प्रेम असेही...
प्रेम असेही...
ऐसा दीवाना हुआ है ये दिल आपके प्यार मै ......... ती कानात हेडफोन टाकून काही रोमँटिक गाणे ऐकत खिडकीबाहेर पाहत होती . मागे मागे पळणारी झाडे खूप छान दिसत होती खिडकीतून मस्त थंडगार हवा आत येत होती . प्रवासाला जाताना अशी रोमँटिक गाणी ऐकणं म्हणजे स्वर्ग सुख आहे असं तुम्हाला पण वाटतं ना तिला पण असचं वाटतं. 1990 मधील ती रोमँटिक गाणी मनाला वेड लावून जातात प्रेमात पडले नसतानाही आपण कोणाच्यातरी प्रेमात पडावे , ती हुरहुर जाणवावी , हळूहळू लाजेच्या कळीने फुलात रूपांतरित व्हावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं तिलाही असंच वाटत होतं की आपल्या आयुष्यात पण असं कोणीतरी यावं जो माझ्यावर मनापासून खूप प्रेम करेल माझ्या गुण-दोषा सहित मला आपलंसं करेल, प्रत्येक निर्णयात माझ्या बाजूने ठामपणे उभे राहील चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन करेल आणि कौतुक पण तितकेच करेल. मीही त्याच्यावर खूप प्रेम करेल त्याच्या घरच्यांवर प्रेम करेल खूप स्वप्न रंगविली होती तिने आपल्या जोडीदाराबाबत पण मुळातच आधीपासून थोडी शांत असणारी, लाजाळूचं झाड असणारी , कोणातही पटकन मिसळता न येणारी आणि आयुष्यात कधीही पटकन मित्र न बनवणारी अशी मुलगी म्हणजे भैरवी .
भैरवी लहानपणापासूनच खूप लाजाळू होती कोणातही ती पटकन मिक्स होत नव्हती पण तरीही अभ्यासात खूप हुशार नेहमी प्रथम क्रमांक येत होता तिचा शाळेत. स्टेज डेअरींग पण खूप होते ती स्टेजवर गेल्यावर भल्याभल्यांची दांडी गुल होत होती .वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा यामध्ये नेहमी पुढे प्रत्येक वेळी ती बक्षिसे घरी घेऊन गेली नाही तर नवलच पण तरीही मुलांशी बोलायचं म्हटलं तर कसं बोलायचं हा यक्षप्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा राहायचा तिच्या मैत्रिणींना या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की प्रत्येक गोष्टीत पुढे असणारी भैरवी या गोष्टीत मागे कसे काय . फावल्या वेळात गजल , रोमँटिक गाणी ऐकणे हा तिचा छंदच होता .दिसायला पण अगदी बाहुली सारखी निम गोरी 5.2 इंच उंची, हसताना गालावर पडणारी खळी खुप खुलून दिसायची तिला. थोडे कुरळे असणारे लांब केस त्यावर चार चांद लावायचे . नाजूक ओठ , सरळ नाक आणि पाणीदार काळे डोळे तिला खूप शोभून दिसायचे. काही वेळ स्तब्ध उभी राहिली आणि लांबून कोणी तिला पाहिले तर गोड बाहुलीचं दिसायची ती. कॉलेजमधली कितीतरी मुले तिच्यावर मरायचे पण हि कोणालाच भिक घालत नव्हती मुळातच मुलांशी बोलताना ती घाबरायची त्यामुळे तिने कधी मित्र बनवले नाही आणि प्रेमाच्या पण कधी भानगडीत ती पडली नाही .
आज ती तिच्या मावसभावाच्या साखरपुड्याला तिच्या मावशीच्या घरी चालली होती . प्रवासात रोमँटिक गाणी ऐकायला तिला खूप आवडत होते आणि निसर्गात रमून जायला तर खूपच. मावशीच्या गावाला झुळूझुळू वाहणारी नदी , डोंगर दऱ्यातून खाली उतरणारे धबधबे आणि त्या पाण्याचा येणारा आवाज, सगळीकडे असणारी हिरवळ , गावाच्या बाहेरच्या बाजूला असणारी हिरवीगार शेती आणि त्यात डौलाने उभे असलेले पीक , परसदारात उभी असणारी नारळाची , सुपारीची झाडे , कैरी, काजू, फणस, शिंदोळे, वेगवेगळ्या मसाल्यांची रोपे, ती लाल माती आणि कौलारू घरे किती मस्त वाटतं ना या वातावरणात. शहरात कधी या गोष्टी फारशा अनुभवायला मिळत नाही पण गावात या गोष्टींमुळे मनाला खूप शांती मिळते.
भैरवी व तिच्या घरचे सर्वजण तिच्या मावशीच्या घरी पोहोचतात. साखरपुड्याची चांगली जय्यत तयारी केलेली असते मावशीने. सर्वजण छान तयार होऊन साखरपुड्यासाठी हॉलवर पोहचतात . भैरवीला हॉलवर पोहचल्यावर सर्वजण एकटक तिलाच बघत आहे हे समजल्यावर लाजल्यासारखे झाले होते त्याच हॉलमध्ये कोणा एकाची विकेट गेली होती तिला पाहताच लव्ह अँट फर्स्ट साईट म्हणतात तसे. मोरपंखी रंगाची बुट्टयांची साडी, मागे मोकळे सोडलेले पाठीवर रुळणारे कुरुळे केस , नाकात मोत्याची नथ, हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर उठून दिसेल अशी चंद्रकोर, गळ्यात ठुशी आणि हलकासा केलेला मेकअप जणू स्वर्गातली अप्सराच भासावी तशी ती दिसत होती. हॉलमध्ये इंट्री केल्यावर सर्वांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या होत्या आता हा कार्यक्रम कधी एकदाचा पार पडतो आणि मी घरी कधी जाते असे तिला झाले होते . जो भेटेल तो तिला लग्न कधी करणार आहे हेच विचारत होता आणि तिला उत्तर काय द्यावे हे समजत नव्हते .
प्रशांत भैरवीचा भाऊ आज त्याचा साखरपुडा होता त्याची होणारी बायको देखील खूप सुंदर होती आणि त्याचा जिवलग मित्र प्रतिक होईल ती मदत त्या कार्यक्रमात करत होता . घरातील सदस्यांप्रमाणेच त्याचा वावर होता. तिची मावशी तर नेहमी म्हणायची मला एक नाहीतर दोन दोन मुले आहेत. एक प्रशांत तर दुसरा प्रतीक दोघांवरही ती सारखीच माया करत होती . प्रतीक थोडा बडबडा, नेहमी इतरांना हसवणारा, इतरांना मदत करणारा, हसतमुख राहणारा, कोणाचही मन त्याच्याकडून दुखावलं जाणार नाही याची तो काळजी घ्यायचा . दिसायला पण रुबाबदार हिरो सारखी पर्सनॅलिटी पण प्रत्यक्ष आयुष्यात पण हिरो. गावातल्या कितीतरी मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या पण त्याला हवी तशी मुलगी अजूनही नव्हती भेटली. पण आज मात्र त्याची विकेट गेली होती भैरवीला बघून तिला बघताच त्याला त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती काहीतरी हरवले आहे आपले पण काय ते कळत नव्हते . घरी जाताना , घरी पोहोचल्यावर, झोपल्यावर पण तीच समोर दिसत होती . आपल्याला काय झाले आहे , असे का होत आहे याआधी तर असे नव्हते झाले मला मग आत्ताच का? जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच दिसत होती . स्वतःच गालात हसून आपण तिच्या प्रेमात पडलो आहे याची त्याने स्वतःला जाणीव करून दिली पण बोलायचे कसे तिच्यासोबत ती तर आधीच खूप लाजाळू आहे आणि घरी तर सर्वजणच असतात मग तिच्याशी मैत्री कशी करायची आपल्याच विचारात तो हरवला होता त्याच विचारात तो कधी प्रशांतच्या घरी पोहोचला हे त्याला कळलेच नाही.
संध्याकाळची वेळ होती नुकताच उन्हाळा संपून पावसाळा सुरू होणार होता कोकणात पाऊस पडताना बघणे म्हणजे सुख असतं ना . त्या लाल मातीचा गंध , त्या कौलारू घरांच्या वरून खाली येणारे पाणी, परसातल्या आंब्याचा सुवास सगळं किती मनमोहक असतं ना. बाहेर ढग दाटून आले होते चिमण्या, कावळे, बुलबुल आणि इतर पक्षी आपापल्या घरट्यांकडे चालले होते सगळीकडे पक्ष्यांचा मंजुळ आवाज कानावर पडत होता झाडांची सळसळ स्पष्ट ऐकू येत होती जोराने वारे वाहत होते त्यामुळे झाडावरील कैऱ्या खाली गळून पडत होत्या. त्या कैऱ्यांचा सुवास अहाहा काय सांगणार त्याबद्दल, समुद्राच्या लाटा जोऱ्यात किनाऱ्यावर आदळत होत्या त्या लाटांचा आवाज मनात धडकी भरून जात होता सर्वीकडे काळाकुट्ट काळोख पसरला होता आणि शेवटी तो आलाच जोरात सोबत लाल मातीचा तो पहिला सुगंध, कैऱ्यांचा सुवास घेऊन तो जोरजोरात बरसू लागला सगळीकडे काही क्षणात चिखल झाला होता. मातीच्या कौलारू घरावरून खाली घरंगळत तो येत होता किती मस्त ना हा पाऊस आणि असा पाऊस अनुभवायला मिळणे म्हणजे किती मस्त .
प्रतीक तर समोर एकटक बघतच होता आपण इतके सुंदर स्वप्न बघतोय की हा आपला भास आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता समोर भैरवी पावसात नाचताना त्याला दिसली. त्या चिखलाच्या डोहात पाय गोल फिरवून ती दोन्ही हात पसरवून गिरकी मारत होती. ओलीचिंब भैरवी त्यावेळी खूप सुंदर दिसत होती प्रतिक तर आधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता अजून काय व्हायचं राहिलं होतं त्याचं . सर्वच तर त्याच चोरीला गेलं होतं . भैरवी अचानक गिरक्या मारता मारता थांबली प्रतीक आपल्याकडे बघत आहे हे बघून तिला कसस झालं आणि तिने आपल्या घरात धूम ठोकली प्रतीकला तर धडकीच भरली होती . “ तिला काय वाटलं असेल माझ्याबद्दल आणि तिने गैरसमज करून घेतला तर , नाही तिला सॉरी म्हणायला हवं लगेच पण कसं बोलणार तिच्याशी ती बोलत पण नाही किती लाजते ती . अरे देवा, …. तुच सांग आता काय करू ते “ तो आकाशाकडे हात जोडून बोलत असताना प्रशांत तेथे आला आणि त्याला बघून हसू लागला .
“ काय रे प्रतीक, वेडबिड लागलं का तुला असं का एकटाच बडबड करतोयस. ये कि आत असं का पावसात थांबलास, चल आत ये ” प्रशांत
“ हो आलोच तू हो पुढे “ प्रतीक
घरात गेल्यानंतर प्रतीकची नजर भैरवीचा शोध घेत होती पण ती होती कुठे त्याची धडधड तर खूप वाढली होती . काय बोलावे हे पण कळत नव्हते. भैरवी आत आरशासमोर स्वतःलाच निरखून बघत होती स्वतःकडेच बघताना गालात लाजत होती.
“ प्रतीक किती हँडसम आहे ना आणि दादाचा जिवलग मित्र पण आहे. सगळेच किती कौतुक करतात त्याच त्याच्याकडे बघितल्यावर एक वेगळीच जाणीव होते मला याआधी असं कोणा मुलाला बघून झालं नव्हतं पण याला बघून मला वेगळेच वाटतय आता पण तो माझ्याकडे बघत होता छान वाटलं मला पण का आणि मी का त्याचा विचार करत आहे. भैरवी तू प्रेमात तर पडली नाहीस ना त्याच्या “ तिच्या ह्या विचाराने तिलाच तिचेच हसू येत होते कितीतरी वेळ ती तशीच आरशाकडे बघत बसली होती प्रशांतने आवाज दिल्यानंतर ती बाहेर हॉलमध्ये आली .बाहेर आल्यावर पण ती प्रतिकला शोधत होती पण तो तिला कुठेच दिसला नाही.
“ काय गं भैरवी कुणाला शोधत आहेस , काही हवयं का तुला “ मावशी
“ काही नाही मावशी...... ते आपल असचं.....आलेच मी ” असं म्हणून ती परत आपल्या रूमकडे गेली. “
“ आज ती किती छान दिसत होती ना परीच जणू हृदय चोरणारी “ प्रतीक एकटाच बडबड करत बसला होता आपल्या रूममध्ये. तिच्याशी कसं बोलू पण बोलायलाच हवं त्याशिवाय कसं कळणार ती कशी आहे ते .ठरलं तर मग उद्याच तिच्याशी बोलेल तसंही उद्या सर्व समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहेत तेव्हाच तिच्याशी मैत्री करेल पण ती करेल का माझ्याशी मैत्री पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रतीक आपल्याच विचारात हरवला होता.
सूर्य उतरणीला आला होता त्याचा तो तांबडा लालसर रंग सर्व आकाशात पसरला होता. आल्हादायक हवा चारही बाजूने सुटली होती . पक्षी आपापल्या घरट्याकडे चालली होती. मच्छीमारांनी जाळे बाहेर काढून त्यातील मासे टोपल्यांमध्ये भरायला सुरुवात केली होती . समुद्रात गेलेल्या बोटी किनाऱ्यावर लागत होत्या. लवकरच मासळी बाजार भरणार होता समुद्रकिनाऱ्यावर. समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर आदळत होत्या त्यातून शंखशिंपले , खेकडे किनाऱ्यावर आदळत होते. मऊ वाळूत शंख शिंपले रुतून बसत होते. लहान मुले लाटांवर स्वार होऊन उड्या मारत होते , कोणी किनाऱ्यावर किल्ले बांधत होते तर कोणी फुटबॉल , कबड्डी सारखे मैदानी खेळ खेळत होते .काही प्रेमी युगले हातात हात घेऊन वाळूवरून चालत होते तर कोणी दगडावर बसून सूर्यास्त पाहत होते काहीजण वाळूवर आपले व आपल्या जोडीदाराचे नाव बदामामध्ये कोरत होते. काही लोक एका बाजूला मासे घेण्यासाठी गर्दी करत होते तर व्यापारी माशांचा लिलाव करत होते या सर्व गोष्टींचा साक्षीदार होता तो एकमेव म्हणजे समुद्र.
एका दगडावर बसून भैरवी सुद्धा सुर्यास्त पाहण्यात गुंग झाली होती. त्या सूर्यास्ताकडे बघत आपल्या भविष्याची स्वप्ने ती बघत होती तर इतर मंडळी समुद्रकिनाऱ्यावर इकडेतिकडे पांगली होती . प्रतिकने आज ठरवलचं होतं तिच्याशी मैत्री करायची म्हणून.
“ हाय भैरवी कशी आहेस “ तिच्याकडे जात त्याने तिला विचारले.
“ हाय प्रतीक , मी मस्त आहे तू कसा आहेस “ जरा चाचरतच ती म्हणाली.
“ मी मस्त ....... भैरवी मी बसू का येथे ”
“ अं …. हो …. हो बस ना “
“ भैरवी , तू इतकी का लाजतेस माझ्याशी बोलायला तू आल्यापासून बघतोय मी तू खूप शांत असतेस फारशी बोलत नाही का बरं असं “
“ असं काही नाही . मी थोडी शांत आहे म्हणून आणि पटकन नाही बोलता येत नाही मला बाकी काही नाही”
“ असं होय . भैरवी एक विचारू तुला राग येणार नसेल तर “
“ हो विचार ना ...... नाही राग येणार मला “
“ मैत्री करशील माझ्याशी....... मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला “
यावेळी भैरवी शांतच असते. ही शांतता प्रतीकला सहन होत नाही तोच या शांततेचा भंग करून परत एकदा तिला विचारतो ,
“ सांग ना भैरवी होशील माझी मैत्रीण ” थोडा विचार करून भैरवी त्याला हो म्हणते यावर तो जोरात येस म्हणतो थोडा वेळाने त्याला त्याच्या या कृत्याचे वेगळेपण जाणवते पण भैरवी मात्र त्याच्याकडे बघून हसत असते . हळूहळू त्यांची मैत्री खूप घट्ट बनत जाते. भैरवी आता मनमोकळेपणे सर्वांशी बोलत असते शांत राहणारी मुलगी आता सतत बडबड करत असते इतरांना हसवत असते. शांत राहणे म्हणजे काय हेही ती विसरून जाते प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकर वाढलेला असतो. लाजणारी भैरवी कुठेतरी लांब गेलेली जाणवते सर्वांना. घरच्यांना तिच्यातला हा झालेला बदल खूप आवडतो . हे जे काही झाले आहे ते प्रतीकमुळे झाले आहे म्हणून त्याचे आभार पण मानतात आणि त्यांना हे पण कळून चुकते की हि दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे पण पुढाकार मात्र कोणीच घ्यायला तयार नव्हते शेवटी प्रशांत डायरेक्ट प्रतिकला विचारतो की,
“ तू माझ्यापासून काहीच लपवून ठेवू नकोस जे आहे ते उघडपणे बोल भैरवी कशी काय इतकी बदलली आहे “ त्या प्रश्नावर तर प्रतीक पूर्णपणे घाबरून गेला होता .
“ आता काय सांगू याला मी कि प्रेम करतो तिच्यावर ते आणि असं सांगितलं तर तो समजून घेईल का मला “ प्रतीक
“कसला विचार करतोयस तू इतका , मी काय विचारलं तुला....... सांग लवकर “ आता प्रशांतचा आवाज वाढलेला होता . त्याच्या अशा पद्धतीने विचारण्याने प्रतीक शांतच राहतो .
“ अरे तुला ऐकायला आलं नाही का ...... मी काय विचारलं ते… बोल ना तोंड शिवलं का तुझं आता .. भैरवीवर प्रेम करतोस ना …. अरे बोल ना ........ “
“ हो........ हो “ प्रशांत स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतो आणि जोरात बोलतो
“ लाज नाही का वाटत तुला असं सांगायला “
“ सॉरी प्रशांत पण मला खुप आवडते रे ती प्लीज समजुन घे ना मला प्रेमात पडलोय रे मी तिच्या “
“ हो मग ....... मी काय करू तिला माहित आहे का हे ....... केलं का तिला प्रपोज तू “
“ नाही सांगितलं मी तिला अजून “
“ अरे बावळटा कधी सांगणार मग तिला तिच लग्न झाल्यावर का ? “
“ काय “ प्रतीक तर एकटक प्रशांतकडेच बघत बसतो .
“अरे असं काय बघतोस भूत बघितल्यासारखा “
“ तुझी परवानगी आहे प्रशांत आम्हाला “
“ अरे माझीच काय पण सर्व कुटुंबाला तु आमचा जावई म्हणून पसंत आहे आता लवकरच तिला प्रपोज कर आणि आम्हाला गुड न्युज सांगायला ये कळलं का दाजीसाहेब “
“ दाजी काय रे तू आपलं प्रतीकच बोल मला “ असं म्हणून दोघेही एकमेकांना आलिंगन देतात.
“ उद्याच मी तिला प्रपोज करतो “ असं मनाशी ठरवून तो आपल्या घरी परत गेला . सकाळीच प्रशांत प्रतीकला फोन करून सांगतो की, “ मी संध्याकाळी भैरवीला घेऊन समुद्रकिनाऱ्यावर येतो तू पण वेळेवर ये आणि तिला आपल्या मनातलं सर्व सांगून टाक . मी आहे तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस चल ठेवतो मी फोन बाय “
आजच गावातल्या सरपंचाचा मुलगा अविनाश शहरातून आपल्या घरी परत आला होता . सरपंच म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व प्रेमळ , सर्व गावाला समजून घेणारे , आपल्यासोबत गावाला घेऊन चालणारे, सतत गावाच्या भल्याचा विचार करणारे , गावात त्यांना खूप मान होता त्यांचा शब्द झेलायला सर्वच तयार असतात त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अविनाश याला शिक्षणासाठी शहरात पाठवलेले होते पण शहरात जाऊन वाईट संगतीत पडून अविनाश पूर्णपणे बिघडलेला होता ज्या ज्या सवयी चांगल्या माणसाला नको त्या सर्व सवयी त्याला लागलेल्या होत्या . अभ्यासात पण ढ नेहमी कॉपी करून पास व्हायचा, मुलींना फिरवायचं , सिगारेट दारूचं व्यसन खूप होतं, मारामारी करणं तर त्याला नवीन नव्हतं . खूप अहंकारी जे पाहिजे असेल ते तो मिळवत असे मग साम-दाम-दंड-भेद या चारही गोष्टी वापरायला लागल्या तरी चालेल पण ती गोष्ट तो मिळवून राही त्याला नाही म्हटलेल कधीच आवडत नव्हत. ज्या दिवशी प्रतीक भैरवीला समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज करणार होता त्यादिवशी तो पण समुद्रकिनाऱ्यावर गेला होता .
फिकट आकाशी रंगाचा पायघोळ वन पीस तिने घातला होता. मोकळे पाठीवर रुळणारे कुरळे केस मागे सोडले होते. चया आऊटफिटमध्ये ती खूप उठून दिसत होती अविनाशच लक्ष तिच्याकडे वळण्यास हेच पुरेसं होतं तिला पाहता त्याच्या मनात ती बसली होती लगेच आपल्या मित्रांकरवी त्याने तिची सर्व माहिती काढली आणि तिला प्रपोज करण्यासाठी तो घरी निघून गेला .
इकडे प्रतीक समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला होता परत एकदा भैरवीला बघून त्याची विकेट पडली होती . त्याच्या हृदयाची धडधड जोऱ्यात होत होती तिला पाहताच शब्द सुचत नव्हते त्याला . त्याच्या मेंदूला मुंग्या आल्या सारख्या झाल्या होत्या तिच्यासमोर काय आणि कसे बोलायचे हेच तो विसरून गेला होता . प्रशांतने त्याला धीर देऊन तिला आताच प्रपोज करायला सांगितले . तरी तो एकाच जागेवर ठम्म उभा होता शेवटी जवळजवळ प्रशांतने त्याला तिच्या बाजुने त्याला ढकलून दिले आणि “ तिला सर्व मनातलं सांगून टाक मी थोडा दूर जातो पण तू बोलला पाहिजेस नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं बोलून “ तो थोडा लांब जाऊन उभा राहिला . शेवटी प्रतिकने थोडी हिम्मत करून तो तिच्यासमोर गेला . गुडघ्यावर बसून त्याने तिच्या समोर त्याचा हात पुढे केला तिला तर समजत नव्हते हा असा का बसला आहे ते .
“ भैरवी खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती पण सांगू शकत नव्हतो आज ती गोष्ट तुला मी सांगणार आहे पण तुझ उत्तर हो असेल अशी आशा करतो मी . भैरवी ......... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्न करशील माझ्याशी ......... “ असं बोलून तो रिंग तिच्यासमोर धरतो . भैरवी तर गालातल्या गालात लाजत होती. असं कोणी प्रपोज करेल असं तिला वाटलं पण नव्हतं परत एकदा प्रतीक भैरवीला विचारतो
“ सांग ना भैरवी........ करशील माझ्याशी लग्न “
“ हो प्रतीक ........ माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे करेल मी तुझ्याशी लग्न “ असं बोलून ती त्याच्या हातातून रिंग घेऊन आपल्या बोटात घालायला त्याला सांगते .तेवढ्यात त्यांना तेथे टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो जेव्हा दोघेही मागे वळून बघतात तेव्हा त्यांच्या घरचे त्यांना टाळ्या वाजवताना दिसतात भैरवी तर लाजून प्रशांतच्या मागे लपते . आता तर सर्वजण त्यांची थट्टामस्करी करत असतात पण पुढे येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ असतात सर्व.
दुसऱ्या दिवशी सर्वजण त्या गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते . प्रशांतचे लग्न आणि भैरवीचा साखरपुडा एकाच दिवशी करायचे असे सर्वांनी ठरवून टाकलेले असते आणि यासाठी मंदिरात पूजा करण्यासाठी सर्वजण गेलेले असतात पूजा सुद्धा खूप छान होते. भैरवी एकटी नैवेद्य घेऊन गायीला दाखवायला जाते . तरी गायीचा गोठा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होता आणि मागच्या बाजूला होता . भैरवी गायीला नैवेद्य दाखवून मागे फिरते तर तिच्यासमोर अविनाश उभा असलेला तिला दिसतो . त्याला असं अचानक समोर बघून ती थोडी दचकते पण नंतर धीर करून ती त्याला विचारते की,
“ तुमचे काही काम होते का माझ्याकडे ”
“ हाय भैरवी , मी अविनाश कालच गावात परत आलो आहे या गावच्या सरपंचाचा मुलगा आहे मी शहरात असतो मी. काल तुला समुद्रकिनाऱ्यावर बघितलं तु या गावात नवीन आहेस ना “
“ हो ......पण तुम्हाला माझे नाव कसे काय माहित आणि तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात मी तर तुम्हाला ओळखत पण नाही “ शक्य तितक्या सौम्य आवाजात आणि चांगुलपणा दाखवत अविनाश तिला सांगतो कि , “ मला कोणाचीही माहिती काढायला वेळ लागत नाही ती लगेच मिळते मला पण खरं सांगू तुला काल मी तुला समुद्रकिनाऱ्यावर पाहिलं आणि तुला सर्वस्वच देऊन बसलो मी हृदय चोरलस माझं तू आता सांग भैरवी काय करू मी “
भैरवी थोडी घाबरली होती पण तसे न दाखवता ती त्याला म्हणाली की, “ प्रेम असं नसतं होत कधी मला जाऊ द्या माझे घरचे वाट बघत असतील मंदिरात “
“ तू जाऊ शकतेस भैरवी पण मी तुझ्यावर प्रेम करतो हे पण तितकच खरं आहे लग्न करशील माझ्याशी होशील तू माझी राणी “
“ अजिबात नाही माझा रस्ता सोड ..... “
“ ओके ओके आता मी जातो पण तुझ्या उत्तराची वाट बघेल दोन दिवसानंतर तुला विचारायला परत येईल मी “
भैरवी पळतच मंदिरात जाते. झाल्या प्रकाराने ती घाबरून गेलेली होती पण घरी गेल्यानंतर लग्नाची तयारी , साखरपुड्याची तयारी सगळ्यांची चाललेली थट्टामस्करी या सगळ्या गोष्टीमध्ये ती हि गोष्ट पूर्णपणे विसरून जाते आणि घरच्यांना का उगाच त्रास म्हणून ती कोणालाही काहीही सांगत नाही हॉलमध्ये चर्चा चालू असताना हळूच भैरवीचे आणि प्रतीकचे डोळ्यांच्या माध्यमातून इशारे सुरू होते .
“ काय दाजीसाहेब तुम्हाला करमत नाही वाटतं माझ्या बहिणीवाचून “ असं बोलून प्रशांत हसू लागतो त्याच्या या मस्करीत घरातले पण सामील होतात भैरवी तर लाजेने चूर होऊन आपल्या रूमकडे धूम ठोकते असेच थट्टामस्करीत दोन दिवस निघून जातात .
“ भैरवी जरा खाली ये एक काम आहे तुझ्याकडे “ मावशी भैरवीला आवाज देत किचनकडे निघून जातात.
“ आले … आले मावशी एक मिनिट थांब “ भैरवी पायर्या उतरून किचनकडे वळली .
“बोल ना मावशी काय काम होतं तुझं “
“ अगं पुरणपोळी केली आहे प्रतिकला खूप आवडते ना त्याला फोन केला होता पण तो आता कामात आहे म्हणून म्हटलं तूच देऊन येतेस का त्याला पुरणपोळी “ मावशी
“ एवढंच ना त्यात काय येते कि देऊन “
“ कोणीतरी लगेच तयार झालं आहे प्रतिककडे जायचं म्हटलं तर हो ना “
“ काय ग मावशी तू पण का आता........ जा मग मी नाही जात तु दादालाच पाठव त्याच्याकडे “
“ बघू चेहरा तुझा “ मावशीने तिचा चेहरा आपल्या हातात धरून “ तुला मस्करी पण कळत नाही का गं . जा लवकर मी सांगून ठेवलं आहे त्याला तू येत आहेस म्हणून “ खुश होतचं ती त्याच्या घरी पोहोचली दारातच प्रतीक उभा होता तिची वाट बघत.
“ किती गं वेळ भैरवी असं करतात का कधी किती वेळ लावलास “
“ दहा मिनिटात तर आले मी असा कोणता उशीर झाला मला “
“ माझ्यासाठी एक मिनिट पण एक तासासारखा आहे तुला काय सांगू “
“ बास कर आता मला जायचं आहे लवकर घरी आहे “
“ आताच आलीस आणि निघालीस पण असं काय करतेस “
“ बर ठीक आहे बसते पण थोड्या वेळ जास्त वेळ नाही बसता येणार मला “
“ ओके राणी सरकार आपला हुकूम मानायला आम्ही तयार आहोत “
बराच वेळ दोघांच्या गप्पा सुरू असतात त्या गप्पांच्या नादात किती वाजले यावर त्यांचे लक्ष देखील जात नाही. मावशीचा फोन आल्यानंतर ती तेथून घरी जायला निघते. प्रतीक तिला घरी सोडायला तयार असतो पण तीच नाही म्हणते
“ घर तसही जवळ आहे मी जाईल आणि घरी पोहचल्यावर तुला फोन करेल “ असे बोलून ती तिथून जाते . थोडे पुढे गेल्यानंतर तिच्यासमोर अविनाश उभा असलेला तिला दिसतो त्याला बघून लगेच तिला त्याचे बोलणे आठवते त्या क्षणी तिच्या चेहर्यावरचे हावभाव बदलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती पुढे निघून जाणार असते तर तो तिचा हात पकडून तिला मागे खेचतो आणि पुन्हा एकदा तेच विचारतो .
“ मला जाणून घ्यायचे आहे तुझे उत्तर करशील ना माझ्याशी लग्न ……...सांग ना भैरवी ......... “
“ तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि लवकरच लग्न पण होणार आहे मग मी तुला हो का म्हणू “ रागाने भैरवीच अंग थरथरत होतं तिच्या या बोलण्याने अविनाशला पण राग आला होता आज कोणीतरी त्याला नाही म्हणाले होते पण तसे न दाखवता तो परत एकदा विचारतो.
“ भैरवी खरचं खुप प्रेम करतो गं मी तुझ्यावर राणी सारखे ठेवेल तुला. तूला जे पाहिजे ते देईल मी , तु फक्त एकदा हो बोल जगातली सगळी सुखं तुझ्या पायाशी आणून ठेवेल . तू जे म्हणशील ते करेन पण तू एकदा हो बोल “
“ अजिबात नाही अविनाश एक तर मी तुला नीट ओळखत पण नाही असं कसं काय तु मला लग्नाविषयी विचारू शकतो तू कितीही काहीही कर पण मी नाहीच म्हणार आहे “
“ हे बघ भैरवी मी तुझ्यासाठी साडी पण आणली आहे . ही बघ आणि ही बघ हिऱ्याची अंगठी बघ ना......... तुझ्या बोटात खूप छान दिसेल ही ......... “
अविनाश तिला साडी दाखवत होता आणि त्याच्या हातातली अंगठी तिच्या बोटात घालण्यासाठी तो गेलाच होता तर भैरवीने सणकन त्याच्या कानाखाली ठेवून दिली . तिने त्याच्या हातातली साडी आणि अंगठी हातानेच दूर ढकलून दिली . तिच्या अश्या वागण्याने अविनाश मात्र चांगलाच भडकला होता .
“ भैरवी तुला परत एकदा विचारतो आहे मी तू लग्न करशील ना माझ्याशी “ वेड लागल्यासारखा अविनाश तोच तोच प्रश्न वारंवार विचारत होता आणि भैरवी नाही म्हणत होती. भैरवी त्याला ढकलून देऊन ती पुढे चालू लागली तसं तिला त्याने मागे ओढून घेतलं आणि एकच किंकाळी ऐकू आली ती म्हणजे भैरवीची आसमंत फाटेल अशी किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली .आजूबाजूला काम करत असलेली लोक तिच्या आवाजाने बाहेर आली त्यातीलच एका मुलाने प्रतिकला तेथे बोलावून घेतले .प्रतिकने तिला पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती तरीही धीर करून तो तिला हॉस्पिटलला घेऊन गेला .
भैरवीने अविनाशला नाही म्हणण्याची शिक्षा अविनाशने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून दिली होती त्यामुळे तिचा अर्धा चेहरा प्लास्टिकप्रमाणे वितळत होता .किती हे नीच कृत्य .प्रेम हि नैसर्गिक भावना आहे त्याग , समर्पण आहे, जोडीदाराच्या आनंदात आहे , ही एक सुंदर भावना आहे हे अविनाशसारख्या विकृत माणसांना का नाही कळत . त्यांचा अहंकार दुखावला गेला कि ते आपला पुरुषार्ध अश्या पद्धतीने दाखवून देतात . का कळत नाही त्यांना या गोष्टी काय मिळाले अविनाशला यातून ना त्याला भैरवी मिळाली ना तिचे प्रेम मग कशासाठी त्याने हे केले .पोलिसांनी त्याला अटक केली आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांमुळे त्याला शिक्षा पण झाली पण या गोष्टीमुळे भैरवीवर मात्र खूप खोलवर परिणाम झाला होता तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण जळाला होता तिची मानसिक स्थिती पूर्ण बिघडली होती. कोणाशी बोलणं नाही कि काही नाही सतत ती गप्प राहायला लागली होती .सतत एकटक शून्यात नजर लावून बसलेली असायची .प्रतीकला तर ती भेटण टाळत होती . तिची अवस्था कोणालाही बघवत नव्हती आत्तापर्यंत बऱ्याचं सर्जरी करून झाल्या होत्या पण तरीही तिचा चेहरा पूर्वीसारखा नाही झाला .
प्रतीक हरतऱ्हेचे प्रयत्न करत होता तिला बोलतं करण्यासाठी , तिला हसवण्यासाठी पण तो आला कि ती झोपेचे सोंग घेत होती त्याला भेटायला पण तयार होत नव्हती ती तरी जबरदस्ती तो तीला भेटायला जात होता. खूप प्रेम होतं त्याच तिच्यावर. या परिस्थितीत पण तो तिला साथ देत होता नाहीतर आपण बघतोच आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते . याच गोष्टीच भैरवीला दडपण आलं होतं नकळत तिच मन अविनाश आणि प्रतीकमध्ये फरक करत होते . प्रतीकच आपल्यावर खरच खूप प्रेम आहे पण आता मी पूर्वीची भैरवी नाही राहिली हा विचार येऊन ती अजून दुखी राहू लागली .
प्रतिकने तिच्या घरी व आपल्या घरी स्पष्ट सांगून टाकले की दोन दिवसांनी मी भैरवीशी लग्न करणार आहे. तुम्ही सर्वांनी लग्नाची तयारी करून ठेवा मी हॉस्पिटलला जाऊन येतो . आज माझ्या भैरवीला डिस्चार्ज मिळणार आहे मी एकटाच जातो मला तिच्याशी थोडं बोलायचं पण आहे “ असं म्हणून तो एकटाच हॉस्पिटलला जातो. इकडे त्याच भैरवीवर असलेलं प्रेम पाहून सर्वजण अवाक् होतात त्याची गोष्ट लक्षात घेऊन सर्वजण त्यांच्या लग्नाची तयारी करायला लागतात . इकडे सगळी प्रोसिजर आटोपून प्रतीक भैरवीला घेऊन गणपतीच्या मंदिरात येतो . गणपतीच्या मूर्तीसमोर तिला उभे करून तिचा हात हातात घेऊन तिला नेहमी सोबत राहण्याचे वचन तो देतो.
“ भैरवी मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले आहे तुला तुझ्या गुण-दोषांसह स्वीकारलं आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत असेन . आज तुझ्यावर हा प्रसंग ओढवला म्हणून मी तुझी साथ सोडून जाऊ अशी अपेक्षा तु का करतेस माझ्याकडून मी तुझ्यावर प्रेम केले आहे . तु जशी आहेस तशी हवी आहे मला. घडलेल्या वाईट गोष्टी , वाईट प्रसंग तू विसरून जावे एवढंच वाटतं मला या गोष्टीमुळे माझ्या प्रेमात काहीही फरक नाही पडणार . मी आधीही तुझ्यावर प्रेम करत होतो आणि पुढेही करत राहील प्रत्येक सुख दुःखात मी तुझ्यासोबत असेन असे वचन देतो मी तुला . माझ्याशी लग्न करशील भैरवी “ प्रतीकच्या डोळ्यातून नकळत अश्रू येत होते .
प्रतीक परत एकदा गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो त्याचे हे प्रेम बघून भैरवीचे मन बदलून जाते तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात ती प्रतिकला उठवून होकार देते तो आपल्या हाताने तिचे डोळे पुसून तिला आपल्या मिठीत घेतो .
“ आय लव यू भैरवी......... मी तुझी कधीच साथ सोडणार नाही कायम तुझ्या सोबतच राहील “
प्रतीकच्या प्रेमामुळे , त्याच्या तिच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे भैरवी परत पहिल्यासारखी होते त्यांचे लग्न पण मोठ्या थाटामाटात होते . आज खऱ्या प्रेमाने त्याची ताकद दाखवून दिली होती आणि खोट्या प्रेमाने त्याची जागा दाखवून दिली होती . भैरवी तिच्यावर आलेल्या प्रसंगाने प्रतीकच्या मदतीने बरीच सावरली होती आणि तिच्यासारख्या मुलीना धीर देण्याचे काम पण करत होती . आज त्या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता खूप सुंदर तयारी केली होती . भैरवीला आज सरप्राईज द्यायचे होते त्याला .त्याने तिला प्रपोज केले होते ती जागा त्याने सेलिब्रेशनसाठी निवडली होती. सूर्यास्त होण्याआधी तो तिला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन आला मस्त हवा सुटली होती फ्रेश वाटत होते तिथे. आज लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर परत एकदा प्रतीक भैरवीला आपल्या पद्धतीने प्रपोज करत होता.
“ भैरवी माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर लग्न करशील माझ्याशी परत एकदा “ भैरवी त्याच्या गालावर हलकीच चापट मारून त्याला होकार देते. इकडे सूर्यास्त होत असतो आणि भैरवी प्रतीकची जुनीच कहाणी परत एकदा नव्याने उदयाला येत होती .