Prajakta Yogiraj Nikure

Drama

5.0  

Prajakta Yogiraj Nikure

Drama

साहस

साहस

5 mins
1.7K


प्राची बॅंकेत नोकरीस लागल्यापासून तिने फार सुट्टया घेतल्या नव्हत्या. रोजच्या धावपळीतून ती थकली होती. रोज घरातले आवरून बॅंकेत जाणे, बॅंकेत अकाऊंटचे काम करणे, रोजचे हिशोब ठेवणे यामुळे तिला खूप थकवा आला होता. तसंही तिच्या सुट्ट्या बर्‍याच बाकी होत्या. तिने काही दिवस रजा घेऊन बाहेरगावी जाण्याचे ठरविले. तिने त्याच दिवशी बॅंकेत रजेचा अर्ज केला आणि तो मंजूरदेखील झाला. घरी आल्याआल्या तिने आई - वडिलांना आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून टाकले. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गडचिरोलीमधील एक नयनरम्य गाव सुचविले. तीही त्या ठिकाणी जाण्यास तयार झाली. तशी तिने तयारीदेखील केली. 15 दिवस ती तेथे राहणार होती म्हणून आवश्यक असणारे सर्व काही सामान तिने आपल्यासोबत घेतले. तिला फोटोग्राफीची खूप आवड होती, म्हणून तिने कॅमेरा, लॅपटॉपदेखील सोबत घेतला.

 

रेल्वेत बसल्यानंतर तिच्यासमोर त्या गावाचे चित्र उभे राहू लागले. हिरवेगार शेत, ठिकठिकाणी भरपूर झाडे, संत्र्याची बाग, विविध रानातील रानमेवा जो शहरात पहावयासदेखील मिळत नाही. नयनरम्य असे गाव जिथे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी यांचे दर्शन होते. तेथे पुरातनकालीन मंदिर, अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी त्या गावातून वाहत असलेली नदी, मातीची कौलारू घरे, समोरच परसबाग असं बरंच काही तिला आपल्या डोळ्यांसमोर दिसत होते. हळूहळू पुणे मागे पडत चालले होते, झाडे पळू लागली होती. थंडगार वारा खिडकीच्या आत येत होता. ती खूप आतूर झाली होती की मी कधी एकदा गडचिरोलीला पोहचते. तिच्या मनात एक गाणे सतत येत होते, "हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे गीत गा रे दुमदुमा रे...लालालाला..." 


18-19 तासांनंतर ती गडचिरोलीला पोहचली. ती त्या क्षणाचीच वाट पाहत होती आणि तो क्षण आता तिच्यासमोर आला होता. ती गडचिरोलीला येऊन पोहोचली होती. तो भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. त्या झाडीपट्टीत ती आली होती. तेथील बराचसा भाग आदिवासी होता. आदिवासी लोकांची वस्ती तेथे मोठय़ा प्रमाणात होती. आदिवासी लोक निसर्गावर खूप प्रेम करतात निसर्गाशी ते एकरूप झालेले असतात. निसर्गच त्यांचे घर आणि देव असतो. प्राचीला त्यांच्याकडून बरेचसे शिकायला मिळणार होते. त्या गावात आदिवासींची वस्ती होती. प्राची त्या गावात गेल्यानंतर त्यांनी तिला राहायला जागा दिली, तिचा तेथे पाहुणचार केला, तो भाग आदिवासी असूनदेखील तेथील लोकांनी आधुनिकता स्वीकारली होती. त्या गावातील सर्व लहान मुले - मुली शाळेत जात होती, गावात रस्तेदेखील व्यवस्थित होते. त्यांनी सौरऊर्जेचा वापर करून त्या गावात वीज आणली होती. गावात सांडपाणी, कचरा याची व्यवस्थादेखील उत्तम केली होती. त्यांनी हे सर्व सरकारकडून कसलीही मदत न घेता केलं होतं. त्यांनी दाखवून दिलं होतं की ते हे सर्व काही करु शकतात. 


