शोध अज्ञाताचा
शोध अज्ञाताचा


छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय गेली २५ वर्षे महाराष्ट्रातील उत्तम महाविद्यालयांमध्ये गणले जात होते. यातील तीनही शाखा म्हणजेच शास्त्र , वाणिज्य आणि कला या शाखांमधून दर्जेदार असे शिक्षण मिळत होते. अभ्यासाबरोबरच हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या कलागुणांचाही विकास करण्यावर भर देत असे. या कॉलेजचे प्रशस्त असे नाट्यगृह, प्ले-ग्राउंड तसेच सुसज्ज अशी सायन्स लॅब होती.
या कॉलेजमधील प्राध्यपकसुद्धा विचारपूर्वक निवडले जात. त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जात नसे. या कॉलेजचा प्रत्येक प्रोफेसर म्हणजे एक हिरा आहे असे मत कॉलेजचे मुख्याध्यापक श्रीधर राजे यांचे होते. याच कॉलेजमधील याच हिऱ्यांमधला कोहिनुर म्हणजे प्रोफेसर शशांक प्रधान. कला विभागाचे प्रमुख. वयाची पन्नशी नुकतेच ओलांडलेले. अत्यंत बुद्धिमान, कडक शिस्तीचे पण तरीही मुलांचे लाडके. इतिहास हा त्यांनी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातल्या अनेक देशांचा इतिहास अभ्यासला होता. ते मुलांना सांगत, " आपल्या भारताला फार जुना इतिहास लाभलाय सुमारे दोन लक्ष वर्षांपूर्वी माकडाचा माणूस बनण्याची सुरवात झाली होती परंतु त्यावेळचा सर्वच इतिहास आपल्याला उपलब्ध नाही. १७ डिसेंबर १९०३ रोजी राईट बंधूनी पहिलं aircraft बनवलं. पण रामायणात रावणाने पुष्पक विमानाने प्रवास केल्याचे उल्लेख आहेत. श्रीलंका जी रावणाची लंका असल्याचं सिद्ध झालंय तेथील उसनगौडा या गावी चारहून अधिक विमानतळासारख्या जागा सापडल्या आहेत. माया सभ्यता जी मेक्सिकोमध्ये इ.स. २५०० मध्ये लुप्त झाली, त्यांच्याकडेही अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचे सिद्ध झाले आहे, अटलांटिस शहर जे पाण्यात विलुप्त झाल्याचे सिद्ध झाले आहे त्यांच्याकडे चुंबकीय शक्ती वापरून ऊर्जा तयार करण्याचे तंत्रज्ञान होते." प्रधान सर अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टींची मुलांजवळ चर्चा करत त्यामुळे त्यांचा तास ही मुलांना पर्वणीच वाटत असे.
प्रधानांना इतिहासाबरोबरच पुरातत्वशास्त्रातही रस होता. ते पुरातत्व शाखेचे पदवीधर होते. ही शाखा इतिहासाशी संबंधित असल्याने प्रधानांना त्यात रस होता. खरंतर पूर्ण वेळ संशोधनासाठी देण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ते कॉलेजशी बांधलेले होते. त्यांच्या हाताखालून गेलेला त्यांचा विद्यार्थी आणि मुख्याध्यापक राजेंचा मुलगा प्रसाद हा पुरातत्व शास्त्रज्ञ होऊन पूर्ण वेळ संशोधन करत होता. तो त्याच्या संशोधनासाठी अनेक वेळा प्रधान सरांची मदत घेत असे. ते स्वतः जाऊन त्या स्थळाची पाहणी करत, आपल्या अभ्यासाच्या आधारावर त्यात भर घालत असत. इतिहासातल्या फक्त १% गोष्टी उघड झाल्या आहेत, अजून ९९% बाकी आहेत असे त्यांचे मत होते. त्यांनी यावर अनेक प्रबंधही लिहिले होते. त्यांनी लिहिलेल्या 'The Secrets in Indian History' या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला होता. संपूर्ण जगभरात ही पुस्तक वाचलं गेलं होतं. आज प्रधान सर खूपच आनंदात होते कारण कालच प्रसादाचं इ-मेल आलं होतं. खरंतर हा नवीन शोध नव्हता. हे प्रकरण 'आजतक' या न्युज चॅनेल नी जगजाहीर केला होतं, कि श्रीलंकेच्या 'उसनगौडा' मधील जंगलात रावणाचं ममी केलेलं प्रेत सापडलं होतं. असं म्हणतात की राम-रावण युद्धात जेव्हा रावणाचा मृत्यू झाला तेंव्हा त्याच्या अनुयायांनी त्या प्रेताचे दाहसंस्कार न करता तो देह संस्कारित करून जतन करून ठेवला होता. रावणाला पुनर्जीवित करण्याचा त्यांचा उद्देश होता परंतु काही कारणांनी तो सफल होऊ शकला नाही. सर आपल्याला माहित असेलच की इतिहासातील पुराव्यांनुसार ममी बनवण्याची कला प्रथम इजिप्तमध्ये असल्याचे कळले. त्यानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर प्रेतातले डोळे, हृदय, किडनी असे अवयव काढून टाकून त्याला काही औषधी वनस्पती आणि मसाले वापरुन तो मृतदेह हजारो वर्षे जतन केला जाऊ शकतो.
मृत्यूनंतरही जीवन असते या उद्देशाने हे देह जतन केले जात. न जाणो देवाच्या कृपेने जर त्या माणसाला परत जीवन मिळाला तर! देह जतन करून ठेवण्यामागे हा उद्देश असे पण हि कला भारतीयांनाही अवगत होती हे रावणाचे प्रेत पाहिल्यावर समजले. ते कामही इतका सहजसाध्य नव्हतं. त्या ठिकाणी जाताना अत्याधुनिक तंत्रज्ञानही अपुरे पडले होते. जाणाऱ्या टीमला अनेक नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. चालत जाणाऱ्या टीम चा रास्ता भरकटला होता. आधुनिक कंपास, नकाशा जवळ असूनही त्यांना रास्ता सापडला नव्हता. तसेच ममी ठेवलेली गुहा असलेल्या डोंगराजवळ जाताच अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला होता त्यात अनेकजण जखमी झाले. हेलिकॅप्टरनि गेलेली टीम अचानक ढगाळ वातावरण, वादळ, पाऊस झाल्याने कितीतरी वेळा परत आली होती.सगळंच गूढ होतं. तरीही सर्व संकटावर मात करून लोकांनी रावणाच्या प्रेताचा शोध लावला. त्याचबरोबर हिऱ्या-मोत्यांचे दागिनेही सापडले, पण तिथले मूळ रहिवासी जे स्वतःला रावणाचे वंशज म्हणवतात त्यांचं असं म्हणणं आहे कि हे रावणाचं प्रेत नाही. ते अशा ठिकाणी आहे कि जे कोणालाच सापडणार नाही. इतकंच नाही तर त्या प्रेताबरोबर रावणाचा सर्व खजिनाही आहे. असं म्हणतात कि मृत्यूनंतर काही काळ आपल्याला आपल्या राजवाड्यात एकांतात ठेवावे हि इच्छा रावणाने राम-रावण युद्धापूर्वी विभीषणाकडे व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे रावणाचा प्रेत एका पेटीमध्ये ठेऊन महालाची दारे बंद करून सगळे बाहेर गेले असताना अचानक भूकंपाचे धक्के बसून जमिनीला एक मोठी भेग पडून संपूर्ण राजवाडा जमिनीत गेला.
ही सर्व हकीगत प्रसादने मेलवर पाठवली होती. यात अतिशयोक्ती वाटत होती. तरीसुद्धा खात्रीलायक माहिती मिळाल्याशिवाय प्रसाद आपल्याला बोलावणार नाही हा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच प्रधानांनी ताबडतोब श्रीलंकेला जायचा निर्णय घेतला. जरी त्वरित निघायचे ठरले तरी सर्व सोपस्कार होईपर्यंत आठ-दहा दिवस गेलेच. १२ डिसेंबरला रात्री ते विमानात बसले . कोलंबोला प्रसाद त्यांना रिसिव्ह करायला येणार होता. ठरल्याप्रमाणे प्रसाद त्यांना भेटला. दोघे हॉटेलवर आले. आराम झाल्यावर गप्पा मारत बसले. प्रधानांना अतिशय उत्सुकता होती. प्रसादने सुरवात केली," जिथे रावणाचं प्रेत सापडलं त्या गुहेत एक गुप्त दालनही सापडलं परंतु मीडियापासून हि गोष्ट लपवून ठेवण्यात आली. ते दालन हवाबंद करण्यात आलं होतं. खूप प्रयत्नांनंतर ते उघडण्यात आम्हाला यश आलं.त्या दालनातील सर्व भिंतींवर रामायणातील चित्रे कोरली होती. त्या चित्रांचा अर्थ लावल्यावर असे समजले कि जरी रावण शिवभक्त होता तरी त्याची जीवनावरील आसक्ती जबरदस्त होती. त्याला आपला मृत्यू कधी होणार आहे याचा फार पूर्वीच अंदाज आला होता. व तो टाळण्यासाठी त्यानी अघोरी विद्येत पारंगत असणाऱ्या लोकांना जवळ केले होते. त्या चित्रांनुसार रावणाने आपला हेतू सफल करण्यासाठी अनेक यज्ञही केले होते. त्यासाठी लोकांचे बळी दिले होते. गुहेत मिळालेल्या माहितीनुसार रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहासकट तो राजवाडा नाहीसा होऊन योग्य वेळ येताच ते अघोरी रावणाला परत जिवंत करणार होते. त्या गुहेत त्या गुप्त ठिकाणाचा नकाशाही होता. आम्ही त्याचे फोटो काढून घेतले. त्या नकाशानुसार श्रीलंकेच्या पूर्वेकडे लहान लहान बेटं आहेत. बरीचशी लोकवस्तीसाठी निरुपयोगी आहेत. फक्त एक बेटं आहे ज्यावर आदिवासींसारखे लोक राहतात. ते पूर्णपणे रानटी आहेत. बाहेरच्या जगाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. आणि तो ठेवायला त्यांना आवडतही नाही. त्यांची भाषा समजायला कठीण आहे.
आपण जबरदस्तीने त्या बेटावर गेलो तर ते आपल्यावर जीवघेणा हल्लाही करू शकतात. त्याच बेटावर रावणाचा देह आहे. ते आदिवासी लोक हेच अघोरी विद्येचे उपासक आहेत. ज्यांनी रावणाला जिवंत करायचं वचन दिलं होतं. आम्ही त्या बेटावर जायचा प्रयत्न केल
ा पण त्या लोकांनी आम्हाला होडीवरून उतरून दिलं नाही. आमच्यावर हल्ला करायला आले. त्याच गोंधळात त्यांच्यातला एक लहान मुलगा पाण्यात पडून वाहून जायला लागला. मी काही विचार न करता पाण्यात उडी मारून त्याला वाचवले. हे पाहिल्यावर ते जरा नरमले. आम्हाला घेऊन त्यांच्या वस्तीवर गेले. तो मुलगा त्यांच्या प्रमुखाचा होता. सर मी अनेक प्राचीन भाषा- लिप्या यांचा अभ्यास केला आहे. तरीपण त्यांची भाषा मला समजत नव्हती. आम्ही उपग्रहाद्वारे बेटाची तपासणी केली. त्यावर राजवाड्यासारखी एकही वास्तू दिसली नाही. मला आश्चर्य वाटतंय कि आमच्या टीमचे एक्सपर्ट्स सुद्धा गोंधळले आहेत. आपण चुकीची जागा तर नाही ना शोधली? कदाचित ते बेट इतक्या वर्षात समुद्रात गडप तर झालं नसेल ना ? पण हे जवळ- जवळ अशक्य आहे. गुहेत मिळालेला नकाशा आजही तेच बेट दाखवतोय. आपल्याला फायदा इतकाच आहे कि आपण आता राजरोसपणे त्या बेटावर जाऊ शकतो. त्या बेटावर एक मोठं नैसर्गिक आश्चर्य आहे ते म्हणजे ते बेट पूर्ण सपाट आहे. त्यावर दाट जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मधोमध एक मोठा पर्वत आहे. बाकी त्या बेटावर एक साधा उंचवटाही नाही. आदिवासी लोक त्या पर्वतातून निघणाऱ्या धबधब्याजवळ राहतात. त्या पर्वतात अनेक लहान-मोठ्या गुहा आहेत. उपग्रहावरून हा पर्वत एखाद्या अजस्त्र मस्तकासारखा दिसतो. त्या मस्तकाच्या नाक,तोंड, डोळ्याच्या जागी गुहा आहेत. आणि नकाशातही हा पर्वत आणि त्याच्या तोंडातून आत जाण्याचा मार्ग दाखवला आहे. त्याच जागेतून तो प्रचंड धबधबा कोसळत आहे.कसे जायचे ते कळत नाही उद्या आपण त्या बेटावर जाणार आहोत. बघू प्रत्यन करून."
दुसऱ्याच दिवशी ते बेटावर गेले जवळ जाताच आदिवासींनी त्यांना आडवले पण त्यानी प्रसादला बघताच ते माघारी वळले. त्यानी समुद्राच्या काठावर एका सुरक्षित जागी तंबू ठोकला. जरी ते आदिवासी मित्रासारखे वागत असले तरी त्यांचा भरवसा नव्हता. मग प्रसादने त्याच्या जवळच्या नकाशाची एक फोटोप्रत त्या आदिवासी प्रमुखाला दाखवली. ती पाहताच तो रागानी हातवारे करत निघून गेला. तेंव्हाच सर्वाना कळले कि आपण एका नाजूक विषयाला हात घातला आहे.
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून त्यांनी तुकड्या बनवल्या. पूर्वी हा भाग श्रीलंकेचाच होता परंतु जमिनीतील बदलामुळे तो दूर गेला असावा. चार हजार वर्ष गेली होती. काही वेळानी शशांक सर आणि प्रसाद त्यांच्या टीमला घेऊन डोंगराजवळ आले. तीन गट पाडण्यात आले. एक गट डोंगराच्या पायथ्याशीच थांबणार होता. एक गट डाव्या बाजूनी तर एक गट मागून चढणार होता. प्रसादाची खात्री होती कि रस्ता नक्की मागूनच सापडेल. त्यांनी चढायला सुरवात केली. खूप शोध घेऊनही त्यांना कुठेच गुहा सापडली नाही. ते हताश होऊन दमून डोंगराच्या मध्यावर असलेल्या एका झाडाखाली बसले. ते एक प्रचंड झाड होतं अचानक प्रसादच लक्ष झाडाच्या मागे गेलं. झाडाच्या बरोबर मागे एक मानवनिर्मित गुहा होती. ती अशा ठिकाणी होती कि कोणाला सहज सहजी सापडणार नाही. दोघं सावधपणे आत गेले. ती गुहा म्हणजे एक भूल-भुलय्या होती अनेक लांबच लांब भूयार आणि शेवटी पहिल्याच जागी परत. चालून चालून हे दोघं दामले. मग प्रधान सर म्हणाले, " हे बघ! जर कथेनुसार तो महाल रावणासकट जमिनीत गेला असेल तर आपण अशा भुयारात शोधायला हवा जिथे उतार असेल." अजूनपर्यंत न पाहिलेलं फक्त एकच भुयार उरलं होतं. तिथेही निराशाच झाली. त्या भुयारातल्या जमिनीला जरा उतार दिसत होता. समोर रस्ताच नव्हता. " थांब प्रसाद! हि गुहा मानवनिर्मित आहे.मग इथे गुप्त कळ असणारच." प्रधान सर बोलले. टॉर्चच्या उजेडात त्यांना भिंतीवर एका राक्षसाचे चित्र दिसले. त्याच्या डोक्यावर एकच डोळा होता. नकाशातही एक डोळ्याचा राक्षस असल्याचे प्रसादला आठवले. त्याच्या डोळ्यावर दाब देताच समोरची भिंत सरकली. खाली तीव्र उतार होता. जमीन गुळगुळीत होती. एखादी मोठी घसरगुंडी असल्याप्रमाणे."प्रसाद विचार कर! या रस्त्यानी गेलो तर परत इथून येऊ शकणार नाही. " प्रधान बोलले. " आता काही झालं तरी पुढे जायचं सर." प्रसाद बोलला. दोघे त्या उतारावर बसताच मागचा दरवाजा बंद झाला. कोणालाच संपर्क अशक्य होता. मोबाईल, वॉकी टॉकी बंद पडले होते.दोघं घसरत जमिनीच्या कितीतरी फूट खाली गेले.उतार संपताच नव्हता. शेवटी २ तास घसरल्यावर त्यांना सपाट जमीन लागली. वेगानी घसरून त्यांना चक्कर येत होती. जमिनीच्या इतक्या खालीही हवा ताजी होती. कुठूनसा उजेडही येत होता. आजुबाऊल लक्ष जाताच ते एका प्रचंड राजवाड्यात उभे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समोरच एक बंद दालन होते. त्याला कोणतेही कडी- कुलूप नव्हते. ते कसे उघडायचे हा प्रश्न होता. त्याच्या दारावर एक माणूस होमात स्वतःचं रक्त अर्पण करतो आहे असं चित्र होतं. प्रधान सरांनी तात्काळ जवळच्या चाकूने स्वतःचं बोट कापलं आणि रक्त त्या होमाच्या चित्रावर लावताच प्रचंड आवाज करत ते दार उघडलं. ते एक खूप मोठं दालन होतं. त्यात एक २५ फूट लांब आणि ६ फूट रुंद पेटी होती. त्यावर संस्कृतात लेख लिहिला होता. तो वाचून प्रसादच्या अंगावर सर्रकन काटा आला. शेवटी त्यांना तो मिळाला होता.
"मी राक्षसराज रावण. मृत्यू हे जगातील अंतिम सत्य ! तो अटळ आहे. परंतु मला तो मान्य नाही. माझं शरीर, बुद्धी सगळं नष्ट होणार, ज्या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान आहे. मी हे सोडू शकत नाही. मला हे टिकवलंच पाहिजे. आज मला हे टिकवण्याचा मार्ग सापडला. हे जंगली लोक ती विद्या जाणतात ज्यांनी शरीरातून गेलेला प्राण परत येऊ शकतो. त्यांनी थोड्याशा द्रव्याच्या मोबदल्यात मला अमर करायचं वचन दिलं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा महाल जमिनीतील या अगम्य ठिकाणी येईल. सूर्य - ग्रह नक्षत्र योग्य स्थानी आल्यावर, या जमातीचा प्रमुख मंत्र म्हणून मला उठवेल. ही जमात माझे रक्षण करेल. कारण तेही अमर आहेत.मी उठेन! जगावर राज्य करण्यासाठी! मृत्यूला मी हरवीन. ज्याचे नशीब थोर असेल तोच माझी हि जागा पाहू शकेल. हे मृत्यू मी येत आहे तुला जिकंण्यासाठी."
प्रसादनी लेख वाचून संपवला. अचानक त्याचे लक्ष छताकडे गेले. तिथे एक महाप्रचंड आरसा होता. त्यात साक्षात राजाधिराज रावणाचे शव दिसत होते. २० फुटी प्रचंड देह. चेहरा अतिशय क्रूर, ज्याला पाहून थरकाप व्हावा. आताच झोपेतून उठेल इतका टवटवीत. अंगावर हिऱ्याचे दागिने त्याचे प्रतिबिंब वरील आरशात पडत होते. दोघेही मंत्रमुग्ध होऊन बघत होते. अचानक जमिनीला हादरे बसू लागले. "प्रसाद लवकर बाहेर चल." प्रधान त्याला ओढत म्हणाले धावतच ते बाहेर आले. ते संपूर्ण दालन मोठा आवाज होऊन जमिनीत खोलवर नाहीसे झाले. त्या जागेवर वेगाने पाणी भरू लागले. दोघं पोहत पोहत समोर दिसणाऱ्या भूयारात शिरले. थोड्याच वेळात ते धबधब्याजवळ आल्याचे त्यांच्या लक्षात आले. पटकन ते समोरच्या खाचेत चढले. तिथून बाहेर पडायचा मार्ग होता. रावण आता कोणालाही दिसणार नव्हता. तो पाहिल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याजवळ नव्हते. ग्रह, तरी योग्य जागी आले कि रावणाला आयुष्य मिळणार होते. रावण परत येणार आहे जगावर राज्य करण्यासाठी. प्रसाद आणि प्रधान सर यांनी हा अनुभव मनातच ठेवायचे ठरवले.कारण काही अनुभव हे फक्त स्वतः साठी असतात. हे त्यांना समजले होते. एकमेकांचाआधार घेत ही गुरुशिष्याची जोडी त्यांच्या मुक्कामी परत निघाली होती.
सौ. संपदा राजेश देशपांडे