कोवळं प्रेम
कोवळं प्रेम
ही कथा आहे राजू आणि लक्ष्मीच्या शाळेतली.. दोघेही दहावीत शिकत असतात.. लक्ष्मीचे बाबा दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्त असतात.. इथे भाऊ आणि आईसोबत लक्ष्मी राहत असते.. राजू एकदम मनमोकळा, हसऱ्या चेहऱ्याचा तर लक्ष्मी नावाप्रमाणेच दिसायला सुंदर, नाजूक, लांबसडक केस, पाणीदार डोळे असलेली..
शाळेत एकाच वर्गात असल्याने राजू, लक्ष्मी, नंदन आणि रेणुका यांचा ग्रुप होता.. या चौघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती.. त्यांनी कधी कोणाला आपल्या ग्रुपमध्ये घेतलंच नाही.. शाळा भरण्याआधी आणि सुटल्यावर बाहेरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारणं, गृहपाठ वहींची देवाण-घेवाण करणं, शिक्षकांची नक्कल करणं हाच या ग्रुपचा उद्योग होता.. हळूहळू राजूला लक्ष्मी आवडायला लागली.. लक्ष्मीच्या मनात राजूबद्दल काय भावना आहे हे काही कळत नव्हतं.. पण गप्पा मारताना राजूचं लक्ष्मीकडे वारंवार बघणं आणि लक्ष्मीने पण हळूच प्रतिसाद देणं, वर्गात प्रवेश करताच पहिल्यांदा एकमेकांना शोधणे, जागेवर दिसले नाही तर आज ती/तो शाळेत येणार की नाही या प्रश्नाने अस्वस्थ होणे, गप्पा मारताना दोघांचं एका विषयावर एकमत होणं आणि आनंदाने टाळी देणे, टाळी देताच लक्ष्मीचे लाजून मान खाली घालणे, मनाला काही पटत नसेल तरी ती बोलली म्हणून हो ला हो मिळवणे, वर्गात तास चालू असतानाही दोघांच्या डोळ्यांनी काहीतरी खाणाखुणा करणे, लक्ष नसताना एकमेकांकडे पाहणे आणि चुकून नजरानजर होताच मान खाली घालून लाजणे या सगळ्या गोष्टींवरून राजू आणि लक्ष्मी एकमेकांना आवडतात हे नंदन आणि रेणुकाच्या लक्षात येत होतं पण कोणीच काही बोलत नव्हतं..
असेच सहा महिने निघून जातात.. पहिल्या सत्राच्या परीक्षा संपलेल्या असतात.. दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असतात.. निवांत वेळ बघून एक दिवस राजू लक्ष्मीबद्दल काही बोलत नाहीय हे बघून नंदन स्वतःच राजूजवळ लक्ष्मीचा विषय काढतो..
"काय मग मित्रा, लफडं कुठपर्यंत आलं तुमचं?"
"लफडं? कसलं लफडं? काय बोलतोय?"
"तुझं आणि लक्ष्मीचं रे मित्रा.."
"आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे.. बस.. लफडं असलं काही नाही.. परत लफडं म्हणू नकोस हं सांगून ठेवतो.."
"बाबा रे, काय तो राग? ह्म्म्म.. लक्ष्मीबद्दल वाईट बोललेलं काही आवडत नाही वाटत राजू साहेबांना.."
आता मात्र राजूला हसायला येतं.. कसंबसं ओठांवरचं हसू लपवत राजू जायला निघतो तसं नंदन थांबवतो त्याला..
"नाही लपवू शकत रे मित्रा तू या मित्रांपासून काही.. लपवायचा प्रयत्न केला तरीही तुझा चेहरा सगळं बोलतोय.."
राजू खूप वेळ आपल्या भावना खऱ्या मित्रांपासून लपवू शकत नाही..
"हो मित्रा, मला आवडते लक्ष्मी खूप.. शाळा सुटल्यावर घरी गेलो की जीव कासावीस होतो रे.. रात्रीपण तिची खूप आठवण येते मग तिच्या गृहपाठाच्या वह्या जवळ घेऊन झोपतो.. "
"आता कसं खरं आलं की नाही बाहेर.. मग वाट कसली बघतोय.. प्रपोज करून टाक.."
"नको रे बाबा.. असंच ठीक आहे.. माझ्या भावना माझ्याजवळच राहू देत.. मला वाटतं, पण तिलाही माझ्याबद्दल असंच वाटतं कशावरून?"
"अरे पण का? लक्ष्मीच्या वागण्यावरून मला तरी वाटतं तिलाही तू आवडतोस.. तीही तू विचारशील आधी म्हणून वाट बघत असेल.. जास्त वेळ दवडू नकोस रे मित्रा.. विचारून टाक.. हम है ना तेरे साथ, जो होगा देखा जायेगा.."
"मी विचारलं आणि तिला नाही आवडलं किंवा तिला मी फक्त मित्र म्हणूनच आवडत असेन तर आता ती जितकं बोलते, भेटते तेही बंद व्हायचं.. नको रे बाबा.. असंच बरं आहे.. "
"अरे मग तुमचं नातं पुढे जाणार कसं? तुही गप्प.. तीही गप्प.. चोरून चोरून खाणाखुणा तर चालतात बुवा तुमच्या.."
दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर लक्ष्मीला प्रपोज करायचं ठरवून दोघेही घरी जातात.. दुसऱ्या दिवशी नंदन आणि रेणुका मुद्दामच त्या दोघांना बोलता यावं म्हणून शाळा सुटल्यावर त्यांच्यासोबत न जाता लांबूनच बघत असतात.. दोघेही खूप वेळ गप्पा मारत असतात.. हसणं, टाळी देणं सगळं चालू असतं. त्यामुळे नंदन आणि रेणुकाला वाटतं बहुतेक लक्ष्मीने राजूला होकार दिला.. लक्ष्मी निघून जाते तेव्हा ते दोघे राजूला भेटायला येतात..
"काय मग? खुश दिसतेय स्वारी? हो बोलली ना?"
"कसलं काय यार.. विचारलेच नाही.. बाकीच्याच गप्पा मारत होतो.. हिंमत नाही झाली यार.."
नंदन आणि रेणुका डोक्याला हात लावतात..
"तुझ्याने काही होणार नाही.. राहू दे.. जसं चाललंय तसं चालू दे.."
२/३ महिने असेच उलटून गेले. दहावीची सराव परीक्षा संपली, प्रॅक्टिकल परीक्षाही होऊन गेल्या.. पण दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमीसारखेच चालले होते. पण राजूची बेचैनी वाढत होती.
"हे बघ मित्रा, आता फक्त शेवटच्या बोर्डच्या परीक्षा राहिल्यात.. आताच संधी आहे तुला.. नाहीतर आयुष्यभर नाही विचारल्याचा पश्चात्ताप होईल.. "
शेवटी राजूने डेरिंग करून मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि पेपर सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि पुढच्या पेपरच्या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजूने पहिले प्रेमपत्र लिहिले. पहिल्या चार पाच पेपरला तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंगच होत नव्हती.
"अरे राजू भाई, विचारणार कधी? शेवटचे दोन पेपर राहिलेत.."
"हो रे दररोज पत्र द्यायचा विचार करून येतो.. पण डेरिंग होत नाही आहे आणि असंही वाटतंय का पेपरच्या वेळी तिला त्रास द्यायचा जर तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच नसेल तर.."
"बघ बाबा तू आणि तुझं प्रेम.. मी थकलो आता.."
शेवटच्या पेपरचा दिवस उजाडतो.. आज काहीही करून लक्ष्मीला पत्र द्यायचं म्हणजे द्यायचं.. तिचं उत्तर काहीही असू दे पण माझ्या भावना तरी तिला कळायलाच हव्यात असा विचार करून राजू शाळेत जातो.. आज सगळे लवकरच आलेले असतात.. कारण ज्यांनी ज्यांनी लायब्ररीचे पुस्तके घेतलेली असतात ते परत करायचं असतं.. राजूही लवकर जातो शाळेत आणि पुस्तके परत करतो आणि वर्गात जाऊन बसतो.. कधी एकदा पेपर संपतो आणि कधी एकदा तिला पत्र देतो असं झालेलं असतं त्याला.. पेपर संपतो.. राजू घाईघाईत बॅग आवरतो.. नंदनला भेटून सांगतो आज देणार म्हणजे देणारच आणि गेटच्या बाहेर जाऊन लक्ष्मीची वाट बघत थांबतो..
"पत्र हातात काढून ठेवतो.." राजू बॅगेतून पत्र काढायला जातो तर त्याला पत्रच भेटत नाही.. सगळे कप्पे, वह्या, पुस्तके बघून होतात पण पत्र नसतं.. राजू एकदम रडायला आलेला असतो.. तेवढ्यात समोर लक्ष्मी येताना दिसते..
"काय रे काय शोधतो आहेस.."
"काही नाही.."
"इतका का घाबरला आहेस.. काही हरवलंय का?"
"नाही.. नाही.. कुठे काय.."
"चल मी निघते लवकर.. आजच आम्ही बाबांकडे कायमचे राहायला जाणार आहोत.. बाबा आलेत ना घ्यायला.."
"ओके.. लगेच.."
"हो.."
आतातरी राजूला काय बोलावं काहीच कळत नाही.. कारण मी काही बोललो तर रडायला लागेन अशी त्याची अवस्था झालेली असते.. दोघेही बाय म्हणून निघून जातात.. राजू तिला जाताना फक्त बघत राहतो.. तिचे प्रत्येक पुढे पडलेले पाऊल ती आपल्यापासून दूर जात असल्याची वेदना देत असते आणि राजूच्या भावना ओठावर न येताच हरवलेल्या पत्रातच राहून जातात..
थोड्या वेळाने नंदन आणि रेणुका राजूला भेटायला येतात..
"काय रे? आज तरी बोललास की नाही?"
राजू काहीच बोलत नसतो.. त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात..
रेणुका लगेच आपल्या बॅगेतून एक पत्र काढते आणि राजूला देते.. निवांत वाच असं सांगून ते दोघे निघून जातात..
काय असतं त्या पत्रात?
"प्रिय राजू,
आज लायब्ररीमध्ये पुस्तके परत करताना मी तुझ्या मागेच होते.. पुस्तके परत केल्यावर माझी पुस्तके देताना टेबलावर ठेवलेल्या तुझ्या एका पुस्तकातून एक चिठ्ठी खाली पडली.. कोणाला कळण्याच्या आतच मी ती उचलली..
ती चिठ्ठी दुसरं काही नसून माझ्यासाठी लिहलेलं प्रेम पत्र होतं.. वाचून खूप खुश झाले मी.. खूप दिवसापासून याचीच वाट मी बघत होते.. मलाही तू खूप आवडतोस.. पण आपली वाट वेगळी असेल या पुढून.. कारण माझ्या बाबांची बदली आता नागपुरात झाली आहे तर आम्ही सगळेच बाबांसोबत नागपूरला शिफ्ट होतोय.. तिथेच माझं पुढचं शिक्षणही होईल.. आजच थोड्या वेळाने मी नागपूरला निघत आहे.. परत कधी भेटू माहीत नाही.. पण तू नेहमीच माझ्या आठवणीत राहशील..
नेहमी खुश राहा.. हसत राहा..
तुझीच,
लक्ष्मी.."
राजू पत्र वाचून मोठमोठयाने रडायला लागतो.. तिलाही मी आवडत असल्याचा आनंद मानायचा की ती लांब गेल्याचं दुःख हेच कळत नसतं त्याला.. अशी ही शाळेतील प्रेमकहाणी दोघांसाठी एक आठवण बनून इथेच संपते..