाला, कदाचित ट्रॅफिक असावी म्हणुन, ४ चे ५ झाले आता गाडी पूर्णपणे ठप्प झाली होती, ड्राईव्हर खाली उतरला पुढे जाऊन नेमकं काय झाल ते बघितलं तेव्हा लक्षात आलं की दोन गाड्यांची जबरदस्त टक्कर झाली होती सगळे जागीच ठार झाले होते, त्यामुळेच हा ट्रॅफिक होता. त्याला कळून चुकले की, त्याला गावी उशिरा पोहण्यास आता कोणीच थांबवू शकत नव्हतं. 
तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार चाटून गेला "जग्ग्या" बोलला होता संध्याकाळच्या आत गावी पोहोच. त्याचं मन कासावीस होत होतं आणी त्याचं कारणचं तस होतं ते म्हणजे उशिरा पोहचल्यावर तेथे टांगेवाले मिळत नाही आणी दुसरं कारण म्हणजे म्हणजे..... तो.. तो... वाटाड्या.

सहा महिन्यांपूर्वीच जगदीशचा फोन आला होता. तो म्हणाला होता गावात एका 'भिकु' नावाच्या माणसाने घराजवळच्या विहीरीत उडी मारुन जीव दिला होता. पोलिसांनी मृत्युचं कारण शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच कळेना. कोणी म्हणत होतं तो कर्जबाजारी झाला होता तर कोण म्हणत होतं की कोणीतरी भानामती केली असेल. आणी आता तोच भिकु खूप लोकांना त्याच्या घराजवळच्या विहीरीजवळ नाहीतर वाटेवर रात्री अपरात्री वाट दाखवताना दिसतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस साधं चिटपाखरुसुध्दा तिथं फिरकत नाही, टांगेवाले सुद्धा भितीने गावच्या वेशीजवळ सोडत नाहीत. सदाशिवच्या मनात भितीचे ढग अजुनच गडद होत चालले होते. अजून जवळपास दीड तासाचे अंतर तरी होते आणी या ट्रॅफिकमुळे किती उशिर होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती.

गाडी सुरू झाली तिने चांगलाच वेग पकडला तसा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तो काचेतून बाहेरची झाडी बघत होता पण मनात मात्र त्या वाटाड्याचाचं विचार चालू होता. कंडक्टरने घंटी वाजवली "चला वालवी नाका." तशी त्याची शुद्ध आली त्याने मनगटावरील घड्याळात पाहिलं, बघतो तर काय घड्याळ बंद पडलं होत. त्याने सामान घेतलं बसमधून उतरताना कंडक्टरला वेळ विचारली असता ८ वाजले होते. जरा जास्तच उशीर झाल्याचे त्याला जाणवले. नाक्यावर खूपच कमी वर्दळ होती. तिथे एकही टांगेवाला नव्हता त्याने उभं राहून त्यांची वाट पाहण्याचे ठरवले. पलीकडे अंधारात झाडं खूप अक्राळविक्राळ दिसत होती त्याने तिथं बघणे टाळले. झाडांमुळे हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. थंडीमुळे त्याची दातखिळ वाजत होती. 
अचानक त्याला घोड्याच्या टापांचा आवाज येत होता मनातली धाकधुक थोडी कमी झाली. टांगा त्याच्यासमोर येऊन उभा राहीला, टांगेवाल्याने डोक्याभोवती शाल गुंडाळलेली त्यामुळे तो त्याला नीट बघू शकला नाही, त्याने बॅग मागे ठेवली व 'पाखरवाडी' सांगत तो टांग्यात बसला. पाखरवाडी बोलल्यावर त्याच्या चेह-याचा रंगच उडाला. 
"पाव्हणे एवढ्या रात्री घोडं गावात न्हाय शिरणार मी तुम्हाला आदल्या वळणावर सोडीन." टांगेवाला जरा दबकुनच म्हणाला.
सदाशिवने नाईलाजाने मान हलवली कारण दुर-या टांगेवाल्याची वाट बघणे त्याला असह्य झाले होते. टांगा सुरू झाला तशी ठंडी अंगाला बोचू लागली. त्याने दोन्ही हात खांद्याभोवती कवटाळले.
"कुठच तुम्ही पाव्हणं?" त्याचा घोगरा आवाज शांतता चिरुन गेला.
"मी मुबईहू आलोय जगदीशचा लंगोटी यार आहे त्याला भेटायला आलोय." 
"अच्छा म्हणजे तुम्ही सरपंच सायबांचं दोस्त व्हयं? बरं..!"

जगदीश सरपंच पदावर असल्याने ओळख म्हणून त्याचं नावच काफी होतं. आणी माणुस म्हणुनही त्याने गावात चांगलीच माणुसकी जपली होती म्हणून कदाचित मी त्याच्या मित्र म्हटल्यावर नाईलाजाने का होईना तो टांगेवाला मला तिथे सोडायला तयार झाला.
त्याने ठरल्याप्रमाणे गावच्या आधीच्या वळणावर मला सोडलं, इथून वाड्यापर्यंतचे अंतर एक मैल तरी असेल. मी पैसे दिले बॅग उतरवली तेवढ्यात टांगेवाला म्हणाला, "पाव्हण जरा जपुन जावा, न्हाय मंजे तुम्हाला गावच्या अंधाराची सवय न्हायी म्हणून म्हणलं." हे ऐकताच त्याच्या अंगावर सरसरुन शहारे आले. त्याला समजलेच नाही की त्याने सतर्क राहण्यास सांगितलं की घाबरवलं. टांगा उलटा फिरवून तो काळोखात दिसेनासा झाला. त्या कुडकुडत्या थंडीत पण त्याला दरदरुन घाम फुटत होता, त्याने खिशातून रुमाल काढला कपाळावरचा, मानेवरचा घाम टिपला व एक एक पावलं टाकत तो त्या पाचोळ्यातून चालु लागला. त्या किर्रर शांततेत पाचोळ्यावर पाय पडताच येणारा कच् कच् आवाज त्याला दिलासा देत होता. त्याने याआधी एवढा गडद अंधार कधीच पाहीला नव्हता. मध्येच एखादी झुळुक पानांची छेड काढायची त्याच्या सळसळ आवाजाने तो मधेच थबकायचा, रुमालाने घाम टिपायचा व परत चालायला लागायचा. आतापर्यंत त्या भिकार ट्रॅफिकला त्याने खूप वेळा शिव्या घालून झाल्या. पण आता ते व्यर्थ होते या काळ्याकुट्ट अंधाराला सामोरं गेल्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते.

अचानक काळीज चिरणा-या आवाजाने तो एकदम दचकला, त्याने चारीबाजूला एक कटाक्ष टाकला त्या कुट्ट अंधारात त्याला त्याचा हात सुधा दिसत नव्हता. त्याने कानोसा घेतला तो आवाज कुत्र्यांच्या विव्हळण्याचा होता. आवाज एवढा भयाण होता की त्याची दातखिळीच बसली. तो झपझप पाऊलं टाकत होता. काहीही करुन लवकर घरी पोहचणे भाग होते. अजुन अर्ध्या मैल बाकी होता, किती वाजले याची काहीच कल्पना नव्हती. अचानक त्याने रस्त्याच्या कडेला बघितले आणी त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं, त्याला तीचं झाडं पुन्हा दिसली जेथे त्या टांगेवाल्याने त्याला सोडलं होतं आता त्याला कळून चुकले की आपल्याला चकवा लागलाय. आतापर्यंत तो भितीने पार अर्धा झाला होता, मेंदू सुन्न झाल्यासारखा वाटत होता, अधुनमधून झुळूक येत होती पण पानांची सळसळ मात्र होत नव्हती. तो पूर्ण परिसर त्याला भयाण व भकास वाटत होता. तो मधेच कुठे खुट्टं झाली की मागे वळून बघायचा.

त्याने एका पुस्तकात वाचले होते की ज्या ठिकाणी भुतांचा वावर असतो तेथे खूप भकास वाटते, वारा वाहतो पण पानांची सळसळ होत नाही. अस वाटतं की त्या पूर्ण परिसरावर जणू त्यांचच वर्चस्व असतं. या विचाराने तो अजूनच घाबरला, पण लगेच त्याने या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकी असतात प्रत्यक्षात हा एक भास असतो भास अशी मनाची समजुत घातली.
तो एका रस्त्या लगतच्या दगडावर येउन बसला, रस्त्या एकदम निर्मनुष्य, अंधारात जणु बुडाला होता. रातकिड्यांची किरकिर, कुत्र्यांचे विव्हळणे अगदी अंगावर बेतल्यासारखे वाटत होते. अचानक त्याची नजर लांबून येणा-या कंदिलाच्या प्रकाशाकडे गेली. कोणीतरी कंदिल घेऊन त्याच्याच दिशेने येत होता. त्याचा चेहरा लांबून दिसण्याजोगा नव्हता. त्याला बघून सदाशिवला जरा हुरूप आला. ताडकन उठून तो उभा राहीला, त्याने त्या माणसाची जवळ येण्याची वाट पाहिली. तो माणूस त्याच्या जवळ आला त्याने कंदिल वर चेह-याजवळ धरलं, अचानक प्रकाश चेह-यावर पडताच सदाशिवने डोळे किलकिले करुन पाहिलं आणी तो दचकलाच. विक्षिप्त दिसणारा, मोठे लालसर डोळे, भुवया उंचावलेल्या, मळकट खमिस व धोतर घालून एक म्हातारा होता तो.
त्या अंधारात कोणीतरी त्याच्यासोबत होतं हेे बघुन "हुश.........! त्याने सुटकेचा निश्वास सोडला.

"कुठ चाललात पाव्हणं येवड्या रातीला?" त्याच्या चेहऱ्या प्रमाणे त्याचा आवाजपण भयाण पण त्या अंधारात त्याला दिलासा देणारा होता.

"मी जगदीश परचुरेकडे आलोय जरा वाट चुकलो होतो म्हणून इथे थांबलो होतो. बर झालं तुम्ही देवासारखे भेटलात." सदाशिव सलग बोलला.
"मी पण तीथंच जातुया चला माझ्यासंग." असं म्हणत मी पुढे व तो मागे असे आम्ही दोघ त्या कंदिलाच्या वर्तुळाकार उजेडात चाललो होतो.
अचानक मला पाचोळ्यातून काहीतरी फरफटत चालल्याचा आवाज आला मी जरा थांबलो मागे पाहिलं आवाज बंद झाला मी पुन्हा चालू लागलो आवाज परत येत होता, माझ्या मागून तर तो म्हातारा चालत होता पण चालत होता तर पायांचा आवाज असा फरफटत का येत होता? त्याला काहीच कळत नव्हतं की त्याला असं का होतंय?

अचानक मेंदू सुन्न होईल असा विचार माझ्या डोक्यात आला. जग्गु मला त्या वाटाड्या बद्दल फोनवर एकदा बोलला होता हा तोच वाटाड्या तर नसेल ना? आणी जर असेल तर..... आता मात्र त्याची भितीने पूर्ण भबेरी उडाली होती. तो घामाने पूर्ण भिजला होता. तेवढ्यात झाडीतून काही हालचाली जाणवल्या, मी झाडीत पाहिलं मला झाडीत कोणाचेतरी डोळे चमकल्या सारखे दिसले व झाडीतून भुंकण्याचा आवाज येऊ लागला. ते आमच्यावरच भुंकत होते त्या माणसाने एक जळजळीत कटाक्ष टाकताच ती कुत्री रडायला, विव्हळायला लागली. मला ते दृश्य पाहून भितीने काटाच आला. मला एखाद्या चक्रव्यूहात अडकल्या सारखे भासत होते. हा माणूस नक्की मला मदत करतोय की यामागे याचा काहीतरी हेतु आहे अशी मनात शंकेची पाल चुकचुकत होती.आता पर्यंत अडचणीत देवासारखा धावत आलेला तो माणूस मला जरा विचित्र वाटू लागला. मी कंदिलाच्या प्रकाशात त्या माणसाचे पाय बघण्याचा प्रयत्न करत होतो कारण खूप लेखकांनी असे लिहून ठेवले होते की भुतांचे पाय उलटे असतात, आणी जर का हा तोच भिकु वाटाड्या असेल तर नक्कीच याचे पाय सामान्य माणसासारखे नसतील पण मला काहीच दिसले नाही कारण कंदिलातील उजेड वारा वाहिल्यावर अधुनमधून क्षीण होत होता .पण जर हा तो वाटाड्या नसेल तर हा एवढ्या रात्री अंधारातून मला मदत का करायला येईल? माझं डोकं या विचाराने जड व्हायला लागलं होतं.

अचानक मला पाचोळ्यातून चालण्याचा आवाज येईनासा झाला. मी थांबलो मागे वळून पाहिले तर तो माणुस एका वाड्याकडे थांबला. त्याने कंदिल खाली त्याच्या पायाजवळ ठेवले. मी त्या प्रकाशात त्याचे पाय बघण्याचा प्रयत्न केला, त्याचे पाय आपल्यासारखे सरळ होते. मी जरा सावरलो, एखाद्या मोठ्या संकटातुन सुटल्यासारखं मनावरचं दडपण गेलं. आणि सुटकेचा निश्वास सोडला, माझी खात्री पटली की हा आपल्यासारखाच एक माणूस आहे, जो मला मदत करायला वेळेवर धावून आला. या गावातल्या लोकांनी का कोण जाणे कसल्या कसल्या भाकडकथा रचल्या होत्या भिकुच्या नावावर मी मनातल्या मनात हसलो.

"हे बघा पाव्हणं सरपंचांचा वाडा." त्याने परत त्याच शांतता दुभंगणा-या करकरीत आवाजात म्हटले.

कोण कुठला कोण जाणे पण वेळेवर मदत केली या माणसाने नाहीतर या भयाण रात्री खरच तो भिकु भेटला असता तर.....! त्याचा नुसता विचार करताच सरसरुन काटा येत होता. सदाशिवने वाड्याचं दार ठोठावलं व त्या माणसाचे खूप खूप आभार मानले, तो वाड्यात शिरणार तोच त्या माणसाने सदाशिवला थांबवले व म्हणाला. "सर्वच भुतांचे पाय उलटे नसतात..!

हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मी एकाच जागी खिळल्यासारखा एकटक त्या माणसाच्या लालसर डोळ्यांकडे बघत होताो. तेवढ्यात दरवाज्याचा कर्रर आवाज आला, थंडगार हात माझ्त्याया खांद्यावर पडले आणी तो दचकला त्याने घाबरत मागे वळून पाहीले तर गणुदा दारात त्याच्या मागे उभा होता.
"अहो सदाशिव राव यवढ्या काळोखात वाट चुकलात नाही न्हाव?" 
हा प्रश्न ऐकताच त्याची बोबडीच वळाली त्याला काहीच कळले नाही की त्याच्या बरोबर काय घडले ते, तो तसाच दारात कुडकुडत उभा होता. त्याची नजर त्या वाटाड्याला शोधत होती पण दारात गणुदा व तो सोडून कोणीच नव्हतं.

 


Rate this content
Log in