Prajakta Yogiraj Nikure

Tragedy

5.0  

Prajakta Yogiraj Nikure

Tragedy

अनुराधा

अनुराधा

16 mins
1.0K


आज आमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस सगळे खूप आनंदात आहेत आज. काय करु आणि काय नको असं सुरू होतं सर्वांचं पण माझं मन मात्र तिला आठवत होतं परत एकदा तिच्या आठवणीत रमत होतं. आता माझा कमनशिबीपणा म्हणा किंवा मी त्यावेळी केलेली चूक त्यामुळे आज ती माझ्या आयुष्यात नाही. लग्नाचा प्रत्येक वाढदिवस साजरा करताना मनात कुठेतरी तिची उणीव भासत राहते. मन सतत टोचण्या देत राहतं. आपण केलेल्या चुकीची जाणीव करून देत राहतं पण मी तरी काय करू नव्हतं कळत मला त्यावेळी कसं वागू ते. द्विधा मनःस्थितीमध्ये अडकलो होतो मी. मन-बुद्धी दोन्ही हतबल झाल्या होत्या तेव्हा. आतापर्यंत तिला विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण मनाच्या एका खोल कोपऱ्यात आजही ती आहे आणि प्रेमाची जाणीव देखील करून देत आहे. कुठेतरी खोल अगदी दूर ती असली तरी मन मात्र तीळतीळ तुटत जातं तिच्यासाठी.


"अहो बाबा, कुठे हरवला आहात तुम्ही केक कापायचा आहे ना चला लवकर आई वाट

पाहत आहे तुमची आणि बाबा सतत का तुम्ही तुमच्या विश्वात हरवत असता हो" 


"काही नाही गं, आलोच मी फ्रेश होऊन तू हो पुढे",असं म्हणून मी माझ्या मुलीला अनुला हॉलमध्ये पाठवून दिलं. माझी अनु माझी मुलगी

अनु तिच्याच नावावरून तर नाव ठेवलं होतं तिचं तिची आठवण म्हणून. चला तयार होऊन बाहेर जाऊयात नाहीतर परत कोणीतरी येईल बोलवायला.


"काय मग प्रोफेसर विद्याधर साखरदांडे काय म्हणताय मग" 


"काय रे तू पण विद्या म्हण की मला हे काय विद्याधर" 


" हो रे, मस्करी केली तुझी बरं अरेंजमेंट मात्र मस्त केली आहे तुझ्या मुलांनी "


" हो रे मुलांची हौस ते म्हणाले या वर्षी तुमचा पंचविसावा वाढदिवस आहे लग्नाचा

जरा मोठा करू मग म्हटलं ठीक आहे त्यांची कशाला हौस मारायची ना "


" हो रे ते पण खरंच आहे आपल्या वेळी कुठे होतं असं आई वडील जे म्हणाले तेच आपण

करायचं हो की नाही "


" हम्म "


" का रे काय झालं चेहरा वेगळाच दिसतोय तुझा काही झाले आहे का ?

"

" काही नाही रे तुला आपलं असंच वाटत असेल सोड ते "


सागर माझा जिवलग मित्र माझ्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी घडताना तो

नेहमी सोबत असायचा साथ द्यायचा मला. माझी परिस्थिती काय आहे हे त्याला न सांगता पण

कळून जायचं. होताच तो माझा जिगरी यार चेहर्‍याकडे पाहून कळायचं त्याला मी बरा आहे

की नाही ते. त्यावेळी सुद्धा तो माझ्यासोबत होता त्या परिस्थितीतून मला सावरायला

त्यानीच तर मदत केली होती.


मी प्रोफेसर विद्याधर साखरदांडे पुण्यामधील एका नामांकित कॉलेजमध्ये गणित विषय

शिकवतो. विद्यार्थ्यांच्या मते मी त्यांचा आवडता प्रोफेसर पण ते खरंच का ते मात्र

माहीत नाही मला. तरुण वयात माझ्या विद्यार्थिनी माझ्याभोवती पिंगा घालायच्या.

होतोच तसा मी राजबिंडा, उंचपुरा, गोरा

शरीरयष्टीला नेटका बोलण्याने समोरच्यावर भुरळ पाडणारा, समोरच्याला मोहित करून घेणारा. माझे कलिग तर मला कृष्ण म्हणायचे पण हो, हे कौतुक मी नाही हा करत माझ्या आजूबाजूचे लोक करतात मी आपलं सांगितलं फक्त.


वयाच्या 28 व्या वर्षीच त्या कॉलेजमध्ये नोकरी मिळवली

आणि मी आजतागायत त्याच कॉलेजमध्ये टिकून आहे हे फक्त विद्यार्थ्यांच्या

प्रेमामुळे. योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत असं होणाऱ्या काळात होतो मी.

त्याचप्रमाणे योग्य वयात लग्न झालं पाहिजे यासाठी माझे आई वडील माझ्या मागे लागले

होते त्यांची तरी चूक कुठे होती. त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाचा

सुखी संसार पाहायचा होता आणि हीच तर प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हो ना, तशीच इच्छा त्यांची पण होती त्या जोगे त्यांनी स्थळे पाहायला पण सुरुवात केली

होती. अनेक स्थळे मी या ना त्या कारणाने नाकारत होतो. सगळी स्थळे छान असून पण

माझ्या मनात येत नव्हती. का ते कोण जाणे पण नव्हतं वाटत जीवनाचा जोडीदार ती ही

असेल म्हणून. माझ्या सततच्या नकारामुळे माझे आई-वडील सुद्धा खूप कंटाळले होते आता

पण तरीही त्यांनी वधू पाहणं थांबवलं नव्हतं. ते पण तितकेच हट्टी होते याबाबतीत. अशातच

आम्ही सर्वजण एका दूरच्या नातेवाईकांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. आता खूप

दूरच्या का तर तेथे तरी चांगली मुलगी मिळेल म्हणून आणि झालेही तसेच.


पुण्याहून १५-१६ तास प्रवास करून शिरसगावला पोहोचलो. तसं ते आडगावच पण

निसर्गाने त्या गावावर दैवीकृपा केली होती इतके ते गाव सुंदर होते. बरेच जण

फिरायला म्हणून त्या गावात येत असत. गावाच्या एका बाजूला यू आकारात

असणारी नदी त्या गावाची शोभा वाढवत होती. त्या नदीमध्ये असणारी रंगीबेरंगी फुललेली

कमळाची फुले तर लक्ष वेधून घेत होती. त्यातच मुक्तपणे खेळणारी बागडणारी बदके तर

सुरेखच. त्या नदीपाशी थोडा वेळ घालवला की एक अद्भुत शांती लाभत होती मनाला. एक

वेगळीच प्रसन्नता मनाला शिवून जात होती. जरासे बारीक निरीक्षण केले की त्या नदीतील

मासे कमळाची फुले खाताना उड्या मारताना स्वच्छपणे बागडताना दिसून येत होती. तेथे

गेल्यावर तिथला तो नजारा पाहण्यातच आपण तासनतास घालवू शकतो याची खात्री पटायची.

मीही तेथे गेल्यावर माझा पाय निघत नव्हता. त्या नदीच्याच बाजूला थोडे पुढे

गेल्यावर राधा कृष्णाचे संगमरवरी दगडात कोरलेले मंदिर होते. मंदिराची रचना थोडी

जुन्या पद्धतीची होती. प्रेमाची व्याख्या सांगणारे, प्रेमाचा त्याग, समर्पण, एकमेकांना

समजून घेणे, प्रेमाची महती सांगणारे असे ते मंदिर होते. नाजूक नक्षीकाम

केलेले, राधाकृष्ण यांच्या मैत्रीमधील प्रसंग काही ठिकाणी कोरले

होते. आजूबाजूला असलेली दाट झाडी, त्या

झाडांवर असणारे वेगवेगळे पक्षी आणि त्यांचा तो मंजुळ आवाज मंत्रमुग्ध करत होता.

फुलझाडांवर बागडणाऱ्या फुलपाखरांकडे पाहून आपण पण असचं बागडाव असेच वाटत होते.

गावाच्या मध्यभागी असणारी चावडी सगळ्यांच्याच सोयीसाठी होती. गावामध्ये

प्रत्येकाच्या दारात परसबाग होती. त्या गावात गेल्यानंतर एक वेगळंच समाधान वाटत

होतं पण मला कुठे माहित होतं की त्या गावातच मला माझं प्रेम मिळेल, पण ज्या गोष्टीची आपण कल्पना पण करत नाही त्याच गोष्टी आपल्या अवतीभवती घडत

असतात. ते गाव पूर्ण फिरून झाल्यावर मी लग्न घरी गेलो. सगळीकडे नुसती धावपळ चालू

होती जो तो आपापल्या कामात मग्न होता. लग्न सुद्धा थाटामाटात पार पडलं आणि त्याच

लग्नात मला माझी स्वप्नसुंदरी दिसली पाहताच क्षणी मला मोहित करणारी ती मोहिनी होती

जशी मी माझ्या स्वप्नात पाहिली होती.

मोरपंखी रंगाची साडी त्यावर मोरांचे नाजूक नक्षीकाम, कानात मोठाले झुमके, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठूशी, हातात किनकिनणाऱ्या हिरव्या बांगड्या, मागे घट्ट बांधलेला अंबाडा त्यावर माळलेला मोगर्‍याचा गजरा, गोरीपान काया आणि बांधेसुद बांधा अशी ती. आवाज अगदी गोड नाजूक असा, हसताना ती किती गोड दिसत होती. तिला पाहताच क्षणी माझ्या मनाने ग्वाही दिली की

हीच ती जिची मी वाट पाहत होतो हीच ती माझी स्वप्न सुंदरी, तिला पाहताच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिथेच ठरवलं होतं की लग्न

करेल तर या मुलीशीच पण बोलायचं कसं आणि कोणाला हे मात्र कळत नव्हतं. लग्न

आटोपल्यानंतर आम्ही सर्वजण घरी निघून आलो. घरी आल्यानंतर आईचा परत तोच विषय सुरु झाला होता. इतक्या लांब गेलो तरी याने नाही सांगितलं कोणी आवडलं की

नाही ते काय करावं आता या मुलाचं. आई आज जास्तच वैतागली होती माझ्यावर पण मला ती

आवडली होती जिचं नाव सुद्धा माहित नव्हतं मला पण योगायोगाने काहीच दिवसात मला एक

स्थळ सांगून आले. मी आताही नाहिच म्हणत होतो पण शेवटचं म्हणून मी त्या मुलीचा फोटो

पाहिला आणि आनंद गगनात मावत नव्हता. माझ्या आईला मी होकार देऊन टाकला आणि तेव्हाच

सांगितलं मी तिला पाहिलं आहे म्हणून लग्नात आणि ती तेव्हाच आवडली होती मला पण तुला

कसं सांगू हे कळत नव्हतं ना नाव माहित होतं ना अजून काही मग कसं बोलणार तुझ्याशी.


            अनुराधा कारखानीस नाव तिचं. माझी अनु माझी स्वप्नसुंदरी अनु जिच्यासाठी मी

एवढे दिवस थांबलो होतो ती माझी स्वप्नसुंदरी अनु. पाणीदार मोठाले डोळे, नाजूक गुलाबी ओठ, धारदार सरळ नाक आणि कोरीव भुवया लांबसडक दाट केस तिच्या सौंदर्यात चार चांद

लावत होते एका नजरेतच घायाळ करणारी ती मोहिनी होती. जिने मला घायाळ केलं होतं तिचा

फोटो पाहिल्यापासूनच मी तिचाच विचार करत होतो ती कधी माझी होईल याची वाट पाहत होतो.

आईने तिच्या घरी माझ्या विषयी विचारणा केली होती आणि न बघता न भेटता आमचं लग्न

थोरामोठ्यांनी ठरवलं पण होतं, पण तिच्या मनात काय चालू आहे तिला मी आवडतो की नाही हे

विचारण्याची सोय पण नव्हती. लग्नाच्या दिवसापर्यंत आम्ही कधीच समोरासमोर भेटलो

नव्हतो लग्न ठरल्यापासून पुढे 15 दिवसांतच आमचं लग्न होतं. लग्न होईपर्यंत जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि

फक्त तिचाच मुखडा दिसत होता मला. सतत ती आपल्या अवतीभवती आहे याचा भास होत होता.

नकळतपणे मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो, झोपेत पण तीच दिसत होती मला घरातले तर एक संधी सोडत नव्हते

मला चिडवायला आणि मला ही ते सार आवडत होतं. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची खूप

स्वप्न पाहिली होती तिच्यासमवेत ती रात्र कधी माझ्या आयुष्यात येते आणि कधी मी

तिला माझ्या बाहुपाशात बंदिस्त करतो असं झालं होतं मला. पहिल्यांदाच इतका उतावीळ

झालो होतो मी. लग्न शिरसगावला होत तिच्या घरी. लग्नाची धामधूम सुरू होती नुसता

गोंधळ सुरू होता.


           लग्नाच्या दोन दिवस आधी आम्ही सर्व शिरसगावला पोहोचलो. तेथे पण मी तिला शोधत

होतो पण ती मला दिसली नाहीच. फक्त एकदा

ती दिसावी म्हणून तडफडत होतो मी पण कोणालाच ही माझी तडफड दिसून येत नव्हती.

लग्नाच्या त्या धामधुमीत मग मी पण रमलो तो प्रत्येक क्षण मनापासून जगत होतो. ती

आपलीच आहे ही भावनाच खूप सुखावत होती मला. आमच्या दोघांचा सुखी संसार आता मी

उघड्या डोळ्यांनी पण बघत होतो कदाचित मला वेड लागले असेल असेच वाटत होते सर्वांना

पण ती वेळच तशी होती की मी पूर्णपणे गुंतलो होतो तिच्यात. त्या क्षणाची मी

आतुरतेने वाट पाहत होतो जेव्हा ती माझी कायमची सहचारिणी म्हणून माझ्या आयुष्यात

प्रवेश करणार होती. शेवटी तो दिवस उजाडलाचं जेव्हा मी तिला समोर पाहणार होतो माझी

जीवनाची सहचारिणी म्हणून.

              लग्नमंडपात सर्व नातेवाईक जमले होते. मंडप तर राधा-कृष्णाच्या मंदिरासमोर होता

आज मला माझं प्रेम भेटणार होतं. सुंदर नदीकाठी तो मंडप टाकला होता आजूबाजूला

आकर्षक फुलांची केलेली मांडणी मन प्रसन्न करत होती. नदी वरून येणारी थंड हवेची

झुळुक अंगावर शहारा आणत होती मंडपात सुगंधित पाणी शिंपडल्याने मनाला एक तजेला

मिळाला होता आणि त्याही पेक्षा माझी अनुराधा आज माझ्या आयुष्यात प्रवेश करणार होती

याचा आनंद जास्त होता माझ्या चेहऱ्यावर. "आली लग्न घटिका ",

हे ऐकायला माझे कान आसूसलेले होते आणि शेवटी ती घटिका आलीच.

जांभळ्या नक्षीदार बुट्याच्या शालूमध्ये माझी अनुराधा खूप खुलून दिसत होती. एका

बाजूने खांद्यावर घेतलेली शाल, कानात मोठाले झुमके आणि त्याचे वेल मागे अंबाड्यामध्ये

खोचले होते. अंबाड्यामध्ये खोचलेला अबोली आणि मोगर्‍याचा गजरा मला अधिक आकर्षित

करत होता तिच्याकडे. कपाळावर ठसठशीत दिसणारी चंद्रकोर, नाकात मोत्याची नथ, गुलाबी ओठ, कोरीव भुवया, हातात किणकिणनारा माझ्या नावाचा चुडा, गळ्यात ठुशी आणि इतर दागिने, चालताना तिची ती चाल पाहून मी पुरता घायाळ झालो होतो. आज

माझी स्वप्नसुंदरी माझी सहचारिणी होणार होती कायमची. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट

पाहत होतो तो क्षण जवळ आला होता आता. डोक्यावर सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या

साक्षीने अक्षता पडल्या आणि ती माझी कायमची सहचारिणी झाली. लग्न दुपारचं होतं

दुपारी जेवण वगैरे आटोपल्यानंतर बरेच नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले फक्त आम्ही

आणि आमच्या सोबत आलेली मंडळी फक्त तेथे रात्रभर थांबणार होती त्यानंतर आम्ही

सर्वजण दुसऱ्या दिवशी तिथून निघणार होतो. आमची ती पहिली रात्र तिच्याच घरी साजरी

होणार होती ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. सगळी पांगापांग झाल्यानंतर

थट्टामस्करी मध्ये तो दिवस निघून गेला. झोपण्याच्या आधी पाहुण्यांनी अनुराधाला

माझ्यासाठी विडा बनवायला सांगितला. तिने अगदी मन लावून माझ्यासाठी विडा बनवला आणि

अगदी हळूहळू चालत हातात पदराचा काठ एका बाजूने पकडत माझ्याकडे येत होती. ती जशी जशी माझ्याकडे येत होती तशी तशी

माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. तिचा विडा घेतलेला हात माझ्या तोंडाकडे आला

मी मात्र तिलाच पाहत होतो एकटक तिच्या नजरेने मला पुरते घायाळ केले होते पण त्याच

नजरेत एकाएकी मला बदल दिसला तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव काही वेगळे दिसले त्यावेळी

मला. काय होत आहे हे कळण्याआधीच ती माझ्या अंगावर कोसळली मी जोरात ओरडलो होतो

अनुराधा काय झालं म्हणून पण ती पूर्ण बेशुद्ध झाली होती. तिची दातखीळ बसली होती, डोळे पांढरे झाले होते, तिचे शरीर पूर्ण थरथर कापत होते, ओठांच्या कड्यांमधून पांढरा फेस बाहेर पडत होता. तिला या

अवस्थेत बघून माझीच दातखीळ बसली होती. काय करावे आणि काय करू नये या अवस्थेत मी

तिथेच बसून होतो. तिची आई तिला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती औषधे आणून दिली गेली

तिला पण आजूबाजूला चाललेली कुजबुज कानात तेल ओतावी अशी वाटत होती. मुलीला हा असा आजार आहे म्हणून तर आतापर्यंत तिचं लग्न ठरत नव्हतं आणि ठरलं

तरी ते मोडत होतं. सोन्यासारखी पोर तरी फक्त या आजाराने खितपत पडली होती घरात. देव

देताना पण काहीतरी कमतरता देतो कस होणार आता या मुलीचं. हळू हळू आवाजात चालणारी ही

कुजबुज मनात विचित्र वादळ उभे करत होती आणि त्याच वेळी रागारागात निघून गेलेले

माझे वडील सुद्धा माझ्या नजरेतून सुटले नव्हते, तडक त्यांच्या मागे आईला जाताना सुद्धा मी पाहिलं होतं. मी

तेथे बसून काय करणार म्हणून मीही तिथून निघून गेलो एकटाच माझ्या अनुला सोडून. माझी

सगळी स्वप्ने, आकांक्षा मातीत मिसळली गेली होती. मन तीळ तीळ तुटत होतं तिच्यासाठी पण काय

करावं हे मात्र कळत नव्हत. अनुराधेच्या वडिलांनी भरभक्कम हुंडा देऊन मुलीला माझ्या

गळ्यात बांधलं होतं अशीच कुजबुज लोकांमध्ये सुरू होती. शेवटी पैसा बोलतो पैसा असला

की सगळं चालतं हे त्यांचं बोलणं मला खूप खोलवर जखमा देत होत. आपली फसवणूक झाली आहे

याबद्दल माझं मन स्वीकारायला तयार होत नव्हतं पण त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर

माझी निरागस अनुराधा येत होती. या सगळ्या गोष्टीत तिची कशी काय चूक, तिने काय केलं होतं ज्याची तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली होती. सतत तिच्याकडे माझं मन धाव घेत होतं. तिचं डोकं मांडीवर घेऊन मला बसायचं होतं, तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा होता, तिला सांगायचं होतं माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर, मी देईल तुला आयुष्यभर साथ, तू जशी आहेस तशी हवी आहेस मला. मला नाही फरक पडत तुला काय त्रास आहे याचा, मला नाही फरक पडत लोक काय म्हणतात ते, मला फक्त तू हवी आहेस हेच सांगायचं होतं मला पण माझं दुसरं मन या सगळ्या

गोष्टी करण्यापासून कुठेतरी रोखत होतं. काय करावे आणि काय करू नये या द्विधा मनःस्थितीमध्ये अडकलो होतो मी. पूर्ण रात्र तळमळत काढली मी. हा

प्रसंग घडल्यानंतर बाहेर बघायला गेलो नाही की अनुराधा कशी आहे ती. इतका स्वार्थी

झालो होतो मी त्यावेळी. सकाळी सकाळी दारावर पडलेल्या धापेमुळे मला जाग आली तर

कोणीतरी जोरजोरात दार बडवत होतं तसंच डोळे चोळत

मी दार उघडलं तर दारात आई उभी होती तिला काय झालं हे विचारलं तर तिने सांगितलं की

आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी निघायचं आहे हे एक क्षणही थांबायला तयार नाही काल

रात्रीपासून खूप चिडले आहेत अजून काही वेळ पण थांबलो तर ते काय करतील हे सांगता

येणार नाही तू जसा आहेस तसं सगळं आवर आणि बाहेर ये लवकर आम्ही सगळे वाट पाहतोय तुझी. मी काही बोलायच्या आधीच आई तेथून तरातरा निघून गेली. ह्या सगळ्यात अनुराधा मात्र कुठेच नव्हती, का नव्हती ती. बाबा काय विचार करत आहे हेच कळत नव्हतं मला. माझ्या अनुचा विचार

करून माझं डोकं सुन्न झालं होतं काय करावं हेच समजत नव्हतं मला त्यावेळी. तसचं

लवकर आवरून मी बाहेर आलो तर अनुराधाच्या वडिलाचं आणि माझ्या बाबाचं बोलणं चालू

होतं. 


"कृपा करून माझ्या मुलीला पदरात घ्या असं अर्धवट सोडून नका जाऊ तिला, आता ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे, तुमची सून आहे. माझा चुकीची शिक्षा तुम्ही तिला नका देऊ मी विनंती करतो पण

माझ्यामुळे सोडून नका जाऊ" 


"हे सगळं करायच्या आधी तुम्ही थोडा विचार करायला हवा होता अशी आजारी पोर तुम्ही

आमच्या माथी मारत होतात. तुमच्यासाठी मी माझ्या मुलाच्या आयुष्याची

वाट लावून देऊ का? वाटलं तरी कसं काय तुम्हाला आणि हो आम्हाला हुंडा नको होता

तरी तुम्ही तो जबरदस्तीने दिला तुमच्या इच्छेखातर आम्ही

त्याचा मान ठेवला पण मी हा विचार केलाच नाही की तुम्ही असं का करत आहात ते, पण आता समजलं मला कारण काय होतं ते " 


" अहो असं नका हो बोलू आतापर्यंत खूप स्थळ बघितली मी तिच्यासाठी पण प्रत्येक

वेळी या कारणासाठी तिचे लग्न मोडत गेले. माझी सोन्यासारखी पोरं यासाठी घरी बसणं

मला मान्य नव्हतं. माझ्या मुलीच्या आनंदासाठी सगळं केलं मी कृपा करून तिला पदरात

घ्या " 


" तुमच्या मुलीच्या आनंदासाठी, मग मी का नाही करायचा माझ्या मुलाचा विचार. बोला, काय आयुष्यभर सहन करायचं का हे सगळं " 


" अहो खरचं माझ्यावर विश्वास ठेवा मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. सगळं खरं

सांगायचं होतं पण काय करू हिम्मत नाही झाली माझी. माझ्या मुलीच्या आनंदासाठी केलं

मी हे सारं आणि डॉक्टर पण म्हणाले आहेत की लग्नानंतर हा त्रास कमी होईल म्हणून.

म्हणून मी हा निर्णय घेतला तुम्हाला काही न सांगण्याचा पण तुम्ही एकदा डॉक्टरांवर

विश्वास ठेवून बघा ना, पण माझ्यामुळे नका सोडून जाऊ तिला पाया पडतो मी तुमच्या " 


" म्हणून काय आम्ही विषाची परीक्षा घ्यायची का. आम्ही आत्ताच्या आत्ता निघणार आहोत.आता गरज

वाटत नाही त्याची तुम्ही जी फसवणूक केली आहे त्यामुळे मात्र

आम्ही तुमच्यासमोर कधी येणार नाहीये एवढे मात्र लक्षात ठेवा तुम्ही " 


     असं म्हणत बाबा तिथून तरातरा निघून गेले. अनुराधाच्या वडिलांचे बोलणे माझ्या

मनाला खूप टोचण्या देत होतं मन सांगत होतं की एकदा डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवायला

काय हरकत आहे पण बाबांसोबत काहीच बोलायची हिम्मत नाही झाली माझी. अनुराधा सुद्धा

माझ्याकडे आशेने बघत होती पण मी तिच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हतो. कसं तिच्या नजरेला नजर देऊ, माझचं मन स्थिर नव्हतं तेव्हा मला अनुराधा पण हवी होती आणि

बाबा पण, पण यावेळी कोणाची साथ देऊ हे कळत नव्हतं. मनातच विचार केला मी की घरी गेल्यानंतर बाबांची समजूत काढून अनुराधाला आपल्या

घरी घेऊन जाता येईल तोपर्यंत सगळं शांत पण होईल. बाबा तर रागारागात त्यांनी दिलेला

हूंडा परत करून गाडीत जाऊन बसले पण होते आणि मला पण लवकर हे असा दम दिला होता पण

माझा पायच निघत नव्हता तिथून. घरी जाताना मला अनुराधाला घरी घेऊन जायचं होतं पण आज

वेळचं अशी आली होती की मी एकटाच घरी चाललो होतो. मला तिला सांगायचं होतं मी तुला

घ्यायला लवकरचं येईल म्हणून, तू माझी आहेस आणि माझीच राहशील हे आश्वासन मला तिला द्यायचे

होते, पण जाताना साधं तिच्या नजरेला नजर पण देऊ शकलो नाही मी, तसाच गाडीत जाऊन बसलो पूर्ण प्रवासात तिचाच चेहरा आठवत होता. मन तीळ तीळ तुटत

जात होतं तिच्यासाठी. काय करावं याची शुद्ध पण नव्हती मला तेव्हा. घरी गेल्यावर

बाबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. माझं मन

मात्र सारखं तिच्याकडेचं धाव घेत होतं. तिला कधी भेटतो असं झालं होतं पण बाबांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतो मी. लग्न

होऊन आता आठ दिवस झाले होते आणि त्याच वेळी मला एक निनावी पत्र आले आणि ते पत्र

माझ्या अनुचे होते माझ्या प्रियेचे होते माझा आनंद गगनात मावत नव्हता तसाच तडक मी

माझ्या रूममध्ये गेलो आणि ते पत्र फोडून वाचायला सुरुवात केली. 


प्रिय विद्याधरराव, 

                 प्रिय लिहिण्याचा अधिकार मला आहे की नाही हे माहीत नाही तरीही मी प्रिय लिहिले

आहे. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत हे मला नाही माहित मी तुमच्यासाठी

कोण आहे हे देखील माहित नाही मला पण माझ्यासाठी तुम्ही सर्व काही आहात. तुम्हाला

मी लग्नात पाहिलं होतं तेव्हाच तुम्ही माझ्या मनात घर केलं होतं पण माझ्यासारख्या

मुलीला आत्तापर्यंत जोडीदाराच प्रेम कधी भेटले नाही आणि मी पण कधी प्रेमाचा विचार

केला नाही तसा तो अधिकार मला नाही हीच समजूत करून घेतली होती मी माझी पण तुम्हाला

पाहिले आणि कुठेतरी वाटले ते तुम्हीच आहात ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करते.

तुम्हाला फक्त बघूनच असं वाटलं की आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे. एक वेगळीच भावना

जन्माला येत होती, प्रेमात पडले होते मी नकळत तुमच्या पण काय

करू मी तरी तुम्ही होतातच तसे की मी नकळत तुमच्याकडे ओढले गेले. मला जेव्हा कळलं

माझं लग्न तुमच्याशी होत आहे तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता पण भीती पण वाटत

होती तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना. खरं तर या सगळ्यामध्ये चूक माझीच होती मी

स्वतःहून तुम्हाला माझ्याबद्दल सगळं सांगायला हवं होतं पण नाही सांगू शकले मी.

बाबांनी फक्त माझा विचार केला माझ्या आनंदाचा विचार केला त्यांनी. त्यात त्यांची काहीच चूक नाही कृपया आपण त्यांच्यावर रागवू नये तुम्ही तुमच्या

आयुष्यात पुढे जावं हीच माझी इच्छा आहे. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही

कारण मी तुमच्या आयुष्यातून, या शहरातून कायमची निघून जात आहे. मी कुठेही असले तरी प्रेम

मात्र तुमच्यावरच करत राहील हे नक्की. तुमची सौ तर नाही पण तरीही,

                                                                                 तुमची अनु


             

 अनुने असं का पत्र लिहिलं आहे मला. अनुराधा स्वतःला का त्रास करून घेत आहे मला ती हवी आहे माझी सहचारिणी म्हणून मला तुला

सांगायलाचं हवं आता मी नाही राहु शकत तुझ्याशिवाय आता. मला तुला भेटायचं आहे

काहीही करून, हे पत्र वाचून माझं डोकं बधीर झालं होतं ती का असं करते. एकदाही तिला मला

विचारावसं नाही वाटलं मला काय वाटतं ते. त्या दिवशी मी पूर्ण कोसळून गेलो होतो.

तडक मी तिच्या गावाला निघालो तिला आणायला. आज मला

माझी अनुराधा भेटणार होती. माझं प्रेम भेटणार होतं आज मला. मी आज सगळ तिला सांगणार

होतो की माझं किती प्रेम आहे तिच्यावर. मी नाही राहु शकत आता तिच्या शिवाय आणि आता

तिलाही शिक्षा भोगू देणार नाही मी. तिला मी माझ्या सोबत घरी घेऊन जाणार आता. आता

यापुढे नाही रडणार ती कधीच नाही ती आनंदी राहील हाच प्रयत्न करेल मी. 15

16 तास प्रवास करून मी शिरसगावला पोहोचल्यावर मी तिच्या घरी गेलो तर घराला कुलूप होतं. सगळीकडे

विचारलं मी पण कुणाला काहीच माहीत नव्हतं ना तिच्या आजूबाजूला ना तिच्या

नातेवाईकांना तिच्याबद्दल काही माहित होतं. मी सगळीकडे तिला खूप शोधलं पण ती मात्र

कायमची मला सोडून गेली होती. पूर्णपणे कोलमडून गेलो होतो मी काय करावे आणि काय करू

नये हे कळत नव्हतं मला. सावरता पण येत नव्हतं मला पण तरीही आई-बाबांसाठी सावरलं मी

स्वतःला, माझ्या आयुष्यात एक पोकळी तयार करून गेली अनु कायमची. खूप शोधण्याचा प्रयत्न

केला मी तिला पण ती कुठे आहे हे कळलेच नाही कधी. तिच्यापर्यंत जाण्याचे सगळे मार्ग

बंद करून टाकले होते तिने. मी मात्र तिच्या आठवणीत जगत होतो असा एक क्षण नाही

जेव्हा मला तिची आठवण नाही आली.आता या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली तरीही मी तिला

विसरू शकलो नाही ती माझ्यासोबत आहे हाच भास होतो मला. परत एकदा माझ्या घरी माझ्या

लग्नाची बोलणी सुरू झाली होती पण मला अनुराधा सोडून दुसरी कोणी नको होती आयुष्यात

पण आई-वडिलांच्या हट्टापुढे मी नतमस्तक झालो आणि शेवटी त्यांनी सर्व चौकशी करून

माझं लग्न सारिताशी करून दिलं. सरिता देखील चारचौघीमध्ये उठून दिसायची. तिला नावे

ठेवली जाईल अशी एक पण जागा नव्हती तिच्याकडे प्रत्येक गोष्टीत ती सरस होती आणि

मुख्य म्हणजे आई-बाबांनी पूर्ण चौकशी करून तिचं आणि माझं लग्न जमवलं होतं. लग्न

आमचं मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या रात्रीची मी तीन वर्षांपूर्वी वाट पाहत

होतो आणि ती रात्र परत एकदा माझ्या आयुष्यात आली होती पण यावेळी माझ्या समोर

अनुराधा नाही तर सरिता उभी होती पण मला मात्र माझी अनुराधा समोर दिसत होती. मी सतत

सरिता मध्ये माझ्या अनुराधेला शोधत होतो पण ती सरिता होती. सरिता हळूच माझ्या

बाहुपाशात सामावली पण तरी ही तेथे मला अनुराधेचा भास होत होता. काल रात्री मला

माझ्या स्वप्नात अनुराधा दिसत होती ती माझ्या खूप जवळ येऊन माझ्या पासुन खुप लांब

चालली होती खूप खूप लांब तेथून ती परत येणार नव्हती कधीच नाही. तिची सावली हळूहळू

लांब दूरवर कुठेतरी गायब झाली आणि मी मात्र घामाने चिंब भिजलो होतो, थरथर कापत जोरात अनुराधा म्हणून ओरडत होतो. माझ्या त्या आवाजाने माझ्या शेजारी

झोपलेल्या सारिताला जाग आली माझ्या त्या अवताराकडे बघून काही क्षण ती घाबरून गेली होती पण लगेच सावरत तिने

तिच्या साडीच्या पदराने माझा चेहरा पुसला आणि शांतपणे मला तिने झोपायला सांगितले.

पूर्ण रात्र मी तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेलो होतो दुसऱ्या दिवशीची सकाळ पण

थोडीशी आळसवल्यागत गेली. चहा वगैरे उरकून मी पेपर हातात घेतला. मला तोपर्यंत माहित

नव्हतं जोपर्यंत मी पेपर वाचला नाही की माझ्यावर कोणी तरी खूप प्रेम करत आहे

तिच्यासाठी मी तिचं सर्वस्व होतो, आयुष्य होतो तिने मला दिलेले वचन शेवटपर्यंत निभावली होतं

आणि आता मी मात्र पश्चातापाच्या आगीत होरपळून निघत होतो. आज पंचवीस वर्ष झाले या

गोष्टीला तरीपण मी हे विसरू शकत नाही ज्यात माझी पण चूक होती आणि त्या चुकीची

शिक्षा मात्र माझ्या अनुने अनुभवली होती. पेपर वाचल्यानंतर मी मात्र माझी शुद्ध

हरपली होती. पेपरमध्ये छापून आलेली बातमी माझ्या लग्नाचा दिवशीची होती. 


       लखनऊमध्ये एका तरुणीने स्वतःच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि तिचं

नाव अनुराधा कारखानीस होतं. माझी अनु मला कायमची सोडून गेली होती परत कधीही न येण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy