प्रेमा तुझा रंग कसा?
प्रेमा तुझा रंग कसा?


सुजित आणि स्नेहा एकाच ऑफिसमध्ये काम करत होते.. दोघांचा प्रोजेक्ट एकच..सुजित टीमचा लीड होता आणि स्नेहा त्याच्या टीम मध्ये काम करत होती..हळूहळू ओळख वाढली.. मिटींग्स निम्मित म्हणा, लंच-टी ब्रेकच्या निम्मिताने दोघांचा एकमेकांशी संवाद व्हायचा..
सुजित एकदम शांत स्वभावाचा तर त्या उलट स्नेहा होती नॉनस्टॉप बडबड करणारी पण मनाने खूप निर्मळ, दिसायला सावळी असली तरी नाकाडोळ्याने सुंदर... बघितलं कि कोणाच्याही नजरेत भरावी अशी.. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि ह्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले कळलंच नाही.. दोघे एकमेकांच्या ओढीने ऑफिसला यायचे.. स्नेहाला सुजितचा ड्रेसिंग सेन्स खूप आवडायचा.. कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये तो आला कि स्नेहाच्या हृदयाचा ठोकाच चुकायचा.. स्नेहाच्या काळेभोर बोलके डोळ्यांच्या सुजित तर प्रेमातच होता.. दोघे विविध गोष्टीवर गप्पा मारायचे पण दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या..
काही दिवस असेच गेले.. दोघे नजरेतून, बोलण्यातूनच प्रेम दाखवत होते पण बोलायची हिम्मत कोणी करत नव्हतं.. एके दिवशी दोघेही जेवायला बाहेर गेलेले असतात..
"सुजित, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. माहीत नाही तुझ्याबद्दल जास्त काही माहीत नसतानाही तुझ्याविषयी एक वेगळीच ओढ जाणवते.. तू सोबत असलास कि आयुष्य खूप सुंदर वाटतं.. "
"स्नेहा, मलाही तेच वाटतं.. पण तुला माहीत असेल कि माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलेही आहेत.. "
"मग आपल्या नात्याचं भविष्य काय? तू काही ठरवलं आहेस का? "
सुजित काहीच बोलत नाही..
"तुला तूझ्या बायको मुलांना सोडावं लागेल जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर.. "
सुजीतला काहीच कळत नाही.. पुढचे काही दिवस दोघांसाठी खूप तणावाचे असतात.. सुजीतचं बदलेलं वागणं सुजीतची बायको नयना च्या लक्षात यायला लागतं.. त्याचं शांत शांत राहणं, सारखं मोबाईल वर असणं, ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवणं.. पण नयना सुजीतला काही बोलत नाही.. एके दिवशी सुजित अंघोळीला गेलेला असताना सुजितचा मोबाईल वर कॉल येतो.. नयना कॉलवर बोलून मोबाईल ठेवतच असते तेव्हा तिची नजर मेसेज वर जाते.. तो मेसेज स्नेहाचा असतो.. ती सगळा चॅट उघडून वाचायला लागते तर तिची पायाखालची जमीन सरकते.. त्या चॅट वरचं बोलणं सुजित आणि स्नेहा मध्ये काय संबंध आहेत हे कळायला पुरेसं असतं..
ती ह्या बद्दल सुजितला काहीच बोलत नाही.. दोन दिवसांनी ती मुलांना घेऊन माहेरी जाते.. जाताना ती सुजितसाठी एक पत्र ठेवून गेलेली असते..
"प्रिय सुजित,
मी काही दिवसांसाठी मुलांना घेऊन माहेरी जात आहे.. मला थोडा ब्रेक हवा आहे.. तुलाही तुझी स्पेस मिळेल त्यामुळे.. मला इतकंच सांगायचं आहे कि तूझ्या मनात काही चाललं असेल तर स्पष्टपणे बोल माझ्याशी.. मला वाटतं तुझं एका मुलीवर प्रेम आहे.. खरंच असं असेल तर तू मोकळा आहेस तुझा निर्णय घ्यायला.. मी कधीच तूझ्या आडकाठी येणार नाही..मी समर्थ आहे स्वतःला आणि आपल्या मुलांना सांभाळायला.. फक्त थोडा विचार करून निर्णय घे.. वाट बघते तूझ्या निर्णयाची..
तुझीच, नयना.. "
हे पत्र वाचून सुजितचं डोकं सुन्न होतं..नयनाने न काही मागता सुजितच्या प्रेमाचा मार्ग मोकळा केलेला असतो..तरीही तो खुश होतं नाही ह्याचं त्याला आश्चर्य वाटतं..
सुजित ऑफिसला येतो...दररोजच्यासारखं स्नेहा टी ब्रेक साठी वाट बघत असते..दररोज खुश असणाऱ्या त्याची तोंडावरचा तेज उडालेला असतो..स्नेहाला जाणीव होते काहीतरी झालंय..विचारलं तरीही सुजित काहीच बोलत नाही..खूप गप्प गप्प असतो..कशातच लक्ष नसतं त्याचं..पुढचे चार पाच दिवस असेच जातात..आता मात्र स्नेहाची सहनशक्ती संपते..ती त्याला बाहेर घेऊन जाते...आणि काय झालंय हे मला कळायलाचं हवं म्हणून जबरदस्ती करते..
"सुजित काय झालंय..चार पाच दिवसापासून बघतीय तोंड पाडून असतोस..ना कामात लक्ष आहे, ना जेवणाकडे, ना माझ्याकडे..इतकं गंभीर मी तुला ह्या आधी कधी नाही पाहिलं..बोल ना काय झालंय.."
"स्नेहा, नयनाला सगळं कळलंय आपल्याबद्दल..ती मुलांना घेऊन माहेरी गेलीय.."
"अरे चांगलंच आहे ना आपल्यासाठी..घटस्फोट देऊन टाक तिला..आपण लग्न करू.."
सुजित स्नेहाला नयनाचं पत्र दाखवतो..
"स्नेहा पण मला आनंद नाही होतं आहे ग नयनाने स्वतःहून आपला मार्ग मोकळा केला तरीही..मला माझंच कळत नाहीय कि मी इतका का मोडून पडलोय..मुलांची खूप आठवण येते ग...नयना नको म्हणतानाही चोरून मुले विडिओ कॉल करतात..कधी येणार बाबा विचारतात..तुम्ही लवकर येणार आहे असं आईने आम्हाला सांगितलंय असं सांगतात..तू ये ना बाबा... आम्हाला खूप आठवण येते हे त्यांचं बोलणं ऐकून न खूप रडायला येतं ग"
बोलता बोलता सुजित रडायला लागतो..स्नेहा त्याला कसबसं शांत करते आणि ते आपापल्या घरी निघून जातात..
दुसऱ्या दिवशी सुजित ऑफिसला जातो तर स्नेहा आलेली नसते.. दुपार होते तरी स्नेहाचा काहीच पत्ता नसतो.. तिचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो.. दुपारी काही ठेवायचं म्हणून सुजित जेव्हा ड्रॉवर उघडतो तर तिथे त्याला एक एनवलप दिसतं.. तो उघडून बघतो तर त्यात पत्र असतं..
"प्रिय सुजित,
मला माहित आहे तू माझी वाट बघत असणार.. पण नको बघूस आता वाट.. कारण मी आता ऑफिसाला येणार नाही.. आज सकाळीच मी resign लेटर मॅनेजर ला देऊन गेली आहे..
नयना गेल्यानंतर तुझी अवस्था बघितली आणि मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळाला.. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मिळवणं म्हणजेच प्रेम नव्हे ना.. हा तर स्वार्थी प्रेम आहे फक्त स्वतःचाच विचार करणारा.. असं करूनही मी तुला मिळवलं असतं तरीही तुला मिळवूनही गमावून बसले असते कारण तुझा जीव तुझ्या मुलांमध्ये अडकलंय.. त्यांची तुझ्या आयुष्यातली कमी तू सहन नाही करू शकणार.. नाही म्हणलं तरीही तू नयनावर प्रेम करतोस.. हे तुला तिच्या लांब जाण्याने कळलंय.. त्यामुळे माझं तुझ्या आयुष्यातून लांब जाण्यातच खरा शहाणपणा आहे..
माझ्यासारख्या जी स्वतःच्या प्रेमासाठी बायकोला सोड म्हणणाऱ्या मुलीवर प्रेम करण्यापेक्षा अशा मुलीवर प्रेम कर जी तुझ्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलंय.. त्यातच तुझं भलं असेल.. आज मनापासून सांगते आहे कि माझ्या मनात कोणताच राग, द्वेष, गोंधळ नाहीय.. फक्त आहे तर तुझ्यावरच्या प्रेमा बद्दल निःस्वार्थ भाव, त्याग आणि समर्पण..
त्यामुळे आज मी माझा निर्णय घेतलंय... ह्यापुढे आपली वाट वेगळी असेल.. आपण परत भेटू कि नाही माहित नाही.. पण नयना आणि मुलांना घेऊन ये परत तुझ्या घरट्यात..
तू कायमच माझ्या मनात असशील..
तुझीच,
स्नेहा.. "
सुजित पत्राकडे बघतच राहिला.. आता त्याला त्याचा पुढचा मार्ग स्वच्छ दिसत होता..
खरच खरं प्रेम काय असतं..
आपलं खरं प्रेम असूनही त्याच्या आनंदासाठी त्या प्रेमाचा त्याग करणं म्हणजे खरं प्रेम जे इथे नयनाने केलं होतं..
आपलं प्रेम असूनही जबाबदारीचं भान ठेवून चुकीचं पाऊल टाकायला डगमगणं म्हणजे खरं प्रेम जे सुजितने केलं होतं..
आणि भावनेच्या भरात वाट चुकत असलेल्या त्याला सरळ मार्गांवर आणणं आणि त्याची जबाबदारी दाखवून देणं म्हणजे खरं प्रेम जे स्नेहाने केलं होतं..