वास्तव
वास्तव


" हाय, मला तुला काहीतरी सांगायच आहे पण तू हे सांगशील ना सगळ्यांना. ऍक्च्युली तुला कसं सांगू हे नाही कळतेय मला पण खूप दिवसापासून चालू होतं तुला या गोष्टी सांगाव्यात. आज हिंमत करतीये आणि माझ्या आयुष्यामधली एक कडवट बाजू तुला सांगणारे कदाचित तू ही गोष्ट सगळ्यांना सांगू शकशील. मला फक्त एवढंच वाटतं जे माझ्यासोबत घडले ते इतर कोणासोबतही घडायला नकोय. ज्या घटनेला मी तोंड दिले जी वेळ माझ्यावर आली होती ती वेळ इतर कोणावर ही येऊ नये हीच माफक अपेक्षा आहे माझी फक्त. जेव्हा तू ऑनलाईन येशील तेव्हा मला हाय मेसेज कर. माझ्या आयुष्यामधील हे वास्तव मला तुला सांगायचं आहे प्लीज तुझी एक मैत्रीण म्हणून मी नक्कीच सांगू शकते तुला"
एवढा मोठा अनोळखी आलेला मेसेज बघून मी देखील त्या मेसेजला रिप्लाय दिला, कदाचित ती माझी मैत्रीण अडचणीत असेल असं वाटून मीसुद्धा तिला मेसेज केला तिला विचारलं,"तुला जे काही सांगायचं आहे ते तू बिंदास मला सांगू शकतेस जर माझ्याकडून तुला काही मदत झाली तर नक्कीच मला आवडेल तुझी मदत करायला निसंकोचपणे तू माझ्याशी बोलू शकतेस" माझा आलेला मेसेज बघून समोरच्या व्यक्तीने सुद्धा लगेच रिप्लाय केला .
"हाय, मी मानसी मूळची नागपूरची. मला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती पण कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये ह्या गोष्टी कळत नव्हत्या पण का माहित नाही तू अनोळखी असून सुद्धा मला तुला ही गोष्ट सांगावीशी वाटते, कदाचित तू ही गोष्ट सर्वांसमोर मांडू शकतेस म्हणून सुद्धा, खरं तर खूप हिम्मत करून ही गोष्ट मी तुला सांगणार आहे. जी आजपर्यंत कधीच मी कोणाला नाही सांगू शकले कशी सांगणार होते त्यांना त्रास होऊ नये एवढंच वाटत होतं फक्त मला.
"हो तुला मला जे काही सांगायचं आहे आहे ते तु मला सांगू शकतेस अगदी निसंकोचपणे"
"आपलं आयुष्य किती विचित्र असतं ना जितकं ते आपल्याला साधं सरळ वाटतं तितकं साधं सरळ कधीच नसतं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी आपण आठवणी म्हणून मागे सोडून देतो त्यातल्या काही आठवणी आपल्याला हव्याशा वाटतात तर काही आठवणी नकोशा होतात कितीही त्या विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाही. सतत त्रास द्यायला त्या आपल्या डोळ्यांसमोर पिंगा घालत असतात. मी मूळची नागपूरची आहे. मी वडिलांच्या कामामुळे सध्या पुण्यात आहे राहायला. माझे वडील सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या सतत या ठिकाणाहून त्या ठिकाणी होत असतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही देखील फिरतीवर असतो. मला एक लहान भाऊ आहे त्याचं शिक्षण चालू आहे आणि आई गृहिणी. आत्ताच माझं शिक्षण पूर्ण होऊन आयटी कंपनीमध्ये जॉब करते मी पण खरं सांगू लग्नाचं वय झालंय म्हणून आई-बाबा सतत माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत पण फक्त या गोष्टीमुळे माझं मन तयार नाही होत. मी तिसरी-चौथीमध्ये असेल तेव्हा जेव्हा माझ्या बाबांची बदली नुकतीच मुंबईला झाली होती. मुंबईबद्दल आम्हाला आकर्षण होतं त्याबद्दल ऐकून होतो आम्ही पण प्रत्यक्षात तेथे मात्र मी तिसरी चौथीमध्ये असताना गेले होते. तो निळाशार समुद्र मला आपल्याकडे खुणावत होता. त्याच्या लाटांवर स्वार होऊन बागडावं वाटत होतं. आजही तो निळाशार समुद्र मला खुणावत असतो आणि मीदेखील नकळत त्यांच्याकडे ओढले जाते अशा बर्याच आठवणी आहेत त्या शहराबद्दल. जितकी चांगली माणसे आपल्याला भेटतात तितकी वाईट माणसे देखील भेटतात माझं आयुष्य बदलून टाकण्यासाठी तेच शहर कारणीभूत ठरलं. माझ्या आयुष्यामधील ती एक काळी बाजू त्याचा अजून पण खूप त्रास होतो अजून पर्यंत ती गोष्ट नाही विसरू शकले मी.
बाबांची बदली झाल्यानंतर आम्ही भांडुप मधल्या एका सोसायटीमध्ये घर भाड्याने घेतलं होतं. सोसायटी म्हणण्यापेक्षा कॉलनी म्हटलेलं जास्त संयुक्तिक ठरेल. तिथे लोक गुण्यागोविंदाने राहायचे. कॉलनी तशी छोटीशीच होती आणि मोजून तीस-पस्तीस घरे होती तेथे. प्रत्येक कार्यक्रमाला लोक एकत्र येऊन तो साजरा करायचे. प्रत्येकाच्या मदतीला कधीही ते धावून जात. आपल्या घरातील एक असं म्हणून सगळेजण एकत्र राहत असत. दसरा-दिवाळी, गणपतीमध्ये तर नुसतीच धूम असायची. सगळे सण समारंभ मोठ्या दिमाखात साजरे व्हायचे तेथे. लहान मुलांना प्रत्येक कलेस प्रोत्साहन मिळावं म्हणून रांगोळी, चित्रकला, नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, लिंबू चमचा, गाणी म्हणणं अश्या वेगवेगळ्या स्पर्धा तेथील सेक्रेटरी राबवत असत. कॉलनी छोटी असल्याने प्रत्येक कार्यक्रम छानपैकी पार पडला जायचा. आम्ही तेथे नवीनच गेलो होतो राहायला तेव्हा नवरात्रीची सुरुवात होणार होती म्हणून तिथल्या ताई मुलींना आणि लहान मुलांना घेऊन डान्स बसवत होत्या. मी सुद्धा लगेच त्यांच्यामध्ये सामील झाले त्या ताईंनी मलासुद्धा डान्स शिकवला त्या मुलांमध्ये मी देखील लगेच सामावून गेले. काही दिवसांमध्येच माझी आणि सगळ्या कॉलनीतल्या मुला-मुलींची ओळख झाली. मुले माझ्याच वयाची असल्याने मी त्यांच्यात सामावून गेले. कधी त्यांच्या सगळ्यांच्या घरातली झाले कळलेच नाही मला आता शाळेतून घरी आले की त्यांच्या सोबतच अभ्यास करणे दंगामस्ती करणे, खेळणे हे नेहमीचेच झाले. माझी एक मैत्रीण होती सायली तिच्या घरी जास्त येणं-जाणं चालू होतं माझं. तिचं घर आणि माझं घर शेजारी शेजारीच होतं. तिचे वडील सेक्रेटरी होते. जेव्हा सुरुवातीला तेथे राहायला आले होते तेव्हा ते खूप लाड करायचे पण मला कधी कळलच नाही त्यांच्या मनात काय सुरू आहे ते. लहान वयात आपल्याला माणसं ओळखता येत नाही. माझी हीच मोठी चूक होती कि मी त्यांच्या नजरेत पडले. सांगायला पण लाज वाटते अशी कृत्य त्यांनी लहान मुलांवर केली आहेत आज जेव्हा पण मागे वळून बघते तेव्हा त्या गोष्टींचा खूप त्रास होतो पण काही करू शकत नाही.
त्या माणसाने घरी कोणी नाही हे बघून मला त्याच्या घरी बोलावून अतिप्रसंग केला एक खेळ म्हणून पण वय लहान असल्याने मला त्या गोष्टी काही कळल्या नाही. काही दिवस सतत हे सुरू होतं पण मला काय होतंय याची शुद्धच राहात नव्हती. कोणाला काही सांगितलं तर मी तुझ्या आई-बाबांना काही पण करू शकतो हे लक्षात ठेव ही धमकी पण दिली होती त्या नीच माणसाने. आपल्यासोबत नेमकं काय घडत आहे याची जाणीव देखील होत नव्हती मला. आई भावाला जेव्हा शाळेत सोडायला जायची तेव्हा मी शाळेतून घरी आलेले असायचे आणि त्याच एका गोष्टीचा फायदा त्या नालायक माणसाने घेतला होता त्या वयात नेमकं काय घडत आहे याची जरादेखील जाणीव नव्हती मला कारण तो माणूस गोड गोड बोलून त्याचा कार्यभाग साध्य करून घेत होता आणि त्या सगळ्यांमध्ये फक्त मीच नव्हते तर त्याची स्वतःची मुलगी पण होती. तिला पण नव्हते सोडले त्या माणसाने आणि अजुन बऱ्याच मुलींबरोबर हे घाणेरडे कृत्य केले होते त्याने. माझ्या सुदैवाने काही दिवसांनी माझ्या बाबांची बदली झाली आणि आम्ही नाशिकला गेलो हळूहळू मी सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत होते पण म्हणतात ना काही गोष्टी अशा असतात की आपण नाही विसरू शकत त्यामध्ये ही एक गोष्ट. मी वयात आल्यावर आपल्यासोबत त्यावेळी नेमकं काय घडलं याची जाणीव झाली आणि पायाखालची जमीनच सरकली. खूप रडले होते तेव्हा जेव्हा या गोष्टी काय होत्या ते कळले होते तेव्हा खूप त्रास होत होता पण काही करु शकत नव्हते. आई-बाबांना सांगू पण शकत नव्हते काय घडलं आहे ते फक्त एकटीच त्या गोष्टींना सामोरे गेले. त्या माणसाला शिक्षा द्यायची होती पण वेळ खूप पुढे निघून गेली होती पुराव्यांअभावी तो नीच माणूस कधीही सुटू शकणार होता आणि माझ्याकडे त्याच्या विरोधात एकही पुरावा नव्हता पण म्हणतात ना देव त्याला शिक्षा देतो जो वाईट करतो. तो सुद्धा त्याच्या वाईट कर्माने तडफडत गेला पण आज पण अशी माणसे आपल्या भोवती फिरत असतात. त्यांची नजर गिधाडासारखी मुलींवर फिरत असते. आपली वासना भागविण्यासाठी हे लोके कुठल्याही थराला जातात . गेंड्याची कातडी पांघरून आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आज पण आपल्या समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत जी दाखवतात की मी किती चांगला माणूस आहे म्हणून, पण खरं काय आहे हे कधी ना कधीतरी समोर येतंच. आज घराबाहेर पडतानासुद्धा अश्याच घाण नजरा मुलींवर पडत असतात. मला फक्त तुला हेच सांगायचं होतं की लहान वयात काही गोष्टी आपल्यासोबत घडतात ते वय असं असतं की मेंदूवर त्या गोष्टी आयुष्यभरासाठी कोरल्या जातात. त्यातल्या चांगल्या गोष्टी असोत किंवा वाईट गोष्टी. हे कोणासोबत अजून घडायला नको म्हणून मला तुला सांगायचं होतं.
तिचा एवढा मोठा मेसेज वाचून मी तर सुन्न झाले होते. काय बोलावं हे देखील कळतं नव्हतं. तिला फक्त धीर देऊ शकले मी पण तीच आता दुर्गेचं रूप होऊन या राक्षसांना धडा शिकवणार होती. लहान वयात मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा हे सांगितलं तर, त्यांना आत्मसंरक्षण शिकवलं तर, थोर महापुरुषांबद्दल माहिती दिली तर, मुलींना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर, लहान वयात मुलांना शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला लावले तर ही परिस्थिती नक्की बदलू शकेल ना. निदान आपण प्रयत्न तरी करूयात. बघा सुरुवात करून जमलं तर...