Prajakta Yogiraj Nikure

Romance

3.4  

Prajakta Yogiraj Nikure

Romance

पाऊस......तो आणि ती

पाऊस......तो आणि ती

5 mins
183


" तू कधी पाऊस पडताना पाहिला आहेस का ? " तिच्या अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाने क्षणभर तो ही गोंधळून गेला . काय उत्तर द्यावं हे कदाचित न कळल्यामुळे किंवा प्रश्न काय विचारला आहे हे न कळल्यामुळे तो तसाच तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला .

" नेमकं काय म्हणायचं आहे तुला मला कळलं नाही निट पाऊस पाहिला आहे का म्हणजे ........… नेहमीच तर बघतो ना आपण "

समुद्राच्या काठावर असलेल्या खडकावर खाली पाय सोडून दोघेही त्या अथांग शांत वाटणाऱ्या सागराकडे पाहत बसले होते. त्याच्यासाठी तिचे असे प्रश्न विचारण आश्चर्याच नव्हतं तरीही त्याने तिला अस विचारलं .

" म्हणजे बघ ना डोंगराच्या माथ्यावर उभं राहिल्यानंतर दिसणारा तो पाऊस किती अवखळ , अल्लड आणि निरागस वाटतो डोंगराच्या माथ्यावरून कोसळताना तो उन्ह सावलीचा खेळ आपल्यालाही त्याच्याकडे पाहायला भाग पाडतो . त्या डोंगरामागून हळूहळू डोकावणारे ते किरण........ त्यात लपंडाव खेळणारा पाऊस....... किती भारी ना....."

तिच्याकडे एकटक बघत तो विचारात पडला होता की तिला नेमकं काय सांगायचं आहे ते . त्याच तिच्याकडे अस बघणं तिला अजून वेड करत होत ती पुढे बोलतच जात होती .

" म्हणजे बघ ना डोंगरावरून पडणारा तो पाऊस आणि आता काही वेळापूर्वी पडून गेलेला पाऊस किती वेगळा वाटतो ना....."

वर नुकताच पाऊस पडून गेल्याने काळे ढग हवेने पुढे सरकत होते . जस काही अजून दुसऱ्या ठिकाणी त्यांना लवकर पोहचायचे होत कापसाच्या पुंजक्यासारखे पुढे पुढे सरकत सगळं आसमंत त्यांनी व्यापून टाकलं होतं . थंड हवेचा झोत अंगावर काटे आणत होता . समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज अजून वेड लावत होता आधीच ओली असणारी वाळू अजून ओली झाली होती . वातावरण शांत आणि थंड वाटत होतं कडाक्याच्या गर्मीनंतर पडलेल्या त्या पावसाने मनाला आणि देहाला शांत केलं होतं . तिला फक्त पावसात देहभान विसरून भिजणं माहीत होतं , मग तो पाऊस समुद्रकिनारी पडत असो वा इतर ठिकाणी पण त्याला तिचं अस देहभान हरपून पावसात भिजणं आवडत होत . तो मात्र कधीही त्या पावसात भिजायला गेला नाही तिचे प्रश्न आज त्याला वेगळे वाटत होते कसली तरी एक अस्वस्थता मनात दाटून येत होती... राहून राहून त्याला वाटत होतं काहीतरी हातातून निसटून जात आहे . तिचे प्रश्न त्याला आज अस्वस्थ करत होते तिच्या डोळ्यातील भाव आज त्याला वेगळे वाटत होते जस काहीतरी तिला सांगायचं आहे . न कळून त्याने तिला सरळ विचारले , " तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट सांग मला कळेल असं "

" म्हणजे बघ ना डोंगरावरून पडणारा पाऊस समोरच्या व्यक्तीला वेगळा दिसतो जो खाली उभा आहे आणि जो डोंगरमाथ्यावर उभा आहे त्याला वेगळा... डोंगरावर जमा झालेलं पाणी हळूहळू डोंगरावरुन खाली धो-धो करत वेगाने धबधब्याच्या रूपात खाली जात पण खाली उभं असणाऱ्या माणसाला तो फक्त धबधबा दिसतो त्याचा शांत प्रवाह मात्र लपून जातो "

" हे बघ मला तुझी ही फिलॉसॉफी नको सांगूस नेमकं काय सांगायचं तुला हे सांग "

" तुला माहीत आहे ना पाऊस आल्यावर मी माझं देहभान हरवून जाते कारण देहभान हरवून मी त्याच्यावर प्रेम करते देहभान हरवून प्रेम करण त्याने मला शिकवलं तेच प्रेम तू आहेस...... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते नेहमी राहील जोपर्यंत मी आहे "

" हो गं राणी मला माहित आहे ते पण तू आज अचानक उदास का झालीस तुझ्या डोळ्यात मला वेगळं काही दिसत आहे तू काही लपवत आहेस का माझ्यापासून "

" मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत... आपली ही भेट शेवटची भेट आहे यानंतर तू मला भेटणार नाहीस हे वचन दे मला प्लीज " घशात आलेला आवंढा तसाच गिळत दुसरीकडे बघत ती बोलत होती . तिला आपल्या बाजूने करत तो तिच्याशी बोलला .... " तू वेडी झाली आहेस का , प्रेम आहे म्हणतेस आणि लग्न नको काय आहे हा वेडेपणा...... काय झालंय नेमकं सांगशील का मला "

नजर चोरत ती बोलत होती ," मी नाही सांगू शकत "

" का नाही..... तुला सांगावच लागेल माझी शपथ आहे तुला सांग काय झालंय ते " थोडस चिडत तो बोलत होता .

" मला ब्रेस्ट कॅन्सर आहे लास्ट स्टेज....... मी फक्त काही महिन्यांची पाहुनी आहे या जगात आणि मला तुझं आयुष्य खराब नाही करायचंय . मला हे बरेच दिवसांआधी कळलं होतं म्हणून मी तुला भेटायला टाळत होते पण अजून नाही थांबवू शकले मी स्वतःला तुला शेवटचं पाहायचं होत म्हणून आज भेटले मी " तिचा आवाज आता रडका झाला होता आताही ती त्याच्याशी नजर चोरुनच बोलत होती .

पावसाने पुन्हा हजेरी लावली होती . धो-धो कोसळत त्या अथांग सागरात तो उलथापालथ घालत होता . शांत वाटणारा तो समुद्र प्रचंड लाटांच्या वेगाने हेलकावे खात होता त्या लाटांचा आवाज कानावर जोरात आदळत होता . शांत वाटणार वातावरण अचानक त्याला उदासीन वाटत होतं . त्याची ती काही दिवसांचीच सोबती आहे हे त्याला पटत नव्हते जीच्यासोबत संपूर्ण आयुष्य एकत्र घालवणार होता तो ती त्याला सोडून जाणार होती ती ही कायमची तो तिला जाऊ देणार नव्हता काहीही करून कारण तिचं पावसावर प्रेम होतं देहभान विसरून आणि त्याचं तिच्यावर अगदी तसंच...... एक निर्णय घेऊन त्याने तिचा हात घट्ट हातात पकडला . आज तोही त्या पावसात भिजत होता मनातील सगळं मळभ दूर करून तो मोकळा होत होता . पाऊस पण अधीर होऊन धो-धो कोसळत होता .

" रितं होतंय आकाश...

दूर करुनी मनातील मळभ ....

भेटायला आलाय धरतीला....

हा पाऊस .... "

कधी हसवणारा , कधी रडवणारा , कुणाला हवाहवासा वाटणारा तर कुणाला नकोसा असा पाऊस प्रत्येकासाठी वेगळा असतो पण तिच्यासाठी तो सगळं काही होता . त्याने तिचा हात तसाच घट्ट पकडून तिला विश्वास दिला त्या पावसाच्या साक्षीने.....

" मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही शेवटपर्यंत फक्त मी तुझाच आहे आणि तुझाच राहील यावर सुद्धा तू मात करशील फक्त माझ्यासाठी आणि फक्त हेच वचन

हवंय मला तुझ्याकडून.....एवढं करशील ना माझ्यासाठी "

त्याचा देखील आवाज रडका झाला होता थोडा .

" हम्म मी प्रयत्न नक्की करेल फक्त तुझ्यासाठी " त्याच्या नजरेला नजर भिडवत ती बोलत होती .

त्या अथांग सागरात पडणाऱ्या त्या धो-धो पावसात त्या दोघांनीही एकमेकांचा हाथ कायमचा हातात धरला होता कधी ही न सोडण्यासाठी .

( तुम्हाला ही छोटी कथा कशी वाटली हे नक्की सांगा )

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance