बाप्पा
बाप्पा
धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक
बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता. ढोल ताशा पथक मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करत होते. बाप्पा पण मस्त आपली बॅग वगैरे भरून आपल्या लाडक्यांकडे १० दिवसांसाठी रहायला आला होता, आपल्या आईला सोडून. त्यांच्या आईने पण मस्त खाऊ वैगेरे देऊ का विचारलं बाप्पाला, पण बाप्पा कसला खाऊ घेतोय आपल्या आईकडून... उलट त्यानेच सांगितलं की,“मी मस्त खाऊ खाणार आहे माझ्या भक्तांकडे जाऊन. काय ते उकडीचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, वेगवेगळे पदार्थ, विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय. आई मी चाललो बघ मस्त १० दिवस एन्जॉय करून येतो, बाय आई...“
बाप्पा जेव्हा आपल्याकडे यायला निघाला तेव्हा त्याला खूप मस्त वाटत होतं.
“अरे वाह या वर्षी ढोल ताशा पथक वाटतं... बर झालं बाबा, नाहीतर डीजेचा आवाज ऐकून ऐकून माझे कान बधीर झाले होते. घरी गेलो तर आई काय बोलत होती काही कळतपण नव्हतं. आता कसं मस्त वाटतंय. अगदी राजेशाही थाट... वा वा मस्तच या वेळेला आपले दिवस मस्त जाणार वाटतं.“ बाप्पा मनात खूप खूश झाला होता.
या चौकातून त्या चौकात मस्त मिरवणूक सुरु होती. ढोल ताशा वाजवणारे मस्त उत्साहात आले होते. कोणी ढोल उडवत होते कोणी नाचत नाचत ढोल ताशा वाजवत होते. आजूबाजूला जमलेली माणसं पण ठेक्यावर नाचत होती. पोलीस आपली ड्युटी करत होते. वातावरण कसं एकदम भन्नाट झालं होतं. सगळे एकदम उत्साहात. तीन तास मिरवणूक संपवून आपले बाप्पा मंडळात विराजमान झाले पण आणि तिकडे घरी पण बाप्पाचं मस्त जल्लोषात जंगी स्वागत झालं. घरी कधी एकदा बाप्पा येतोय याची वाट बघत होते आमचे इवलेशे कार्टून... एक विशाखा तर एक विपू म्हणजे विपश्यना... हो दोघी पण कार्टून नुसता धिंगाणा घालायला पाहिजे त्यांना... दोघी पण चांगल्या मैत्रिणी, एकमेकांची शिकवणी घेणाऱ्या विशाखा ६ वर्षांची तर विपू ४ वर्षांची. गणपती बाप्पा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. गणपती बाप्पा त्यांचा खूप चांगला मित्र होता. जेव्हापासून त्यांना कळायला लागलं तेव्हापासून ते बाप्पाची खूप आतुरतेने वाट बघतात. अशा या आमच्या दोन कार्टून खूप गोड, गोंडस आणि निरागस अशा मुली. त्या असल्या की दिवस कसा गेला ते पण कळत नाही ते म्हणतात ना मूलं ही देवाघरची फुलं असतात अगदी तसंच.
बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशी विपू आणि विशाखा खेळत असताना आपला बाप्पा किती मोठा असणार, त्याच्यासाठी मी काय करणार, आई कोणते मोदक करणार यावर मस्त बोलत बसले होते.
“विशाखा दीदी माझी मम्मी बाप्पासाठी मोदक कलणार ये, तुझी मम्मी काय कलणार ये बाप्पासाठी, विपू..."
“माझी मम्मीपण कलणार मोदक ते पण भरपूर तुझ्या मम्मीपेक्षा जास्त आणि मी बाबांबरोबर जाणार ये बाप्पाला आणायला. तुला नाही नेणार बाबा ये ये ये...“ - विशाखा (बाबा म्हणजे आजोबा आणि आई म्हणजे आजी)
“मला का नाही नेनाल बाप्पाला आणायला मी पण येनाल बाबासोबत,“ - विपू
“पण बाबा नाही नेणार तुला सोबत...“ - विशाखा
“पण का नाही नेनाल...“ - विपू
“तू छोटीच आहे अजून म्हणून तुला नाही नेणार मीच जाणार मग मज्जाच मज्जा.“ - विशाखा
“जा बाबा, तू नेहमी अशीच करते मी नाही बोलणार तुझ्याशी जा, कट्टी बट्टी बारा बट्टी.“ - विपू
झालं आता आपली विपू एवढे मोठाले गाल फुगवून बसली ना आता काय करायचं. आपला बाप्पा मात्र या दोघींची मज्जा बघत होता बरं का त्याला खूप हसू येत होतं.
शेवटी विशाखाच म्हणाली बरं बाबा, आपण दोघीपण जाऊ हा
बाप्पाला आणायला.“ - विशाखा
मग काय स्वारी एकदम खूश.
तिकडे बाप्पापण खूप आनंदी झाला होता. आपल्या पाखरांना भेटायला तो पण खूप आतुर होता. दुसऱ्या दिवशी बाप्पाचं आगमन झालं घरी.
“आई गणपती बाप्पा आले चल ना गं बाहेर.“ इवलीशी विपु तिच्या आईला सांगत होती.
आपल्या दोन परी विशाखा आणि विपू सगळ्यांच्या पुढे. बाप्पाला हात लावून बघ, त्याला मोदक दे म्हणून आईच्या मागे लागणार असू दे नुसता गोंधळ घालणं चालू होतं त्या दोघींचंपण. बाप्पापण मनात हसत होता. मग बाप्पाची पूजा करण्यात आली. आरती झाली त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवून झाला. तो पण खूप खुश आणि इकडे या दोघी प्रसाद वाटायला पुढे. मोदक मी देणार... मोदक मी देणार... म्हणून सुरु. आईनेच मग त्या दोघींनापण सांगितलं तुम्ही दोघीपण वाटा मोदक... मग काय स्वारी खुश. एक मोदक याला दे, दुसरा मोदक त्याला दे, असं आपलं सुरु होत त्यांचं.
बाहेर मंडळात पण ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं जंगी स्वागत झालं डीजे नसल्यामुळे बाप्पा एकदम खुश.
“चला आपले कान वाचले, आता मला सगळं ऐकायला येईल.“
मंडळात बाप्पाची स्थापना झाली. पूजा-आरती करून झाली. लहान लहान मुले आपल्या बाप्पाकडे कौतुकाने बघत बसले होते आणि आपल्या बाप्पाचं वाहन उंदीरमामा इकडून तिकडे पळत होते मोदकासाठी. दररोज मंडळाकडून लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात संगीतखुर्ची, लिंबू-चमचा, हस्तकला, ड्रॉईंग, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, बुद्धिमत्ता चाचणी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नाटक आणि वादन स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं होत. या वर्षी थोडा वेगळा उपक्रम राबवला गेला मंडळाकडून... जे भाविक दर्शनासाठी येत होते त्यांच्याकडून हार-फुले न घेता वही-पेन-पेन्सिल असं साहित्य घेत होते आणि ते साहित्य गरीब मुलांना वाटले जात होते. तसेच मंडळाकडून आवाहनदेखील केले होते, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे म्हणून. तसे प्रत्येकाला झाडे लावण्यासाठी रोपटेदेखील दिले जात होते. हा अभिनव उपक्रम पाहून बाप्पादेखील खुश झाले.
हाहा म्हणता म्हणता १० दिवस संपले पण आणि तो क्षण आला जेव्हा बाप्पाला निरोप द्यायचा होता. सर्व भक्तांचा ऊर भरून आला होता. सगळ्यांसाठीच हा क्षण खूप कठीण असतो पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार ही भावना सुखावून जाते. तिकडे मंडळाच्या बाप्पाची वाजतगाजत ढोल ताशांच्या आवाजात मिरवणूक काढली गेली आणि बाप्पाचं विसर्जन कृत्रिम हौदात झालं अगदी नैसर्गिक पद्धतीने. तिकडे घरीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरु झाली होती पण आपल्या दोन कार्टूनने नुसता गोंधळ घातला होता.
“बाप्पा कुठेच नाही जाणार आपल्या घरीच राहणार. आई सांग ना गं बाबांना...“ - विशाखा
“अरे बाळा बाप्पा पुढच्या वर्षी नक्की येणार आहेत.“ - आई
“आई मी पण जाणार बाप्पाकडे.“ - विपू
बाप्पांचापण कंठ दाटून आला होता सर्वांना निरोप देताना, पण पुढच्या वर्षी लवकर येणार याचं आश्वासन देऊन बाप्पा चालले होते. विपुने आणि विशाखाने तर गोधळ घातला घरी. आईने त्यांना समजावून सांगितले की,“बाप्पा त्याच्या आईकडे चालला आहे आता आणि तो लवकरच परत येणार ना, मग कशाला रडता, शहाण्या मुली रडतात का? नाही ना... मग चला डोळे पुसा लवकर लवकर. गुड गर्ल.“ विपू आणि विशाखा थोड्या शांत झाल्या.
दोघींना पण नीट समजावल्यावर त्या समजल्या आणि आपल्या बाप्पाला निरोप द्यायला तयार झाल्या त्याच्याकडून प्रॉमिस घेऊन की,“तू लवकर यायचं आमच्या घरी. आम्ही मग तुला खूप सारे मोदक करून देऊ ,प्रॉमिस ना बाप्पा.“ बाप्पाने पण त्यांना प्रॉमिस केलं मी लवकर येईल म्हणून.
बाप्पाचं विसर्जन त्यांच्या गार्डनमध्येच करण्यात आलं. कसलंही पर्यावरणाचं नुकसान होऊ न देता.
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,“ म्हणत जड अंतःकरणाने सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. पुढच्या वर्षी येण्यासाठी...