सोन्याचा पिंजरा
सोन्याचा पिंजरा


"आई मला नाही ग ह्या मुलाशी लग्न करायचंय.. "
"अग स्वरा काय कमी आहे ह्या मुलात? चांगला बिजनेस आहे.. श्रीमंत आहे.. एकुलता एक.. किती मोठी बिल्डिंग आहे माहिती त्यांची.. घरी नोकर चाकर.. अजून काय हवं? इतक्या मोठया घरातील मुलाने पसंती कळवली तुझं नशिब समज.. "
मागच्या आठवड्यात स्वराला पटेल कुटुंब आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नासाठी बघून गेले होते.. त्यांना स्वरा आवडली होती.. पण स्वराला मात्र हे स्थळ पसंद नव्हतं..
"कसलं नशीब ग आई.. तुला माहितीय मी जेव्हा त्या मुलाशी बोलायला टेरेस वर गेले तेव्हा स्पष्टपणे सांगितलं मला फॅशन डिजाईन मध्ये करिअर करायचं आहे.. मला स्वतःचं बुटीक काढायचं आहे.. तर बिलकुल इंटरेस्ट नव्हतं त्याचं.. ऐकून न ऐकल्यासारखं करत होता.. मीच खोदून खोदून सांगितल्यावर म्हणतो कसा..
"काय गरज आहे ह्या सगळ्याची? आमचा बिसनेस खूप मोठा आहे.. बायकांनी बाहेर पडून करिअर करायची गरज नाही.. "
"बरोबरच आहे ना बाळा.. इतकी श्रीमंती असताना तुझं काम करणं कशाला पाहिजे? " बाबा मध्येच बोलले..
"अहो बाबा काम करणं गरजेचं नसेल.. पण माझे स्वतःचे असे काही स्वप्ने असतील ना.. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याची साथ नको का? "
"हे सगळं खूळ तू काढून टाक बाई डोक्यातून.. लाखात एक स्थळ आहे तू नाकारते म्हणजे काय बोलावं आता.. "
"आई, हे स्थळ म्हणजे माझ्यासाठी सोन्याचा पिंजरा आहे.. बाकी काही नाही.. मला त्या घरात सगळं मिळेल जसं त्या पिंजऱ्यातल्या पक्षाला मिळतं.. बघ ना त्या पिंजऱ्यातल्या पक्षाला वेळेवर खाऊ पिऊ कदाचित पंचपक्वान्न मिळत असेल, सुरक्षितता मिळेल, डोक्यावर छप्पर मिळेल, ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळेल पण त्याला आकाशात उडायचं स्वातंत्र्य नाही मिळणार.. कारण त्याला त्याच्या मालकाने आखलेल्या परिघातच उडायचं बंधन असतं.. पिंजऱ्यामध्ये पंखाची जेमतेम उघडझाप करता येते किंवा तो उडू नये म्हणून मालक त्याचे पंखच कापून टाकतो.. त्यापेक्षा मला असं घर पाहिजे जिथे मला उंच झेप घेता येईल.. असा मुलगा पाहिजे जो मला माझ्या पंखाच्या ताकदीवर विश्वास ठेवायला सांगेल.. माझ्या पंखातील ताकद ओळखून मला उडायला मदत करेल.. मान्य आहे मला पंचपक्वान्नांसाठी, सुरक्षितेसाठी संघर्ष करावा लागेल.. वेळप्रसंगी मी पडेन, जखमी होईन पण परत माझ्या हिंमतीवर उडायला शिकेन मी.. मला आयुष्याची खरी किंमत कळेल.. मी आकाशामध्ये झेप घेईन जिथे काहीच बंधने नसतील, त्याला सीमा नसेल..
आई मी त्या घरात शोभेची एक बाहुली म्हूणन राहीन ग.. मी नाही म्हणत आहे ते घर, घरातील लोकं वाईट आहेत.. पण मला जीवन जगण्याची दुसरी वाट निवडायची आहे जिथे माझा जोडीदार आयुष्याच्या ऊनपावसाच्या खेळात माझ्या पाठीशी उभा राहिल.. मला उंच भरारी घ्यायला मदत करेल.. माझ्या स्वप्नांना स्वतःचं स्वप्नं मानून पूर्ण करायला साथ देईल.. प्लीज आई बाबा मला माझ्या आयुष्याची दुसरी वाट निवडायचं स्वातंत्र्य द्या.. "
स्वरा इतकं बोलून बेडरूम मध्ये निघून जाते.. आई बाबा तिचं बोलणं ऐकून स्तब्ध होतात.. कारण तिचं बोलणं त्यांना खूप विचार करायला भाग पाडलेल असतं..