Suresh Kulkarni

Thriller

2.4  

Suresh Kulkarni

Thriller

सावज !

सावज !

7 mins
17.9K


 सनसेट 'पाहण्यासाठी साक्षी रिसोर्टमधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. रिसॉर्टपासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता. संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रापर्यंत जात. रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता. मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठपर्यंत माणसांची वर्दळ चालू असे. पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला आली तेव्हा तिच्या लक्षात आले की मोबाईल रूममधेच विसरलीये. ती परत लिफ्टकडे गेली तर लिफ्ट बंद होती. लाईट गुल झाले होते ! आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले. तासा दीड तासांचा तर प्रश्न होता. साडे सहाला जरी परत निघालो तरी सात सव्वासातपर्यंत रिसॉर्टला परतू. मग निवांत गॅलरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू. इथली कॉफी मात्र भन्नाट असते ! असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली.

तिची आणि सदानंदाची ओळख याच समुद्रावर झाली होती. आता त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. तसे ते दोघे नेहमीच येथे येत. सारा परिसर ओळखीचा होता. यावेळेस थोडी गडबड झाली होती. अचानक सदाला ऑफिसचे अर्जेंट काम निघाले. तो सकाळी तिला जॉईन होणार होता इतकेच.

सूर्योदयापेक्षा समुद्रावरला सूर्यास्त साक्षीला खूप आवडायचा. निळा, पिवळा, लाल रंगांचे मिलन, ग्रे कलरच्या समुद्रावर विलोभनीय असते, शिवाय त्यांचे प्रतिबिंब ! माणूस हिप्नोटाईझ होऊन जातो ! 'सूर्यास्त पहावा तर समुद्र किनारी आणि सूर्योदय पहावा तर हिमालयाच्या पर्वत राईत !' असे ती सदाला नेहमी म्हणायची. सूर्यास्तानंतरही हा 'नजरबंदी 'चा खेळ चालूच रहातो, अर्थात थोडा वेळ. साक्षीचा काही लवकर पाय निघत नसे. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता.

ती परत फिरली तोवर इतर पर्यटकांची वर्दळ बरीच कमी झाली होती. ती झपझप पावले टाकत निघाली. रस्ता सरळच होता. दहा पंधरा मिनिटात रिसॉर्टचे लाइटिंग नजरेच्या टप्प्यात येणार होते. रूममध्ये फ्रेश होऊन कॉफी मागवावी, गॅलरीतल्या एका खुर्चीवर आरामात बसून समोरच्या खुर्चीवर पाय पसरावेत अन सदूड्याला फोन लावावा. साक्षीचे विचार आणि पाय वेगाने रिसॉर्टकडे निघाले होते.

अपेक्षित अंतर चालूनही समोर कोठेच रिसॉर्टचा मागमूस दिसत नव्हता! आता रस्ताही निर्मनुष्य झाला होता ! दिवस केव्हाच मावळा होता. एव्हाना हॉटेल यायला हवे होते! आपण वाट तर चुकलो नाही ना? तिच्या मनात पाल चुकचुकली! छे, कशी चुकेल ? आपण सरळच चालत आहोत,कोठेही वळण घेतलेले नाही! अंधार दाटत होता. चांदण्यांचा मंद प्रकाश रस्त्यापर्यंत पोहचत नव्हता! ती नेटाने चालत होती. कुठल्याही क्षणी रिसॉर्टचे लाईट दिसतील ही तिची आशा क्षणाक्षणाला मावळत होती! काळोखाची भरती वाढतच होती! अंधाराच्या लाटा त्या किर्रर्र जंगलाच्या ध्यानस्थ झाडांच्या खोडावर आदळून फुटत होत्या! काळ्या प्रकाशाच्या छायेन सगळंच गिळून टाकलं होतं! साक्षी पूर्ण हतबल झाली होती. तिला रात्रीच्या वेळेचा अंदाज पण येत नव्हता. मोबाईलची प्रखरतेने आठवण होत होती. ती या समुद्र किनाऱ्याच्या जंगलात हरवली आहे, याची तिला आता खात्री पटत चालली होती !

०००

गाडीतून दूर अंतरावर तिची अंधुक आकृती त्याला दिसली. ती एक तरुणी होती आणि एकटीच होती. तो गालातल्या गालात हसला! सावज.... प्रयत्न करायला मुळीच हरकत नाही! त्याने गाडीचे हेडलाईट ऑन केले. प्रखर प्रकाश झोतात ती दोन्ही हात उंचावून गाडी थांबवण्याची विनंती करत होती! याला म्हणतात नशीब! त्याने सावकाश गाडी तिच्याजवळ उभी केली. अपेक्षेपेक्षा ती खूपच सुंदर होती! स्लिम फिट जीन्स आणि टी-शर्टमध्ये आकर्षक पण दिसत होती! पण त्याला तिचा सुंदर चेहरा किंवा फरफेक्ट फिगरशी काही देणं घेणं नव्हतं! फक्त ती एकदा गाडीत बसलीकी त्याचा उद्देश सफल होणार होता!

"एस मॅडम, एनी प्रॉब्लेम ?" त्याने अतिशय सौम्य आणि मृदू आवाजात विचारले. घाई करून चालणार नव्हते. ती भडकेल असे वागूनही चालणार नव्हते! गाडीत बसेपर्यंत नो जोर जबरदस्ती!

"अहो बहुदा मी माझ्या विचाराच्या नादात या जंगलात रस्ता चुकतेय! प्लिज मला जवळच्या रिसॉर्टपर्यंत लिफ्ट द्या! नाही म्हणू नका!" साक्षीने कळकळीने विनंती केली. त्याच्या होकार, नकाराची वाट न पहाता ती मागच्या सीटवर घुसली आणि झटक्यात दार लावून घेतले. तो गालातल्या गालात हसल्याचा तिला भास झाला .

गाडीच्या आतले वातावरण थंडगार होते. बहुदा ए.सी. फुल असावा.

"मॅडम तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू?" त्याने सावकाश गाडी स्ट्रार्ट करत विचारले.

"हो पण आधी तो तुमचा ए.सी. बंद करा! मला हुडहुडी भरतीय!"

"ओ,सॉरी!" त्याने ए.सी. बंद केला. शेजारच्या सीटवरील थर्मास मधून गरमागरम कॉफीचा एक मग भरला आणि साक्षीला दिला. त्याने पुन्हा ड्रायव्हिंंगवर लक्ष केंद्रित केले.

"ओ, कॉफी, माय एनी टाइम फेव्हरेट ड्रिंक! थँक्स! आणि खरे सांगू मला या क्षणी याची खूप खूप गरज होती."

कॉफी पिताना साक्षी त्याला न्याहाळीत होती. तो सहा फुटाच्या आसपास असावा, जिमचे शरीर कपड्यातूनही नजरेला जाणवत होते! व्यवस्थित कापलेले केस. ट्रिम केलेली ऐटबाज हलकी दाढी. डल कलरचा तरी भारी सूट आणि सगळ्यात अपिलिंग होता तो त्याचा आवाज. किंचित खर्जातला, मर्दानी हुकूमत गाजवणारा. असा आवाज सदाचा पाहिजे होता. साक्षीला वाटून गेले.

"मॅडम, आर यू ओके?"

"हो मी ठीक आहे. तुम्ही मघाशी काहीतरी विचारणार होताना?"

"काही नाही, माझ्या गाडीत बसताना तुम्हाला भीती नाही वाटली?"

"खरं सांगू, थोडीशी वाटलीच. पण आता वाटत नाही. तुम्ही एक सुशिक्षित आणि सदगृहस्थ आहेत!"

अन भीती वाटून काय उपयोग होता, तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. रिस्क तर घ्यावीच लागणार होती.

"थँक्स, तो तर मी आहेच. अजून एक अशा भयानक रात्री तुम्ही एकट्याच या जंगलात काय करताय? आणि तुमचं नाव काय?"

"मी साक्षी, त्याच काय झालं मी 'सन-सेट...." साक्षीने आपली सगळी हकीकत सांगितली आणि विचारले.

"बाय द वे, तुम्ही काय करता?"

" मी काहीच करत नाही. मला काही करायची गरजही नाही. मी फक्त संधीची वाट पहात होतो आणि तुम्ही ती मला दिलीत."

साक्षीच्या पोटात खड्डा पडला. शेवटी यांच्यातला पुरुष जागा झाला तर, समोर काचेतून लोकवस्तीच्या खुणा, काही लाईटचे खांब दिसत होते.

"मिस्टर गाडी येथेच थांबवा." साक्षी कठोर आवाजात म्हणाली.

" येस मॅडम, मी थांबणारच आहे आणि येथेच." त्याने गाडी थांबवली आणि इंजन बंद केले. काय होतंय हे कळायच्या आत तो साक्षीच्या दारापुढे उभा राहिला. दुसरे दार उघडण्याचा साक्षीने प्रयत्न केला. पण ते उघडले नाही. खिडकीच्या काचा पण बंदच होत्या. ती पूर्णपणे गाडीत बंदिस्त झाली होती.

"मॅडम शांत व्हा." कमरेवर दोन्ही हात ठेऊन तो गाडी बाहेरून बोलत होता. सगळी गाडी बंद असूनही, त्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता.

"मॅडम तुम्हाला वाटतंय तस काहीही नाही. मी तुमच्या असहायतेचा फायदा घेणार नाही."

"आणि मी तुला तो घेऊ पण देणार नाही." साक्षी दृढनिश्चयाने म्हणाली.

"मी तुम्हास स्पर्शही करणार नाही. आधी तुम्ही शांत व्हा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. फक्त तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहेत हे तुम्हास सांगितले की मी 'मोकळा' होईन."

"मोकळा, म्हणजे?"

"सांगतो. आता तुम्ही जश्या या गाडीत आपणहुन बसलात, तसाच मीही आपणहून या गाडीत बसलो होतो."

"बसलो होतो? कधी? म्हणजे ही गाडी तुमची नाही?" ही सगळी काय भानगड आहे हे साक्षीला कळत नव्हते.

" नाही, ही माझी गाडी नाही आणि लिफ्ट घेऊन किती दिवस झाले? की किती वर्ष झाली? मला माहित नाही. पण मीही तुमच्यासारखाच अडचणीत होतो आणि स्वखुशीने गाडीत आलो होतो."

"मग?"

"मग काही नाही. असेच कुणीतरी तुमच्या या गाडीत स्वखुशीने बसेल तेव्हा तुमची सुटका होईल. जशी आता माझी होतीय."

"अरे बाबा मला कळेल असे सांग."

"साक्षी मॅडम, या गाडीत तुमचा आत्मा अडकलाय."

"वाट डू यु मिन?" साक्षी किंचाळली.

"होय, तुम्ही जेथे गाडीत बसलात तेथेच तुमचा रिकामा देह अजूनही पडलेला आहे. तुमचे देहावसान झाले आहे. तुम्ही मेलात आणि या गाडीरुपी पिंजऱ्यात तुमचा आत्मा अडकलाय. या गाडीची दार तुमच्यासाठी तेव्हाच उघडतील जेव्हा एखादा आत्मा स्वखुशीने आत येईल. तो आत येईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. माझ्यासारखे....थँक फॉर लिफ्ट. ऑल दि बेस्ट, बाय"

पहाता पहाता तो हवेत विरघळून गेला.

००००००

दूर अंतरावर त्याची अंधुक आकृती तिला गाडीच्या काचेतून दिसत होती. तो उंचपुरा तरुण होता आणि एकटाच होता. ती गालातल्या गालात हसली. सावज... प्रयत्न करायला मुळीच हरकत नव्हती.

तिने गाडीचे हेड लाईट्स ऑन केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller