प्लेसमेंट
प्लेसमेंट


"हॅलो , निधी आवरलं का गं तुझं किती वेळ लागतो तुला आवरायला आवर ना पटापट नाहीतर इंटरव्ह्यूला जायला उशिर होईल " निशा
"हो झालंच आवरून आलेच 5 मिनिटात तू थांब खाली " असं बोलून निधीने फोन ठेऊन दिला .
निधी नुकतीच M.com झाली होती . अभ्यासात हुशार सामान्य ज्ञान सुद्धा उत्तम होतं हिंदी, मराठी उत्तम बोलत होती पण इंग्रजी बोलताना थोडं चाचरत असे तस इंग्लिश तिला येत नव्हत अस नाही पण बोलताना तिला शब्दच सुचत नसे आज 6 महिने झाले होते निधीला M.COM पूर्ण करून तरीही तिला पाहिजे तसा जॉब मिळत नव्हता . जॉबसाठी ती वेडीपिसी झाली होती कालच तिला एक कॉल आला होता की , आमच्या येथे Accountant साठी vacancies आहे . तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता का ? आणि फक्त फेस टु फेस राऊंडच होणार आहे . 15,000 सॅलरी असेल आणि डे शिफ्ट आहे सोबतच पिक अँड ड्रॉपची सर्विस पण आहे . निधीने लगेच होकार दर्शविला आणि आपल्या मैत्रिणीला निशाला याबद्दल सांगितले .
निशादेखील निधीबरोबरच एम.कॉम झालेली तरुणी. ती देखील हुशार होती आणि महत्वाचें म्हणजे ती देखील जॉब शोधत होती. निशा आणि निधी अगदी शाळेपासूनच्या मैत्रिणी होत्या आणि आहेत. कुठेही जायचे असेल तर त्या दोघी नेहमी सोबतच जात असे. तर आज त्या दोघीही इंटरव्ह्यूला जाणार होत्या आजतरी काहीतरी होऊ देत जॉबच अस म्हणत होत्या .
खाली निशा उभीच होती , "अगं किती वेळ आवरायला अशाने उशीर होईल ना आपल्याला जायला " हे ती एका वाक्यात बोलून मोकळी झाली आणि प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. " तू त्या कंपनीच नाव विचारलं का ? ती कोणती कंपनी आहे, त्यांचं प्रोफाइल काय आहे ? पत्ता व्हेरिफाय केला का तू ? एक ना अनेक प्रश्न विचारून निशाने निधीला भंडावून सोडलं "
" अगं हो हो सांगते आपण फायनान्स कंपनी मध्ये जात आहोत आणि पत्ता व्हेरिफाय केला मी पण त्या बिसनेस पार्कमध्ये त्या कंपनीची इमेज नाही दिसली . कदाचित कंपनीचे दुसरे ऑफिस असेल इंटरव्हूसाठी फक्त आणि त्यांनी वर्क लोकेशन चिंचवड सांगितलं आहे , समजलं" निधी
" हो गं माझी आई समजलं , आता बघू तेथे जाऊन काय होत ते " निशा. एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन त्या हसू लागल्या . बोलता बोलता त्या बसस्टॉपवर आल्या आणि आपल्या बसमध्ये चढून त्या ऑफिसपाशी आल्या . आजूबाजूच्या लोकांना पत्ता विचारून त्या त्या ऑफिसमध्ये आल्या ते ऑफिस कंपनीचे नाहीतर ते एक प्लेसमेंट ऑफिस आहे हे तेथे गेल्यावर त्यांना कळलं. फोनवर बोलणाऱ्या मॅडमने प्लेसमेंट ऑफिसचा कुठेही उल्लेख केला नव्हता आणि निधीने तस विचारलं नव्हतं पण ऑफिस खूप प्रशस्त होत तेथे 3 मोठ्या कॅबिन होत्या दाराजवळच रिसेप्शनिस्टचा डेस्क होता त्या डेस्कवर प्रसन्न मुद्रेने एका तरुणीने त्यांना May I help you ? असे विचारले. निधीने त्यांना इंटरव्ह्यूला आलो आहोत असे सांगितले तसे त्या तरुणीने त्या दोघींची ही नावे रजिस्टर मध्ये लिहून दयायला सांगितली त्यावर पत्ता, फोन नंबर , कोणाला भेटायचे आहे, नाव आणि सही करायची होती सर्व फॉरमिलिटी पूर्ण करून त्यांना तेथे बसायला सांगितले .
निधी आणि निशा तेथे सोफ्यावर बसल्यावर त्यांनी ते ऑफिस पूर्णपणे निहाळून घेतले . दाराजवळच असलेला तो रिसेप्शनिस्टचा डेस्क त्यावर बसलेली ती तरुणी खूपच लक्षवेधक होती . कोणाचेही लक्ष तिच्यावर खिळून राहील इतकी ती सुंदर होती . ऑफिसच्या डाव्या बाजूला 3 कॅबिन होत्या जेथे इंटरव्ह्यु घेणारे HR बसलेले होते आणि ते ज्या सोफ्यावर बसले होते तो सोफा बरोबर ऑफिसच्या मधोमध होता त्या सोफ्याशेजारी न्युजपेपर व्यवस्थित ठेवून दिले होते. शोभेकरिता तेथे फ्लॉवर पॉट ठेवलेले होते. ऑफिसमध्ये अगदी प्रसन्न वाटत होतं पण हे प्लेसमेंट ऑफिस आहे या गोष्टीमुळे त्या दोघींनाही पहिला शॉक बसला पण ऑफिस त्यांना छान वाटलं आणि त्यांच्यासारखेच बरेच जण तेथे इंटरव्ह्यूसाठी आले होते . त्यामुळे त्यांना फार काही वाटलं नाही .
थोड्यावेळाने निधीला इंटरव्ह्यूसाठी कॅबिनमध्ये बोलावलं गेलं . ज्या मॅम इंटरव्ह्यु घेत होत्या त्यादेखील खूप फ्रेश वाटत होत्या आणि त्यांची पर्सनॅलिटी देखील खूप आकर्षित होती . आत जाताना निधीने त्यांना May I come in mam ? असे विचारले त्यावर हसून त्या Hr मॅमने तिला आत बोलावले त्यानंतर तिला तिच्याबद्दल विचारले ते सर्व काही निधीने आत्मविश्वासाने सांगितले त्यानंतर त्या मॅमने Account शी रिलेटेड प्रश्न विचारले त्यावर न घाबरता निधीने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली . त्यावर त्यांनी छान देखील म्हटले त्यानंतर त्यांनी कंपनीची प्रोफाइल काय आहे हे समजावून सांगितले .
" निधी , तुझं वर्क लोकेशन चिंचवड असेल XPX Pvt Ltd मध्ये आणि कॅन्टीन्यू डे शिफ्ट असेल, सॅलरी 15,000 असेल , पिक अँड ड्रॉप सर्विस कंपनीची आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. फक्त आता एकदा कंपनीमध्ये जाऊन असाच एक इंटरव्ह्यू फेस करावा लागेल हे तुला मान्य असेल तर तस आम्ही कंपनीला कळवू शकतो ठीक आहे "
त्यावर निधीने होकार दर्शीविला त्यांच्या बोलण्याने ती इतकी भारावून गेली की काही शंकाच नाही आली तिच्या मनात. त्यानंतर त्या मॅमने तिला " तुला रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल " असे सांगितले यावर तिने का असे विचारले असता त्यांनी सांगितले की , "तू पुढे मागे हा जॉब सोडला तरी आम्ही तुला दुसरा जॉब लावून देऊ तेही लाईफटाइम आम्ही ही सर्विस तुला प्रोवाईड करू आणि त्यासाठी आम्ही काही नोट्स देखील तुला प्रोवाईड करू त्यातीलच प्रश्न तुला विचारले जातील आणि आम्ही त्यांना Employee प्रोवाईड करतो त्यासाठी ते आम्हाला काही अमाऊंट पे करतात " मॅम
, किती चार्ज भरावा लागेल " निधी .
"500 रुपये चार्ज भरावा लागेल तुला " मॅम
निधीने काहीही खातरजमा न करता 500 रुपये भरून टाकले आणि त्यांच्याकडून एक पावती घेतली आणि त्यांचा एक नंबर घेतला तिकडे निशानेही 500 रुपये भरले होते .
आता सगळे चांगले होईल या आशेने त्या दोघीही घरी परत आल्या दोघींनीही आठवडाभर होणाऱ्या इंटरव्ह्यूची जोरात तयारी केली आणि नंतर त्यांनी त्या प्लेसमेंट ऑफिसमध्ये फोन लावला परंतु फोन बंद आहे असे सांगण्यात येत होते त्या दोघीही सतत फोन करत होत्या पण फोन एकतर स्विच ऑफ आहे असे सांगण्यात येत होते किंवा फोन लागला तरी कोणीच फोन उचलत नव्हते. नंतर त्यांनी नेटवर त्या प्लेसमेंट ऑफिसची माहिती काढली तेव्हा त्यांना लोकांची मते लिहिलेली दिसली आणि त्यांच्या मतानुसार ते प्लेसमेंट ऑफिस एक फेक ऑफिस आहे हे कळले एका क्षणात काय झाले हे कळलेच नाही त्यांना पण आपण फसवले गेले आहोत हे मात्र त्यांना कळून चुकले आणि त्यांच्याप्रमाणेच अनेकजण यामध्ये फसले होते पण आता या दोघीही काहीही करू शकत नव्हत्या. त्यांनी त्या पत्यावर जाऊन बघायचे ठरवले पण ते ऑफिस तेथे नव्हते. आपण शिकून सुद्धा सारासार विचार न करता या प्लेसमेंट ऑफिसवर विश्वास ठेवला, आपण किती मोठा मूर्खपणा केला हे त्यांना समजले पण आता त्या काहीही करु शकत नव्हत्या. तश्याच हताश होऊन त्या घरी परत आल्या आणि निधीने एक गोष्ट मनाशी पक्की ठरवून ठेवली. आपण ज्या पद्धतीने मूर्ख बनलो त्याप्रमाणे इतर कोणालाही मूर्ख बनू द्यायचे नाही त्यांना याबाबत जागृत करायचे असे निधीने ठरवले आणि या निश्चयात तिची जिवलाग मैत्रीण निशादेखील तिची मदत करणार होती .