रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा


सान्वी दिसायला एकदम सुंदर, प्रेमळ, सुसंस्कृत, धाडसी आणि नेहमी हसत-खेळत राहणारी आई वडिलांची एकुलती एक मुलगी.. एमबीएचं शिक्षण पूर्ण करून एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती.. तिच्याकडे सुंदरतेची देणगी तर होतीच पण तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळेच सगळ्यांना ती हवीहवीशी वाटायची.. अचानक तिच्या डाव्या पायावर गुडघ्याच्या खाली एक पांढरा डाग दिसला.. सहसा पायाकडे लवकर लक्ष जात नसल्याने तिला तो बऱ्यापैकी मोठा होईपर्यंत कळलंच नाही.. नंतर तिला हाताच्या कोपऱ्यावर, तळहातावर छोटे छोटे पांढरे डाग दिसायला लागले.. तिला वाटलं कशाची तरी ऍलर्जी असेल किंवा व्हिटॅमिन कमी पडत असेल म्हणून झालं असेल... पण नंतर ते डाग इतक्या वेगाने वाढायला लागले की चेहऱ्यावर, ओठाभोवती, डोळ्याखाली सगळीकडे डागच डाग दिसायला लागले.. आता मात्र सान्वी आणि घरच्यांना टेन्शन आलं आणि त्यांनी डॉक्टरकडे जायचं ठरवलं.. प्राथमिक तपासानंतर डॉक्टरांनी ते कोड असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र सान्वी आणि घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली.. लग्नाला आलेल्या मुलीला कोड झालंय हेच तिच्या घरातले सहन करू शकत नव्हते..
डॉक्टरांनी पांढरे डाग सगळीकडे खूप पसरल्यामुळे गोळ्या आणि सूर्यकिरणांच्या उपचारांनी काही फायदा होणार नाही उलट दुष्परिणामच जास्त होतील तर आपण पूर्ण शरीराचाच रंग पांढऱ्या डागांसारखा केला तर शरीर विद्रुप न दिसता एकसमान रंगाचा दिसेल असा सल्ला दिला.. घरच्यांनी खूप सारे डॉक्टर्स, वैद्य, भोंदू बाबा सगळीकडे जाऊन काहीच फरक न पडल्याने हताश झाले.. पर्याय नसल्याने त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण शरीरच पांढऱ्या डागाच्या रंगाचा करायचा निर्णय घेतला..
या सगळ्या प्रकारामुळे नेहमी हसत खेळत असणारी सान्वी मात्र खूप मानिसक तणावाखाली आली होती.. घरातल्यांचा मानसिक आधार तर होताच तिला, तरीही सगळ्यापेक्षा वेगळी दिसत असल्याने अवहेलनेपासून ते अनेक प्रकारच्या मानसिक कुचंबणेपर्यंत सामोरे जावे लागत असे.. ऑफिसमध्ये, जाता येता बसमध्ये, मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाताना लोकांच्या नजरा ती काहीतरी वेगळी आहे हेच सांगत असे.. त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होऊ लागला.. त्यामुळे तिला जास्त वेळ एकटी राहणे, लोकांमध्ये न मिसळणे आवडू लागले.. तिला लग्नासाठी बघायला येणारी मुलेही तिच्या अशा रंगहीन शरीरामुळे नकार देऊ लागले.. आणि कोणी होकार दिलाच तर ती मुले एकतर वयाने खूप मोठी, घटस्फोटित किंवा बायको नसलेली असायचे.. या सगळ्याचा सान्वीला खूप मानसिक त्रास होऊ लागला.. कधी कधी तर तिच्या डोक्यात जीवन संपवून टाकावं इथपर्यंत विचार यायचे.. याचदरम्यान तिला कंपनीकडून अमेरिकेला जायची संधी मिळाली.. जेव्हा ती शिकागोच्या विमानतळावर उतरली तेव्हा तिचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला.. कारण तिथे कोणी तिच्याकडे मागे वळून पाहत नव्हतं.. तिथली बहुसंख्य माणसं तिच्याच रंगाची होती.. ती त्या गर्दीत अलगद मिसळून गेली.. तेव्हा तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.. जगाच्या एका कोपऱ्यात हा माझ्यासारखा रंग नैसर्गिक समजला जातो... मग माझ्याच देशात कोडाचा इतका उपहास का? आपण शारीरिकदृष्ट्या इतके संपन्न आणि सक्षम आहोत तर रंग बदलण्याने निराश का वाटून घ्यायचं? आता काहीही झालं तरीही मी माझ्या रंगाला माझ्या मनाचा ताबा घेऊ देणार नाही.. माझ्यासारख्या रंगाचीही लोकं या जगात आहेत, फक्त माझ्या देशात नाहीत म्हणून मला थट्टेचा विषय बनवत असतील तर तो त्यांच्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे.. माझ्या नाही.. कुटुंबाचा सबळ पाठिंबा, शिक्षण आणि आर्थिक स्वयंपूर्णता तर माझ्याकडे आहे फक्त गरज आहे मला सत्य परिस्थिती स्वीकारायची.. जर मी ते करू शकले तर माझ्या मनाला निराश करणाऱ्या भावनांना दूर करू शकेन.. असा निश्चय करून आपलं काम संपवून एका वेगळ्याच आत्मविश्वासाने सान्वी भारतात परतली..
भारतात आल्यावर तिचा "श्वेता" या कोड असणाऱ्या मुलामुलींसाठी काम करणाऱ्या वधू-वर मंडळाची माहिती मिळाली.. तिथे तिला खूप छान समुपदेशन मिळालं..कारण या मंडळाची संस्थापकच दुसरी तिसरी कोणी नसून कोडामधूनच उभारलेली महिला डॉ. माया तुळपुळे आहेत आणि या संस्थेचा मुख्य उद्देशच कोड झालेल्या लोकांना एकत्र करून समाजापासून वेगळे करण्याचा नाही तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेऊन समाजाने स्वीकारणे हा आहे. त्यांनी केलेल्या समुपदेशनामुळे तिला जगायची उभारी मिळाली.. कोड म्हणजे जीवनाचा शेवट नव्हे हे तिला कळालं.. आणि त्या संस्थेमार्फतच तिची एका कोडमधून ट्रीटमेंट घेऊन 50% बरा झालेल्या समीरशी ओळख झाली आणि दोघांनाही एकमेकांचे विचार आवडले आणि त्या दोघांनी लग्नही केलं..
ही कथा काही प्रमाणात काल्पनिक असली तरीही कोड झालेल्या लोकांना अजूनही समाज स्वीकारत नाही.. लग्नासाठी तर नाहीच नाही.. शारीरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम असताना फक्त रंग वेगळा आहे म्हणून त्यांना समाजाच्या प्रवाहातून वेगळं करणं बरोबर नाही.. गरज आहे त्यांना सामान्य व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची.. कारण कोड हा काही रोग नाही.. फक्त रंगपेशींची कमतरता किंवा त्या नष्ट झाल्यामुळे रंगामध्ये झालेला बदल आहे.. जेव्हा कोड असणाऱ्या व्यक्तीकडे दुसरा दृष्टिक्षेप टाकला जाणार नाही तेव्हा समाजाने खऱ्या अर्थाने त्यांना स्वीकारलंय असं म्हणता येईल..