शहारा
शहारा
तयार होऊन आरशात बघताना त्याने तिला छान दिसते अशी खूण केली.ती लाजली.अन् तिच्या लक्षात आले घरात ती एकटीच रहात होती...
सकाळी उठताना त्याने तिचा हात धरला..इश्श्य असे म्हणत ती वळली , त्याचा हात धडाशिवाय तिच्या हातात राहिला.अन् तिच्या घशातील किंकाळी बाहेर न येताच शांत झाली ..
रस्त्यावरून चालताना अंगावर येणाऱ्या फांदीला तिने चार वेळा बाजूला केले आणि तिच्या लक्षात आले पहिली फांदी दोन किलोमीटर आधी आली होती. मागे वळून न बघता तिला कळले ते झाड तिचा पाठलाग करत होते....
थकून भागून तो घरी आला ,आईने दिलेले ताट हातात घेऊन जेवायला बसला. पाणी पिण्यासाठी तो जेव्हा उठला तेव्हा आईचा फोटो रिकामा होता..
नवऱ्याच्या दहाव्या दिवशी सासूने दिवा उचलून पाहिले तर तिला मांजराची अस्पष्ट पावले दिसली. आणि नवरा गेल्यापासून घरात शिरलेल्या बोक्याची तिला भीती वाटायला लागली.
आई गेल्यानंतर तिची साडी नेसून जेव्हा ती घरात वावरत होती.तेव्हा तिला जाणवत होते की वडिलांची नजर तिचा पाठलाग करत होती.रात्री जेव्हा झोपेत वडिलांनी तिच्यावर झडप घातली तेव्हा तिला कळले आईचे वाक्य,"भुताची भीती वाटत नाही मला ,ते अस्तित्वात आहे की नाही माहित नाही,पण माणूस असतो आयुष्यभर रहातो .आणि काही झाले तरी पाठ सोडत नाही "शांतपणे उठून तिने पाटा वडिलांच्या डोक्यात घालून आईच्या फोटोकडे बघून म्हणाली," आपण ठरवले तर माणसालाही होत्याच नव्ह्ते करू शकतो आपण".
गाडी बोगद्यात गेली आणि त्याला समोरची मुलगी डोकं हातात घेऊन केस विंचारताना दिसली.त्याच्या मानेवरचे केस भीतीने उभे राहिले.गाडी बोगद्यातून बाहेर आली आणि तिचा गॉगल घातलेला चेहरा त्याला दिसला.आता पाहिलेले सत्य की स्वप्न ह्या विचारात असताना त्याच्या पायाजवळ घरंगळत काहीतरी आले,खोबणी तून बाहेर आलेला डोळा त्याला खुणावत होता . यापुढचा एक दिवस आता गाडीत कसा काढायचा ह्या विचाराने त्याला घाम फुटला.

