गणपतीचे घर
गणपतीचे घर
मी जर तुम्हाला म्हणालो की मी गणपतीचे घर पाहुन आलोय तर तुमचा विश्वास बसेल का..? तुम्ही म्हणाल देवाच घर कोणी जिवंतपणी कसं बघू शकतं?पण हो, हे शक्य झाल कारण आम्ही, आम्ही म्हणजे मी व माझे काही भाऊबंध गेल्या महिन्यात दि. १८-६-२०१७ मध्ये हमरापूर ता. पेण जि. रायगड या गावात गेलेलो खूप दिवसांपासून त्याच रुटीन लाईफला मी कंटाळलो होतो शुक्रवारी मला माझ्या मामेभावाचा फोन आला म्हणाला आपल्याला रविवारी पेणला जायचे आहे मी त्याला जास्त काही विचारलं नाही कारण तीथे जाण्याचं कारण मला ठाऊक होतं ते तुम्हालाही कळेलच पुढे. मी एका पायावर तयार झालो. कारण शनिवार रविवार माझा सुट्टीचा दिवस होता आणी खूप दिवसांपासून बाहेर फिरायला गेलो नव्हतो तर हा चान्स मला सोडायचा नव्हता. शनिवारी बॅग भरली आणी दुपारच्या सुमारास मी मुम्ब्र्याला उतरलो कारण मला तिथूनच रविवारी सकाळी ट्रेनने हमरापुरला चायचे होते. त्याच कारण असं की माझ्या भावाला म्हणजेच (Lucky) आणी (Virus) सुरजला गणपतीची कार्य शाळा सुरु करायची होती तर त्यासाठीच आम्ही गणपती (Booking) करायला तेथे गेलो होतो.
सकाळी ठरल्याप्रमाणे ६:४५ ची दिवा हमरापुर गाडी पकडायची होती पण दिव्याला पोचता पोचता ७:३० वाजले गाडी हुकली आणी त्याला कारणीभूत मीच होतो मी उशिरा उठलो होतो पण त्यानंतरची ९:३० ची गाडी होती त्यादरम्यान आम्ही चहा नाश्ता उरकला आणी ९:३० च्या गाडीत बसलो. गाडीत आमची मस्ती मजाक चालुच होती. ती कोण थांबवणार कारण सगळेच आम्ही लहानपणीचे मित्र होतो तर मग काय विचारुच नका. नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे ओसाड जमिन हिरवागार दिसत होती कुठे नवीन लालसर तांबूस पालव्या फुटलेल्या, तर कुठे हिरवी गवतं झुलत होती. ट्रेनच्या खिडकीतून मस्त निसर्ग दिसत होतं. जवळपास १:३०-२ पर्यंत आम्ही हमरापुरला पोहचलो असेन डोक्यावर ऊन लई तापलेलं मध्ये मध्ये काळे ढग नुसती हुल देऊन जात होते.आम्ही स्टेशनवरुन गावात चार एक किलोमीटर चालत गेलो होतो कारण ज्या व्यक्तीकडून आम्ही दरवर्षी गणपतींच्या मूर्ती घ्यायचो त्याचं घर स्टेशनपासून लांब होतं शिवाय खाजगी गाडीने तिथपर्यंत जाणे व्यर्थ होते कारण तिथल्या प्रत्येक घरात गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू होतं आणी तेच बघत बघत आम्ही गेलो. तिथल्या प्रत्येक घरात एक उमदा कलाकार होता याची प्रचिती त्यांच्या सुबक व रेखीव मूर्ती पाहिल्यावर होते. अगदी एक फुटापासुन ते ७-८ फुटापर्यंतच्या मूर्ती पण तितक्याच रेखीव होत्या जितक्या लहान मूर्ती होत्या. आम्ही जवळपास २-३ किलोमीटर तुडवला असेल तेथे दादर, दिवे, जोहे अशा छोट्या छोट्या गावात सगळ्यांकडे गणपतीच गणपती दिसत होते. कोणी सिंहासनाव
र तर कोणी मोरावर तर कोणी शंकराच्या खांद्यावर तर कोणी नंदीच्या चेह-यावर बसलेल्या अशा कित्येक प्रकारच्या मुर्त्या होत्या पण सगळ्यात जास्त चर्चा एकली ती बाहुबलीच्या गणपतीची हत्तीच्या तोंडावर उभे राहुन हत्तीने सोंडेत पकडलेल्या धनुष्यातुन तो बाण मारत होता एकदम हुबेहूब जसा त्या बाहुबली फिल्ममध्ये तो प्रभास त्या हत्तीवर ऊभा राहुन बाण मारत आहे तसाच.
खरच त्या कलाकाराला माझा मानाचा मुजरा कारण त्याने मुकुट, धनुष्यबाण,हत्तीची सोंड या सगळ्यांवर कोरीवकाम केले होते ती मुर्ती एवढी जिवंत वाटत होती की काही संदेहच नव्हता. आम्ही शेवटी एकदाचे त्या माणसाच्या घरात पोहोचलो घरुन कळले की तो बाजुच्याच गावात खाजगी कामासाठी गेलाय. तोपर्यंत आम्ही त्याच्या मुर्त्या बघण्याचं ठरवलं त्याच्या घराचं पुर्ण अंगण गणपतींच्या मूर्तीनी भरुन गेलेलं अंगणाला ताडपत्रीचे शेड केले होते एवढच नव्हे तर त्याचा माळा देखील मुर्त्यांनी भरलेला होता. आम्ही सा-या मुर्त्या डोळ्याखालुन घातल्या कारण आम्हाला ठराविक आणी आकर्षक मुर्त्या हव्या होत्या.
आमच्या पोटात भुकेने थैमान घातले होते पाण्याच्या बाटल्या पटापट संपत होत्या तो माणूस येईपर्यंत आम्ही जेवणासाठी छोटे हॉटेल बघत होतो शेवटी एका छोट्या धाब्यावर जेवणाची सोय झाली जेवण खूप चविष्ट व रुचकर होतं सगळ्यांनीच भुकेमुळे आडवा हात मारला. जेवण उरकल्यावर त्या माणसाकडे गेलो तेथे आवडले तेवढे जवळपास दिड-दोन फुटांचे ५० गणपती बुक केले.आनी स्टेशनवर यायला निघणार तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. मग काय..? निघालो भिजत परत चार किलोमीटर चालायच म्हणजे जिवावर आलेलं पण पावसाची साथ होती तर ते अंतर एकदम किरकोळ वाटलं एकदाच स्टेशन गाठलं संध्याकाळची ५:३० ची ट्रेन होती. आम्ही तर ४:३० लाच पोचलो मग स्टेशनवरच भारत× पाक सामना पाहिला स्टेशनवर गर्दी कमी होती पण तरी सगळे त्या मोबाईलजवळ घोळका करुन बसले होते त्यातल्या त्यात त्यांचापण टाइमपास झाला. ५:३० ला ट्रेन आली गर्दी फार होती पण पनवेल नंतर बसायला जागा मिळाली. आणी संध्याकाळी ८:३०-९ पर्यंत घरी परतलो. खरच हमरापुर बद्दल बोलायचं झाल तर तिथले कलाकार जे परंपरागत त्यांची कला जोपासण्याचं काम सातत्याने करत आहे. तिथली लोक तिथलं धाब्यावरचं जेवण सारच फार अप्रतिम होतं. हमरापुरला गणपतीचे घर का म्हणतात ते मला तेव्हा पटलं. तिथल्या बोलक्या मूर्ती, माणसं खरच मनाला भावली माझी एक दिवसाची एक छोटीशी पिकनिक खूप उत्तम ठरली. किमान मुंबईतला थकवा तरी त्या छोट्या पिकनिकने दूर झाला. सलाम त्या सच्च्या कलाकारांना आणी सलाम त्या गणपतीच्या गावाला.