SMITA GAYAKUDE

Drama

5.0  

SMITA GAYAKUDE

Drama

संसार दोघांचा तडजोडही दोघांची

संसार दोघांचा तडजोडही दोघांची

4 mins
599


निता एक गरीब घराण्यातील सुसंस्कृत मुलगी... आई, वडील, भाऊ आणि ती असं त्यांचं कुटुंब होता.. वडील एका साड्यांच्या दुकानात काम करायचे.. निताच्या आई-वडिलांचं खूप पटायचं नाही.. परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे आई घरकाम करून ब्लाऊज, ड्रेसही शिवायची... इतकं सगळ करत असूनही वडिलांनी कधीच आईला मान, सन्मान दिला नाही... नेहमी घालून पडून बोलायचे... तिला कधीच घरकामात मदत नाही करायचे.. काही चुकलंच तर हात ही उगारायला कमी करायचे नाहीत...


निता जसजशी मोठी होऊ लागली तसं तिला आईचे कष्ट दिसायला लागले.. इतकं करूनही आईला कोणीच किंमत देत नाही याचं तिला वाईट वाटायचं.. आईला बाबा असे का वागतात गं विचारल्यावर आई म्हणायची.. “पुरुषाची जातं गं ती.. काही केलं तरी चालतं.. स्त्रीला मात्र प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागते.. आलेल्या परिस्थितीला मन मारून सामोरे जावं लागतं..” हे ऐकून निताला वाईट वाटायचं.. ती विचारायची... “आई मग लग्न म्हणजे स्त्रीसाठी तडजोड करणेच का...?” आई म्हणायची.. “हो गं बाई... तुझंही आता लग्नाचं वय झालंय... तू ही हे लक्षात ठेव.. “


निताला स्थळे येऊ लागली... बघता बघता एक स्थळ सगळ्यांनाच आवडलं आणि लग्न ठरलं.. माझ्या आईसारखं आयुष्य मलाही जगावं लागणार आता या विचाराने निता घाबरून गेली.. लग्न झालं... निता, नरेश म्हणजे निताचा नवरा आणि सासरे असं कुटुंब होतं... आर्थिक परिस्थिती ठीक होती... निताही घराजवळच नोकरीला जात होती.. घर, नोकरी नीट सांभाळत होती.. वर्षही होत नाही इतक्यात निताला दिवस गेले आणि एका सुंदर मुलीला तिने जन्म दिला.. आता मात्र निताची धावपळ व्हायला लागली.. घर, बाळ आणि नोकरी हे सगळं करता करता तिची दमछाक होऊ लागली आणि त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर व्हायला लागला... पण आईचं लहानपणापासून बघितल्याने आणि हे सर्व स्त्रीला करावंच लागत या समजुतीने काही न बोलता करत राहायची..


एक दिवस निता कामावरून अंगात ताप घेऊन आली... स्वतःजवळचीच एक गोळी घेऊन कोणाला काही न बोलता सगळ्यांना जेवायला देऊन झोपी गेली.. तापाने आणि अशक्तपणाने तिला सकाळी लवकर जाग आली नाही.. उठून बघते तर काय नरेश उठला होता आणि बाळाला बाटलीने दूध पाजत होता... सासऱ्यांना चहा आणि उपमा बनवून दिला होता त्याने.. हे सगळं बघून आपण स्वप्नात तर नाही आहोत ना असं वाटायला लागलं.. ती विचार करू लागली.. असा कसा आहे हा नवरा... माझे बाबा तर आई ठणठणीत किंवा आजारी असू देत कधी मदत नाही करायचे आईला.. आजारी असली तरी ती 24 तास राबायची... नरेश मात्र असा... तिचे डोळे पाण्याने भरून आले...


इतक्यात नरेश म्हणाला.. “निता मी आज सुट्टी घेतली आहे.. तू पटकन फ्रेश होऊन नाश्ता कर आणि गोळी घे.. तोपर्यंत मी बाळाला खेळवतो...”

निताने नाश्ता करून घर आवरायला घेतलं तसं नरेश आला आणि म्हणाला.. “तू आराम कर... मी बघेन आज सगळं... काल रात्रभर तापाने कण्हत होती तू...” निता म्हणाली.. “नाही नाही हे तर माझं काम आहे... आजारी असले म्हणून काय झालं...”

नरेश म्हणाला.. “कोण बोललं की घरकाम फक्त स्त्रीची जबाबदारी आहे.. मी बघतो ना तुला.. सकाळी लवकर उठते.. रात्री बाळामुळे नीट झोप होत नाही.. सकाळी बाबांचं हवं नको ते बघते.. सगळ्या धावपळीत नीट खातही नाही.. आरशात बघायलाही तुला वेळ नसतो... आता आजारी पडल्यावर कळतं गं तुझी किंमत.. किती तडजोड करावी लागते तुला.. आणि मी मात्र ऑफिस आणि घर याशिवाय काहीच करत नाही.. पण आता मला कळलंय की तुलाही तुझा वेळ द्यायचा.. तुला शक्य तितकी मदत करायची.. संसार दोघांचा आहे ना.. मग दोघेही थोडी थोडी तडजोड करूया ना.. मला हवं तसं मी राहणार आणि तू सर्वस्व देणार हे म्हणजे तडजोड नाही ना... नेहमी मी जे बोलणार, मी जे सांगणार ते तू ऐकणार म्हणजे तडजोड नाही ना... तडजोड करणे म्हणजे कधी तुझं खरं.. कधी माझं खरं.. तडजोड म्हणजे एकमेकांना समझून घेणं नंतर उमजून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं.. तडजोड करणं म्हणजे काही गोष्टी अहंकार न ठेवता तुझ्या प्रेमासाठी सोडून देतोय/देतीय याची जाणीव करून देणं.. कोणा एकाला दुःखी न करता दोघांना सुखी करण्यासाठी करायची असते ती तडजोड..”


हे ऐकून निताचा ताप कुठल्याकुठे पळून गेला.. नरेशसारखा नवरा मिळाल्याचा अभिमान वाटला तिला... तिने लगेच आईला कॉल केला आणि म्हणाली.. “आई असं काही नाहीय गं की फक्त स्त्रीलाच तडजोड करावी लागते... नरेशसारखे पुरुषही आहेत जे तडजोडीची व्याख्याच बदलून टाकतात आणि स्त्रीला प्रेम आणि मान सन्मान देतात..“

हे ऐकून निताच्या आईने देवाचे मनोमन आभार मानले...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama