Sangita Tathod

Horror

4.0  

Sangita Tathod

Horror

रंभा आणि वाडा

रंभा आणि वाडा

17 mins
265


सुमन लालीला आवाज देते ,"लाली ,चल ना शेतात .उदया बाजारात काकड्या न्यायच्या आहेत. आणू पटकन तोडून .आज सोबतीला ,कोणी नाई .चल बरं लवकर ."

" आई ,मला ऊन ,लागलं वाटत .अंगाला ताप आहे .आजच्या दिवस राहू दे .उद्या जाऊ दोघी."लाली" तू थांब घरीच .तापाची गोळी घे .माझी घराची काम आटोपली .मी पटकन जाऊन येते .जेवढ्या जमतील तेवढ्या काकड्या आणते ."सुमन

"आई ,जरा सांभाळून रहा .एकटी आहेस ना ?" लाली सुमन आज घाईने एकटीच शेतात जाते.दोन तिन तास काम करून पटकन बाराच्या आत घरी येऊ असा विचार करत ती रस्त्याला लागते शेतात पोहचल्यावर.झपाट्याने हात चालवत काकड्या तोडू लागते. लालीचा अंगात ताप भरल्याने तिचा डोळा लागतो. बाबाच्या आवाजाने जाग येते.दुपारचे तीन वाजलेले असतात .

"लाली ,आई कुठं गेली ? चल वाढ बरं तुच ,फार भूक लागली ."सुरेश लालीचा बाबा म्हणतो . लालीचा ताप उतरल्याने, ती उठून सुरेशला वाढते. मनात आईचा विचार सुरू असतो. आपण झोपलो होतो ,म्हणुन गेली असेल शेजारी काकी कडे . संध्याकाळ होते तरी सुमानचा पाय घरात नाही म्हणून लाली शेजारी चौकशी करते तर ,ती तिथेही नसते .

घाबरून ती सुरेशला सांगते .तिचा भाऊ सदू आणि ती गावभर सुमनला शोधतात .पण कुठेच सापडत नाही . आता सुरेशला घाबरायला होते. आता बाहेर चांगलाच अंधार दाटला होता. बघता बघता सुमन बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरते. चौकशीसाठी तिच्या घराबाहेर चांगलीच गर्दी जमते. शेवटी गावचे पोलीस पाटील म्हणतात ,"सुरेश ,आता जास्त वाट पाहण्यात अर्थ नाही .तू ,सोबतीला पाच सहा जवान घे .आपल्या साऱ्या जंगलात शोध घे सूनबाईचा . बॅटरी, कंदिल, मोबाईल ,काठ्या घेऊन सुरेश सोबत पाच -सहा जनांची टिम निघते .नदीचा काठ, सर्व शेत, गावाबाहेरचे पडकी मंदिरे सगळीकडे सुमानच शोध घेतला जातो ,पण नाही सापडत .हताश होऊन सर्व पहाटे पहाटे गावात परत येतात. सुरेश तर आल्या आल्या मटकन खालीच बसतो .कोणाशी एक शब्दही बोलत नाही. घरदारावर अवकळा पसरते. शेजारची काकी चहा आणून देते.तिघे दोन घोट चहा पितात. तिच जेवण आणून देते. पण कोणाच्या गळ्याखाली एक घसही उतरत नाही. आपण अस बसुन राहिलो तर ,लेकरं काय करतील ?

म्हणुन सुरेश स्वतः दोन घास खातो ,लेकरांना जबरदस्ती चारतो . हात धुवायला अंगणात येतो तर , गावातला चंदू धापा टाकत त्याच्याकडे येत असतो ."सुरेश भाऊ, सुमन वहिनी ,बाभूळ बनाच्या वनात आहेत .मी त्यांना घरी चला म्हटलं तर, मला ओळखले नाही त्यांनी ."चंदू सुरेश दोन घोट पाणी पितो , आणि चंदू सोबत निघतो ."बाबा कोणाला तरी सोबत न्या ."लालीचा आवाज सुरेशच्या कानावर पडत नाही .लाली शेजारी ही बातमी सांगते .गावातील आणखी दोघे चौघे सुरेशच्या मागे जातात. हिरव्यागार साडीत कपाळावर भलं मोठ कुंकू, हातात हिरवागार चुडा ,पायात मोठाले पैंजण आणि डोळ्यात कोरभर काजल मानेवर केसांचा अंबाडा अशा थाटात सुमन ,सुरेशच्या नजरेस पडते .या आधी असा नखरा केलेला त्याने तिला कधीच पाहिले नव्हते .रात्रभर कुठे राहून आली - - -?

सुरेशच्या डोक्यात संतापाची तिडक उठते .तिचा रागाने हात पकडून ,एक कानाखाली वाजवायचा विचार तो करतो .तिचा भयंकर रागाने हात पकडतो ,दुसऱ्या हाताने मारणार असतो .पण - - -- - -

तिच्या डोळ्यातील ते भ्रमिष्ट भाव बघुन ,उगारलेला हात तसाच मागे घेतो .अगदी मनापासून काकुळतीने

म्हणतो ,"सुमन ,काय झालं तुला असं ?चल आधी घरी चल .हे असे भडक कपडे तुला अजिबात शोभत

नाहीत ." सुमन त्याचा हात सोडवते . सुरेशकडे अनोळखी नजरेने बघते आणि धावत सुटते ,जणू सुरेशला तिने आज पहिल्यांदाच बघितले आहे .इतर लोक या दृश्याने आश्चर्य चकीत होतात.तिला घरी चल म्हणणाऱ्या चुलत सासाऱ्यांच्या तोंडावर एक लागवून देते .तिला पकडणाऱ्या चार चार माणसांना ती आटोपता येत नाही. शेवटी गावातून बैलगाडी बोलावली जाते .त्यात बांधुन तिला गावात नेतात. तिला बघायला अख्खा गाव गोळा होतो .सुमनला बघुन लाली आणि सदुला रडूच कोसळते .कोणीतरी गर्दीतून म्हणते,"तिच्या लेकरांना करा तिच्या पुढे ,लेकरांना बघुन शुद्धीवर येईल सुमन."

"आई ,आई "करत लाली आणि सदू सुमानच्या पुढे उभे राहतात. पण ती स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना सुध्दा ओळखत नाही .सर्व लोकांच्या संमतीने सुमनला काही दिवस गावातील मंदिराच्या एका खोलीत बंद ठेवण्याचा निर्णय होतो .लाली या निर्णयाला विरोध करते. आईची मी पूर्ण काळजी घेईन ,ती कोणाला त्रास देणार नाही .असे ती वारंवार सांगतो .पण तिचे कोणी ऐकत नाही. त्या रात्री सुरेश ,मंदिराच्या आवारातच झोपतो. दुसऱ्या दिवशी सुमनची काय अवस्था आहे ,हे बघण्यासाठी लोक येतात तर, ती तिथे नसते. सर्व घरी जातात. सुमन ,सकाळची तिची काम करीत असते . सर्वजण सुमनकडे आ - वासुन बघतात. सुरेश त्यांना आत बोलावतो .सुमन चहा करते. सुरेश रात्री घडलेला प्रसंग सांगतो - - -

"रात्री ,मंदिरात बाहेर झोपलो .खुप उशिरा झोप लागली .पहाटे ,हिचा आवाज आला .भित भित तिच्या जवळ गेलो .मला या खोलीत बंद का केलं ?म्हणुन विचारत होती .आपल्या घरी चला .लाली ,सदू एकटे घरी असतील म्हणू लागली. मला दया आली .आम्ही दोघे घरी आलो . आल्याआल्या तिने अंगावरचे कपडे बदलले . तिच्या सकाळच्या कामाला लागली. काय झाल काहीच कळत नाही ." "जाऊ दे ,सुरेश देवानी चांगलं केलं .तुम्ही दोघे नवरा बायको कोणाचं वाईट करत नाही ना ? तुमचं भलच होईल ."सुरेशचे काका गावातील मंडळी आली तशी निघुन गेली . सुमन थोडी गप्प गप्प राहत होती .पण तशी

ठिक होती .त्यादिवशी पासून सुरेश तिला शेतात जाऊ देत नाही .शेतातील सर्व कामे तो एकटाच करतो .गरज पडली तर मजुर सांगायचा पण सुमनला शेतात येऊ देत नव्हता . सुमारे पंधरा दिवसानंतर , सुमन दुपारच्या वेळी गाईला चारा टाकायला गोठ्यात जाते . पुन्हा मागचाच किस्सा रिपीट होतो .भरदुपारी

गोठ्यात गेलेली सुमन परत येत नाही . संध्याकाळी पुन्हा शोधाशोध सुरू होते .यावेळी रात्रीचे शोधायला कोणी तयार होत नाही . सुमनचे आता त्या "लांडगा आला रे ,आला" या गोष्टीतल्या मुलासारखे झाले होते रात्रभर सुमानचा विचार सुरेशच्या डोक्यात चालु असतो .'असा ,सुखाने चाललेल्या आपल्या संसाराला कोणाची दृष्ट लागली असेल ?प्रत्येक सुख दुःखात साथ देणारी सुमन अशी का वागू लागली .अशी न सांगता अचानक कुठे निघुन जाते ?रात्रभर कुठे राहत असेल ?असं जर हिच नेहमी होत राहील तर ?

लोक सुमन बद्दल अफवा उठतील.मलाच नालायक समजतील .बायकोला ताब्यात ठेवलं नाही म्हणतील  बरं ,परत आल्यावर सुमनला काही विचारावं तर, बया काहीच आठवत नाही म्हणते . सुमनसाठी आता काहीतरी करावं लागेल .गावातील सर्वांत जुनी जाणती भागा आजी आहे .अशा प्रसंगी लोक तिचाच सल्ला घेतात .उद्याच भागा आजीला भेटलं पाहिजे. देवा ,सुमनला उदया सुखरूप घरी येऊ दे .' सुरेश देवाची मनापासुन प्रार्थना करतो आणि झोपी जातो . रात्री उशिरापर्यंत जागल्यावरही सुरेश सकाळी लवकर उठतो .सकाळचे नित्य कर्म उरकुन भागा आजीकडे जायला निघतो . जातांना लालीला संगतो ,"मी ,भागा आजीकडे आहो .सुमन आली तर मला कळव ." भागा आजीचा गावाच्या मध्यभागी मोठा

वाडा .तिच्या चार मुलांच एकत्र कुटुंब .आजी बैठकीच्या खोलीला लागुन असलेल्या खोलीत राहत होती . तिला भेटायला येणारे ,तिला तिथेच भेटत .सुरेश भागा आजीला भेटायला तिथेच जातो .गेल्यागेल्या पाया पडतो . आजी सुरेशला बसायला सांगते . "आजी, माझी बायको, सुमन - -" सुरेश "माहीत पडलं मला सुमन बद्दल "आजी "आजी ,आता काय करावं काही सुचत नाही . अशानी माझा संसार विसकटुन जाईल ."सुरेश "तू ,पहिल्यांदा अशी गेली ,तेव्हाच तिला  माझ्याजवळ आणायचं असतं ,पण आता घरी

अली की ,इकडे घेऊन ये .सुनबाई फेऱ्यात आलेली दिसते ."भागा आजी "यईल ना ,ती परत ?"सुरेश काळजीने विचारतो. "हो ,नक्की येईल ,पण तरीही शोध सुरू ठेव . गावाच्या वेशीतच येईल वापस ."आजी सुरेश चंदूला घेऊन सरळ शेतात जातो . आधी कांद्याला पाणी देऊ अन लगेच सुमनला शोधायला निघु असा विचार तो चंदूजवळ बोलुन दाखवतो .दोघे शेतात येतात. चंदू जरा आंब्याच्या झाडाखाली बसावं म्हणुन तिकडे जातो ,तिथे सुमन काहीतरी खोदताना त्याला दिसते .तिचा अवतार बघुन त्याच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत .कसातरी

"सुरेश भाऊ ,वहिनी ,वहिनी "असे जोरात ओरडतो .त्याचा घाबरलेला आवाज ऐकुन सुरेश लगेच धावत येतो . लालभडक साडी, केस मोकळे कपाळावर मळवट ,डोळे रागाने लालबुंद झालेले अंगावर अनेक ठिकाणी जखमा त्यातुन रक्त वाहते,अशा अवतारातील सुमन ,जोरजोराने माती उकरत होती ."सुमन "असा हळूवार आवाज सुरेश देतो .हातातील मातीचे मोठे ढेकूल सुमन त्याला फेकुन मारते आणि आणखी त्वेषाने माती उकरू लागते .

"चंदू ,पटकन ,बैलगाडी आणि गावातुन एक दोन जणांना घेऊन ये .येतांना भागा आजीला सुमन सापडल्याचा निरोप सांग ." सुरेश भागाआजीच्या सांगण्यावरून सुमनला वेशी वरच्या आसरा मातेच्या मंदिरात नेतात . भागाआजी तिथे हजरच असते .आजी देवीला ओटी भरते .सुमनच्या मस्तकावर अंगारा

लावते .जबरदस्तीने तिचे मस्तक टेकवते . तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवते. "सुनबाई, पहिल्या वेळी गेली ,तेव्हा पौर्णिमा होती .कुठ गेली होतीस बाई - ?असा भरला संसार सोडून ?कोण्या हडळीने नेलं होत तुला नादी लागून ." भागा आजी. सुमनला बघण्यासाठी मंदिराच्या आवारात बरीच गर्दी जमते .आता सुमन काय सांगते याकडे सर्वांचे कान लागतात .वातावरण एकदम शांत होऊन जाते . सुमन भागा आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागते .रडून मन शांत झाल्यावर उठून बसते .पदर नीट करते आणि म्हणते, "मी ,शेतात काकड्या तोडायला गेली होती. एकटीच होती त्या दिवशी .काकड्या तोडता

तोडता मला आवाज आला .सुमन आज तू एकटीच आहेस ना ?बघ मी तुला मदत करायला अली .दुपारचे बारा वाजले होते . लाली घरी तापाने पडली होती ,तिचे बाबाही घरी नव्हते .मला वाटले आली असेल गावातली कोणीतरी मी एकटी दिसल्यावर मदतीला . ती भराभर काकड्या तोडत होती .'ये माझ्या

माग ,ये माझ्या माग 'म्हणत होती . मी भुरळ पडल्यासारखी तिच्या मागे जात होती .खुप पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आले ,आपलं गाव, आपलं शेत खुपच मागे सुटलं आहे .मी घाबरली .तिला विचारले की ,कोण आहेस तू,? मला कुठे नेत आहेस ?तेव्हा ती विचित्र हसली .मला आणखीच भीती वाटली .

मग ती म्हणाली की ,'सुमन आता तू ,घरी नाही जाऊ शकत ,चल माझ्याबरोबर .''तिच्या बोलण्यात जरब होता . मग तिने माझी बखोटी धरली .आम्ही दोघी .हवेतून शेत ओलांडत होतो. नंतर खुप वेळाने तिने मला जमिनीवर आदळले .समोर एक मोठा दगडी वाडा होता . आजूबाजूला सामसूम .तिनेच मला हिरवी

सुंदर साडी नेसवली ,माझी तयारी करून दिली. मला म्हणाली की ,या वाड्यात जा .तिथं रंभा नावाची एक बाई आहे ,बाई कशाची - -?

चेटकीणच आहे ती ! तिची नजर चुकवून तिथं असलेल्या शुभम नावाच्या छोट्या मुलाला बाहेर घेऊन ये .हं - - पण याद राख. तुला हे काम करावंच लागेल .जर तू शुभमला बाहेर आणू शकली नाहीस तर - - तर ती रंभा तुला वाड्यातच कैद करेल मग तुला तुझा नवरा ,तुझी लेकरं कधीच दिसणार नाहीत .'

त्याही परिस्थितीत मी तिला विचारले की ,'मी त्या वाड्यात जायला नाही म्हटले तर ?' तिने जोरदार माझ्या कानावर एक मारली  आणि म्हणाली ,'तू माझ्या ,शुभमला  आणायला नाही म्हणतेस ? हालहाल करील

तुझे ?माझ्यासोबत रानोमाळ फिरविण तुला . घरी जाऊ देणार नाही .तुझ्या सारख्या कित्येक

फिरतात माझ्यासोबत .चल उशीर करू नकोस जा पटकन वाड्यात .' मी घाबरतच वाड्यात शिरले .आतुन खुप मोठा होता वाडा .जागोजागी जाळे लागलेले . वटवाघूळ फिरत होते ,इकडे तिकडे .खुप

मोठ्या रिकाम्या खोल्याच खोल्या होत्या .या एवढ्या मोठ्या वाड्यात शुभमला शोधायचे

कसे ?एक एक खोली पार करत पुढे गेली . एका खोलीत मला काहीतरी हालचाल दिसली. आत डोकावुन पाहिले .एक तिन चार वर्षाचा मुलगा खिन्न मनाने माळेत मणी ओवत होता . मी क्षणात ओळखले ,हाच शुभम आहे .त्याला कडेवर उचलले ,आणि धावत सुटली . बाहेर जाण्याचा रस्ता कुठे आहे ? हे माहीत नव्हते ,फक्त धावत होती .वाड्याचा मोठा दरवाजा दिसला तसा जीवात जीव आला .

बस्स - - आता यातुन बाहेर पडली की झाले . तेवढ्यात त्या रंभाला आमची चाहूल लागली .

ती ओरडली ,'त्या सटवीच्या पोराला नेऊ ,नकोस ,फार महागात पडेल .' रंभा माझ्या

मागे धावत येत होती मी मागे वळून बघितलेच नाही.मी फक्त जीवाच्या आकांताने

धावत होती .शेवटी एकदाची मी शुभमला घेऊन वाड्याच्या बाहेर आली .रंभा दात ओठ

खात वाड्यात परत गेली . शुभमला बघुन तिला खुप आनंद झाला . त्याला तिने चांगले कपडे घातले .त्याला स्वतःच्या हाताने चांगले चांगले पदार्थ खाऊ घातले .त्याचे खुप लाड केले .त्याच्या सोबत खेळली सुध्दा .तेव्हापर्यंत सूर्य मावळतीला आला होता .नंतर ती काय करते काय माहीत ? शुभम मरून पडतो . ती हसत हसत त्याच्यावर अंतिम संस्कार करते .स्वतःच्या मुलाच्या मरणावर तिचे ते भेसूर हसणे खूपच अमानवी वाटते .'सुटला बिचारा एकदाचा 'असे म्हणुन मला म्हणते ,'चल तुला आता तुझ्या वेशीत

सोडते .' येतांना ती खुपच खुश असते .गाणी गुणगुणत असते .बाभूळ बनात मला सोडून ती गायब

होते .रात्रभर मी तिथेच भटकत असते .माझं भितीने आणि त्या विचित्र घटनेने भान हरपते . मी वेड्यासारखी वागू लागते .गावात आल्यावर काय घडलं हे तर तुम्हाला माहीतच आहे .मला हे सर्व आठवत होत .पण ते आठवले की माझं डोक भयंकर दुखायचे म्हणुन मी ,आठवत नाही असे मुद्दाम खोट सांगत होती ." सुमन सर्व एका दमात सांगते .बोलताना तिला आता धाप लागते .सुरेश समोर येतो .

आजीला म्हणतो ",आजी ,आता घरी जाऊ का आम्ही ?" "नाही सुरेश ,तिला ,आजच सर्व सांगावं लागेल .

त्यावरून पुढे काय करायचं ते ठरवता येईल ." भागा आजी .आजी सुमनला पाणी देते.

सुमन पुढे सांगु लागते . त्यादिवशी अमावस्या होती .बरोबर पंधरा दिवसा नंतर ची गोष्ट .मी गोठ्यात गाईला चारा टाकायला गेली .तोच आवाज मला बोलावत होता .मी तिच्या मागे गेली .आता मी तिला

ओळखले होते ,पण कसे कुणास ठाऊक आताही मी गेली .तिने त्याच वाड्याच्या बाहेर मला आदळले . लाल रंगाची साडी नेसवली ,माझे केस मोकळे सोडले .मला म्हणाली ,"माझ्या, गुड्डूला लाल रंग खुप

आवडायचचा तू तिच्या समोर याच रंगात जा . तिला सोडवून आण .पुन्हा सांगते ,"माझ्या गुड्डूला आणले नाहीस तर ,तुला तुझे घरदार नवरा ,पोर कधीच दिसणार नाहीत ." आत काय आहे याची मला कल्पना आली होती .मी भराभर गुड्डूला शोधत होती .पूर्ण वाडा पालथा घेतला पण गुड्डू सापडली नाही. शेवटी मागच्या बाजुला एक दार दिसले .त्यातुन बाहेर गेली .सात आठ वर्षाची गुड्डू विहिरीवर

पाणी भरत होती .तिचे इवले इवले हात त्या जाड दोराने राहाटाचे पाणी काढत होते .मी तिचा हात पक्का पकडला आणि म्हटले, "चल ,माझ्यासोबत "तिचा हात घट्ट पकडून मी शक्य होईल तितक्या लवकर नेण्याचा प्रयत्न करत होती .पण बया भलतीच द्वाड !तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता  . "तू कोण आहेस ? मला कुठे नेतेस ?' कितीदा म्हटलं तिला "चूप बस ,चूप बस ' पण ऐकतच नव्हती . अखंड बडबड सुरू , "ही रंभा आहे ना ,मला खुप त्रास देते . दिवसभर काम करायला लावते .जंगलातुन

प्राणी पकडून आणते ,त्यांना मारते .रक्त मला साफ करायला सांगते .कधी कधी तर विनाकारण मारते  .खूपच दृष्ट आहे ही रंभा. मी तिचं काम केलं नाहीतर शुभमला त्रास देते .'गुड्डू मला रंभा बद्दल सांगत होती . मला भीती वाटत होती ,गुड्डूच्या आवाजाने रंभा आली तर - - -? आणि झाले तसेच  चेटकीण का नाम लिया और चेटकीण हाजीर ! एकदम पुढ्यात उभी आमच्या. तिला बघुन बोबडीच वळली माझी ! देवाचे नाव घेऊन तिला चकवा देण्याचा प्रयत्न केला .चार पावले पुढे गेली नाही तर तिने मागुन माझे केस

ओढले .गुड्डूचा हात माझ्या हातातुन सुटला . ती रडायला लागली .रंभाची आणि माझी चांगलीच झटापट झाली .तिच्या लांब नखांनी तिने मला चांगलेच बोखरले .हे सर्व वाड्याच्या दरवाजाच्या बाजुला सुरू होते .मी गुड्डूला म्हटले ,"गुड्डू बाहेर जा .बाहेर तुझी आई  आहे ."आईचे नाव ऐकताच गुड्डू जोरात बाहेर जाण्यास पाळली .गुड्डू आपल्या हातुन सटकते आहे ,हे बघुन रंभा तिला पकडायला

जाते .या संधीचा फायदा घेऊन मी पण बाहेर पडते . गुड्डू आईला जाऊन बिलगते .ती गुड्डूचे पटापट मुके घेते ."माझ्या लेकीकडून किती काम करून घेतली त्या चेटकीनीने .सुकून गेली माझी लेक ." ती

ती गुड्डूला छान परीचा ड्रेस घालुन देते . तिच्या सोबत नाचते .तिला छान गोष्टी सांगते. अंधार पडायला येतो त्यावेळी भानावर येते. शुभम प्रमाणे गुड्डू वरही अंतिम संस्कार करते. मला म्हणते ,"चल तुला तुझ्या वेशीत सोडते ." तिची होणारी तारांबळ बघुन मीच तिला म्हणते ,"माझा ,आता तुझ्यावर विश्वास आहे. मला उद्या सोडलं तरी चालेल ." लगेच ती म्हणते,"असं ,बोलु नाही .तू जर रात्रभर माझ्यासोबत राहिलीस तर आमच्यातली होऊन जाशील ." मला तिच्या बोलणे कळत नाही .उशीर झाल्यामुळे ती जोरात आणते .मध्ये येणारे काटेकुटे माझ्या अंगाला लागतात .तिला मात्र काहीच लागत नाही .आपल्या शेतात ती मला आणुन सोडते .रात्रभर या अंगावरच्या जखमांची आग सहन करत आहे मी .या

विचित्र घटनेनंतर माझी शुद्धच हरपून जाते . "लय धीराची आहेस ,बाई सुमन तू ."

भागा आजी . नंतर सुमन घरी जाते .लाली, सदू ,सुरेश तिघेही सुमनची खुप काळजी घेतात .भागा आजी सुमनच्या जखमेवर लावायला झाड पाल्याची औषधी देते .चार दिवसात सुमन ठिक होऊन कामाला लागते . पुन्हा पौर्णिमा जवळ येते ,तशी सुरेशला सुमनची काळजी वाटते .तो सुमनला बाहेर

कुठेच जाऊ देत नाही .स्वतः कुठे गेला तर लालीला चार चार वेळा बजावून सांगतो .

"सुमनवर लक्ष ठेव "

पौर्णिमेच्या दोन दिवस आधी भागा आजी सुरेशला भेटायला बोलावते .सुरेश आजीकडे जातो .आजी त्याला एक धागा देते .तो सुमनच्या कमरेत बांधायला सांगते .एक अंगाऱ्याची पुडी देते .पौर्णिमेच्या दिवशी तो अंगारा तिला सतत लावायला सांगते .उरलेला अंगारा तिच्या पदराला बांध असे सांगते.

सुरेश सांगितल्याप्रमाणे सर्व करतो . त्या दिवशी सुरेश सतत ,तिच्या सोबत राहतो . तिला नजरेआड होऊ देत नाही .त्याच्या मनात भिती असते की ,आज पौर्णिमा आहे , सुमनला ती नेण्यासाठी नक्की येईल . पण आपण स सुमनला जाऊ दयायचे नाही . तो दिवस सुरळीत पार पाडतो .रात्रीचे जेवण करून सर्व झोपी जातात .सुरेशला हायसे वाटते . रात्री सुमन तहान लागली म्हणुन उठते . उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा माठ

अंगणात ठेवलेला असतो .ती पाणी पिते .

पाणी पिऊन झाल्यावर ती झोपायला जाणार तेवढ्यात ,"सुमन सुमन , बाहेर ये "असा

आवाज येतो .सुमन दार उघडले .तिच्या मागोमाग निघते .सुरेशला आवाजाने जाग येतो .उघडे दार बघुन काय समजायचे ते समजतो .बाहेर येऊन सुमनला शोधण्याचा निरर्थक प्रयत्न करतो .सुमन कुठेच दिसत नाही . ती सुमनला एका शेतात नेते आणि म्हणते ,"सूर्याची पहिला किरण येइपर्यंत तू येथेच थांब .रात्रीच मी तुला माझ्यासोबत नेऊ शकत नाही .तू कुठे पळून गेलीस तरी मी तुला शोधुन आणेलच .तुझं घर येथून खूप दूर आहे .मी पहाटे येईल ."सुमन त्या शेतात त्या रात्री एकटीच राहते .रातकिडे किर किर

करतात .जरा कुठे हवेची झुळूक ,आली की , दचकायला व्हायचे .पानांच्या सळसळ सुध्दा घाबरवून सोडायची.एकच दिलासा होता तो, फक्त पौर्णिमेच्या शितल चंद्राचा ! तिथेच  एका खोडाला टेकून सुमन बसते .त्याही परिस्थितीत सुमनचा बसल्याजागी डोळा लागतो . पहाटेच ती येते .सुमनला फरफटत

त्या वाड्याच्या बाहेर आणुन सोडते . आता कोणाला आणायला सांगते ही -? सुमन मनाशी विचार करते.

ती सुमनला आज पांढऱ्या रंगाची रेशमाची साडी नेसायला देते .मोगऱ्याचा गजरा तिच्या

केसांत मळते .आजीने दिलेली अंगाऱ्याची पुडी सुमन पदरात बांधायला विसरत नाही .

सुमनला ती म्हणते ,"आजचे काम जरा जोखमीचे आहे .तुला आज माझ्या मोहनला वाड्यातून घेऊन यायचे आहे . मोहन सहसा रंभेच्या नजरेसमोर असतो . तिची नजर चुकवून तुला हे काम करायचे आहे .

चल जा पटकन ,दिवस मावळायच्या आत तू आली पाहिजेस .नाहीतर रंभा तुलाही कैद करून ठेवेल ."

"मुलांच ठिक होत .शुभमला मी कडेवर उचलून आणले ,गुड्डूला हात पकडून आणले .पण

मोहनला कसे आणणार ?ते माझ्या मागे का येतील ?आणि त्यांनी नाही म्हटले तर ? सुमन

"तू ,फक्त मोहनला एवढेच म्हण ,बाहेर राधा तुझी वाट बघतेय .मग तोच तुझ्या मागे

येईल ." ती सुमन वाड्यात शिरते .आज वाडा छान सजवलेला दिसत होता .सर्व जळमटे काढलेली ,अत्तराचा सडा टाकलेला ,प्रत्येक खोलीच्या दरवाजाला मोत्यांची तोरणे ! शिवाय मागील दोन खेपेला निर्मनुष्य असलेल्या वाड्यात आज बरीच चहल पहल होती . सर्वत्र सजावट असली तरीही ,कुठेतरी त्या

सजावटीला भेसूरतेची किनार होती .सुमन हळूहळू आत सरकत राहते .दिसणाऱ्या गर्दीतून

मोहन कोणता असेल ?आपण तिला विचारले ही नाही त्याला कसे ओळखायचे ?त्या गर्दीत

कोणाला विचारावे ?तर आपल्याला ओळखले आपण यांच्यातले नाही ?रंभाला सांगितले तर ? ती पुढे पुढे जात राहते .दोन चेटकीणी मधील संवाद तिच्या कानावर पडतो . पहिली चेटकीण ,"आज ,मोहनची , सुरेल  बासरी ऐकायला मिळेल .जवळपास दोन वर्षांनी मोहन बासरी वाजवत आहे .." दुसरी चेटकीण ,"मी पहिल्यांदा ऐकेल .रंभाने मला बोलावले ,बरच झालं .नाहीतर आपल्या राज्यात कुठे करमणूक ?"

पहिली चेटकीण :"चल लवकर, रंभाच काही खरं नाही ,आपल्याला उशीर झाला तर - - ती आपल्याला हाकलून देईल ." सुमनला कळले मोहन कोणता आहे ते , त्याचा शोध घेत ,ती पुढे पुढे जात राहते .एका

मोठ्या सभागृहातून तिला बासरीचे मधूर सूर ऐकू येतात .ती धावतच त्या दिशेने जाते . त्या मोठ्या सभागृहात मोहन अगदी तन्मयतेने बासरी वाजवत असतो आणि रंभा तिथेच पायथ्याशी बसलेली असते .कमाल आहे तिनेही आज पांढरी साडी नसलेली असते .मोत्यांची दागिणे अंगावर चढवलेली असतात .केसात सुगंधी फुलांचा गजरा माळला होता .वस्त्र अलंकारांनी ती सजली होती .पण डोळ्यात

तिच्या राग होता ,बदल्याची भावना होती . प्रत्येक हालचालीतून अहंकार ,मग्रुरी जाणवत

होती .मागील दोन वेळा सुमनने रंभाला नीटसे पाहिले नव्हते .यावेळी ती रंभेला नीट

बघते . दोन तास होतात .बासरी वादन सुरूच असते .मध्ये कोणी एखाद गाणं म्हणते .

सुमनला चुटपूट लागते .कधी एकदाचा हा कार्यक्रम संपतो आणि ती मोहनला भेटते .

दारामागे उभे राहून तिचे पाय सुध्दा दुखायला लागतात .शेवटी मोहन म्हणतो ,"बस आता ,भयंकर थकलो मी .". रंभा जाण्याचं इशारा करते ,तशा सर्व चेटकीणी क्षणार्धात नाहीशा होतात .भल्या मोठ्या

सभागृहात आता फक्त रंभा आणि मोहन असतो .आता संधी मिळाली की ,पटकन मोहनला बाहेर काढता येईल .असा विचार सुमनच्या मनात सुरू असतो .मोहन नाही नाही म्हणत असतांनाही रंभा एकदा बासरीवर गाणं वाजव असा आग्रह करीत असते . "मोहन ,तुला बरं वाटावं म्हणुन थांब ,एक

औषध देते ."असं म्हणुन रंभा औषध आणायला जाते .हिच संधी बघुन ,सुमन ,मोहनजवळ येते ."तुला तुझी राधा बोलावते ," असे म्हणुन त्याचा हात पकडून त्याला  पळायला लावते . रंभाला दोघे पळताना

दिसतात ."आज ,त्या तू ,मोहनला घेऊन जाऊ शकत नाहीस .मोहनला त्या सटवीकडे जाऊ

देणार नाही ."रंभा रंभा सुमनला नखांनी रक्तबंबाळ करते .तिला त्या सभागृहात गोल गोल फिरवते.

सुमनला चक्कर येतात .रंभा जोर जोरात हसत सुमनला आणखी गोल फिरवते .आता या रंभाच्या तावडीतुन सुटायचे कसे ? शेवटी रंभा सुमनला खाली उतरवते ."बरं झालं तू माझ्या हाती सापडली .मला फुकटची दासी मिळाली . चल आता हा सभागृह साफ कर ."असे म्हणुन रंभा ,मोहनला घेऊन निघुन जाते . थोड्यावेळापूर्वी स्वच्छ असलेले सभागृह एका मिनिटांत घाणेरडा कसा झाला ?तो घाणेरडा

वास .तो रक्ताचा सडा स्वच्छ करता करता सुमनच्या नाकी नऊ येतात .मधे मधे रंभा

सुमन काम करते की नाही बघत होती .असे काम करत राहिलो तर ,काही खरं नाही - -?

काहीतरी करावेच लागेल .

काम करताना ,पदराने घाम पुसायला जाते .तिच्या हाताला भागा आजीने दिलेला

अंगारा लागतो .ती तो कपाळाला लावते .उरलेला तसाच ठेऊन मोहनला शोधायला निघते .मोहन एका अंधाऱ्या खोलीत राधा राधा करत बसलेला असतो .ती त्याला त्याच्या सोबत यायला सांगते .ते दोघे बाहेर

जाण्यासाठी धावत सुटतात .रंभा बघते .ती सुमनला मागे खेचते ,पण तिची जादू सुमनवर

चालत नाही .दोघे वाड्याच्या बाहेर पडतात . राधा त्यांची बाहेर आतुरतेने वाट बघत असते . राधाला बघुन मोहन आनंदाने रडू लागतो.

"आपली पुन्हा भेट होईल असे कधी वाटलेच नव्हते ." मोहन .

ते दोघे हातात हात घालुन कितीतरी वेळ

बोलत बसतात .नंतर ते सुमनलाही आवाज देतात . "सुमन तुला आज सर्व सांगतो आम्ही " राधा

"हा वाडा आहे ना ? हा आमचा होता .मोहनच्या  आजोबांकडे दिडशे एकर शेती होती .सज्जन असलेल्या आजोबांचे पंचक्रोशीत खुप नाव आणि दरारा होता .त्याच गावात रंभा आणि तिची आई राहत होती .रंभाची आई जादूटोणा करायची . काळी जादू करून लोकांना छळायची .हे आजोबांना

अजिबात आवडायचे नाही . रंभाला मोहन आवडायचा .रंभाची आई  आजोबांकडे दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाते . आजोबा याला स्पष्ट नकार देतात .रंभाची आई खुप विनवण्या करते .मी जादूटोणा करणे सोडून देईल म्हणते .पण आजोबांचा नकार कायम असतो . नंतर मोहनचे आणि माझे लग्न होते . आम्ही दोघे आमच्या संसारात खुश असतो .गुड्डू आणि  शुभमचा जन्म झाल्यावर आमच्यातील प्रेम आणखी बहरते .कालांतराने आजोबांचा मृत्यू होते ."

मोहन ,"इथूनच आमच्या सुखी संसाराला दृष्ट लागणे सुरू होते .रंभा तिच्या आईकडून सर्व काळ्या जादू

शिकुन घेते .मोहनला तिच्या जाळ्यात ओढते .तो कामधंद्यातील लक्ष काढुन टाकतो .भरभरून पिकणारी जमीन ,ओसाड बनते .माणसांनी गजबजलेला वाडा माणसाला पारखा होतो . गुड्डू ,शुभमवर, रंभा जादूटोणा करते . ती दोघे अचानक गायब होतात .वाडा रंभा ताब्यात घेते .

मोहन नशेत गर्क राहू लागतो .राधाला हे सर्व सहन होत नाही .ती वाड्यातील विहिरीत जीव

देते . पण त्याआधी ती शपथ घेते ,ज्या रंभाने माझा संसार उध्वस्त केला ,तिचा मी जिवंतपणी बदला

घेऊ शकली नाही ,पण मेल्यावर घेईल .रंभाच्या वाड्यात राधाला ,प्रवेश नाही म्हणुन राधाला तुझा

सहारा घ्यावा लागला .आज तुझ्यामुळे आम्हा चौघांना मुक्ती मिळाली .या पुढे आता तुला कोणताही

त्रास होणार नाही .रंभा आता वर्षानुवर्षे या वाड्यात एकटीच राहील ." राधा आणि मोहन ,सुमनला गावाच्या वेशीत आणुन सोडतात .सुमन सुखाने संसार करते . प्रत्येक अमावस्या ,पौर्णिमेला तो वाडा मात्र

सुमनच्या स्वप्नात येत असतो .



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror