इडियट्स
इडियट्स
मैत्री म्हणजे काय रक्ताचं नातं नसतानाही रक्तापेक्षा घट्ट असलेलं नातं म्हणजे मैत्री, सुखदुःखात सोबत असणं, हसणं, चिडवणं, दंगामस्ती करणं, रुसवे-फुगवे करणं, कधी आई-वडील होऊन समजावून सांगणं तर कधी लहान भावंड होऊन हट्ट करणं, कधी मोठे बहिण-भाऊ होऊन कान पिळणं असो. मैत्री श्वास आहे तिच्या शिवाय काहीच नाही ज्या गोष्टी आपण इतरांना सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो . लहानपणापासून आपण मैत्री करायला शिकतो तशी ती शिकवावी लागत नाही ती होतेच. मैत्री आपल्याला जगायला शिकवते, हसायला शिकवते, प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणीही असायलाच हवेत माझ्याही आयुष्यात असे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार आपल्या सगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत मला समजून घेतलं आहे दर वेळेस काहीतरी नवीन शिकवलं आहे त्यातले बरेच जण आज भेटत नाही पण तरी देखील ते आठवणीत आहेत आणि कायम राहतील शाळेच्या मैत्रिणी तर फक्त आता व्हाट्सअप आणि फेसबुकवर संपर्कात आहेत प्रत्यक्षात मात्र त्यांची भेट होत नाही तरीही एक मैत्रीण अशी आहे बालवर्गापासून ते आजपर्यंत माझ्यासोबत आहे जीवाला जीव देणारी आहे , थोडीशी आळशी, झोप जरा जास्तच प्रिय असणारी , कधीही वेळेवर हजर नसणारी, तुम्ही कितीही फोन करा पण कधीच लवकर न उचलणारी आवराआवरी करण्यात उशीर करणारी अशी ही पण तरीही स्वभावाने शांत असणारी , फारशी मस्ती न करता आमचं सगळं गुपचूप ऐकून घेणारी, आम्हाला जीव लावणारी अशी भारती . भारती आणि मी जेव्हापासून शाळेत जायला लागलो तेव्हापासूनच्या घट्ट मैत्रिणी नेहमी शेजारी शेजारी बसायचो अगदी कॉलेजमध्ये देखील. प्रत्येक गोष्टीत सोबत , फिरायला तर एका पायावर तयार, कधीकधी आमची भांडणे सुद्धा खूप वेळा झाली पण ती तात्पुरती फार काळ नाही टिकली ती . आमच्या ग्रुपमधील सर्व एकत्र आले की बऱ्याचदा तिला नाही तर मला टार्गेट केलं जातं मस्तीसाठी, स्वयंपाकामध्ये आणि घर कामामध्ये आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये हुशार असणारी अशी ती, झाडांची खूप आवड असणारी, आज पर्यंत तिने खूप झाडे लावली आहेत तिच्या घरी. तिच्याकडून आजपर्यंत मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. कळत नकळत आजपर्यंत तिने खूप गोष्टी मला शिकवल्या आहेत अशीच एक दुसरी मैत्रीण तिची आणि माझी भेट जुनियर कॉलेजला झाली सडपातळ उंचीला मध्यम हवा आली की लगेच उडून जाईल अस आम्ही सतत तिला चिडवत असतो पण तरीही ती काहीही मनावर न घेणारी उलट दिवसेंदिवस डायटिंगवर असल्याप्रमाणे बारीक-बारीक दिसणारी , जराशी नाजूक, मस्तीखोर, भांडण करायला खूप आवडणारी, फिरायला शॉपिंगला जायला तर एका पायावर तयार असणारी, जराशी अवखळ अल्लड असणारी, निरागस वाटणारी पण तशी नसणारी, थोडीशी फोटोहोलिक असणारी पण खूप गोड असलेली मैत्रीण म्हणजे हिरा .
स्वयंपाकात आणि अभ्यासात हुशार असणारी अशी ही, नेहमी टिंगल-टवाळी करणारी, मस्तीच्या मूडमध्ये असणारी आणि खाण्याची प्रचंड आवड असणारी तरीही तब्येत न सुधारणारी माझी जीवाभावाची मैत्रीण. आतापर्यंत कायम माझी साथ देणारी मला समजून घेणारी अशी आज पर्यंत बर्याच ठिकाणी आम्ही एकत्र फिरलो आहे अनेक ठिकाणं पालथी घातली आहेत एकत्र फिरलो आहे मस्ती केली आहे बऱ्याच प्रसंगांमध्ये मला तिचे प्रत्येक वेळेस वेगवेगळे पैलू दिसून येतात जीवाला जीव देणारी आणि प्रत्येकाला त्या त्या वेळेनुसार समजून घेणारी त्यांना कायम साथ देणारी . अशी ही पण मनाप्रमाणे नाही झालं की लगेच चिडणारी सुद्धा पण तरीही खूप चांगली मैत्रीण, अशीच आणखीन एक मैत्रीण तिच्याबद्दल काय सांगणार मी आमच्या ग्रुपमधली चुलबुली गर्ल, सगळ्यात जास्त मस्ती करणारी आणि फोटो शूट करायला कुठेही तयार असणारी अशी ही. फोटो कसे काढायचे आणि कशा पोझ द्यायच्या हे तिच्याकडून शिकायला हवे तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्यांकडून शिकण्यासारख्या. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी म्हण तंतोतंत लागू पडणारी अशी माझी जीवाभावाची मैत्रीण उषा. कधी हट्ट करणारी, कधी रुसणारी भांडणारी अशी आमच्या ग्रुपमधील डोरेमॉन, सगळ्यांची खूप काळजी घेणारी, खाण्यापिण्याची प्रचंड आवड असणारी अशी ही उषा. उषासुद्धा माझ्या शाळेमध्ये होती पण तरीही माझी आणि तिची ओळख नव्हती पण खरी ओळख आणि घनिष्ठ मैत्री आमची सिनिअर कॉलेजला झाली. सतत बडबड करणारी फिरायला खूप जास्त आवडणारी अशी ती गोड मैत्रीण . कॉलेजमध्ये या ग्रुपमध्ये शिवानी ज्योती गौरी या सुद्धा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या पण त्यातील दोघींची लग्न झाल्यामुळे त्यांची आणि आमची आता फारशी भेट होत नाही . प्रत्येक ग्रुप मध्ये जर अशा चित्रविचित्र सगळ्या स्वभावाच्या मैत्रिणी असतात तशाच या आहेत मैत्री कशी निभवायची , मैत्री काय असते हे आपण एकत्र राहिल्यावर समजतं. आम्ही सर्वांनी एकत्र पूर्ण पुणे पालथं घातलं होतं सीनिअर कॉलेजमध्ये असताना , खूप दंगामस्ती केली होती, सोबत अनेक आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालविले होते, मित्र-मैत्रिणी सुद्धा आपले गुरुच असतात. प्रत्येक वेळी त्यांच्यातील अनेक पैलू आपल्याला वेळेनुसार दिसतात आज आम्ही चौघी सोबत आहोत भारती, हिरा, उषा आणि मी पण बाकी मैत्रिणींची पण कमतरता जाणवते, कुठे जाताना मस्ती करताना आनंद सांगताना टचकन डोळ्यात पाणी येतं आणि परत एकदा ते जुने क्षण जिवंत होतात. कॉलेज संपल्यानंतर आम्ही चौघी खूप ठिकाणी फिरलो भटकंती केली तिथल्या खाद्य संस्कृती जाणून घेतल्या. खाण्याच्या बाबतीत आम्ही चौघीही खवय्या हीच एक सारखी बाजू आहे बाकी सगळ्या गोष्टी विरुद्ध तरीही जिवाभावाच्या मैत्रिणी. सपना, सोनी, पूजा, रंजना, सुवर्णा, रवीना, सारिका, भाग्यश्री, श्रद्धा ,संध्या, अश्विनी, कोमल यांच्यासारख्या मैत्रिणी माझ्या आयुष्यात आहेत ह्या सारख भाग्य खरच माझ नाही अशा अनेक मैत्रिणी जोडून ठेवल्या आहेत पण त्या सगळ्यांची नावे लिहिता येणार नाही व त्या सर्व जणी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. या मैत्री दिनानिमित्त मी माझ्या सर्व मैत्रिणींना खूप मिस करते तसं तर त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे पण सांगता येत नाहीये फक्त एवढच म्हणेल ही मैत्री अशीच राहू द्या कायम. रक्तपलीकडच आपलं नात आहे ते असचं सहजासहजी नाही तुटणार ते .