Jyoti gosavi

Classics

4.0  

Jyoti gosavi

Classics

सांज

सांज

3 mins
240


सांज, तिन्हीसांज, संध्याकाळ ही सारी एकाच अर्थाने घेतली जाणारी नावे दिवस आणि रात्रीच्या उंबरठा म्हणजेच संध्याकाळ तिन्हीसांजेची ही कातर वेळ मनाला मोठी हुरहुर लावणारी असते . हातातून काहीतरी निसटत असल्याची भावना निर्माण होते. 

सूर्य अस्ताला जात असतो, पक्षी आपापल्या घरट्याकडे निघालेले असतात.शेतामधून गुरे वासरे घरी परत चाललेले असतात, आणि शहरांमध्ये चाकरमानी घराच्या ओढीने गाड्यांना लटकत घरी येतात . 


तिन्ही सांजेचे अजून एक दृश्य ,मुळात त्याला शब्दच सांजवात आहे. 

म्हणजे अंधार पडतो आहे, कदाचित असुरी शक्तीच प्रॉबल्य होत आहे, आणि अशावेळी "तमसो मा ज्योतिर्गमय" अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा, म्हणजेच सांजवात देवापुढे लावली जाते. 

घरात लहान मुले देवापुढे शुभंकरोती म्हणतात. "दीपज्योती नमोस्तुते" म्हणतात, रामरक्षा म्हणतात त्याचवेळी स्वयंपाक घरातून आमटी, भाजी ,भाकरी याचे खमंग खरपूस वास येत असतात. 


, कोणीतरी रमणी आपल्या पती राजाची, आपल्या सजणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते.आणि अनामिक ओढीने गुणगुणत असते, 


"झाल्या तिन्हिसांजा

 करुन सिणगार साजा

 वाट पाहते मी ग 

येणार साजन माझा"


याच "तिन्ही सांजा" या शब्दावर ती अजून एक काव्य


आजपासुनी जिवे अधिक

 तू माझ्या हृदयाला

तीनी सांजा सखे

 मिळाल्या, देई वचन तुला..


तू मला माझ्या जीवा पेक्षा अधिक आहेस. असं वचन मी तुला या संध्याकाळी देतो. तो प्रियकर तिन्हिसांज किंवा संध्याकाळ झाल्यावर असे नाही म्हणत. वेळ जरी संध्याकाळचीच सुचवायची असली तरी त्याला त्याहूनही अधिक काही सुचवायचं असावं. तीनी – सांजा मिळाल्या असे म्हणतो आहे. मराठी शब्द तिनिसांज आणि तिहिसांज मिळून बोली भाषेत तिन्हीसांज असा झाला असावा कदाचित. दोन्हीचा अर्थ संध्याकाळ. संस्कृतमध्ये संध्या-काल. किंवा दिवस आणि रात्र यांचा संधि काल. पण राजकवी भा रा तांबे तिन्ही सांजा असं म्हणतात. आणि त्या देखील मिळाल्या असं म्हणतात. आणि आशावेळी हा प्रियकर त्याच्या सखीला हे वचन देतो आहे. पहिली सांज उन्हे उतरू लागल्यावर होते, दुसरी सूर्य मावळल्यावर, तर संधिप्रकाशाची वेळ म्हणजे तिसरी सांज. अशा तीनही सांजा मिळण्याची वेळ, म्हणजे मधली सांज, अर्थात सूर्य मावळतानाची. ही तीनही सांजा मिळण्याची वेळ, संधिकाल अर्थात बोली भाषेत संध्याकाळ. संध्याकाळ ही प्रेमी युगुलांची आवडती वेळ. कुणी लांबून पहिलं तर ओळखू येणार नाही पण एकमेकांना मात्र दोघेही स्वच्छ पाहू शकतात, नाही का? म्हणून आवडती. प्रेम विव्हल करणारी, हळवेली वेळ. अशा वेळी प्रेमी युगुलांच्या आणाभाका चालतात.


 जेवढा सकाळचा सूर्योदय मनाला भावतो ना ,तशीच ही सांज मनाला भावते.एक अनामिक हुरहुर जीवाला लागत असते, ती एक कातर वेळ असते. कुठेतरी अस्त होत असतो, अस आणि म्हणतात ना लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, राजकवी भा. रा. तांबे" यांनीमात्र मावळत्या दिनकरा" मध्ये त्याला नमन केलेल आहे .आणि एक  हूरहूर व्यक्त केलेली आहे.

त्या सांजेचे वर्णन खूप गाण्यांमध्ये, कविते मध्ये कित्येक नामवंत कवींनी केलेले आहे.


"सांज ये गोकुळी

 सावळी सावळी

 सावळ्याची जणू

 मूर्त साकारली


 म्हणजे त्या  श्यामल अंधाराला देखील त्यांनी सावळ्याची उपमा दिलेली आहे .

बालकवींनी तर म्हटलेलेच आहे

 "कुठे बुडाला? पलीकडे, 

  तो सोन्याचा गोळा


 म्हणजे त्याच्या पुढे नंतर सांज होणारच असते.


कवी भा रा तांबे यांनी तर "ढळला रे ढळला दिन सखया

 संध्याछाया भिवविती हृदया

 कधी कविंना संध्याकाळ आवडते तर कधी ती भीतीयुक्त अभिव्यक्ती असते. 

माणसांचं देखील असंच नाही का जोपर्यंत तुम्ही माध्यानिचे सूर्य असता, तोपर्यंत तुम्हाला सारे नमस्कार करीत असतात. जोपर्यंत तुम्ही आपल्या घरा दारासाठी सार काही करत असता, त्यांच्या डोक्यावर छप्पर बनून राहता ,त्यांचे आधारस्तंभ होता, तोपर्यंत तुम्हाला सारेच नमस्कार करतात. परंतु एकदा का जीवनाचा सूर्य उतरणीला लागला किंवा मावळतीला आला हे सारेच त्याकडे पाठ फिरवतात .ही तर जगाची रीतच आहे त्यापेक्षा आपण स्वतः स्वतःला जर ओळखलं आणि आता पैल तिर दिसू लागतोय, जीवनाचा सूर्य मावळतीला उतरला आहे .आता ही जीवनाची सांज आहे अशावेळी सगळ्या मोहपाश बंधनातून स्वतः स्वतःला मुक्त करून


 "न ऊल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली"


 असा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याच प्रियजनांनी आयुष्याच्या उतार काळात दिलेले दुःख, केलेले दुर्लक्ष मनाला क्लेश देणार नाहीत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics