आई मी नाही बदललो गं
आई मी नाही बदललो गं


ठरल्याप्रमाणे सचिन आणि नेहाचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे सचिन आणि नेहा दोघेही खूप खुश होते. घरातील पाहुणे मंडळीही हळूहळू आपापल्या गावी रवाना झाले. सचिन आणि नेहा हनिमूनला जाऊन आपापल्या दिनचर्येला लागली. सचिन, नेहा आणि सचिनचे आई-बाबा असं छोटंसं आनंदी कुटुंब होतं. माहित नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली. हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडू लागले आणि आईला वाटू लागलं, “आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे. किती कष्ट घेतलेत याला मोठा करण्यासाठी थोडीतरी जाणीव आहे का? बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला...“ घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्रच पालटलं. बायको आणि आईमध्ये सचिनच सँडविच होऊ लागला आणि हे काही सचिनला सहन होईना. आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि सचिनने तिला खास गिफ्ट द्यायचं ठरवलं. त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमजूत दूर करायचे ठरवले. चला तर मग वाचूया सचिनने काय लिहलं होतं त्या पत्रात...
“प्रिय आई,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटत जसं तू आधी असायची. पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला. आई तुझा हा चेहरा मला नाही बघवत म्हणून पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न करतोय..
आई, माझं लग्न झालं.. मी नाही बदललो गं.. माझं जग बदललं आहे.. माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे नेहा..
मला कळत नाहीय आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदी कसं ठेवू.. खूप अवघड वाटतंय.. कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत दरवेळी.. आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय.. लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोप्पं नाहीय आई.. इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभवाव्या लागतात. आई फक्त एवढं लक्षात ठेव की “मी नाही बदललो... माझं जग बदललं आहे...” आई माझी बायको तर सोड जगातली अशी कोणतीच शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग मी बायको येण्याने कसं विसरेन?
आई माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलंय. तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखी आहे. ती आपल्या घरात रुळावी, तिलाही हे जग आपलं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिची जास्त काळजी करतो याचा अर्थ असा नाहीय आई की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे..
कधी कधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो कारण ती अजून बालिश, अल्लड आहे. तुझ्याइतका अनुभव आणि समजूतदारपणा नाहीय तिच्यात. तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं. याचा अर्थ असा नाही आई की मी तिला काही बोलत नाही.
तिला कधी कधी मी एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणाने राहू नाही शकणार. आम्ही समवयस्क असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल.
तिच्या आई वडिलांशी बोललेलं, त्यांची काळजी केलेलं तुला नाही आवडत पण आई मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले ते मी कसे विसरू.. आणि ज्या आई-वडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे त्या आई-वडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न असतो.
तुझ्यात आणि नेहामध्ये भांडण झालं की मी शांत बसतो.. कोणाचीच बाजू नाही घेत तेव्हा तू नाराज होते. पण आई तू आणि नेहा माझ्यासाठी दोघेही खूप महत्त्वाचे आहात. तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखावू नये हीच भावना असते गं.. मी नेहाला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केलंय.. तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत. फक्त तिला थोडा वेळ दे या घरात adjust होण्यासाठी.. ती नक्की तुला आवडायला लागेल याची मला खात्री आहे.
आई.. तुला मी हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसा रडायचो आठवतं ना? तसंच नेहा पण तिच्या आई-वडिलांना miss करत असेल. म्हणून plss तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलासारखं सगळं शिकव.. कारण नेहा इतकी वाईट नाहीय गं.. ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल. म्हणून ती तुझ्यावर रागवेल, चिडेलही पण मला जसं प्रेमाने जवळ घेऊन समजावते, राग काढते तसं तिलाही समजून सांग.. नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल.
मी आधी मला नाश्त्याला, डब्याला उशीर झाला की चिडायचो, ओरडायचो. पण नेहावर मी नाही करत.. याचा अर्थ असा नाही आई की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे. पण आई त्या वेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही गं.. पण आता मोठा झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं.. म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो. त्यासाठी खरंच आई मला माफ कर.. त्या वेळी मी नाही समजू शकलो तुला..
मी नेहाला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वात्रंत्र्य देतो कारण तुझी स्वप्नं बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि त्याचं दुःख तुला आजही आहे आणि आजही तू यासाठी बाबांना दोष देते म्हणून मला नेहाची सगळी स्वप्ने पूर्ण व्हावं असं वाटतं.
आई... तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस.. plsss तू निवांत राहा.माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही नाही घेऊ शकत. मला माहित आहे माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळेच तुझ्यामध्ये ही असुरक्षिततेची भावना आली असणार. उगीच गैरसमजूत करून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहेस आई.. तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश नाही राहू शकणार. तूच आमचा आधार आहेस. Plsss माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर.
तुझाच,
सचिन.
मग कसं वाटलं हे आई आणि मुलांमधील प्रेमाने भरलेलं पत्र... आवडलं ना?
आई आणि मुलाचं नातं खरंच खूप अतूट असतं आणि ती जागा कोणीच नाही घेऊ शकत.. ती फक्त आपली गैरसमजूत असते. एक सून म्हणून प्रत्येक सासूला एवढंच सांगणं आहे की, “आई तुमची जागा कोणीही नाही घेऊ शकणार.. ना कोणती सून ती हिरावून घेणार.. तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा इतकीच इच्छा आहे. जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे तितकीच सासू म्हणून तुम्ही सुनेला हवे आहात.”