Sangita Tathod

Others

3  

Sangita Tathod

Others

रम्य बालपण

रम्य बालपण

2 mins
200


मज आठवते आज

बालपण ते सुखाचे

दंगामस्ती, मौजमजा

दिन होते आनंदाचे


बालपणीचा काळ आठवला की, अजुनही मन आनंदाच्या झोपाळ्यावर बसून, तासनतास त्या गोड आठवणीत रममाण होते. ज्या दिवसांना दुःखाचा वारा शिवला नाही, ते दिवस कायम स्मृतीत राहतात. आजच्या काळाइतकी, मार्क्स मिळविण्याची स्पर्धा त्या काळात नव्हती, त्यामुळे मी बालपण खूप, छान प्रकारे उपभोगले आहे. एका तालुक्याच्या ठिकाणी माझे बालपण गेले. बाबा सरकारी नोकरीत होते. दर चार वर्षांनी  त्यांची बदली होत असे. एका भल्या मोठ्या वाड्यात दहा बारा कुटुंब भाडयाने राहत होतो.सर्वांचा एकोपा होता. माझ्याच वयाच्या दहा-वीस मुलामुलींचा आमचा ग्रुप होता. शाळा घरापासून जवळ होती. पाठीवर दप्तर टाकले की, एकमेकांना आवाज देत आम्ही शाळेत जायचो. परत येताना पुन्हा सर्व सोबत. घराच्या अगदी जवळ, बालाजीचे भव्य दिव्य मंदिर आणि मंदिराचा ऐसपैस परिसर, आजही नजरेसमोर येतो.


शाळेतून घरी आल्यावर फ्रेश झाले की, मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचो. नंतर तिथेच बाहेर मैदानावर आमचे खेळ चालत. असा एकही खेळ नाही, की जो, मी लहानपणी खेळली नाही. लागोऱ्या, डीग्गर,पाळापळी, विष अमृत, नदी की पहाड, क्रिकेट, कबड्डी, खो खो, कंच्या, चौफुल, कॅरम... हे सर्व खेळ आम्ही खेळत असू. खेळतांना बरेचदा भांडण होत असत, पण ते कधीच विकोपाला गेले नाहीत की, घरच्यांनी आमच्या भांडणात लक्ष दिले नाही. बरोबर सातच्या ठोक्याला मंदिरात आरती होत असे. ती आरती घेऊन मग आम्ही घरी परतायचो. आरतीनंतर रोज वाराप्रमाणे प्रसाद असायचा. मला शुक्रवारचे गूळ फुटाणे खूप आवडत, त्यामुळे शुक्रवारची आरती मी कधीच सोडायची नाही.


परीक्षा जवळ आली की, खेळणे बंद करून आम्ही सोबत अभ्यास करायचो. एकमेकांचे पाठांतर घेणे, तोंडी परीक्षा घेणे हे आम्ही आपसात करायचो. माझा गणित विषय

चांगला असल्याने मी इतरांना गणित शिकवायची. बरेचदा आमची डबापार्टी व्हायची. एकत्र भेळ बनविणे व्हायचे. भाद्रपद महिना आला की, महिनाभर बाहुल्या बसवत होतो. एकमेकींच्या घरी जाऊन गाणे म्हणणे, टिपऱ्या खेळणे, यात खूप मजा यायची. आजही बरीच गाणी माझ्या अगदी तोंडपाठ आहेत. दसऱ्याच्या आसपास मंदिराच्या मोकळ्या मैदानात दर दोन वर्षांनी रामलीला व्हायची. रामलीलेचे सात-आठ दिवस धमाल असायचे.


    ना. घ. देशपांडे प्रसिद्ध कवी, त्यांची नात माझी मैत्रीण होती. बरेचदा मी तिच्या घरी जात होती. ती घरापासून थोडी दूर राहात होती. पण आदरणीय ना. घ. देशपांडे आजोबा घरी असले की, आम्हा दोघींना ते बऱ्याच कविता म्हणून दाखवत. कधीकधी आमच्या पाठ्यपुस्तका तील कविता आम्हाला शिकवत. त्यांच्या तोंडून कविता ऐकली की, पुन्हा त्या कवितेची प्रश्नउत्तरे पाठ करायची गरज भासत नसे.


बाबांची बदली झाली. त्यानंतर बालपण घालविलेल्या गावी मला पुन्हा जायची संधी आजपर्यंत तरी मिळालेली नाही.


Rate this content
Log in