Niranjan Salaskar

Romance

2  

Niranjan Salaskar

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

6 mins
8.8K


आज त्याने कॉलेजमध्ये तीची खूप वाट पाहिली. दुस-या लेक्चरला येईन असं तिने प्रॉमिस केले होते. दुसरे लेक्चर काय, कॉलेज सुटण्याची वेळ आली होती. त्याचा सगळा दिवस खराब गेला होता. एकतर प्रॉमिस करूनसुद्धा ते तोडले, आणि दुसरं म्हणजे आज त्याने O.C च्या लेक्चरला शिक्षकांचा खूप ओरडा खाल्ला, कारण त्याचा प्रोजेक्ट तिच्याकडे होता आणी प्रोजेक्ट सबमिट करायच्या शेवटच्याच दिवशी ती आली नव्हती. त्याने खूप वेळा फोनही ट्राय केला पण तोही स्विच अॉफ लागत होता. त्याला माहीत होतं ती सगळ्या दुनियेचं टेंन्शन विसरुन चांगली झोपली असणार मोबाईल स्विच अॉफ करुन. शेवटी कॉलेज सुटल्यावर तिचा कॉल आला.

"हॅलो,  अरे सॉरी सिद्ध मला जागच आली नाही. मी अलार्म लावला होता पण झोपच एवढी होती, की जागच आली नाही. काल रात्री उशिरापर्यंत मी प्रोजेक्ट कम्प्लीट करत होते." तीने एका दमात कॉलेजला न येण्याच कारण सांगितलं.

'ठीक आहे संजू (संजना) मी मिस ला रिक्वेस्ट केलीय ती उद्या प्रोजेक्ट दे म्हणाली,  हा..!  पण उद्या असं नको करुस मग तर मेलोच आपण."

"नाही रे उद्या तर नक्कीच येईन,  चल ठेवते फोन आता उद्या भेटू बाय."

"हो बाय."

दुस-या दिवशी ती कॉलेजला आली दोघांनी प्रोजेक्ट सबमिट केले, लेक्चर्स झाले तसे ते त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर म्हणजेच कॅन्टीनमध्ये आले. दिग्या, नरु, नेहा, सिद्धु आणी संजु अशी पाच जणांची टोळी होती. या टोळीत दिग्याला माहित होतं की सिद्धु संजूवर लाईन मारतोय. त्याला ती आवडतेय आणि तिला मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्नही दिग्याला ठाऊक होते, म्हणून तो अधूनमधून त्या दोघांची फिरकी घ्यायचा. त्या दोघांना तो लव्ह बर्ड्स या नावाने चिडवायचा. नुसतं लव्ह बर्ड्स असं ऐकलं की सिद्धु गालातल्या गालात हसायचा आणी बोलायचा "तस काही नाहीय रे दिग्या." त्यादिवशी कॅन्टीनमध्ये असताना दिग्या मस्करीत म्हणाला. "अरे संजू, तू आली नव्हती म्हणून याला किती शिव्या ऐकाव्या लागल्या माहीत आहे का? एरवी साधा कोणाचा ओरडा सहन न करणारा आपला सिद्धु त्या घोरपडे मिस चा ओरडा मुकाट्याने गिळत होता."  तशी टेबलावर हास्याची लाट उसळली.

"ओ कम अॉन दिग्या, माझा नाईलाज होता म्हणून गप्प ऐकत होतो नाहीतर कोणाचं ऐकून घेतलं नसतं." सिद्धुने आपली बाजू मांडली.

"हो का..?  आम्हाला माहित आहे काय होता तुझा नाईलाज तो."  नेहा म्हणाली तसे परत सगळे हसू लागले.

आतापर्यंत संजूला काहीच कळत नव्हतं ते कशाबद्दल चर्चा करतायत ते तिचं लक्ष मोबाईलमध्येच होतं.

"ओके गाईज मी निघते, थॅँक्यू वन्स अगेन सिद्धु बाय उद्या भेटू". एवढ बोलून ती निघाली. सिद्धु तीच्या पाठमो-या आकृतीकडे एकटक बघत होता. आज तो खूप अस्वस्थ वाटत होता, त्याची बेचैनी दिग्याने पटकन ओळखली. एव्हाना बाकी पंटर लोकपण गेले होते. टेबलावर फक्त दिग्या आणी सिद्धु दोघेच होते. दिग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सिद्धुने एक उसासा सोडला.

"काय झालय सिद्धु तू आज असा एकटा एकटा का वाटतोय? हेच विचार करतोयस ना की संजूला कसं सांगायचं?"

"हु" त्याने हुंकार दिला, आणी म्हणाला "कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचे ते कुरळे केस, घारे डोळे, मध्यम बांध्याची, चुणचुणीत अशी संजना पाहताक्षणी प्रेमात पडण्यासारखी होती ती. नशीबाने आम्ही दोघ एकाचं डिव्हिजनमध्ये आलो, कसे एकमेकांशी बोलायला लागलो काही कळलच नाही..! हळुहळू मैत्री झाली. आणी मैत्री प्रेमात कधी बदलली ते कळलच नाही. ते म्हणतात  ना की जोड्या ह्या वरुनच ठरलेल्या असतात माझ्याबाबतीत ते खरच झालय असचं वाटतं. मला तिच्यासोबत माझं आयुष्य घालवायचय दिग्या."

तिच्याबद्दल बोलताना सिद्धुच्या चेहरा खुलून उठतो. तो बोलताना दिग्या त्याच्याच चेह-याकडे बघत होता. कॉलेजमध्ये आल्यापासून दिग्या त्याचा खूप जवळचा मित्र झाला होता याआधी त्याने कधीच त्याच्या चेहरा इतका खुललेला बघितला नव्हता जेवढा तो तीच्याबद्दल बोलताना खुलला होता. आणी ते सहाजिकच होतं कारण सिद्धु तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता हे त्याला ठाऊक होतं. तो तिच्यासाठी मिस. चा ओरडाच काय तर कोणत्याही परिस्थितीला जायला तयार होता.

"तू मग बोलून का टाकत नाहीस तिला तुझ्याबद्दल..?" दिग्या म्हणाला.

"माझी हिम्मत होत नाही तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगायला. नेहमी एक भिती वाटाते मनाला, की तिला वाईट वाटलं तर..? तिच्या मनात माझ्याबद्दल तश्या भावना नसल्या तर.? असं असल तर तिला एक फ्रेंड म्हणून मी गमावल तर..?  अशी खूप भिती वाटते मनात."

"मी बोलून बघू का संजूशी?"  दिग्याने त्याला धीर देत विचारले.

"नाही!  नको!  मीच तीला विचारेन योग्य वेळ आल्यावर."

"ठीक आहे, बघ उशीर नको करु, या बाबतीत जास्त उशीर केलेला चालणार नाही,  मला वाटतयं संजू तुला नाही म्हणणार नाही."

एवढं बोलून दिग्या निघून गेला. सिद्धु मात्र तसाच टेबलावर बसून तिला कसं सांगावं याबद्दल विचार करु लागला. संजुू एक चांगली मुलगी होती. मध्यम घरातली असल्याने ती व्यवहारी होती. दिसायला तर देखणी होतीच शिवाय तिचा स्वभाव सगळयात मिसळणारा होता. मित्रांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर, जसं एक खुलं पुस्तक कोणीही वाचू शकतं तसच तीचा स्वभाव दिलखुलास होता. तिला कोणीही एका भेटीत ओळखू शकतो अशी होती. आणी तिच्या याच स्वभावाला सिद्धु भुलला होता. संजू सोडली तर तो कॉलेजमधल्या कुठल्याच मुलीशी जास्त बोलायचा नाही किंबहुना त्याला दुस-या कोणाबरोबर बोलल्यावर तो मोकळेपणा नाही वाटायच जो तिच्यासोबत बोलल्यावर वाटायचं. असा एकही दिवस गेला नसेल की ते एकमेकांशी बोलले नसतील एकमेकांचे सिक्रेट्स त्या दोघांना माहीत होते. एवढे ते जवळचे मित्र झाले होते.  ही नुसती मैत्री होती का त्यापुढचं काही हे त्या दोघांनाही ठाऊक नव्हतं. कदाचित सिद्धुला ते स्पष्ट होत आणी त्याचीच कबुली तो करणार होता.

एक-दोन महिने अशेच गेले. सिद्धुने अजून संजुला त्याच्याबद्दल सांगितलं नव्हतं. त्याच्यामते ती वेळ अजून आली नव्हती. या दरम्यान दिग्यानेही खुप वेळा, मी मध्यस्ती करु का? असं विचारल पण सिद्धुने त्याला साफ नकार दिला. त्यादिवशी सिद्धु आणि दिग्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसले होते. तेवढ्यात संजू धावत कॅन्टीनमध्ये शिरली आणि धपकन त्या दोघां समोरच्या टेबलावर बसली आणी धापा टाकत होती.

"अगं हळू जरा, एवढ काय झालय पळत यायला?" सिद्धु तीला पाण्याची बॉटल देत म्हणाला.

तिने बॉटल घेतली, घटाघटा पाणी प्यायली जोर जोरात श्वास घेऊन ह्रुदयाचे ठोके जागेवर आणले.

"काय झालय संजू, काही सांगशील का?"  दिग्या चिंतेत दिसत होता.

"गाईज मी आज खूप खूष आहे, यु नो व्हाय..? ती बोलताना खूप खूष होती.

"तेच तर विचारतोय तुला काय झाल? सांगशील तर कळेल ना".  दिग्याने पुन्हा चिंतेने विचारले.

"आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदी दिवस आहे. आज मी खूप खूष आहे. आज ना त्या 'ए' डिव्हिजनमधल्या 'अविनाशने' मला प्रपोज केलं, आणी ते पण अख्ख्या कॉलेजच्या समोर माझा तर विश्वासच बसला नाही की ते खरं होतं की एक स्वप्न होतं!. हे बघ ते लाल गुलाब आणि ग्रीटिंग कार्ड.  तिने त्या दोघांना अविनाशने दिलेलं गुलाब आणी कार्ड दाखवले.

सिद्धु डोळे फाडून त्या गुलाब आणि ग्रीटिंगकडे बघत होता. त्याला विश्वासचं बसत नव्हता कि त्याचं नुकतचं उमलणारं प्रेममय फूल कधी पार सुकून एकदम करड्या रंगाच झाल होतं. तीच्यावर एवढं जिवापाड प्रेम केलं पण ती शेवटी माझी होऊ शकली नाही. जर आधी मी तिला विचारल असतं तर कदाचित ती माझी होऊ शकली असती, कदाचित नसती पण शेवटी आपण त्याच गोष्टींची स्वप्ने बघतो जी आपल्या आयुष्यात नसतात आणी माझ्याबद्दलपण तेच झालं. एका क्षणात त्याच्या ह्रुदयाचा चक्काचूर झाला होता.  ती त्या अविनाशबद्दल खूप काही बोलत होती त्याला तीचं असं दुस-याबद्दल बोलणं आवडल नाही तो तसाच ताडकन कॅन्टीनमधून निघून गेला. दिग्या आणी संजू रागाने पाय आपटत जाणा-या त्याच्या आकृतीकडे बघत राहिले. संजूला काहीच कल्पना नव्हती की हा असा का निघून गेला. तीने दिग्याला विचारले.

"हा असा काय  रागात गेला?"

"नाही आम्ही आधीच निघणार होतो, त्याला लेट होत होता तू आलीस म्हणून थांबलो, चल मीपण निघतो अॉल द बेस्ट फॉर युवर न्यू लाईफ. मला माहीत आहे अविनाश चांगला मुलगा आहे. असेच एकत्र रहा शेवटपर्यन्त, बाय." दिग्याने सिद्धुला पूर्ण कॉलेजभर शोधला. तो कुठेच सापडला नाही. तो कॉलेजच्या मागच्या एका शांत रस्त्यावर बसला होता. दिग्याला तो दिसला तो त्याच्याजवळ आला त्याच्या शेजारी बसला. काही मिनिटे अशीच शांततेत गेली. दिग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

"आपण फोडूया का बोल अविनाशला मी आता रेडी आहे चल.!"  दिग्या उभा राहणार तोच सिद्धुने त्याचा हात पकडला.

"त्याची काही गरज नाही माझ्याच नशीबात ती नव्हती मग त्याला मारुन काय फायदा?" नकळत सिद्धुच्या डोळ्यातून पाणी टपकलं.

"अरे मग तू काय असं रडत बसणार का? नाही मला तुझी अशी हालत झालेली बघवत नाहीय चल तू आताच आपण फोडूया त्या अव्याला."  दिग्या जरा रागातच बोलला. दिग्या एकटाच असा मित्र होता जो सिद्धुला जवळून ओळखायचा. त्याच्यासाठी काहीपण करायची त्याची तयारी होती. सिद्धुचं दु:ख त्याला कळत होतं. त्याच्या मनात चाललेली घालमेल त्याला ठाऊक होती. पण तो काहीच करु शकत नव्हता कारण सिद्धुने त्याला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. अखेर ज्या मुलीवर आपलं पहिलं आणी शेवटचं प्रेम करणा-या सिद्धुला संजु काही मिळू शकली नाही. आणि त्याने परत कधी कोणावर तेवढं प्रेम केल नाही. पुढे संजू आणी अविनाशचं लग्न झालं सिद्धुचंपण झाल पण ती फक्त एक औपचारिकताच राहिली कारण शेवटी पहिलं प्रेम हे पहिलच असतं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance