स्वातंत्र्याचा खरा अर्थ
स्वातंत्र्याचा खरा अर्थ


घरात लग्नाचा विषय निघताच माझ्यासारख्या प्रत्येक मुलीच्या मनात अजूनही बापरे.. लग्न? म्हणजे बंधन.. माझ्या स्वातंत्र्यावर गदा असे विचार नक्कीच येतात.. येतात ना?
पण खरंच प्रत्येक मुलीसाठी लग्न म्हणजे एक बंधन आहे का??
प्रसंग पहिला :
आज मोठ्या जाऊबाईंकडे श्रावणाची पूजा होती.. काकू आणि समीरा दोघीही आवरत होत्या.. समीरा आणि अजयचं नुकतंच लग्न झालं असल्याने तेच पूजेला बसतील असं ठरलं होतं.. समीरा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली.. काकूही साडी घालून तयार होत्या..
"आई, झालं माझं आवरून.."
"अगं साडी नेसायची ना.. पूजेला जातोय आपण.. आईला विचारली का पंजाबी ड्रेस घातलं तर चालेल का ते.."
अजयने बेडरूममधून बाहेर येणाऱ्या समीरला अडवत विचारलं..
"त्यांना काय विचारायचं त्यात? मला नाही जमणार साडी घालून पूजेला बसायला.. मी ड्रेसमध्येच येणार.."
"अगं.. समजून घे.. आपण पूजेला जातोय.. फिरायला नाही.."
दोघांचं बोलणं काकूंच्या कानावर पडलं..
"राहू दे रे अजय.. साडी घातली असती तर बरं झालं असतं.. पूजेला साडी घालूनच बसतात अगं.. माझी पैठणी काढून ठेवली आहे बघ.. पटकन नेसते का..? "
"आता मी काय घालायचं हे पण तुम्ही ठरवणार.. म्हणून लग्न म्हणजे एक बंधन वाटतं मला.. "
जास्त वादविवाद न करता सगळे पूजेला गेले.. तिथे काकूंनी समीराला छान सांभाळून घेतलं..
"अगं तिची तब्येत थोडी ठीक वाटत नव्हती म्हणून मीच म्हणाले ड्रेस घाल.. पूजेला ओढणी घेईल डोक्यावर ती.. "
पूजा छान पार पडली आणि सगळे खुश होऊन घरी परतले..
प्रसंग दुसरा :
"अजय, या शनिवारी मी माहेरी जाते आहे.. मला आठवण येत आहे.. कालच ऑफिसमध्ये दुपारी तिकीट काढलं.. "
"अगं आईची तब्येत बरी नाही.. पुढच्या आठवड्यात गेली असती तर बरं झालं असतं.. आई-बाबांशी बोलली का तू या बद्दल..? "
"आठवण आली.. तिकीट काढलं मी.. माहेरी जाण्यासाठी पण आता सगळ्यांची परमिशन काढावी लागेल का मला..?"
"परमिशन नाही गं बाई.. तू माहेरी जाते म्हटल्यावर कोणी तुला अडवलं असतं का गं.. विचारून केल्याने आणि न विचारल्याने गोष्टीत खूप फरक पडतो.."
"आता तुझं पुराण नको चालू करू प्लीज.. मला जे वाटतं ते करायला मी स्वतंत्र आहे.."
प्रसंग तिसरा :
"समीरा, उद्या गुढीपाडवा आहे गं.. तुला ऑफिसला सुट्टी नाहीय म्हणते ना.. तर एक तासभर लवकर उठशील का.. आपण दोघे मिळून प्रसादाचं आवरून गुढी उभारूया.. मग तू जा ऑफिसला.."
"आई, मला काही ते गुढी उभारण्यात आणि प्रसाद अँड ऑलमध्ये इंटरेस्ट नाहीय... तुम्ही नंतर सावकाश उभारा ना गुढी मी गेल्यावर.. "
"मी उभारेन गं नंतर.. माझ्यानंतर तुलाही जमायला हवं ना.. प्रथा न सोडता आपल्याला नोकरी सांभाळून जमेल तरी करायची असं वाटतं मला.. बघ तुला कसं पटतं ते.."
समीरा काही उठली नाही.. काकूंनीच नंतर आवरून गुढी उभारली.. दुपारी जेवण झाल्यावर काका आणि काकू गप्पा मारत बसल्या होत्या..
काका : "तुझ्यात आणि समीरामध्ये किती फरक आहे बघ.. तुही नोकरी केली, तुलाही कामाचा प्रचंड ताण असायचा.. दिवसभर नोकरी, मुलांचे शिक्षण, माझ्या आई-वडिलांचा आदर, माझ्या आवडी निवडी, नातेवाईक, सणवार सगळं केलं तुही.. सणावाराला तर आईसोबत लवकर उठून नैवेद्याचं ताट ठेवूनच ऑफिस गाठायची.. हे सगळं करताना तुझी दमछाक व्हायची पण किती आनंदी असायची तू...पण आजची पिढी स्वातंत्र्याच्या नावावर या सगळ्या गोष्टींपासून पळ काढते आहे असं नाही वाटत का तुला?"
काकू : "जनरेशन गॅप म्हणायचं अजून काय? काही सांगायला गेलं या मुलांना तर बंधने वाटायला लागतात.. संसार फुलवण्यासाठी आपण दोघांनीही किती कष्ट केले.. मान्य आहे मला काहीवेळेस मनाला मुरड घालावी लागायची पण घरातल्या थोरामोठ्यांना आदर देत, त्यांचा सल्ला घेत खूप साऱ्या गोष्टी शिकण्यात एक वेगळीच मजा होती.. मला प्रवासाची आवड म्हणून मुद्दाम वर्षभरातून एकदा तरी आपल्याला सासूबाई ट्रीपला पाठवायच्या.. मला वाचायला आवडायचं म्हणून सुट्टीच्या दिवशी कामे आवरायला मदत करून मोकळा वेळ द्यायच्या.. मीही त्यांच्या सेवेत कधी कमी पडले नाही हो.. किरकोळ वादविवाद झाले तरीही आम्ही दोघी एकमेकांना सांभाळत मजेत असायचो.. "
काका : "हो ना.. आज माझी बायको थकली आहे, चला बाहेर जेवायला जाऊया म्हणालो तरी किती खुश व्हायची तू.. स्वतःचे घर, मुलांचं शिक्षण, नातेवाईकांची मर्जी, सणवार आणि प्रथा, ऑफिसचं काम आणि शेजार पाजारी इतक्याच काय त्या अपेक्षा होत्या तुमच्या पिढीतल्या स्त्रियांच्या.."
काकू : "बघा ना आजच्या पिढीला स्वातंत्र्य हवे आहे.. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागणे असा नाही ना अर्थ होत? स्वातंत्र्य स्वतःच्या विचारात हवे, मतात हवे.. आमच्या पिढीतील काही स्त्रियाही आर्थिकदृष्टया स्वतंत्र होत्याच की पण आम्ही त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा कधी घेतला नाही.. मान्य आहे आम्ही स्वतंत्र नव्हतो पण सुखी होतो.. आजची पिढी उच्च शिक्षण, गलेलठ्ठ पगार, महागडे ब्रँडेड कपडे, पार्लरच्या चकरा, नेहमीचं बाहेरचं जेवण, परदेशवारी, महागडे कार हे सर्व स्वतः करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी स्वतःच घेतले आहे पण या पलीकडे जाऊन सणवार, रीतीभाती, नातेवाईक, शेजाऱ-पाजारी, मोठ्यांचा आदर, त्यांना विचारून आणि त्यांचा सल्ला घेऊन गोष्टीं करणे सोडून दिले आहे.. त्या खरोखरच खूप स्वतंत्र झाल्या आहेत.. "
काका : "पण कुठेतरी हे स्वातंत्र्य मनाला रुजत नाही बघ.. तू तूझ्या जागेवर बरोबर, समीरा तिच्या.. पण कसं असतं ना स्त्री ही घरचा कणा असते.. लक्ष्मी असते.. तू स्वातंत्र्य ही संकल्पना समजुतीने घेत संस्कार, शिक्षण, आवड निवड याचा उत्तम मेळ जमवत स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं.. समीरापण उच्चशिक्षित आहे.. चांगल्या नोकरीवर आहे.. हुशार आहे.. छान गाते ती.. डान्सची आवड आहे.. पण मोठ्यांना सांगून, वेळप्रसंगी सल्ला घेऊन करायची जाण तिच्यात नाहीय.. साधं माहेरी जाताना घरातल्यांना सांगावंसं तिला वाटत नाही.. आपण थोडी माहेरी जाण्यापासून तिला अडवणार आहोत.. तरीही तिने असं का वागावं हे न समजलेलं कोडं आहे.. मुळात प्रत्येक गोष्ट काय सांगून करायची, मला जे वाटतं ते मी करणार अशी मानसिकता आहे.. स्वातंत्र्य म्हणजे मी कोणाला विचारून किंवा कोणी म्हणतंय म्हणून मी काही करणार नाही.. मला जे वाटतं तेच मी करणार असा या पिढीचा समज आहे.. स्वातंत्र्याची खरी व्याख्या या पिढीला अजून कळलीच नाहीय.. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःवर काही बंधने घालत थोरामोठ्यांचा आदर करत स्वतःच्या विचारांचा, मतांचा स्वातंत्र्य जपणं आहे हे जेव्हा आजच्या पिढीला कळेल तेव्हा खरी ही पिढी सुखी होईल.. "
दारावरची बेल वाजली.. काका-काकूंनी गप्पांना आवरतं घेतलं..