प्राचीने त्या गावात जाऊन खूप धमाल केली. विविध प्राणी, पक्षी, निसर्गरम्य जागेचे फोटो काढले. आदिवासी गावकऱ्यांमध्ये एकजण खूप हुशार असा विद्यार्थी होता. तिने त्या विद्यार्थ्यासोबत जंगलातील प्राणी, पक्ष्यांचे फोटो काढण्याचे ठरवले. त्याचे नाव प्रथमेश होते. तो 9वी मध्ये शिकत असल्याचे त्याने सांगितले. तसा तो धाडसी, हुशार आणि गुणी होता. त्याच्या वर्गात तो नेहमी नावाप्रमाणेच प्रथम श्रेणीतच येत होता. त्याला जंगलातील सर्व प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली तसेच तेथील बर्‍याच गोष्टींची अचूक माहिती होती. त्यालादेखील प्राचीसोबत बरेचसे काही नवीन शिकायला मिळणार होते. त्याचे मन सतत काहीना काही नवे शिकण्यासाठी आतुर असे त्यामुळे तोदेखील प्राचीसोबत फोटो काढण्यासाठी लगेच तयार झाला. असेच ते जंगलात फिरत होते. प्राची जंगलातील प्राणी, पक्षी यांचे फोटो काढत होती. प्रथमेश तिला प्राणी-पक्षी तसेच विविध झाडांबद्दल माहिती सांगत होता. त्याचे वडील कधीकधी जंगलात मध, रानमेवा गोळा करण्यासाठी येत असत. त्यांच्याबरोबर प्रथमेशदेखील येत असे. सावधगिरीने प्राचीने अनेक प्राणी, पक्षी यांचे फोटो काढले पण तिला व प्रथमेशला कसली तरी भनक लागली. त्या जंगलात अतिशय दाट झाडी होती. त्या झुडपात कोणाची तरी हालचाल होत होती. प्रथम ते दोघेही घाबरले पण नंतर हळूच दबक्या पावलाने कोणालाही आपली चाहूल लागू नये या पद्धतीने ते दोघेही त्या झुडूपाजवळ गेले आणि समोर त्यांनी जे पाहिले ते अगदी भीतीदायक होते. ते सर्व पाहून दोघेही अगदी गळून गेले. त्यांनी लवकरात लवकर जंगलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि खूप सावधगिरीने ते दोघेही जंगलातून बाहेर पडले. प्राची व प्रथमेशची तर बोबडीच वळली होती. काय करावे नि काय करू नये हेच त्यांना कळत नव्हते. पण काहीतरी त्यांना करावेच लागणार होते. नाहीतर फक्त आणि फक्त विनाशच झाला असता.

  

प्राची व प्रथमेश त्या गावाच्या सरपंचाकडे गेले. त्यांनी जंगलात काय पाहिले ते सांगितले. त्या झुडुपाच्या मागे दहशतवादी आपापसांत बोलत होते. त्यांनी भारताची उपराजधानी असलेल्या मुंबई शहरात आणि त्यापाठोपाठ पुणे शहरावर आतंकवादी हल्ले करण्याचा प्लॅन तयार केला होता. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनादिवशी ते हा हल्ला करणार होत. अनेक ठिकाणी साखळी बॉम्ब ठेवून ते भारताला हादरवून ठेवणार होते. ते सर्व दारूच्या नशेत असल्याने त्यांना प्राची व प्रथमेशची चाहूल लागली नाही, नाहीतर आज त्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले असते.


सरपंच त्यांना म्हणाले की, आता तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या आपण थोडया वेळाने बोलू पण ही गोष्ट फक्त आपल्या तिघातच राहिली पाहिजे, ही गोष्ट इकडची तिकडे होता कामा नये नाहीतर आपण कोणालाच वाचवू शकणार नाही. सरपंच प्राचीला घरापर्यंत सोडवायला आले. सरपंच गेल्यानंतर प्राचीने आपला कॅमेरा चेक केला तर तिला त्या कॅमेऱ्यात त्या दहशतवादी लोकांचे फोटो क्लिक झाल्याचे दिसले. त्यावर तिने खूप विचार केला व एक निर्धार केला की, ती कोणत्याही परिस्थितीत या आतंकवादी लोकांचा प्लॅन पूर्ण होऊ देणार नाही. तिने ते फोटो सरपंचांना दाखवले आणि सरपंचांना तिची योजना काय आहे ती समजावून सांगितली. यानंतर प्राचीने गुप्त पद्धतीने गुप्तहेरांना याबद्दलची माहिती दिली, त्यांना या गावात बोलावले तसेच काही आर्मीमधील व पोलिस दलातील अधिकारी सामान्य नागरिक म्हणून त्या गावात आले. त्या गावातील लोकांप्रमाणे पेहराव केला आणि त्यांचे मिशन सुरू झाले. गुप्तहेर त्या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची बारीक नजर होती. त्यांची योजना जाणून पोलिस अधिकारी त्यांच्यापुढे दोन पावले चालू लागले.

 

यात सर्वांत अधिक धोके होते परंतु ते उचलावेच लागणार होते. पोलिसांनी ते दहशतवादी गाफील असतानाच त्यांना आपल्या ताब्यात घेतले व त्यांच्या सर्व योजनांवर पाणी फिरले. त्यांची सर्व योजना पोलिसांनी निष्फळ केली. आपला भारत देश वाचला हा एकच आनंद त्यांना झाला. सर्व गाव त्या आनंदात न्हाऊन गेले. गावात प्राचीचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाकडून प्राचीच्या या शौर्याबद्धल व साहसबद्धल तिचा सत्कार करून तिला शौर्यपदक देण्यात आले. आज तिच्या साहसामुळे एक मोठे संकट टळले होते, तिने त्यावेळी घाबरून न जाता डोके शांत ठेऊन या संकटाचा सामना केला, या संकटाला निर्धाराने तोंड दिले. त्यात तिला त्या गावच्या सरपंचांनी व सैन्य दलातील, पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी मदत केली. या सर्वांच्या समयसूचकतेमुळे एक मोठे संकट टळले व ते सर्व दहशतवादी कैदेत सापडले. या सर्वांच्या साहसाबद्दल, शौर्याबदद्ल आमचा प्रणाम.

"जय हिंद" या एकाच नाऱ्याने ते सर्व गाव दुमदुमून गेले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama