पाय नेहमी जमिनीवरच हवेत
पाय नेहमी जमिनीवरच हवेत


सुनंदा काकू एका बँकेत सिनियर मॅनेजर म्हणून काम करत होत्या.. त्यांच्या घरी मंगल ही मागच्या चार वर्षांपासून कामाला होती.. सुनंदा काकू स्वभावाने खूपच प्रेमळ आणि सगळ्यांना जीव लावणाऱ्या होत्या.. मंगलला माहीत होतं की सुनंदा काकू खूप मोठ्या पदावर बँकेत कामाला आहेत म्हणून पहिले काही दिवस ती त्यांना मॅडम म्हणूनच हाक मारायची..
"मंगल, मॅडम नको म्हणू गं मला... मॅडमपेक्षा मला ताई म्हण, जास्त आवडेल मला.."
तेव्हापासून मंगल सुनंदा काकूंना ताई म्हणायला लागली.. ताई म्हणता म्हणता काकू मंगलला कधी मोठ्या बहिणीसारख्या वाटायला लागल्या कळलंच नाही... काकूही तिची प्रेमाने सगळी विचारपूस करायच्या.. काही प्रॉब्लेम असेल, कुठे काही अडलं तर मंगल काकूंचा सल्लाही घ्यायची आणि मंगल खूपच विश्वासू असल्याने काकूंना टेन्शन नव्हतं...
मागच्या वर्षी मंगलला दिवस गेले...काकूंना मंगलची घरची परिस्थिती माहीत असल्यामुळे तिला झाडू-फरशी वरून काढून वरवरच्या कामासाठी मदत म्हणून यायला सांगितलं... जेणेकरून तिला पगारही देता येईल आणि मंगललाही काम न करता पैसे घेताना संकोचल्यासारखे वाटणार नाही..
काही दिवसांनी मंगलला मुलगी झाली... मंगलने लगेच काकूंना कॉल करून ही बातमी दिली... मंगल काही महिने माहेरी राहणार होती.. काकू अधून मधून तिला कॉल करून चौकशी करायच्या... जेव्हा मंगल माहेरहून परत आली तेव्हा काकू तिच्या मुलीसाठी ड्रेस आणि खेळण्या घेऊन गेल्या.. काकूंना आपल्या दारात बघून मंगलला खूप आश्चर्य वाटलं...
(आश्चर्याने) "ताई तुम्ही? काही काम होतं का? कॉल वर सांगायचं ना मला.. मीच आले असते..."
"मंगल वेडी आहेस का... काही काम नाहीय माझं.. तुला आणि तूझ्या मुलीला खास भेटायला आली आहे मी.. "
"खरं ताई? " मंगलचे डोळे पाण्याने भरून आले..
"ताई मागच्या सात-आठ वर्षांपासून खूप लोकांच्या घरची कामे करते मी.. खूप मोठ मोठ्या लोकांच्या घरची कामेही केलीत, पण तुमच्यासारखं फक्त मला भेटण्यासाठी म्हणून एवढ्या छोट्याशा घरात कोणी आलं नाही हो.. आणि तुम्ही मात्र या झोपडपट्टीत वाट काढत माझ्या घरी आलात.."
"अगं मंगल बस इथे... आधी डोळे पूस बघू.. माझे बाबा लहानपणीच वारले तेव्हा माझ्या आईनेही तुझ्यासारखीच कामे करून आम्हाला शिकवलं म्हणून आज मी इथे आहे.. हे बघ आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवर असायला हवेत.. आपण कोण होतो, कुठून सुरुवात केली हे नेहमी लक्षात असायला हवे.. माणसाने जरूर आकाशात झेप घ्यावी.. खुशाल अवकाशात विहार करावा.. अधिकाधिक उंचीवरून जग पाहावं आणि विशाल दृष्टिकोनासह परत जमिनीवरही यावं.. हे जमिनीवर येणं आणि पाय जमिनीवर असणं फार महत्वाचं आहे बघ.. कारण आपण गाठलेली उंची पाहून टाळ्या वाजवणारे, कौतुक करणारे आणि आनंदाने गळाभेट घेणारे नेहमीच जमिनीवर असतात.. माझ्या आईसारखीच तुझी ही घरासाठी, संसारासाठीची धडपड बघते गं मी.. तुही तूझ्या मुलीला खूप शिकव, खूप मोठं कर... पण त्याचबरोबर पाय जमिनीवर ठेवायला शिकवणं विसरू नको.."
मंगल खूप लक्ष देऊन सगळं ऐकत होती... काकूंनी तिला खूप मोलाचा सल्ला दिला होता... काकूंनी आणलेल्या ड्रेस आणि खेळण्या दिल्या आणि मंगलचा निरोप घेतला.. मंगल मात्र खूप वेळ काकूंच्या बोलण्यात गढून गेली... आज तिच्या मनात काकूंबद्दलचा आदर अजून वाढला होता...